नातं..

नातं पांडुरंगाशी..


#नातं
©स्वप्ना..
" हे बघ दहा पोळ्या झाल्या की गॅस,ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा,..तो खरकटा ओटा आवडत नाही मला,..आणि आता इकडे ये हॉलमध्ये,..हे बघ हे सगळं फर्निचर स्वच्छ पुसायचं, झाडू,फारशी ठरल्याप्रमाणे करायची आहेच,..काकु तिला सगळं तावतावाने सांगत होत्या,..ती मात्र हरखली होती,..एवढं सुंदर घर असतं किती प्रसन्न वाटतंय इथे अगदी आपल्या घरी आजी विठ्ठलाची पूजा करायची तेंव्हा वाटायचं तसंच,.. गावाकडून येऊन पहिल्यांदाच कामाला लागणार होती ती,....
गावी आजी वारली मग आजोबांनी त्यांच्या बहिणीकडे पोर आणून सोडली, काहितरी शिवणकाम शिकवू म्हणाले,पण उरलेल्या वेळात माझ्या ओळखीच्या घरी काम आहे असं बहिणीने सांगितल्यावर आधी आजोबांनी विचारलं,.."चिऊ कामं करशील का बेटा,..? तशी पोळ्या फार छान करते चिऊ म्हणत आजोबांनी डोक्यावर हात फिरवला,.."
चिऊ म्हणाली,"आवडलं तर करेल."आत्याआजी हसून म्हंटली होती,"काय आवडलं तर काम की माणसं,.."
चिऊ म्हणाली होती,"घर..घर आवडायला पाहिजे मला.."
आताही चिऊला ते आठवलं,.. घर खरंच छान आहे एक वेगळाच विश्वास वाटतोय आपल्याला एक वेगळी प्रसन्नता,..नेमकी कशाने?,..चिऊने मनाला विचारलं आणि परत त्या ईशान्य कोपऱ्यात बघितलं,..तो आताही मस्त हसत होता,..मी आहे असं डोळ्यांनी विश्वासाने सांगत होता,.. चिऊचे त्याच्याकडे बघून आताही डोळे भरून आले,..तेवढ्यात त्या काकु म्हणाल्या,"बघ तुला नक्की जमतील ना ही कामं मला उद्यापर्यंत सांग मी सध्या दुसरी बाई बघत नाही,.."
त्याच्याकडे बघतच आणि त्याला हात लावायचा प्रयत्न करत चिऊ काकूंना हो जमतील असं म्हणाली.
तेवढ्यात काकु एकदम ओरडल्या," ए त्या विठ्ठलमूर्तीला कशाला हात लावतेस,..आमच्या सासूबाईंना नाही आवडत त्याला कोणी हात लावलेलं,.. "काकूंच्या आवाजाने चिऊ एकदम घाबरली पटकन विठ्ठल मूर्तीजवळून तिने हात बाजूला केला..अजूनही तिला वाटत होतं ही मूर्ती आपण खुप बघितलेली,..
तेवढयात काकूंच्या सासुबाई आल्या परडीत फुलं घेऊन,..काकु म्हणाल्या,"आई ही आपली नवी मोलकरीण..अजून नक्की ठरवायची बाकी आहे पण तिला घर आवडलं तर येईल म्हणाली तिची आत्याआजी,.."
सासुबाई हसत म्हणाल्या,"अगबाई हो का,..घर आवडलं म्हणजे नेमकं काय ग घराचा रंग, घरच
रूप, घराचा दिखावा ,..घरातली माणसं, घरातला पैसा..नेमकं काय आवडायचं आहे ग तुला.?"
आजीच्या प्रश्नावर चिऊ हसत म्हणाली,"आजी ते असं दिसणाऱ्या वस्तूत नसतं,.. ते असं जाणवतं,.. असं छान,प्रसन्न वाटतं.. ते मला आवडायला हवं.."
आजी हसून म्हणाली,"अगबाई बरीच हुशार आहेस ग,..चैतन्य म्हणायचं आहे तुला,.."
चिऊला आवडला तो शब्द,."चैतन्य"
चिऊ लगेच म्हणाली,"हो अगदी बरोबर आजी,चैतन्य.. जे आपल्या भक्तीभावाने त्या घरात निर्माण झालेलं असतं,.. माझ्या आजीकडे होतं ते आजी गेली आणि सगळं हरवलं म्हणत चिऊने डोळे पुसले.."
उद्या येते सांगून चिऊ निघाली,.. निघताना चिऊ परत त्याच्याकडे पाहात होती,..ही मूर्ती का आपल्याला आपलीशी वाटते,..?मनातलं चैतन्य का वाढवत आहे ही,..अगदी मंदिरातला विठोबा आठवतोय अगदी असाच हुबेहूब ज्याच्या समोर आपण लहानचं मोठं झालो,..ज्याच्या नक्षी खांबाला एका हाताने धरत गोलगोल फिरत आपण खुप खुप खेळलो तो विठ्ठल असायचा आपल्यावर लक्ष ठेवून,..अगदी तसाच हा इथेही आला की काय आपली काळजी घ्यायला,..?चिऊला अनेक प्रश्न उभे राहिले,..निघताना ती आजीला म्हणालीच,"आजी मी विठ्ठलाच्या पाया पडू,.."
आजीने मानेनेच होकार दिला,..आजी त्या विठुरायला हार करण्यात दंग झालेली होती,..
आज चिऊ आली कामावर,.. घरात जरा गडबड जाणवली,..काकु येऊन म्हणाल्या,"आजी पडल्या ग काल,.. आता बऱ्या आहेत,तू तुझ्या पोळ्या करून मग झाडू फारशी कर,.."
चिऊने मानेनेच हो म्हंटल,..पटापट पोळ्या आटोपल्यावर तिने झाडून घेतलं,.. हॉलमध्ये ती सारखी त्याच्याकडे बघत होती,..डोळ्यातले भाव,खुप ओळखीचे,..पण गळ्यातला हार सुकलेला,..चिऊ पटकन आजीच्या खोलीत गेली,..आजीने तिला बघितलं आणि म्हणाली,"अरे चिऊ आलीस का?बघ माझ्या मेलीच काय झालं,..आषाढी एवढी जवळ आली,..वारीला निघायचं होतं तर इथेच पाडलं मला विठोबाने,.. आणि आता तर घरातल्या विठूची सेवा करता यायची नाही,..डॉकटरांनी चालायला नाही सांगितलं,..चिऊने नेमका विषय पकडला म्हणाली,.."आजी तुमची हरकत नसेल तर मी करू का सेवा,..मला नाहीतरी माझ्या गावाची म्हणजे पंढरीची आठवण येतेच.."
आजी म्हणाल्या,"अगबाई,तू तर ह्याच्याच गावची,..बघ तुला वेळ असेल तर कर हो सेवा,..तेवढंच माझ्या विठुला आनंद होईल.नाहीतर तसं कोणी त्याला हातही जोडत नाही या घरात."
चिऊच काम आता वाढलं होतं,.. सगळं आवरून झालं की चिऊ बागेतील फुलं तोडून आणायची त्याचा सुंदर हार करायची,..नाजूक जाई, जुईच्या कळ्या आणि मध्ये एक पिवळा सोनचाफा असा सुंदर हार असायचा त्याच्या सेवेत,..त्याला उगाळून चंदन टिळा लावायची,..तुळशीच्या मंजुळांचा हार असायचा गळाभरून,..स्वच्छ घसलेली चांदीची समई तेवत असायची त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तेजस्वी करत..
चिऊ अगदी रमून जायची ह्या सगळ्यात,..पण रोज पूजा करताना,.. तिला त्याला स्नान घालताना ती मूर्ती खुप आपलीशी वाटायची,..त्याची बोटं, त्याच नाक,डोळे ती परत परत त्यावरून हात फिरवायची,त्याचा तो मुकुट त्यातली एकेक लयदार रेष तिला वाटायचं ही आपल्या अगदी परिचयाची,..ती तल्लीन होऊन पूजा करायची विठ्ठलाची,..आजी सुखावून जायची रोजची पूजा बघून,..कधीकधी आजी गमतीत म्हणायची,"अग मी बरी झाल्यावर हा विठ्ठल माझी पुजा आवडून घेतो की नाही काय माहित? चिऊ तू इतकी सुंदर पूजा करतेस,..जणू काही तो तुझा हक्काचा विठ्ठल आहे,.."
चिऊ म्हणाली,"आजी खरं सांगु खऱ्या पांडुरंगाला बघत मी लहानाची मोठी झाले,.. पण ह्या मूर्तीला बघून खुप समाधान मिळतं, मला ही मूर्ती अगदी माझी वाटते का कुणास ठाऊक हिच्याशी माझं नातं आहे असं वाटतं.."
चिऊ बोलत होती तेवढयात काकूंनी हाक मारली,"अग चिऊ तुझी आत्याआजी आलीये बोलवायला तुला,.. आज पूजा राहू दे तुझे गावाकडचे आजोबा आलेत भेटायला,..जा तू घरी आज मी बघेल पूजेच,.."
आजीला जरा वाईटच वाटलं कारण आजीला सूनबाईची पूजा माहीत होती निव्वळ उरकण्याचा कार्यक्रम असायचा चिऊ मात्र अगदी मनलावून पूजा करायची त्यामुळे आजी खुश होती पण नेमकं आज एकादशीला चिऊच्या हातची पूजा नाही आजी अस्वस्थ झाली,..
चिऊ पण जरा हिरमुसली,आज एकादशी आणि नेमकी आजच आपण ह्याची पूजा करायची नाही,.. चिऊ म्हणाली,"आत्याआजीला सांगून येते मी मला थोडावेळ लागेल तुम्ही पुढे व्हा,.."
चिऊ बाहेर आली तर चिऊचे आजोबा काकूच्या सासऱ्यांशी बागेत बोलत उभे होते,.. चिऊ म्हणाली,"आजोबा तुम्ही ह्यांना ओळखता?"
चिऊचे आजोबा म्हणाले,"अग फार जून नातं आहे ह्यांच्याशी विठ्ठलाने जोडलेलं."
काकूंनी ते ऐकून सगळ्यांना घरात बोलवलं,..आजोबा चिऊच्या आजोबांना घेऊन घरात आले आणि आजीला म्हणाले ,"अहो,ओळखलं का कोण आहेत हे."
आजीने नीट निरखत एकदम आश्चर्य व्यक्त केलं अगबाई तुम्ही,..?चिऊला कळेचना नेमकं काय सुरू आहे,..ह्यांची ओळख काय ?आजोबा म्हणाले,"ताई आमचा पांडुरंग कसा आहे हो,..?"
आजी हसत म्हणाली,"तुमचा पांडुरंग तुमच्याच नातीच्या हाताने सगळं करून घेतो आणि प्रसन्न हसत उभा राहतो,..तो बघा."
आजीच्या खोलीतून ती प्रसन्न विठ्ठलमुर्ती बघून आजोबांचे डोळे पाण्याने डबडबले,...त्याने आपले थरथरते हात जोडले..चिऊला शेवटी राहवेचना,..ती म्हणाली,"मला कळतच नाही ए आजोबा हा आपला विठ्ठल म्हणजे?मला सांगा ह्या मूर्तीसोबत आपलं नातं काय आजोबा."
तेवढ्यात काकूने चहा आणला,..चहाचा एकेक घोट घेत आजोबा भूतकाळात हरवत बोलू लागले,.."तुझ्या बापाला मूर्ती घडवायचं वेड लागलं कर्ज काढून मूर्ती बनवायचा कारखाना सुरू केला,.. कधी गणपती,मारुती,देवी अश्या अनेक मूर्ती त्याच्या हातून त्या घडायला लागल्या,..पण विठ्ठल मूर्ती काही त्याने घडवली नाही,..लग्न झालं आणि तुझी आई निस्सीम विठ्ठल भक्त तू पोटात असताना तिने तीन महिन्यात तुझ्या बापाच्या मदतीने हा विठ्ठल हट्टाने घडवला,.. मूर्ती बघून जो तो भारावून जायचा,..कितीतरी जणांनी मूर्ती मागितली पण आम्ही दिली नाही,..तुझ्या जन्माच्या वेळी तुझी आई गेली माझा लेक सैरभैर झाला,..ह्या विठ्ठलावर खुप रागावला,..मूर्ती चंद्रभागेत टाकतो म्हणाला,..रागारागात घराबाहेर पडला,...काळ आला होता तो ही अपघाताने गेला..एवढं बोलून आजोबा रडायला लागले,..परिस्थिती हलाखीची झाली कर्जासाठी बँकेचे लोकं चकरा मारायला लागले,..तू लहान तुला पोसण्यासाठी मी आणि आजी हतबल झालो,..ह्या विठुरायला घेऊन भजन म्हणत पैसे गोळा करायला लागलो,..पोटाची भाकरी तर हरवली होती आणि आता छप्पर जायची वेळ आली,..
हे साहेब धावून आले ग तेंव्हा,.. जप्तीला ह्यांना बँकेने पाठवलं ह्यांनी सगळं बघितलं आणि विठुरायावर सौदा करून सगळं मोकळं करून टाकलं..विठुला निरोप देताना आजी आणि मी तर रडलोच पण त्याहीपेक्षा तू आकांत केला होता,..कारण बिन मायबापाचं लेकरू त्या माऊलीच्या अंगाखांद्यावर मोठं व्हायला लागलं,..ज्या मायबापाने तू पोटात असताना ही मूर्ती घडवली त्या मूर्तीने जणू तुला प्रेम द्यायला स्वतःला निर्माण केलं असं वाटत होतं..विठू गेला पण घर वाचलं,..खरंतर हे साहेब काहीच देऊ नका म्हणत होते,..पण तुझ्या आजीनेच मूर्तीसमोर ठेवली,.."
काकूंचे सासरे म्हणाले,"हो तशीही माझी बायको विठ्ठल भक्त मग मला वाटलं तिला आवडेल ही मूर्ती आणि मुख्य तुमच छत माझ्याकडून ह्या विठ्ठलाला वाचवायच असेल,..मी बँकेत पैसे भरून टाकले,..त्या बदल्यात तुमच्या चेहऱ्यावरचा आंनद आणि हा हसरा विठू मला मिळाला,.."
चिऊ उठून विठूच्या पायाशी जाऊन ओक्साबोक्शी रडायला लागली,..माऊली तुझं माझं नातं खरंच जन्मापासूनचं ग म्हणूनच मला इथे भेटलीस,..
आजीने चिऊला जवळ बोलवलं तिच्या डोक्यावरून हात फिरवला,..रडू नकोस चिऊ,"अग मी आयुष्यात एवढया वाऱ्या केल्या,..यावेळी विठूची वारी चुकली असं वाटलं पण आता वाटतं त्याने ती मुद्दाम चुकवली,..ह्या नात्याला पुनर्जन्म मिळायचा होता,..आता हा विठुराया तुझाच तूच त्याची पूजा करायला रोज ये आणि तुझ्या लग्नात हिच तुला भेट,..कारण तुझं आणि त्याच नातं पाठीराख्याचं आहे,..ते असंच टिकव,.."
कालचीच पूजा असलेली विठाई आताच्या या घडवून आणलेल्या सोहळ्याने अधिकच हसरी दिसत होती,..जणू पाठीराख्याच नातं टिकवायला पुन्हा नव्याने सज्ज झालेली...
वाचकहो कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा,..अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास 9822875780 ह्या no वर msg करा,धन्यवाद.
©स्वप्ना मुळे(मायी)