Feb 24, 2024
वैचारिक

न तुटणारं नातं...

Read Later
न तुटणारं नातं...


ऋचा आणि ऋषी यांना आज घटस्फोटाचे पेपर मिळाले होते. गेल्या चार वर्षांपासून ते याचीच वाट बघत होते कदाचित. चार वर्ष तारखेवर तारखा सुरु होत्या, कोर्टात दोघांचेही वकिल जीव तोडून भांडत होते आणि आज शेवटी निकाल आला होता.

दोघेही एकत्रच कोर्टातून बाहेर पडले. दोघांचेही कुटुंब कोर्टात त्यांच्यासोबत होते. त्यांच्या चेहऱ्यावर विजय आणि शांततेच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. चार वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आज हा निर्णय घेण्यात आला होता.

त्या दोन प्रेमीजीवांना अलग करून घरच्यांनी सिद्ध करून दाखवलं होतं की प्रेमविवाह करून त्यांनी खूप मोठी चूक केलीय. घरच्यांचं न ऐकून त्यांनी आपलं आयुष्य बरबाद करून टाकलंय.

आताशा त्यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती, पण प्रेमाविवाह असूनही ते फक्त सहा वर्षेच एकत्र राहू शकले होते.

घटस्फोटाच्या प्रक्रियेला तब्बल चार वर्षे लागली होती.

ऋचाच्या हातात हुंड्याच्या वस्तूंची यादी होती जे सर्व तिला ऋषीच्या घरून घ्यायच होत आणि ऋषीकडे ऋचाकडून घ्यायच्या दागिन्यांची यादी होती.

त्यासोबतच न्यायालयाचा आदेशही होता की, ऋषी कडून दहा लाख रुपयांची रक्कम ऋचाला एकरकमी दिली जावी.

ऋचा आणि ऋषीं दोघेही एकाच गाडीमध्ये बसून ऋषीच्या घरी पोहोचले. ड्राइवर च्या बाजूला ऋषी सुन्न बसून होता. मागच्या सीटवर ऋचा आणी तिची आई. दोघांनाही एकाच जागी जायचं होतं,
ऋषी आणि ऋचाच्या घरी.

हुंड्यात दिलेल्या वस्तू ऋचाला वापस आणायच्या होत्या. आणि ऋषीला सगळे दागिने वापस घायचे होते.

किती हौशीने त्याने ऋचाला एकेक दागिना बनवून दिला होता, तिच्या आवडीने. वर्षभर एकेक ग्राम सोनं जमा करून तो त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी तिला एक दागिना भेट देत होता.

तब्बल चार वर्षांनी ती आज या सासरच्या घरी जात होती. बस शेवटच्या वेळी,यानंतर तिला इथे कधीच यायचं नव्हतं.

दोघांच्याही घरातील सर्व सदस्य कोर्टातून परस्पर आपापल्या घरी गेले होते. फक्त तीन जीव उरले होते ऋषी, ऋचा आणि ऋचाची आई.

ऋषी हा घरात एकटाच राहत होता. आई-वडील आणि भाऊ अजूनही गावात राहायचे. ऋषी तेरा वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त शहरात आला आणि अकरा वर्षांपूर्वी त्याला ऋचा भेटली. बघताक्षणी आवडलेली ती. जात, धर्म याच्या पलीकडे दोघांचे प्रेमाचे नाते जुळले. एक वर्षाने दोघांनी लग्न केलं.

दोघांच्याही घरून प्रचंड विरोध होता. ऋचा मराठा ब्राम्हण आणि ऋषी पंजाबी. शेवटी ऋचा आपलं माहेर सोडून ऋषिकडे आलेली.

राजाराणीचा संसार सुरु होता, एक फुलही उमललं होत त्यांच्या संसारवेलीवर. पाच वर्ष झाले होते लग्नाला, तिच्या बाबांची डेथ झाली आणि ऋषी स्वतः तिला तिच्या माहेरी घेऊन गेला. इथेच माशी शिंकली.

आतापर्यंत मेली की जिवंत आहे हे ढुंकूनही न बघणारे तिच्या घरचे नातवाच्या ओढीने 'हम साथ साथ है' झाले. ऋचाही आनंदात होती, त्यांच्या मुलाला कधी नव्हे ते आजी,मामा, मामीचं प्रेम मिळायला लागलं होत.

हे सार बघून ऋचाला वाटायचं की आता सासरी जाऊनही माफी मागावी, ते लोक ही नातू बघून विरघळतील आणि सर्व परिवार एकत्र येईल.

झालंही तसंच, पण सहा महिन्यातच दोघांत कुरबुरी सुरु झाल्या. ऋचाच्या घरचे ऋषी कसा वाईट हे तिच्या मनात भरवू लागले आणि ऋषीच्या घरचे ऋचा कशी वाईट ते त्याच्या मनात भरायला लागले. दोन्ही घरच्यांत लागलेली चढाओढ यां दोघांच्या नात्याला भेदू लागली.

न्यायालयाच्या निर्णयानुसार ऋचा आणि ऋषी यांचा एकुलता एक मुलगा, जो अवघ्या सात वर्षांचा होता, तो समजदार होईपर्यंत ऋचासोबत राहणार होता.

ऋषी त्याला महिन्यातून एकदा भेटू शकणार होता. तीन वर्षाचा असताना माहेरी नेलेला तो मुलगा आता ऋषीला ओळखतही नव्हता.

घराच्या आजूबाजूचा परिसर दिसताच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सहा वर्ष ती या घरात राहिली होती.

ऋचाने खूप मेहनत करून घरासमोरची बाग सजवली होती. त्यांचं सगळं आयुष्य त्या एका गोष्टीत म्हणजे त्या घरात गुंतल होतं.

सर्व काही त्यांच्या डोळ्यांसमोर बांधले गेले होते. ऋषीने विटां विटांनी बांधलेल घर हळूहळू पूर्ण होताना पाहिल होत तिच्या साक्षीने. घराला नाव दिल होतं 'स्वप्न महल.'

जणू ते त्याचं स्वप्नातील घर होतं, इतक्या समर्पणाने ऋषीने आपले स्वप्न पूर्ण केलं होतं आणि मग तिथे लक्ष्मीच्या पावलांनी ऋचाचा गृहप्रवेश झाला होता.
ऋषी थकून सोफ्यावर पसरला. "तुला जे पाहिजे ते घे, मी तुला अडवणार नाही."


ऋचाने ने आता त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं. चार वर्षांत किती बदल झाला होता त्याच्यात, केस पांढरे होऊ लागले होते, शरीर आधीच कमजोर त्यात अर्धवट खाली झाल्यासारखं वाटत होत, वजन कमी झालं होत. चार वर्षांत चेहऱ्यावरील चमक, आत्मविश्वास आणि मिश्किल भाव नाहीसे होऊन गंभीरपणा आला होता.

ती त्या स्टोअर रूमच्या दिशेने निघाली जिथे तिचा बहुतेक हुंडा पडून होता. माल जुन्या पद्धतीचा होता, त्यामुळे रद्दीप्रमाणे स्टोअर रूममध्ये फेकून दिला होता तिनेच. नवीन घर त्यांनी त्यांना हव्या तश्या वस्तूंनी सजविले होते. त्याला हुंडा तरी किती मिळाला? दोघांचा प्रेमविवाह होता. घरातील सदस्य नव्हतेच, दूरचे नातेवाईक, ओळखीतले काही कसेबसे एकत्र होते.

तो प्रेमविवाह झाला होता, तेव्हाच कोणाची तरी नजर लागली. कारण प्रेमीयुगुलांचे ब्रेकअप झालेले प्रत्येकाला बघायचे असते.

प्रत्येकाला त्यांना जाणवून द्यायचे असते की तुमचा निर्णय चुकलाय.

फक्त एकदा ऋषी दारू प्यायल्याने ऋचाचा भ्रमनिरस झाला होता. घरात कटकटी सुरु झाल्या आणि कधी नव्हे ते त्याने बाहेर मित्रांसोबत ड्रिंक केलं.
घरी आल्यावर त्यावरून कडक्याचं भांडण झालं त्याने हात उगारला तिने त्याचा हात धरला, ती रागातच मुलाला घेऊन आईच्या घरी निघून गेली. इथेच सर्व संपलं.


त्यानंतर कोर्टाचे अर्ज आणि शिकवण्याचे, कान भरण्याचे युग आले. इकडे ऋषीचे भाऊ-वहिनी आणि दुसरीकडे ऋचाची आई.
खटला कोर्टात पोहोचला आणि घटस्फोट घेतला.

या काळात ऋचा किंवा ऋषी एकमेकाला आणायला गेले नाहीत की भेटायला गेले नाही, की कधी एकमेकांशी बोलायचा प्रयत्न केला नाहीं

ऋचाची आई तीला म्हणाली, "तुमचे सामान कुठे आहे? ते इथे दिसत नाहीये. या दारुड्याने विकले असेल बहुतेक?"

"शट अप आई"ऋचा ओरडली.
ऋषीला दारुड्या म्हणणे ऋचाला का आवडत नाही हे त्या वेडीला अजूनही कळत नव्हते.
त्यानंतर स्टोअर रूममध्ये पडलेला माल यादीत एक एक करून मिसळला गेला.
बाकीच्या खोल्यांमधूनही यादीतील वस्तू उचलल्या गेल्या.
ऋचाने फक्त तिचे सामान घेतले आणि ऋषीच्या सामानाला हातही लावला नाही. त्यानंतर ऋचाने ऋषीला दागिन्यांनी भरलेली बॅग दिली.
ऋषीने बॅग परत ऋचाला दिली. "हे ठेव, मला नको, तुझ्या अडचणीत कामी येईल तुला."
दागिन्यांची किंमत 12-15 लाखांपेक्षा कमी नव्हती.
"का?, कोर्टात तुझा वकील दागिने,दागिने किती वेळा ओरडत होता?"
"कोर्टातली कोर्टकेस संपली आहे, ऋचा. तिथे मी जगातील सर्वात वाईट प्राणी आणि मद्यपी असल्याचेही सिद्ध झाले आहे."
हे ऐकून ऋचाच्या आईने नाक उडवले.

"गरज नाही, आम्हाला ते दहा लाखही नकोत." ऋचा बोलली.
"का?" असे म्हणत ऋषी सोफ्यावरून उठला.

"असेच" ऋचाने तोंड फिरवले.

"एवढं मोठ आयुष्य आहे, कस जगणार आहेस एकटी? घे, चालेल मला. माझ्याकडे आहे ते आयुष्यभर पुरून उरेल मला एकट्याला, जमवून करायचे तरी काय आहे आता."
असे म्हणत ऋषीने पाठ फिरवली आणि दुसऱ्या खोलीत निघून गेला. कदाचित त्याच्या डोळ्यात काहीतरी दडले असावे.

ऋचाची आई कार ड्रायव्हरला फोन करण्यात व्यस्त होती.

ऋचाला संधी मिळाली. ती ऋषीच्या मागे त्या खोलीत गेली.
तो खुर्चीवर बसून फॅन कडे बघत होता, डोळ्याच्या कोपऱ्यातून पाणी ओघळत होते . एक विचित्र चेहरा करून तो जणू आतला पूर दाबण्याचा प्रयत्न करत होता.

ऋचाची चाहूल लागताच त्यानें तोंडावर रुमाल झाकून घेतला. ऋचाने आजपर्यंत त्याला कधी रडताना पाहिले नव्हते. आज पहिल्यांदाच पाहिलं, "का कळत नाही मला याच वागणं"पण तिच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. एक युद्ध जिंकल्याचा भाव मनात उमटला, ती जास्त भावूक झाली नाही.
ऋचा विजयी मुद्रा करत साध्या शब्दात म्हणाली, "माझी एवढी काळजी होती, मग घटस्फोट कशाला दिलात ?"

"मी तुला घटस्फोट दिला नाही, तू सही केलीस, घटस्फोट तुला हवा होता."ऋषी म्हणाला.

"तुम्ही माफी मागू शकत नाही का?"ऋचा म्हणाली

"तुझ्या घरच्यांनी मला कधी संधी दिली? तू कधी फोन केलास, डिस्कनेक्ट झाला दरवेळी माझा फोन."ऋषी निराश होत म्हणाला.

"घरी पण येऊ शकला असतात ना, मनात असत तर?" ऋचा म्हणाली

"तुझी हिम्मत नाही झाली? तू कां नाहीं आलीस तुझ्या घरी वापस? "ऋषीने मुद्दाम विचारले.

ऋचाची आई आली. त्यांनी तिचा हात धरला आणि बाहेर नेले. "आता असं का बघतेयस? आता नातं संपलंय, काही ऐकू नकोस यां बेवड्याचं" म्हणत एक जळजळीत कटाक्ष ऋषिकडे टाकला.
ऋचाच्या आत काहीतरी तुटलं.'खरंच बेवडा होता का हा? '

आई-मुलगी बाहेर व्हरांड्यातल्या सोफ्यावर बसून गाडीची वाट पाहू लागली.
ऋचाला सुद्धा वाटत होत आत काहीतरी फुटत आहे. तिचे हृदय खाली जात होते. ती सुन्न होत होती.

ती ज्या सोफ्यावर बसली होती त्या सोफ्याकडे तिने लक्षपूर्वक पाहिलं. तिला आठवलं,तो सोफा तिला कसा आवडला आणि ऋषीने पै पै जमवून तो सोफा विकत घेतला.

तेव्हा घराचं लोन असल्यामुळे थोडी नड असायची, ऋचाशी लग्न करायचंय म्हणून आधी त्याने घर बांधलं होतं तिच्यासाठी, त्यात त्याची सगळी सेविंग, फंड संपला होता, लोन चे हप्ते पण सुरु होते तरी त्याने तिला आणि मुलाला कधीच काही कमी पडू दिल नव्हतं.

तिला आठवलं जेव्हा ते दोघे शहरात फिरत होते तेव्हा तिला तों आवडला होता त्याने चार पाच महिन्यात जुळवाजुळव करून तिच्या वाढदिवसाला तो सोफा घरी आणला होता, किती खुश होती ती त्यादिवशी अगदी तिलाच तिच्या सुखाचा हेवा वाटावा अशी, आणि आज?

ऋषी खूप अस्वस्थ होता,तेवढ्यात त्याची नजर समोरच्या वाळलेल्या तुळशीच्या रोपाकडे गेली. 'किती काळजी घेतलीस तु यां तुळशीची? बघ तुळशीही तिच्यासोबत घरातून निघून गेली.' त्याच मन आक्रंदत होतं.

जीव घाबरल्याने ती पुन्हा उठून आत गेली. आईने मागून हाक मारली पण तिने दुर्लक्ष केले. तिला काय होतंय कळत नव्हतं.

ऋषी बेडवर उशीत तोंड लपवून पडलेला होता. एकदा तिला त्याची दया आली. पण आता सगळं संपलं होतं हे तिला माहीत होतं त्यामुळे तिला भावनिक होण्याची गरज नव्हती. तिने त्याला रुमाल दिला.
त्याने रुमाल कडे टकटक नजरेने पाहिले.
संपूर्ण खोली अस्ताव्यस्त होती. कुठे कुठे कोळ्याचे जाळे लटकत होते.

त्याला कोळ्याच्या जाळ्यांचा किती तिरस्कार होता? सगळं नीटनेटकं लागायचं त्याला, जिथंली वस्तू तिथेच असावी हा आग्रह असायचा त्याचा. त्यासाठी तो कधी ओरडत नव्हता तिच्यावर उलट स्वतःच सार आवरून घेत होता.

मग तिने आजूबाजूला असलेल्या त्या फोटोंकडे पाहिले, एका फोटोवर तिची नजर खिळली ज्यात ती हसत ऋषीला मिठी मारत होती.
किती सोनेरी दिवस होते ते?

तेवढ्यात आई पुन्हा आली. तिचा हात धरून पुन्हा तीला बाहेर काढले.
बाहेर गाडी आली होती. गाडीत सामान टाकले जात होते. ऋचा एकटी बसली होती. आई सामान टाकणाऱ्यांना सूचना देत होती.
गाडीचा आवाज ऐकून ऋषी बेचैन होऊन बाहेर आला.

अचानक ऋचासमोर कान पकडून गुडघ्यावर बसला.
म्हणाला - "जाऊ नकोस ना अशी,मला माफ कर एकदा, एक संधी दे ना प्लिज?"
ऋचाला जाणवलं,कदाचित हेच शब्द, चार वर्षांपासून ऐकायला तिचे मन आतुर होते. संयमाचे सगळे बांध एकदम फुटले.

ऋचाने हातातला कोर्टाच्या निर्णयाचा कागद फाडून टाकला आणि आई काही बोलायच्या आधीच ती ऋषीला घट्ट बिलगली. चार वर्षाचा दुरावा त्या एका मिठीत विरला होता, दोघंही मिळून खूप रडत होते कितीतरी वेळ.
दूर उभ्या असलेल्या ऋचाच्या आईला जे समजायचे ते समजले होते.
न्यायालयाचा आदेश म्हणजे हृदयासमोरील कागदाशिवाय दुसरे काही नाही.
तिच्या आईलाही जाणवले त्यांना आधी भेटू दिले असते तर ? मनं भरवून नातं दूर होऊ शकत पण तुटू शकत नाहीं, त्यांचं प्रेम खरं होतं ते दूर होऊच शकत नव्हतं. कधीच...समाप्त...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//