गूढ (भाग-७)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. कथेतील सर्व नावे, प्रसंग, ठिकाण पूर्णतः काल्पनिक आहे. कथा कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
डॉ. विजय पाणी घेतात.... त्यांना दरदरून घाम फुटलेला असतो.... नियतीच्या हे लक्षात येतं.....
नियती:- सर तुम्हाला काही त्रास होतोय का? एवढा घाम का येतोय तुम्हाला?
डॉ. विजय:- अगं काही नाही... जरा उकडतंय म्हणून असेल.... तू फॅन फास्ट करतेस का?
नियती:- हो करते! पण पावसाच्या या थंड दिवसात पण तुम्हाला घाम येतोय म्हणजे काहीतरी त्रास होत असेल तुम्ही डॉक्टर ना दाखवून घ्या...
डॉ. विजय:- नको काळजी करुस! मला असं होत कधी कधी... ते जाऊदे मी तुझं ब्लड सॅम्पल घ्यायला आलो आहे... तुला बरं वाटत नाहीये ना म्हणून म्हणलं टेस्ट करून बघूया....
नियती:- सर त्यात ब्लड सॅम्पल का घेतलं पाहिजे? मला आता बरं वाटतंय.... काही गरज नाहीये त्याची....
डॉ. विजय:- नियती ऐक माझं! पावसाळा सुरू आहे. सध्या बऱ्याच साथी पसरलेल्या असतात... तू जर खूप आजारी पडलीस तर मला लॅब मध्ये कोण मदत करेल? माझी ऑर्डर आहे समज आणि सॅम्पल दे टेस्टिंग साठी....
नियती नाईलाजाने तयार होते.... डॉ. विजय तिचं ब्लड सॅम्पल घेऊन जातात....
थोड्यावेळाने ती भाजी आणायच्या निमित्ताने घराबाहेर जाते तेव्हा सुशांत ला फोन करून हे सगळं सांगते!
सुशांत:- बघ मी म्हणलं नव्हतं काहीतरी गडबड आहे! मला मगाशी हॉस्पिटल मधून त्या डॉक्टर चा फोन आला होता सकाळी ११ वाजता त्याने मला बोलावलं आहे.... बघू तेव्हा काय होतंय.... देतो मी तुला अपडेट्स.... या प्रकरणाचा जरा बारकाईने छडा लावतो अजून.... बाय....
नियती:- बाय....
दुसऱ्या दिवशी नियती लॅब ला जाते... आजपण डॉ. विजय आधीच आलेले असतात....
नियती:- सर दोन दिवस झाले तुम्ही लवकर येताय.... मला पण बोलवायचं होतं ना जास्तीच काम होत तर...
डॉ. विजय:- अगं कशाला उगाच! तुला आधीच खूप मनस्ताप होतोय म्हणून मीच लवकर येत होतो.... बाय द वे तुझे कालचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत! काळजी करण्यासारखं काही नाही.... हे घे तुझे रिपोर्ट्स....
नियती रिपोर्ट्स घेते आणि तिला आश्चर्याचा धक्का बसतो.... डॉ. विजय तिला खुणेनेच काही बोलू नकोस म्हणून सांगतात....
त्या रिपोर्ट्स च्या फाईल मध्ये त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ज्यात लिहिलेलं असतं; "तू आता फार काळजी घे.... त्या तस्करीच्या टोळीची नजर आता तुझ्या जीवावर आहे! तुला प्रश्न पडला असेल हे सगळं मला कसं माहित पण आत्ता मी तुला काही सांगू शकत नाही.... या बद्दल एकही शब्द न बोलता हा कागद जाळून टाक.... आणि नॉर्मल वाग! तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला हळूहळू मिळतील... सुशांत बरोबर सगळं शोधून काढतोय....."
नियती तो कागद जाळून टाकते..... सगळा दिवस असाच विचार करत करत काम करण्यात निघून जातो! संध्याकाळी नियती घरी येत असताना सुशांत ला फोन लावते....
सुशांत:- बोला मॅडम तुमच्याच फोन ची वाट बघत होतो....
नियती:- म्हणजे तुला माहित होत मी कॉल करणार आहे?
सुशांत:- हो! आणि तुझे सर या प्रकरणात गोवले गेले आहेत.... आजच माझ्या खबऱ्याकडून मला समजलं....
नियती:- पण हे सगळं नक्की काय चाललंय मला काहीच समजत नाहीये..... आज सरांनी पण मला चिठ्ठी मधून हेच सांगितलं....
सुशांत:- हो! आपलं बोलणं झाल्यावर मला लगेच खबऱ्या कडून सरांना या प्रकरणात अडवलं जातंय हे कळलं होतं म्हणून मीच त्यांना तुला हे सांगायला सांगितलं! त्यांच्या बायकोला तस्करीच्या टोळीने किडनॅप केलंय आणि त्यांच्या कडून हे काम करून घेतायत...
नियती:- अरे देवा! सर हे आधी बोलले असते तर बरं झालं असतं!
सुशांत:- त्या मागे पण कारणं आहेत! पण आता आपलं काम अजून जोखमीचं झालंय..... आपल्याला आता त्यांचा जीव सुद्धा वाचवायचा आहे!
नियती:- हम्म... तू आज हॉस्पिटल मध्ये जाणार होतास ना? काय झालं तिथे?
सुशांत:- हो गेलेलो! त्यांनी सांगितलं आहे किडनी डोनर मिळाला आहे येत्या आठ दिवसांनी आपण ऑपरेशन करू म्हणून सांगितलं आहे! तू आता काळजी घे.... घरात काहीही होऊ शकतं! मी म्हणलं होत ना ते लोक आता आमावस्येची वाट नाही बघणार!
नियती:- हो! पण तुला हॉस्पिटल मधून आठ दिवस सांगितलं आहे म्हणजे आपल्या हातात आठ दिवस आहेत! चल आता आपण नंतर बोलू मी घराच्या जवळ पोहोचत आली आहे... बाय....
नियती आज घरी जायच्या आधी तिथेच जवळ असलेल्या देवळात जाऊन दर्शन घेते.... तिथेच थोडावेळ शांत बसल्यामुळे तिला प्रसन्न वाटतं आणि एक ऊर्जा जाणवू लागते...... ती तिथून निघणार तेवढ्यात तिला तिथे डॉ. विजय दिसतात.... त्यांच्या बरोबर कोणीतरी एक माणूस बोलत उभा असतो.... त्याच्या एकूणच पेहेरावावरून तो गुंड च वाटत असतो! नियती तिथे लपून सगळं ऐकत असते...... आणि व्हिडिओ काढायला घेते....
डॉ. विजय:- माझी बायको कशी आहे? मी सगळं केलं ना आता तुम्हाला जे हवं होतं ते... आता सोडा ना तिला.... नाही तर मी पोलिसांना सगळं सांगीन...
गुंड:- ए गप! अजून सगळं काम झालं नाहीये... तुझी बायको आहे सुखरूप! ती जर फुल पीस मध्ये पाहिजे असेल तर आम्ही सांगतो ते करायचं..... जास्तीच डोकं चालवायचं नाही..... नाहीतर बायकोचे तुकडे मिळतील तुला.....
डॉ. विजय:- नाही नाही तिला काही करू नका!
गुंड:- हम्म! असंच खालच्या पट्टीत बोलायचं! ती तुझ्या लॅब मध्ये काम करते ती पोरगी तिला काही संशय येऊ द्यायचा नाही.... आठ दिवस राहिलेत तिचे शेवटचे आता..... तिने काही शहाणपणा करायचा प्रयत्न केला तर लगेच कळवायचं..... चल निघ आता इथून....
डॉ. विजय तिथून गेल्यावर तो गुंड कोणाला तरी फोन लावतो आणि बोलतो; "बॉस आपलं काम झालंय.... तो विजय जरा जास्तच उडत होता त्याचे पंख कापले आहेत! हॉस्पिटल मधून पण फोन आलेला त्या मालदार पार्टीला आठ दिवसात किडनी द्यायची आहे.... आणि एका consignment ची पण ऑर्डर आहे त्या साठी पण या पोरीचाच वापर करू.... तसही तिचं या जगात कोणी नाहीये तर कोणी शोध घेण्याचा प्रयत्न नाही करणार....." एवढं बोलून तो फोन ठेवतो आणि तिथून निघून जातो.... नियती सुशांतला तो व्हिडिओ सेंड करते..... सुशांत चा रिप्लाय येतो; ओके.... बरं झालं व्हिडिओ काढलास! थोडा थोडा चेहरा दिसतोय यात गुंडाचा... मी बघतो आता काय ते... तू लवकर घरी जा आणि सावध राहा... त्या लोकांना संशय येऊ देऊ नकोस तुला काही कळलं आहे याचा...."
नियती सगळं नॉर्मल असल्यासारखं दाखवत घराकडे निघते.... घरी जायच्या आधी ती आजींच्या घरी जाते....
आजी:- अरे नियती ये ये.... आज स्वतःहून कसं येणं केलंस?
नियती:- आजी ते चौथं घर आहे तिथे मी कोणाला कधी बघितलं नाही..... कोण राहतं तिथे? आता मला इथे येऊन बराच काळ झाला पण अजून ओळख नाही झाली ना....
नियतीच्या बोलणं ऐकून आजींच्या चेहऱ्याचा रंगच उडाला...
नियती:- काय झालं आजी? तुम्ही काही बोलत का नाही?
आजी:- अगं त्या घरात खरंतर कोणी राहत नाही.... पण....
नियती:- पण काय आजी? ते घर पण पछाडलेलं वैगरे....
आजोबा:- हो! त्या घरातून विचित्र आवाज यायचे.... तू ज्या घरात राहतेस तिथे कोणी राहायला आलं कि, ते आवाज येत नाहीत.....
नियती:- विचित्र आवाज म्हणजे?
आजी:- कधी कोणाला बांधून ठेवलंय असा आवाज यायचा, कधी कोणीतरी किंचाळायच, मोठं मोठ्याने हसल्याचे आवाज यायचे...
नियती:- तुम्हाला कोणी दिसलं का तिथे?
आजोबा:- कधी कोणी दिसलं नाही...
नियती:- तुम्ही बरीच वर्ष इथे राहत असाल ना या आधी सुद्धा असं झालंय का कधी?
आजी:- नाही! आधी तिथे एक कुटुंबं राहत होतं पण ते सगळे परदेशात गेले... घर सांभाळायला ठेवलेला एक माणूस पण काय झालं काही माहित नाही....
नियती:- ओके.. बरं जाऊदे... मी म्हणलं ओळख होईल पण असो... चला मी येते... असं म्हणून ती घरी जाते आणि काही कडी जोडली जातेय का याचा विचार करत करत सगळी कामं आवरते....
आता नियतीच्या हाती काही लागेल का? त्या बंद असलेल्या पण तरीही तिथे कोणीतरी राहतं असं नियतीला वाटत असणाऱ्या घराचा आणि या तस्करीचा काही संबंध असेल? पाहूया पुढच्या भागात....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा