नातीगोती -समाजव्यवस्थेचे महावस्त्र भाग २

नातीगोती -समाजव्यवस्थेचे महावस्त्र भाग २


विषय -नातीगोती


आई जर नोकरी करत असेल तर मुलांना सांभाळण्यात आजी-आजोबांचा मोलाचा वाटा असतो. कारण नातवंड म्हणजे त्यांच्या दृष्टीने "दुधावरची साय"  "दुधापेक्षा दुधावरच्या सायीलाच जास्त जपावं लागतं. "या उक्ती नुसार आजी- आजोबांचा नातवंडावर जास्त जीव असतो. पण अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलं आजी-आजोबांच्या प्रेमाला मुकतात. कितीही पैसे देऊन आया ठेवली तरी घरच्या ज्येष्ठांसारखे प्रेम मुलांना मिळू शकत नाही. यासाठी सासू-सासरे यांच्या काही गोष्टी खटकत असतीलही पण त्या नजरेआड करून नाती सांभाळली तर ती नाती टिकतात. कोणीही दुखावले जात नाही.


मुलांच्या वडिलांना सुद्धा नोकरी करणाऱ्या आईची ओढाताण कळते. त्याला सुद्धा तुमच्या कामाची आणि आर्थिक योगदानाची माहिती असते ज्याप्रमाणे आई मुलांना जेवढी प्रिय असते तेवढेच वडीलही प्रिय असतात त्यासाठी नवऱ्याने सुद्धा मुलांना सांभाळणे, त्यांचा अभ्यास घेणे, घर कामात शक्य होईल तेवढी मदत करणे या गोष्टी जर केल्या तर आईला ही मोठी मदत होते. व  मुलांचा वडिलांबद्दलचा आदर वाढतो. आज-काल कुटुंब लहान झाली आहेत तेव्हा मुलगा, मुलगी किंवा भाऊ, भाऊ यांचे एकमेकांशी नाते कसे चांगले राहील असे योग्य संस्कार त्यांच्यावर असणे महत्त्वाचे आहे.


मुलांनाही फावल्या वेळात घरातील कामांमध्ये सहभागी करून घ्यायला हरकत नाही. त्यांना छोटी छोटी कामे स्वतःची स्वतः करण्यास प्रवृत्त केले पाहिजे म्हणजे हळूहळू स्वावलंबन ते शिकतील घरातील ज्येष्ठांचे तसेच बाहेरगावी राहणारे नातेवाईक जसे लग्न झालेल्या नंणदा, जावा -जावा, दीर, भासरे यांचे वाढदिवस, लग्न वाढदिवस लक्षात जर ठेवले, त्यांना प्रत्येक वेळी शुभेच्छा दिल्या तरी नातेसंबंधात माधुर्य टिकून राहते. घरातील ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करणे, त्यांना त्यादिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खायला देणे यामुळे सुद्धा नात्यांमध्ये दृढता येते अर्थातच या सर्व गोष्टी जरी छोट्या छोट्या वाटत असल्या तरी आवश्यक असतात. म्हणतात ना  "प्रेमाने प्रेम वाढते आणि द्वेषाने द्वेष. " म्हणून नात्यांमध्ये प्रेम ठेवणे केव्हाही इष्ट.


नवीन सून घरात आली की तिच्या काही इच्छा, अपेक्षा असतात आणि सासू व घरातील मंडळींना तिच्याकडून अपेक्षा असतात. दोन्हीकडून विचारांचा मोकळेपणा, देवाण-घेवाण असायला हवी. सुनेने मुलीप्रमाणे आणि जावयाने मुलाप्रमाणे वागावे असे वाटत असेल तर दोन्हीकडील आई-वडिलांनी मोठेपणा घेऊन त्यांना प्रेम, माया दिली पाहिजे. तरच नातेसंबंध मधुर होतील, मजबूत होतील. ननंद, भावजय ,जावा - जावा या नात्यातला गोडवा टिकून राहील. गोड बोलण्याने,समजूतदार स्वभावाने ,आणि प्रेमळ वागण्याने क्वचित प्रसंगी स्वतःकडे कमीपणा घेत एकमेकींना मदत केल्याने ही नाती अधिक फुलतात.


सर्वप्रथम नात्यातील स्त्रिया प्रथम एक मुलगी आहे. नणंदही कुणाची तरी वहिनी आहे. भावजय सुद्धा कुणाची तरी मुलगी आहे हे लक्षात ठेवले तर एकमेकींमधील संबंध चांगले राहू शकतात. संकट प्रसंगी सुखदुःख वाटून घेण्यासाठी ही नाती महत्वाची ठरतात. कारण घरातच तुम्हाला आधार, प्रेम,सहानुभूती मिळू शकते .सर्वात महत्त्वाचा नातं म्हणजे नवरा बायकोचं. ते नातं टिकवण्याचा, फुलवण्याचा दोघांनीही प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. अलीकडे जगण्याच्या धावपळीत  नव्यानं फुलू शकणारं आणि नवीन दिसू शकणारं हे नातं रोजचं आणि तेच तेच होतं. नवरा बायकोचं नातं हे रक्ताचं नसतं पण हे एकच नातं असं आहे की ज्यामुळे रक्ताची नाती जन्माला येतात. म्हणूनच दोघांनीही नातं जपण्याला विशेष महत्त्व दिले पाहिजे. नातं तोडण्यापेक्षा नातं जपणं हे खूप अवघड असलं तरी खरं सुख आणि समाधान त्यातच असतं.

पुढील भाग अवश्य वाचा.

क्रमशः

सौ. रेखा देशमुख


🎭 Series Post

View all