गूढ (भाग-५)

The story of mysterious house.

गूढ (भाग-५)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. कथेतील सर्व नावे, प्रसंग, ठिकाण पूर्णतः काल्पनिक आहे. कथा कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

          शेवटी तो आमावस्येचा दिवस उजडतोच! संध्याकाळी नियती लॅब मधून निघण्याच्या आधी तिथे सुशांत येतो.... डॉ. विजय नीच त्याला बोलावलेलं असतं! मागच्या वेळेला नियतीच्या घरात फक्त 'इथून निघून जा' एवढंच लिहिलं होतं पण, जर आज तिच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर म्हणून काळजी ने डॉ. विजय नी सुशांतला बोलावून घेतलेलं असतं! 
डॉ. विजय:- ये सुशांत! मला आज नियती ची खूप काळजी वाटतेय.... तिच्या जीवाला धोका आहे! आज तू जा तिच्या बरोबर तिच्या घरी!
नियती:- नाही सर! असं नाही करता येणार.... त्या माणसाला जरा जरी संशय आला तर होत्याचं नव्हतं होईल! 
सुशांत:- हो सर! नियती बरोबर बोलतेय.... तुम्ही काळजी करू नका नियती ला काही होणार नाही! आजींच्या म्हणण्यानुसार तिथे राहणारा व्यक्ती ३ महिन्यांपर्यंत टिकतो! म्हणजे अजून एक महिना नियती च्या हातात असेल.... आता घरात आपण कॅमेरा लावला आहे त्या वरून सुद्धा आपल्याला कोणतातरी धागा सापडेल! 
डॉ. विजय:- तरी मला खूप काळजी वाटतेय... मला मुलीसारखी आहे रे ही! लॅब मध्ये आल्यापासून अगदी लळा लावला पोरीने... मला ही कोणी अपत्य नाही.... मनोमनच हिला मी मुलगी मानलं! नियती तुला कधी बोललो नाही पण, तुझ्यासाठी माझं मन बाबाच्या काळजासारखं तुटत गं!
नियती:- सर नका काळजी करू.... मला काही नाही होणार! माझं पण या जगात कोणी नाहीये... पण, तुम्ही मला मुलगी मानता ना... मग एवढा विश्वास ठेवा माझ्यावर! तुमची मुलगी लेचीपेची नाहीये! 
         कसंबसं डॉ. विजय ना समजावून नियती आणि सुशांत निघाले.... नियती घरी आली... नेहमी प्रमाणे सगळं आवरून झोपायला गेली.... पण, आज वैऱ्याची रात्र आहे हे तिला माहित होतं! झोपायचं नाटक करून ती घरात काही हालचाली जाणवतायत का हे बघू लागली... मागच्या वेळी जसा आवाज झाला होता तसाच आज पुन्हा झाला..... नियती ने घड्याळ बघितलं.... रात्रीचे दोन वाजले होते... गपचूप मोबाईल चा कॅमेरा ऑन करून लपवून ठेऊन ती आवाजाच्या दिशेने निघाली.... स्वरक्षणासाठी हातात फ्लॉवरपॉट घेतला.... मागच्या वेळेसारखं च तिथे कोणी नव्हतं! ती पुन्हा बेडरूम मध्ये आली कोणी आहे का ते पाहिलं पण कोणी नव्हतं! अचानक कोणीतरी हसल्याचा आवाज आला आणि नियतीने जसं मागे वळून पाहिलं तशी तिला एक सावली दिसली..... जी मोठ मोठ्याने विचित्र हसत होती आणि जा इथून लवकरात लवकर असं बोलून लुप्त झाली! नियतीच्या काही लक्षात येत नव्हतं! डोकं सुन्न झालं होतं! 
         दुसऱ्या दिवशी नियती फोटो फ्रेम मधल्या कॅमेऱ्याची चीप काढून घेते. लॅब ला जायच्या आधी ती सुशांत ला भेटते आणि सगळा घडलेला प्रकार त्याला सांगते.... 
सुशांत:- तू कॅमेऱ्याची चीप घेऊन आली आहेस का? ती दे आपण फुटेज बघू....
नियती:- हो! एक मिनीट थांब! 
सुशांत ती चीप लॅपटॉप ला कनेक्ट करतो आणि दोघं फुटेज बघू लागतात.... पण संशयास्पद असं काहीच दिसत नसतं! 
नियती:- अरे पण हे कसं शक्य आहे? घरातून यायला फक्त एकच रस्ता आहे तो म्हणजे हे मेन डोअर.... पण यात काही संशयास्पद नाहीये.... 
सुशांत:- हम्म... खूप प्लॅनिंग केलेलं दिसतंय त्या लोकांनी! 
नियती:- अरे हा ऐक! मी बेडरूम मधून बाहेर गेली तेव्हा माझ्या मोबाईल चा कॅमेरा ऑन करून ठेवला होता... त्यात बघूया काही रेकॉर्ड झालं आहे का ते!
असं म्हणून ती फोन मधलं रेकॉर्डिंग सुशांत ला दाखवते..... त्यात त्या बाईच्या आवाजाशिवाय काहीच नसतं! 
सुशांत:- चल काहीतरी हाती लागलं आपल्या... आता या वरूनच आपण काहीतरी शोध लावू! हे रेकॉर्डिंग आधी मला ट्रासन्फर कर..... आणि या रेकॉर्डिंग बद्दल कोणालाच बोलू नकोस!
नियती:- कशाला कोणाला बोलेन! हे फक्त आपल्या तिघात तर राहतं सगळं!
सुशांत:- म्हणजे हे तू आधीच डॉ. विजय ना सांगितलंस का?
नियती:- नाही अजून सांगितलं! पण लॅब ला गेल्यावर विचारतीलच ना ते!
सुशांत:- नशीब माझं! नको सांगूस त्यांना पण! 
नियती:- अरे पण का? त्यांना किती काळजी असते माझी! 
सुशांत:- हो म्हणूनच म्हणतोय काही नको सांगू! त्यांना फक्त कसले तरी आवाज आले आणि फ्रेम मधल्या कॅमेरात काही रेकॉर्ड झालं नाही एवढंच सांग... 
नियती:- बरं! तू म्हणतोयस ते पण बरोबर आहे त्यांना अजून काळजी वाटेल! चल आता मी निघते... भेटू पुन्हा... 
असं म्हणून नियती तिथून जाते.... 
          लॅब ला पोहोचल्यावर सुशांत ने जसं सांगितलं होतं अगदी तसंच ती डॉ. विजय ना सांगते! 
डॉ. विजय:- अगं मग तू सुशांत ला इथेच बोलवायचं होतंस ना! आधी त्याला भेटायला गेलीस मग इथे.... 
नियती:- इथेच बोलावणार होते पण त्याला काहीतरी काम होतं म्हणून त्याला जास्त वेळ नव्हता! म्हणून मग बाहेरच भेटून आले! 
डॉ. विजय:- बरं! 
इतक्यात लॅब मध्ये एक प्रेत येते.... डॉ. विजय आणि नियती कामाला लागतात.... मागच्या वेळी जसा खून झालेला असतो अगदी तसाच खून या वेळी सुद्धा झालेला असतो! आणि प्रेत सुद्धा नियतीच्या घराच्या थोडं पुढे असणाऱ्या सामसूम तलावातून मिळालेले असते! आता नियती चा संशय खात्रीत बदलतो.... हे सगळं अवयव तस्करी साठीच सुरु आहे! पण, अवयव इतक्या शिताफीने काढून घ्यायचे आणि पुन्हा टाके घालायचे म्हणजे यात कोणीतरी डॉक्टर सुद्धा सामील असला पाहिजे! ही बातमी सुद्धा सुशांत ला देणं गरजेचं आहे! डॉ. विजय स्वतः तिला सुशांतला फोन करून हे सांग असं सांगतात.... पण सुशांत फोन उचलत नाही.... बहुतेक बिझी असेल थोड्यावेळाने फोन करते असं म्हणून नियती पुन्हा कामाला लागते.... डॉ. विजय सुद्धा फोन ट्राय करत असतात पण त्यांचा फोन सुद्धा तो उचलत नाही! असाच दिवस संपून जातो.... नियती घरी जायला निघते..... 
           वाटेत तिला सुशांत दिसतो..... तो तिला एक वेगळा फोन देतो... 
नियती:- अरे हे काय? तीन तीन फोन च काय करू मी? सरांनी सुद्धा मला एक फोन दिला आहे! 
सुशांत:- आत्ता काही बोलू नकोस... सगळं नंतर सांगतो! या फोन बद्दल कोणाला कळता कामा नये... मला जेव्हा काही महत्वाचं सांगायचं असेल तर मी या वर कॉल किंवा मेसेज करेन! तुला पण जे सांगायचं असेल ते यातूनच कर! पण तुझ्या सरांसमोर चुकून सुद्धा हा फोन काढू नकोस! लॅब मध्ये ऑफ ठेवत जा फोन! 
नियती:- ते सगळं ठीक आहे पण, आज सकाळ पासून तू सरांविषयी असं कोड्यात का बोलतोयस? 
सुशांत:- कळेल तुला वेळ आल्यावर पण आत्ता प्लिझ माझं ऐक! चल मला इथे जास्त वेळ नाही थांबता येणार.... बाय भेटू उद्या! 
असं म्हणून सुशांत पटकन कुठे जातो हे नियतीच्या सुद्धा लक्षात येत नाही! सुशांतच्या बोलण्याचा विचार करत करतच ती घराजवळ कधी पोहोचते हे हि तिला समजत नाही! 
   
तुम्हाला काय वाटतंय? सुशांत असं का बोलत असेल? त्याला काही पुरावे मिळाले असतील कि खरंच डॉ. विजय नियतीची फार काळजी करतात म्हणून म्हणत असेल.... पाहूया पुढच्या भागात..... 
          

🎭 Series Post

View all