न विसरता येणार पहिलं प्रेम...
माही आणि राज एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच वर्गात शिकायचे.
माहीच्या गावापासून राजचे गाव पाच किलोमीटर पुढे असल्याने, रस्ताही एकच आणि येण्या-जाण्यासाठी बसही एकच, हा एक निव्वळ योगायोग.
सुरुवातीला राजच्या शेजारी माही बसायची नाही, कधी कधी गाडीला गर्दी होत असल्याने ती ताटकळत उभी असायची.. तो बसायला जागा द्यायचा पण अडसरीत कशाला म्हणून तीच बसत नव्हती...
पंधरा वीस दिवसानंतर राजला काय वाटले कुणास ठाऊक, त्याने येतानाच, त्याच्या शेजारी हातरुमाल टाकून जागा धरली, ती मात्र बसली नाही....
त्याने विंनती केली
" बस ना...
“हम्म.. होकारार्थी मान हलवत, अंग चोरत ती बसली.....
आता हे रोजचं झालं, तो जागा धरायचा आणि ती जाऊन बसायची...
हळूहळू दोघांमध्ये ओळख झाली, बोलणं सुरू झालं.
एकाच बसमध्ये एकाच सिटवर बसून गप्पागोष्टीचे रुपांतर प्रेमात कधी झाले, हे कळलेसुद्धा नाही..
बस मध्ये कितीही गर्दी असली तरी ती निश्चिंत असायची, कारण तिची जागा धरणारा तिचा " तो " त्या गाडीत असायचा. गप्पांच्या ओघात स्टँड कधी यायचे कळायचे ही नाही.
हा प्रवास संपूच नये असे वाटायचे. पण कोणत्याही गोष्टीस शेवट हा ठरलेलाच असतो.
त्यांच्या प्रेमाला ती बस, तो वाहक, चालक, रोज येणारे विद्यार्थी साक्षीदार होते...त्यांच्या पहिल्या प्रेमाचे साक्षीदार...
रविवारी तो येत नसल्याने तीच मन बेचैन व्हायच...
सोमवारी त्याला पाहिल्याशिवाय करमत नसायचे.....
त्याच बोलणं, वागणं, राहणीमान सगळ्यांचीच भुरळ पडली होती तीला... त्याचा आकर्षक बांधा ,पीळदार शरीरयष्टी... सगळ्यात हरवून गेली होती ती...
शिक्षण संपल्यावर जीवनसाथी बनण्याच्या आणाभाका ही घेतल्या ...
कॉलेज, कॉलेज कॅन्टीन, सगळीकडेच त्यांच्याच प्रेमाच्या चर्चा असायच्या....
प्रेमप्रकरण वाढतच गेले, घरापर्यंत गेले आणि सुरू झाला प्रेमाचा काटेरी प्रवास..
तिच कॉलेज बंद झालं, तिच्या
भावाने मुलाची माहिती काढली आणि प्रेमाला विरोध सुरू झाला.
राजच्या घरचे लग्नाला तयार होते, राजच्या घरच्यांनी त्याचे माहीसोबत लग्न करण्याचे ठरवले. ते स्वत:हून तिच्या घरीही गेले, पण तिच्या घरच्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला, ती काहीच बोलू शकली नाही.
नकारा नंतर मात्र तिच्या घरचे तिच्या साठी स्थळ शोधू लागले. परीक्षा ही दिली नाही, शिक्षण आणि प्रेम... अर्ध्यावरच सुटले.
बरेच दिवस माहीने त्याच्या आठवणीत काढले, त्याच्याशिवाय एक एक क्षण एका एका युगासारखा वाटायला लागला होता.
दिवस दिवस बसली असायची, राजनी दिलेले गिफ्ट्स बघत बसायची,त्याच्या आठवणीत आसवं गाळायची.
माहीच्या घरच्यांनी तिच्या साठी स्थळ शोधायला सुरुवात केली, एक चांगल स्थळ चालून आलं आणि माहीच लग्न ठरलं
काही महिन्यातच माहीच लग्न झाल...
माहीचा पती अजय खुप छान स्वभावाचा होता.त्याला माहीच्या चेहर्यावरचे भाव दिसायचे.
“काहीतरी नक्की आहे, माही इथे आनंदी नाही”
अजय मनोमन विचार करायचा.
एक दिवस त्याने न राहवून विचारलं,
“माही तू माझ्या सोबत आनंदी नाहीस का?”
“अस का विचारताय?”
“आल्या दिवसापासून बघतोय, तू स्वतःमध्येच हरवलेली असतेस, अस वाटतं तुझ्या मनात काहीतरी साठून आहे ज्याने तुला त्रास होतोय, माही तुझ्या मनात काही असेल तर सांग मला, मी प्रॉमिस करतो शक्य तेवढी मदत करील मी”
माहीला अजयच्या बोलण्यावर विश्वास वाटला,तिनी अजयला सगळं सांगितलं.
अजयने ते सगळं मोठ्या मनाने ऐकलय.
आणि अजय ने माहीला वचन दिलं.
“माही मी तुला तुझं पहिलं प्रेम मिळवून देऊ शकेल की नाही माहीत नाही, पण जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत माझ्या कडून तुला भरभरून प्रेम मिळेल, तुला तुझ्या घरच्यांची ,तुझ्या पहिल्या प्रेमाची आठवणही येऊ देणार नाही.”
माही थोडी सुखावली.
मनातलं सगळं बोलून तिला मोकळं वाटतं होत.
हळूहळू माही तिच्या सासरी रमायला लागली. पण अजय सोबतच नात खुलायला अजून वेळ लागणार होता. माहीला आनंदी ठेवण्यासाठी अजयचे प्रयत्न सुरू असायचे.
तो तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा, तिला बर वाटावं म्हणून शॉपिंग, हॉटेलिंग सगळं करायचा.
पण तरीही माहीच्या मनातून राजच्या आठवणी जात नव्हत्या.
लग्नानंतर ब-याच महिन्यानंतर ती तिच्या गावी गेली...
गावच्या कट्ट्यावर थांबली.... पांढ-या शुभ्र रंगाची एक अलिशान गाडी आली आणि कट्ट्यावर थांबली, गाडीचे काच खाली झाले आणि त्यात तो दिसला.
हा निव्वळ योगायोग होता की नियतीचा खेळ देवच जाणे.
पांढ-या शुभ्र कोटवर टाय लावलेला, अगदी एखाद्या हिरोसारखा दिसणारा, तीच पहिलं प्रेम होता तो..
तिने मात्र मान खाली घातली, त्याच्याकडे पाहण्याचेही धाडस झाले नाही.
त्याचे चांगले झाल्याचे मनोमन समाधान होते.
दोघांची चुकून नजरानजर झाली... डोळ्यात भावना दाटून आल्या....
पुन्हा पहिल्या वहिल्या प्रेमाची आठवण झाली...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा