Nov 30, 2021
प्रेम

न भेटलेला तो...

Read Later
न भेटलेला तो...

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

                                                                          न भेटलेला तो....

 

         आज ती पुस्तक वाचण्यात जरा जास्त मग्न झाली होती. इतकी कि ट्रेन वाटेत येणाऱ्या स्टेशनवर थांबल्यावर प्रवाश्यांची, फेरीवाल्यांची होणारी ये जा ही तिला जाणवली नाही. मध्येच तिला कोणा एका फेरीवाल्याने हाक मारली , ' ताई वडापाव घेणार का?? ' तीने तसचं पुस्तकातून डोक बाहेर न काढता म्हटलं , ' नको नको '  वडापाव म्हणजे तिला सगळ्यात आवडणारी गोष्ट. पण ह्या वेळी ती नाही म्हणाली. ती पुस्तकात एवढी गुंतली होती कि तिला वाचताना मध्ये कोणाचाच अडथळा नको हवा होता. ट्रेन स्टेशनवरुन सुटली. तशी फेरीवाले, प्रवाश्यांची वर्दळ हळूहळू कमी होवू लागली. हळूहळू ट्रेननी वेग घेतला. रोजच्यापेक्षा तशी ट्रेनमध्ये फार गर्दी नव्हती. सगळीकडे शांतता पसरली. मध्येच लहान मुलांचं धावणं, बायकांच्या रंगात आलेल्या गप्पा तर त्यांचा आवाज चढल्यावर अधूनमधून चांगल्याच ऐकायला येत होत्या. बाजुच्या साईडला काही ज्येष्ठ नागरिकांच्या शांतपणे गप्पा चालू होत्या. राजकारणाच्या त्या गप्पात प्रत्येकजण आपापल्या पक्षाची बाजू अगदी पद्धतशीरपणे मांडत होता. जास्त गर्दी नसल्यामुळे सगळे प्रवासी कसे ऐसपैस बसले होते. 

          ती मात्र अजूनही पुस्तकच वाचत होती. आपल्या आजूबाजूला काय चाललयं ह्याकडे तिच लक्षच नव्हतं आणि तसही तिचं स्टेशन यायला अजून १-१.३० तास होता. ती बसली होती तिथे ती सोडून कोणीच नव्हतं. त्यामुळे तिला थोड्या शांततेत पुस्तक तरी वाचायला भेटलं. आता पुस्तकाची शेवटची १-२ पानं राहिली होती. पुस्तकाचा शेवट वाचताना क्षणाक्षणाला तिचे हावभाव बदलतं होते. अखेर तिने पुस्तकाच्या शेवट वाचला. तिच्या चेहऱ्यावर गोडस हसू अन् डोळ्यात पाणी दाटून आलं. क्षणभर ती तशीच राहिली. मग अचानक भानावर येवून तिने पुस्तक आपल्या पर्समध्ये ठेवून हातातल्या घड्याळात बघितलं संध्याकाळचे ४ वाजले होते. 'अजून खूप वेळ आहे' असं म्हणत ती खिडकीबाहेर बघू लागली. कसं सुंदर वातावरण होतं. सुर्यदेव आपल्या सोनेरी किरणांचा वर्षाव जाता जाता ह्या सृष्टीवर करत होते. झाडही मनमुरागपणे त्याचा आस्वाद घेत थंडगार वाऱ्याच्या तालावर झुलतं होती. पक्षीही आता सुर्यदेव आहेच तोवर आपापल्या घरी जायची घाई करत होते. अगदी छान वातावरण होतं. 

         त्यात तिला आज रोजच्यापेक्षा जरा जास्तच त्याची आठवण येत होती. तिला खूप मनापासून वाटत होत कि जसं पुस्तकात नायिकेला शेवटी तिचं खर प्रेम भेटतं, तो तिच्या स्वप्नातला राजकुमार भेटतो. तसं तिला त्याला भेटायचं होतं. त्याच्याशी खूप खूप बोलायचं होतं. त्याला प्रेमाने घट्ट मिठी मारवी अन् त्याच्या मिठीतच रहावं अस वाटतं होतं. तो नव्हता तेव्हा तिला त्याची किती आठवण आली हे आवर्जून सांगायचं होतं. इतके दिवस न भेटल्याबद्दल तिला त्याला दटवायचं होत पण प्रेमाने हो! 

        पण तो आहे कुठे? त्याचं नाव काय असेल?? तो कुठे राहत असेल??? कसा दिसत असेल???? असे असंख्य प्रश्न तिला पडले होते… कारण तो तिच्या आयुष्याचा जोडीदार अजून तिच्या आयुष्यात यायचा होता…… पण आठवण तर खूप येत होती ना त्या अनामिकाची….काय करावे काहीच सुचत नव्हतं. तिच्या मनात खूप प्रकारच्या भावना दाटून येत होत्या. तिच मन खुपदा मोठ्याने ओरडून त्याला हाक मारायचं "अरे! आहेस तरी कुठे? मला भेटायचयं तुला.... मला खूप आठवण येतेय तुझी……" पण तो तिचा राजकुमार तिला अजुनही भेटला नव्हता. कदाचित तिने घातलेली साद त्याच्यपर्यंत पोहोचली नसेल. "असं म्हणतात कि गाठी वर बांधलेल्या असतात. मं देवा मला आता जाणून घ्यायचयं तो कोण आहे?" तिच मन खूपदा देवाकडे अशी विनवणी करत असे. 

         तिला अजून न भेटलेल्या त्याच्या विरहाचा किती त्रास होतोय, किती आठवण येतेयं, किती बोलून वाटतयं ह्याची तर त्याला जाणिवही नसेलं. उलट त्याला तिचं अस्तित्वावही माहित नसेलं कदाचित… असं तिला वाटतं होत. तिच मन म्हणत होतं "त्या पुस्तकातली नायिका जशी त्यांच्या विरहाच्या काळात प्रियकराला गुपचूप पत्र पाठवत असे तशी तिला पाठवता आली असती तर…! किती मस्त झाल असतं. पण मला हा पठठ्या कोण आहे हे कुठे महितेय???" तिच्याच  शब्दावर ती गालातल्या गालात हसली. "हे सगळं मी त्याला भेटल्यावर सांगेन तेव्हा काय बरे त्याच्या चेहऱ्यावर हावभाव असतील…...?" ह्या विचारत असताना अचानक तिच्या डोळ्यात एक चमक आली, "तेव्हा कशाला आता का नाही सांगू शकत मी….....? जशी ती नायिका त्याला पत्र लिहित असे तसं मी पण……. पण हा तर एक प्रकारचा वेडेपणा ठरेल….. मग काय झालं आयुष्यात असा वेडेपणा एकदा तरी करावा…….नेहमीच लॉजीकल जगण्यापेक्षा असा वेडेपणा कधीतरी करावा...चल करुया……." तिच्या मनात कितीवेळ चाललेलं द्वद्व संपलं आणि शेवटी तिने ठरवलं. ट्रेन तिच्या स्टेशनला यायला १० मिनीटे होती. लागलीच तिने आपलं सामान आवरुन घ्यायला सुरुवात केली. ट्रेन स्टेशनला थांबली तशी ती उगाचचं घाईघाईने आपलं सामान घेत ट्रेनमधून उतरली. ती स्टेशनवर काहीतरी शोधत होती आणि ते तिला दिसलही… तिने डायरी घ्यायचं ठरवलं होतं. त्यात ती त्याच्याबद्दल जे काही वाटत होत, जे त्याच्याशी बोलूसं वाटत होत ते सगळ लिहिणार होती. मग जेव्हा तो तिला भेटेल तेव्हा ती डायरी त्याला वाचायला देणार होती आणि मग त्याला प्रेमाची मिठी मारणार होती….तिथे एक  स्टेशनरीच छोटसं दुकान होतं तिला हवी असणारी वस्तू तिथे नक्की भेटणार होती. ती त्या दुकानाच्या दिशेने गेली…….....

        स्टेशनवरच्या त्या गर्दितल्या आवाजात कुठेतरी लागलेलं एक गाणं तिच्या भावनांना साद देत होत…

           " पाहिले न मी तुला, तु मला न पाहिले

            ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले…."

           
 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now