मिस्टीरिअस मेसेज (भाग-९)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-९)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, सोनाली आणि ईशा ने मिळून कोन बदलले... सुशांत सुद्धा नियती ला भेटला... ईशा ला एक चिठ्ठी सापडली आहे..... निनाद आणि अभिषेक ला जी चिठ्ठी मिळाली त्यात नियती आधी राहायची तिथला पत्ता आहे.... आता पुढे...)
************************
दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता हळदीचा मुहूर्त होता.... आणि लग्न दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी होते.... लवकर कार्यालयात जायचं म्हणून अनुजा ने सगळी तयारी करून ठेवली होती.... बराच उशीर झाला होता तरी, डॉ. विजय आणि अनुजाला काही झोप लागत नव्हती....

"बघा ना, आपली नियती आता उद्या सासरी जाईल.... पुन्हा आपण एकटे..." अनुजा रडवेल्या सुरात म्हणाली. 

"हो गं! नियती आपल्या आयुष्यात येऊन जवळ जवळ पाच ते सहा महिनेच झाले असतील ना.... पण, ती अगदी आपलीच मुलगी असल्यासारखं वाटतंय.... असं वाटतंय आपणच तिला लहानाचं मोठं केलं आणि आता ती सासरी निघाली..... किती कमी वेळात जीव लावला पोरीने...." डॉ. विजय सुद्धा भरलेल्या डोळ्याने बोलत होते.

एवढ्यात त्यांच्या खोलीचं दार वाजलं.... डॉ. विजय नी पाहिलं तर नियती होती...

"काय झालं बाळा? झोप येत नाहीये का?" डॉ. विजय म्हणाले. 

"हो!... मी आज तुमच्या दोघांबरोबर इथेच झोपले तर चालेल का?" नियती म्हणाली. 

"ये ना... विचारतेस काय?...." अनुजा म्हणाली.

नियती त्यांच्या खोलीत गेली.... अनुजाच्या मांडीवर डोकं ठेवून ती झोपली.... अनुजा तिच्या केसातून हात फिरवत होती.... 

"आई! उद्या आता मी सासरी जाणार.... खूप मिस करेन गं मी तुम्हाला दोघांना...." नियती सुद्धा रडवेल्या सुरात म्हणाली.

"शु... काही बोलू नकोस.... आम्ही कायम तुझ्या बरोबरच असणार आहोत... आणि आता सुशांत, त्याचे आई - बाबा ते सुद्धा आहेतच की... तू पुन्हा लॅब जॉईन करशील तेव्हा बाबा पण रोज भेटणार आहेत तुला... मी सुद्धा येत जाईन अधून मधून लॅब मध्ये.... आता कसलाही विचार न करता झोप बघू शांत..... उद्या लवकर कार्यालयात जायचं आहे ना..." अनुजा नियतीचे डोळे पुसत म्हणाली. 

थोडावेळ असाच गेला... अनुजाने तिला अंगाई म्हणून झोपवलं.... अगदी एखाद्या लहान मुलीसारखी ती तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती.... डॉ. विजय तिथेच बाजूला बसले होते.... त्यांनी सुद्धा नियतीच्या डोक्यावरून हात फिरवला.... हळूच तिचं डोकं उशीवर ठेवलं..... 

"आत्ता मगाशी तू स्वतः हिच्यासारखी रडत होतीस आणि आत्ता तिलाच समजावलं... तुम्हा बायकांना समजणं ना महा कठीण काम आहे..." डॉ. विजय म्हणाले.

"असुदे.... आमच्या माय - लेकीचं तुम्हाला काय समजणार..." अनुजा म्हणाली. 

"बरं बरं... मी इथे खाली अंथरूण घालून झोपतो.... तू सुद्धा आता लवकर झोप..." डॉ. विजय म्हणाले. 

त्यांनी त्यांचं अंथरूण घातलं आणि झोपले.... अनुजा सुद्धा झोपली.... सकाळी लवकर उठून तिने आवरा आवरी केली... डॉ. विजय सुद्धा त्यांचं आवरून हॉल मध्ये जाऊन बसले.... अजून काही नियती उठली नव्हती.... 

"नियती तिच्या खोलीत नाहीये..... आवरलं का तिचं?" ईशा ने डॉ. विजय ना विचारलं. 

"अगं नाही... काल रात्री ती आमच्या खोलीत येऊन झोपली होती.... माझं आवरलं तोपर्यंत तरी ती उठली नव्हती.... अनुजा ने उठवलं असेल आता.... काल बराच उशीर पर्यंत झोप लागली नव्हती ना तिला...." डॉ. विजय म्हणाले.

"ओके... तुम्ही सांगितल्या प्रमाणे काल ड्रॉवर मध्ये मी कोन ठेवले आहेत.... हि चावी... पण, आज तुम्ही कसे चेक कराल ते?" ईशा ने डॉ. विजयंच्या हातात चावी देत विचारलं.

"हळद झाली की काहीतरी निमित्त काढून मी लॅब ला जाणार आहे... तेव्हा चेक करेन... लग्नाला नंतर बराच अवकाश आहे ना.... तोपर्यंत इथे काही माझं काम नसेल... पटकन जाऊन येईन..." डॉ. विजय म्हणाले. 

"बरं... मला तुम्हाला अजून एक चिठ्ठी दाखवायची आहे.... हि चिठ्ठी काल मला नियतीच्या आसनाखाली मिळाली.... मात्र यात हे असं का लिहिलं आहे ते समजत नाहीये...." ईशा ती चिठ्ठी डॉ. विजय ना देत म्हणाली. 

"हे एक काय दुष्टचक्र मागे लागलंय काय माहित..." डॉ. विजय काळजीत म्हणाले. 

"नका काळजी करू तुम्ही.... सुयश सर आणि बाकी सगळे आहेत आपल्या सोबत... शिवाय सुशांत सुद्धा आता विशेष काळजी घेतोय.... आपण नियती ला काहीही होऊ देणार नाही...." ईशा त्यांना समजावत म्हणाली. 

"कोणाला काय देणार नाही?" अनुजा त्यांचं बोलणं ऐकून म्हणाली.

"पाहुण्यांना ओ... काहीही कमी पडू देणार नाही असं म्हणत होते..." ईशा सावरून घेऊन म्हणाली. 

"बरं बरं... नियती तिचं आवरतेय.... आत्ताच उठली ती.... मी काय म्हणतेय, ईशा आता पुढे जातेच आहे तर तुम्ही पण जावा ना तिच्या बरोबर... म्हणजे काही हवं असेल तर पटकन कोणीतरी असावं.... सदू गेलाय आधीच पण तुम्ही पण असावं बरोबर..." अनुजा म्हणाली.

"हो चालेल... पण, तुम्ही दोघी वेळेत या..." डॉ. विजय म्हणाले.

एवढ्यात दार वाजलं.... डॉ. विजय नि दार उघडलं तर सोनाली आली होती.... 

"तू आज एवढ्या पहाटे कशी?" डॉ. विजय नि विचारलं.

"ईशा ने बोलावलं.... तिला कार्यालयात तयारी ला जावं लागेल ना... मग नियती बरोबर कोणीतरी हवं म्हणून..." सोनाली म्हणाली. 

"अहो.... कोण आलं आहे?" अनुजा ने विचारलं. 

"सोनाली... ये आत ये...." डॉ. सोनाली ला म्हणाले. 

ईशा ने नजरेनेच तिला लक्ष ठेव म्हणून सांगितलं.... ती आणि डॉ. विजय पुढे कार्यालयात जायला निघाले....

"सर, मी काय म्हणते; तुम्ही आत्ताच लॅब ला जाऊ शकाल का? म्हणजे कोन तुम्ही सोबत आणले असतीलच ना... नंतर घाई नको..." ईशा ने विचारलं. 

"हो.... हे सामान घेऊन तू पुढे हो.... मी लॅब ला जाऊन येतो... चेक करून तुला आणि सुयश सरांना कॉन्फरन्स कॉल करतो..." डॉ. विजय म्हणाले. 

"ओके... पण, वेळेत या... नाहीतर अनुजा मॅडम ना काळजी वाटेल..." ईशा म्हणाली. 

"हो... लवकरात लवकर येतोच..." डॉ. विजय म्हणाले. 

अर्ध्या रस्त्यातूनच ईशा कार्यालयात गेली आणि डॉ. विजय लॅब मध्ये.... कार्यालयात सगळी तयारी व्यवस्थित झाली होती..... नियती येई पर्यंत ईशा ने तिला घालायचे दागिने, साडी आणि इतर तयारी करून ठेवली.... 
*************************
इथे लॅब मध्ये डॉ. विजय नि सगळे कोन तपासले... टेस्ट झाल्यावर लगेच त्यांनी सुयश सर आणि ईशा ला कॉल केला....

"हॅलो.... मी सगळे कोन तपासले.... पण, कोणत्याच कोन मध्ये कसल्याही प्रकार ची भेसळ नाहीये...." डॉ. विजय म्हणाले. 

"ओह... म्हणजे, ती कालची चिठ्ठी या साठी होती तर.... आपण, कोन बदलले आहेत ते त्या व्यक्ती ला समजलं असणार.... आणि म्हणून ती चिठ्ठी ठेवली असेल तर?" ईशा म्हणाली. 

"तू म्हणतेस त्यात तथ्य आहे... असू शकतं..." सुयश सर म्हणाले. 

"सर, ईशा आणि सोनाली आहेतच नियती ची काळजी घ्यायला पण, तुम्ही सुद्धा लग्नाच्या मुहूर्ताच्या आधी आलात तर बरं होईल..." डॉ. विजय म्हणाले. 

"हो! आम्ही सगळे लवकरच येऊ..." सुयश सर म्हणाले. 

"ठीक आहे! भेटूया..." असं म्हणून डॉ. विजय नि फोन ठेवला... आणि ते सुद्धा कार्यालयात जायला निघाले. ते कार्यालयात पोहोचले आणि दोनच मिनिटात नियती आणि अनुजा सुद्धा आल्या... 

"सोनाली कुठे आहे?" ईशा ने विचारलं. 

"अगं ती आम्हाला इथे सोडून सुशांत च्या घरी गेली आहे.... त्याचं घर इथेच बाजूला आहे ना... ते लोक घरात हळदीचा कार्यक्रम करून मग इथे येणार आहेत! सोनाली सुशांत ची करवली आहे ना... म्हणून मग ती तिथे गेली... चला आता ईशा तू नियतीला तयार कर.... तोपर्यंत मुलाकडची उष्टी हळद येईलच..." अनुजा म्हणाली. 

"हो! चल नियती आपण तयारी करू....." ईशा म्हणाली. 

नियती आणि ईशा तयार व्हायला गेल्या.... नियती ने मस्त पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.... त्यावर आर्टिफिशियल फुलांचे दागिने घातले होते.... बाजूबंद, बिंदी, नेकलेस, ब्रेसलेट आणि गुलाबाच्या फुलाचे कानातले... पांढऱ्या मोत्यांनी बनवलेले, पिवळी गुलाबाची फुलं लावलेले ते दागिने नियती वर छान खुलून दिसत होते....  

"वाव यार... काय मस्त दिसतेयेस... एकदम कडक..." ईशा म्हणाली. 

एवढ्यात तिथे अनुजा आली... 
"वा... काय छान दिसतंय माझं लेकरू... कोणाची दृष्ट नको लागायला..." असं म्हणत तिने डोळ्यातून काजळ काढून नियतीच्या कानामागे लावलं.... 

"चला आता खाली... सोनाली तिथून निघाली आहे... येईलच इतक्यात...." अनुजा म्हणाली. 

ईशा नियती ला घेऊन खाली आली... खाली निंबाळकर आजी आलेल्याच होत्या... 
"वा... छान दिसतेस हा बाळा... अशीच हसत राहा... कोणाची दृष्ट नको लागायला..." असं म्हणत त्यांनी नियती च्या चेहऱ्या भोवती हात फिरवून बोटं मोडली...

नियती ला तिथे पाटावर बसवलं.... पाटा भोवती छान रांगोळी काढली होती.... हळदीचं तबक सुद्धा छान सजवलं होतं... एवढ्यात सोनाली सुशांत कडून उष्टी हळद घेऊन आली... पण, ईशा ला काहीतरी दिसलं.... तिने स्वतः पुढे होऊन ती हळद घेतली आणि सोनाली ला सगळ्यांना बोलण्यात अडकव असं हळूच कानात सांगितलं....

क्रमशः....
************************
ईशा ला काय दिसलं असेल? तिने का सोनाली ला हळद बाकी कोणाच्या हातात देऊ दिली नसेल? पाहूया पुढच्या भागात.... तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट मधून नक्की सांगा... 

🎭 Series Post

View all