न वाचलेलं पत्र

नकळत घडलेली चूक


"कांचन किती दिवस रडणार?"
"सविता मला हे सहन होत नाही गं.रोज रात्री दारात मरणाने हजेरी लावणं आणि दिवस त्या किळसवाण्या आठवणीं सोबत राहणं."
"अगं कोणाला आवडतं असं जगणं सांग ना? पण एकदा ह्या धंद्यात अडकलो की सुटका नाही."
" मी ह्या देहव्यापारात फक्त सुधीर मुळे सापडले. रोज रात्री जेंव्हा माझं मन आणि शरीर एकमेकांशी झगडत असतं तेंव्हा डोळ्यातील अश्रूंसोबत आठवणी ही वाहत असतात गं.
काय ही माझी कर्मकहाणी. माझा राग मला नडला गं आणि इथे फरफटत घेऊन आला."
\"मला वाटतं तू जर आपलं मन मोकळं केलंस तर तुझी अगतिकता थोडी तरी कमी होईल"
सविता आणि कांचन दोघी समदु:खी आणि समवयस्क असल्याने चांगल्या मैत्रिणी झाल्या होता आणि हा संवाद ही नेहमी चा होता.
पण आज.
शून्यात नजर लावत कांचन हळूहळू भूतकाळात पोचली.

सुधीर,नीरज,तेजस, अवि,रेखा आणि कांचन ह्यांचा मस्त ग्रुप होता. सुधीर साहित्य, काव्य ह्यात रमणारा आणि आऊट ऑफ द वे जाऊन कोणाला ही मदत करणारा. नीरज आणि तेजस अभ्यासू आणि अत्यंत हुशार,सगळ्यामधे असून ही स्वत: कडेच लक्ष असलेले. अवि उणानटप्पू, बाहेरख्याली पण सतत हसत आणि हसवत राहणारा.रेखा सौम्य, हुशार पण बहुतेक वेळा काळजीत असणारी.कांचन सुंदर , पजेसिव,संशयी आणि शीघ्रकोपी. रागात ती काय करेल ते ब्रह्मदेव ही सांगू शकत नव्हता.

सुधीर आणि कांचन एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले.कांचन तिथे सुधीर आणि सुधीर तिथे कांचन हे समीकरणच झालं होतं.

एकदा दोनदा कांचन ने रेखा आणि सुधीर ला बोलताना बघितलं आणि ती पोचल्यावर दोघंही शांत झाले. एकदा तर रेखाचे डोळे पुसताना तिने सुधीर ला पाहिलं आणि विचारलं तर "काही नाही आईचा प्रॉब्लेम" म्हणून गप्प झाला.

"पण मग ती सगळ्यां बरोबर बोलून कां नाही सोडवत?" हे विचार कांचनच्या मनात यायला लागले.सुधीर आणि रेखाचं काही तरी गडबड आहे हा संशय बळकट व्हायला लागला.

"आज काय तो सोक्षमोक्ष मी ह्या प्रकरणाचा लावणारच." 

असा विचार करूनच ती कॉलेजमध्ये पोहोचली. सुधीरला शोध शोधून थकली पण तो काही तिला दिसेना. राग वाढायला लागला होता. तितक्यात समोरून अवि येताना दिसला.कांचन पुढे झाली

" सुधीर ला पाहिलंस का रे?"
"अगं ! तो रेखा बरोबर नाशिक ला गेला आहे.जाताना हे पुस्तक…..."

कांचन ने पुढचं काहीच ऐकून न घेता अविच्या हातून पुस्तक हिसकून घेतले ,आणि धावत सुटली. काॅलेज बाहेर येऊन ती वाट घेऊन जाईल तिथे धावत होती, आणि एका व्हॅन मधे तिला कोणी तरी ओढलं.

तिचा पुढचा प्रवास कधी शुध्दीत तर कधी बेशुद्ध अवस्थेत चालू होता आणि तो ह्या रेडलाईट एरियात येऊन थांबला.

सविता ला सगळं समजल्या वर तिला आतून भरून आलं. समजावून सांत्वन करण्यापलीकडे तिच्या ही हातात काही नव्हतं.

रात्री गिराहिक येणे आणि दिवसा त्या आठवणींने डोक्यात थैमान घालणे, ह्यात काहीच बदल होत नव्हता.
एका रात्री कांचन येणाऱ्यांची वाट बघत खोलीत बसून होती. येणारी व्यक्ती आली आणि दोघं ही एकमेकांना पाहून हादरलेच.

"अवि तू इथे काय करतो आहेस?"

"माझा प्रश्न सोड. पण तू इथे काय करते आहेस?"

"इथे ज्या सगळ्या करतात तेच."

"अगं वेडे तू इथे कशी पोचली? तू माझ्या हातून पुस्तक घेऊन, सुधीर चा निरोप ही ऐकून न घेता धावत सुटलीस. त्यानंतर तुझ्या घरचे,मित्र ,सुधीर सगळे वेड्या सारखे तुला कुठे आणि कशा कशा प्रकारे शोधत होते, ते तुला काय माहित.अगं काय करून बसलीस आपल्या आयुष्याचं.?"

" हे सगळं सुधीर मु..,.."
मधेच तिला थांबवत अवि म्हणाला

" त्याला दोष द्यायचा नाही हं. त्याने पुस्तकात एक पत्र तुझ्या साठी ठेवलं आहे. हा निरोप तू ऐकलाच नाहीस ना? ते पुस्तक जर तुझ्या कडे असतं ,आणि ते पत्र जर तू वाचलं असतं, तर हे काहीच घडलं नसतं.आणि सुधीर ही आज माणसातून उठला नसता. तुला माहित नसेल तो कित्येक दिवस महिने कॉलेज कट्ट्यावर बसून असायचा. डोळे तुझ्या वाटेकडे लागलेले असायचे. काही महिन्याने तो कोणाला ही धरून विचारायचा
\"कांचनला बघितलं का?\" 
आज तो कुठे आहे हे जाणून घ्यायचं आहे? तर ऐक…"

पण पुढचं काही न ऐकता ,कांचन झपाटल्या सारखी उठली आणि कपाटात काही शोधू लागली.आणि थोड्याच वेळात एक पुस्तक घेऊन वळली.
"हे बघ ते पुस्तक. त्या नराधमांनी काहीही केलं असेल, पण एक उपकार मात्र केला, पुस्तक तेवढं माझं मला दिलं." असं म्हणत तिने पुस्तकाची पाने भिरभिरवली. आणि त्यातून एक पत्र पडलं

प्रिय कांचन,
मी तुला न सांगता रेखा बरोबर नाशिक ला जात आहे.तिच्या आईची तब्येत बरी नाही. किडनी फेल झालेल्या आहेत. रेखाची किडनी (ब्लड ग्रुप चा काही प्राब्लेम असल्याने) त्यांना देता येणार नाही.पण देवाची लीलाच म्हणावी मी आपली किडणी देऊ शकतो. आता हे तुला सांगितलं असतं तर प्रेमापोटी तू ते करु दिलं नसतं आणि म्हणून तुला न सांगता मी रेखा बरोबर नाशिक ला जात आहे.

कांचन रागवू नकोस तुझ्या रागाची भिती वाटते गं .पण पत्र वाचून माझ्या भावना तुला कळतील.मी आलो की तुलाच प्रथम भेटणार आणि तू हसली की माझं जग बहरणार.

मन्मनीच्या भावना समजून घे माझे सखे!
जग हे सारे व्यर्थ आहे,तुजवीण माझे ग सखे!
देह मी पण प्राण माझा तूच आहे ग सखे!
तुझ्या प्रेमात हा जीव ही जाईल माझा ग सखे!

चातका सारखा वाट पहाणारा
तुझाच
सुधीर

पत्र वाचताच कांचन जिवाच्या आकांताने ओरडली "सुधी..र"आणि आपलं डोकं पलंगावर आपटू लागली,जोराजोरात हसत
"कांचन तुला हीच शिक्षा हवी होती"
"सुधीर नको हात लावू मला"
"वा वा छान झालं "
म्हणत टाळ्या वाजवू लागली.
अर्ध्या पाऊण तासात सगळे गोळा झाले .काय झालं ते कोणाला कळेना. अवि ही दिङमूढ होऊन बघत होता. थोड्याच वेळात सगळ्यांना कशा मुळे आणि काय झालं ह्याची कल्पना आली.
पुढे दोन दिवस कांचनची समजूत घालण्याचे प्रयत्न व्यर्थ गेले.तिचं रडणं,तिचं विव्हळणं, मधेच जोरात हसणं,मधेच जिवाच्या आकांताने ओरडणं ऐकून सगळेच हवालदिल झाले होते. सगळ्यांची तहान भूक मेली होती. सदैव जगमगणारी रात्र ,काळरात्र वाटतं होती. नेहमी यौवनाने बहरलेली वस्ती स्मशानासम झाली होती. सर्वकाळ गजबजलेला हा भाग आज भणंग होता.

फक्त कांचनचे आर्तस्वर तेवढे ऐकू येत होते.

  दोन दिवसा नंतर मेंटल हॉस्पिटलमधून एक व्हॅन तिथे पोहोचली, त्यातून नर्सेस भराभर बाहेर निघाल्या, जिने चढून वर गेल्या आणि आरडाओरड करणाऱ्या कांचन ला घेऊन खाली आल्या. अस्तव्यस्त कपडे, पिंजारलेले केस, रडून लाल झालेले डोळे, ही कांचनची अवस्था बघून सगळ्यांबरोबर एरवी पाषाण हृदयी असलेले दलाल ही डोळे पुसत होते. कांचन सुटण्या साठी धडपड करत होती. दलालांचे हात तिला वाचवण्या साठी उठत होते आणि हताशेने परत खाली येत होते. सविता जिन्याला घट्ट धरून सुन्या डोळ्यांनी कांचन कडे बघत होती.

व्हॅन कांचनला घेऊन पुढे सरकत होती , "सुधीर सुधीर" चे आवाज वाऱ्यात विरत होते आणि अश्रूभिजल्या डोळ्यांमुळे व्हॅन हळूहळू पुसट पुसट दिसता दिसता नजरें आड झाली होती.

राधा गर्दे