विषय- माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण
न विसरता येणारी गोष्ट!
बी. ए. एम. एस. च्या शेवटच्या वर्षाची वार्षिक परीक्षा होती. परीक्षा भर मे महिन्यात होती. त्यातल्या त्यात विदर्भातला उन्हाळा म्हणजे सूर्य जणू मुक्कामी असल्यासारखाच…! प्रचंड ऊन…! परीक्षा जवळ आली होती… अभ्यासही अगदी जोमाने सुरू होता. बघता बघता परीक्षेचा दिवस जवळ येऊन ठेपला. दुसऱ्यादिवशी प्रसूती तंत्र विषयाचा पेपर होता. रात्रीचं जेवण झालं आणि पुन्हा पुस्तकं, नोट्सचा पसारा घेऊन मी आणि माझी रुममेट वाचत बसलो होतो.
रात्रीचे बारा वाजून गेले होते. सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म लावून दोघी झोपलो. झोप लागली पण लगेच थोड्यावेळाने जाग आली. अचानक माझ्या पोटात खूप तीव्र वेदना होत होत्या. उठून थोडं पाणी पिलं, वॉश रूममध्ये जाऊन आले पण त्रास काही कमी होईना. मी माझ्या रूममेटला उठवलं.
"ही गोळी घे, झोप लागेल आणि सकाळी बरं वाटेल… टेन्शन घेऊ नको…" तिने प्रेमळ समजुतीसोबत एक गोळी दिली. मी पण ती गोळी घेतली आणि झोपी गेले. पुन्हा थोड्यावेळाने जाग आली. पुन्हा पोटात तशाच तीव्र वेदना…! पहिल्यापेक्षा त्याची तीव्रता जरा जास्तच वाढली होती. दरदरून घामही येत होता. मोबाईलमध्ये पाहिलं सकाळचे पावणे पाच वाजले होते… काय करावं काहीच सुचत नव्हतं… पेपर दुपारी अडीच ते साडेपाच या वेळात होता… पण तोपर्यंत बरं वाटेल की नाही ही या भीतीने अजूनच त्रास व्हायला लागला होता.
तसं अकोल्यात माझे मामा, मावशी आणि काका तिघांचेही घरं होते. माझे काका अकोल्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर! त्यांचा स्वतःचा मोठा दवाखाना; पण त्यावेळी काही सुचलं नाही… माझ्या मामे भावाला मी रडतच फोन केला आणि तो अगदी पंधरा मिनिटांत दारात हजर झाला. वेळेचं गांभीर्य पाहून माझी रूममेटही चटकन तयार झाली. आम्ही तिघे मिळून माझ्या काकांच्या दवाखान्यात गेलो. पोट दुखीच्या तीव्र वेदनांमुळे माझं रडणं सुरूच होतं. दवाखान्यातल्या सगळ्या स्टाफ लोकांना मी ओळखत असल्याने त्यांनी पटकन काकांना फोन लावला. काकाही धावतच आले. मला तपासत तपासत ते मला काही प्रश्न विचारत होते; मीही रडत रडत त्याची उत्तरं दिली. अगदी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी माझ्या डाव्या हाताला आय. व्ही. कॅनुला लावला… सलाईन सुरू केले आणि इंजेक्शन दिले. त्यानंतर मात्र मला झोप लागली.
जाग आली तेव्हा मी स्पेशल रूममध्ये होते आणि समोर माझी मावशी आणि माझ्या काकु होत्या. मामेभाऊ तिथेच होता… दुपारी पेपर असल्यामुळे माझ्या रूममेटला सगळ्यांनी परत रूमवर पाठवले होते… माझ्यामुळे तिचं नुकसान होऊ नये हा हेतू…!
मी उठल्यावर मावशीने आईला फोन लावून दिला. आईचा आवाज अगदीच रडवेला येत होता… येणार कसा नाही म्हणा…तिचं लेकरू तिच्यापासून तीनशे किलोमीटर दूर होतं आणि त्यात माझ्या पप्पांची तिसरी किमोथेरपीची सायकल सुरू झाली होती…आई त्यांनाही एकटं सोडू शकत नव्हती…
"आई, तू काळजी करू नको… इथे माझ्यासोबत मावशी, काका, काकु, मामा आहेत… तू तिकडे एकटीच आणि घरी दोन छोट्या बहिणी… पप्पांची काळजी घे…" मी आईला म्हटलं… खरंतर त्याक्षणी आई जवळ असावी असं खूप वाटतं होतं; पण ते शक्य नव्हतं. पप्पांना किमोथेरपीनंतर होणाऱ्या वेदनेपेक्षा माझ्या ह्या वेदना नक्कीच कमीच होत्या.
सकाळचे दहा वाजत आले होते. काकूंनी दिलेला उपमा पाच मिनिटांसाठी पोटात जाऊन पुन्हा बाहेर आला होता. काका सगळ्या पेशंटचा राउंड घेत माझ्याकडे आले होते.
"कसं वाटतंय?" डोक्यावरून मायेने हात फिरवत त्यांनी विचारलं.
"बरं वाटत नाहीये; पण मला आजचा पेपर द्यायचा आहे…" मीही रडत उत्तर दिलं. आश्वासक हसून ते बाहेर गेले. नंतर सिस्टर्सनी येऊन एक दोन इंजेक्शन आणि सलाईन दिले कारण पोटात अन्नाचा कण थांबत नव्हता. भरदुपारी बारा वाजता मी, माझी मावशी आणि काकांची असिस्टंट डॉक्टर असे आम्ही गाडीने माझ्या रूमकडे गेलो. तिथून हॉलतिकीट वगैरे घेऊन परीक्षा केंद्रावर गेलो. परीक्षा केंद्र गावापासून थोडं लांब असलेलं दंत महाविद्यालय होतं. परीक्षा केंद्राच्या बाहेर आम्ही उभे होतो… वेळेच्या थोडं आधीच पोहोचलो होतो… एका हाताला आय.व्ही. कॅनुला तसाच होता… तिथल्या पर्यवेक्षक सरांना माझी परिस्थिती कळल्यावर त्यांनी आतमध्ये जाऊन बसायची परवानगी दिली. जिथे माझा रोल नंबर होता, मी तिथे जाऊन बसले… तेवढं चालण्यानेही गळून गेल्यासारखं वाटत होतं त्यामुळं मी बेंचवर डोकं ठेऊन बसले. थोड्यावेळाने बाकीचे विद्यार्थी आले आणि परीक्षा सुरू झाली. उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या. जे येत होतं ते आधी भरभर लिहून घ्यायचं नंतर बाकीच्या प्रश्नांचा विचार करायचा असं मनाशी ठरवलं. जवळपास अर्धा पेपर लिहिणं झाला आणि पुन्हा त्रास सुरू झाला… तरी होईल तसा पेपर पूर्ण करायचा प्रयत्न केला… पण पंधरा मार्कांचा एक मोठा प्रश्न सोडवायला वेळच कमी पडला.
आम्ही परत काकांच्या दवाखान्यात आलो. पप्पांचा फोन आला. त्यांची किमो नुकतीच संपली होती.
"अभिनंदन दिदू… तू जिंकलीस!" पप्पा म्हणाले
"पण पप्पा मी पंधरा मार्कांचा पेपर लिहिलाच नाहीये… आणि तुम्हाला माहितीये ना की आमची पासिंग पन्नास टक्क्यांची असते… मी कशी बरं पास होईल…?" माझं रडणं सुरूच होतं.
"प्रत्येकवेळेला परीक्षा ही मार्कांसाठीच नसते… आज तुझ्या इच्छाशक्तीची परीक्षा होती… आणि ती तू यशस्वीपणे पूर्ण केलीस… एवढं बरं नसतांनाही आमची लेक परीक्षा द्यायला गेली यातच सगळं आलंय… आणि तू बघशील… तू नक्कीच पास होशील… आणि यावर्षीदेखील तूच कॉलेजमध्ये पहिली येशील…आईला आणि मला दोघांनाही हा आत्मविश्वास आहे…" पप्पा फोनवर बोलत होते; पण असं वाटतं होतं की बाजूला बसून डोक्यावरून हात फिरवून बोलत होते.
त्यानंतरचे चार पेपर सलाईन इंजेक्शन घेत, निरनिराळ्या टेस्ट, त्यांचे रिपोर्ट, त्याप्रमाणे दुसऱ्या डॉक्टरांना दाखवणे आणि त्यानुसार ट्रीटमेंट अशा चक्रातच गेले. या सगळ्यात माझी मावशी मात्र माझ्या सोबतच होती…
परीक्षा संपली, त्यानंतरची प्रात्यक्षिक परीक्षाही बरी गेली. मी घरी गेले…
"रिझल्टचा विचार करायचा नाही…" पप्पांनी डोक्यावर हात फिरवत म्हटलं. घरी असलं की घड्याळाचे काटे अक्षरशः पळायला लागतात… तसंच झालं.. रिझल्टचा दिवस जवळ आला.
"रिझल्टचा विचार करायचा नाही…" पप्पांनी डोक्यावर हात फिरवत म्हटलं. घरी असलं की घड्याळाचे काटे अक्षरशः पळायला लागतात… तसंच झालं.. रिझल्टचा दिवस जवळ आला.
रिझल्टचा दिवस होता, तसा तो नकोच वाटत असतो म्हणा. विद्यापीठाच्या वेबसाईटवर रिझल्ट पाहिला. आई-पप्पांचा आत्मविश्वास खरा ठरला होता. मी पास झाले होते….! आमच्या तिघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू होते…
तेवढ्यात रूममेटचा फोन आला.
"रिझल्ट पाहिला का? यावेळी कॉलेजमध्ये पहिलं कोण आलंय माहिती का?" माझी रूममेट
"नाही गं, माहिती नाही… मी कोणालाच फोन केला नाही… कोणी का पहिलं येईना… मी पास झाले हेच खूप आहे." मी
"अगं वेडाबाई, नाव तर विचार ना…" माझी रूममेट आनंदाने बोलत होती.
"सांग…" मी
"डॉ. किमया संतोषकुमार मुळावकर!" ती अक्षरशः आनंदाने ओरडली होती… आणि तिचं ते बोलणं ऐकून आम्ही तिघे आई, पप्पा आणि मी एकमेकांच्या गळ्यात पडून आनंदाश्रूने चिंब भिजलो होतो.
आज पप्पा आमच्या सोबत नाहीत; पण त्यांचे शब्द, त्यांचे अक्षर, त्यांची लेखणी सोबत आहे… जी कोणत्याही संकटावर मात करायची ताकद देण्यास पुरेशी आहे…
पूर्णविराम!
(ईरा प्रशासकीय मंडळाचे खूप धन्यवाद की त्यांनी हा विषय लिहायला दिला… खरंतर आयुष्यात बरेच प्रसंग असे अविस्मरणीय असतात पण बरेचदा ते व्यक्त होत नाहीत… माझ्या त्या काळात माझी मावशी, काका, काकु यांनी माझी खूप काळजी घेतली होती… त्यांच्याविषयी कृतज्ञात व्यक्त करायची ही संधी मला आज मिळाली. खूप आभार!)
© डॉ. किमया मुळावकर
फोटो-गुगलवरून साभार
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा