मिस्टीरिअस मेसेज (भाग-७)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-७)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, ईशा पोलीस स्टेशन ला गेली आहे.... सुशांत मॉल च सी.सी.टिव्ही. फुटेज घेऊन आला आहे.... अभिषेक आणि निनाद त्या फोटोतल्या माणसाबद्दल माहिती काढायला गेले आहेत आणि ईशा ला मिळालेल्या चिठ्ठीत मेहंदी च डिजाईन आहे... आता पुढे....)
**********************
नियती च्या घरी मेहंदी च्या कार्यक्रमाची जोरात तयारी सुरु होती.... ईशा ने जसं जसं सांगितलं होतं अगदी तसंच सगळं डेकोरेशन होत होतं....

"हाय नियती... काय म्हणतेस? जोरदार तयारी सुरु आहे हा सगळी..." सोनाली नियतीच्या खोलीत जात म्हणाली. 

"ये सोनाली... आज काय सुट्टी टाकलीस वाटतं..." नियती म्हणाली. 

"हो! म्हणलं तुला काही मदत हवी असेल तर दिवसभर थांबूया तुझ्याकडे.... ते सगळं जाऊदे पण हाताला काय गं लागलं?" सोनाली काहीही माहीत नसल्यासारखं दाखवत म्हणाली. 

नियती ने सगळा घडलेला प्रकार सांगितला. 

"पण, हे आई ला कळू देऊ नकोस हा..." नियती म्हणाली. 

"हो गं बाई..." सोनाली म्हणाली. 

"काय आम्ही यावं का आत... कि मैत्रिणींच्या गप्पा झाल्यावर येऊ?" डॉ. विजय वातावरण हलकं करायला म्हणाले. 

"काय सर तुम्ही? या ना... आमचं काय चालूच असतं!" सोनाली म्हणाली. 

डॉ. विजय आत आले... सोबत फर्स्ट एड किट पण होतंच! 

"चल नियती हात बघू तुझा.... पटकन ड्रेसिंग करून देतो... तुझी आई बाहेर गेली आहे तेवढया वेळात हा किट पण जागच्या जागी गेलेला बरा..." डॉ. विजय म्हणाले. 

त्यांनी नियतीच्या हातावरची जुनी पट्टी काढली... व्यवस्थित चेक करून, आधीचा मलम पुसून नीट पुन्हा नवीन पट्टी करून दिली.... 

"चला तुम्ही दोघी बसा मी आता आवरतो आणि लॅब ला जायला निघतो..." डॉ. विजय सगळं किट मध्ये पुन्हा सामान ठेवत म्हणाले. 
***********************
अभिषेक आणि निनाद सदू च्या मित्राच्या (रामू च्या) घरी पोहोचले.... कोणाला संशय नको म्हणून दोघं साध्या वेशातच होते... घराचं दार उघडचं होतं... आजूबाजूला चौकशी केल्यामुळे रामू तिथे एकटाच राहतो हे समजलं होतं.... दोघं डायरेक्ट घरात घुसले... 

"बोला साहेब नाव काय तुमचं? कोणत्या कामासाठी माणसं हवी आहेत?" रामू वर न पाहताच म्हणाला. 

" ज्युस मध्ये विष मिसळतील अशी माणसं हवी आहेत?" निनाद म्हणाला. 

"ओ.. काय बोलताय... मी काय सुपारी किलर वाटलो का? थांबा पोलिसांनाच फोन करून बोलावतो..." रामू उभा राहत म्हणाला. 

"त्याची काही गरज नाहीये... आम्ही जे विचारतोय त्याची उत्तरं दे फक्त..." अभिषेक त्याचं आय.डी. कार्ड दाखवत म्हणाला. 

"बोल... दोन दिवसांपूर्वी डॉ. विजयंच्या घरी साक्षगंध सोहळा झाला, तेव्हा स्नॅक्स सर्व्ह करायला कोणाला पाठवलं होतंस?" निनाद ने त्याला खांद्याला धरून खुर्चीवर बसवत विचारलं. 

"दोन दिवसापूर्वी..... हा.... हा... साहेब आठवलं... त्या दिवशी मला सदू चा फोन आलेला त्याला मदत म्हणून मी मंग्या ला पाठवलं होतं..." रामू म्हणाला. 

"हाच का तो मंग्या?" अभिषेक ने त्याला फोटो दाखवत विचारलं. 

"नाही... हा मंग्या नाहीये..." रामू म्हणाला. 

"काय? ठीक आहे... आम्हाला त्याचा पत्ता दे.... आणि आम्ही इथे येऊन गेलो हे कोणालाही सांगायचं नाही... सदू ला पण नाही... समजलं?" निनाद ने मागे खुर्चीला धरून रामू जवळ जात सांगितलं. 

रामू ने बरं बरं साहेब म्हणत मंग्या चा पत्ता दिला... निनाद आणि अभिषेक त्या पत्त्यावर गेले.... दार आतून बंद होतं... अभिषेक ने दार वाजवलं..... मंग्या ने दार उघडलं... 

"तुम्ही कोण? कोण हवं आहे आपल्याला?" मंग्या ने दारातूनच विचारलं. 

"तूच मंग्या ना?" अभिषेक ने त्याच्या घरात जात विचारलं. 

"हो! पण, तुम्ही असं डायरेक्ट काय घरात येताय? कोण हवंय तुम्हाला?" मंग्या ने पुन्हा विचारलं. 

"हा माणूस कोण आहे?" निनाद ने फोटो दाखवत विचारलं. 

"मला काय माहित? असं कोणाच्या पण घरात जाऊन काहीही काय विचारताय?" मंग्या थोडं घाबरत घाबरत म्हणाला. त्याला एव्हाना अंदाज आला होता हे नक्कीच पोलीस असणार...

"माहित नाहीये तर एवढा घाम का फुटलाय? आणि घाबरायचं काय कारण?" निनाद म्हणाला. 

हे ऐकून तो पळायचा प्रयत्न करू लागला... पण, अभिषेक ने त्याची मागून कॉलर धरली आणि त्याला पकडलं.

"कुठे पळून चालला आहेस... बोल... कोण आहे हा माणूस?" अभिषेक ने विचारलं. 

"सांगतो! आधी मला सोडा..." मंग्या म्हणाला. 

अभिषेक ने त्याची कॉलर सोडली... 

"दोन दिवसाआधी रामू ने मला एका कार्यक्रमात काम मिळवून दिले होते.... मी तिथेच चाललो होतो... पण, वाटेत मला हा माणूस भेटला.... आणि तो म्हणाला हे काम करायला मी जातो... मी आधी नाहीच म्हणालो... पण, त्याने मला चार हजार रुपये दिले आणि सांगितलं मी जरी काम केलं तरी त्याचे पैसे पण तूच घे... आणि तो गेला... मला वाटलं बरंच झालं काहीही काम न करता आयते पैसे मिळतायत तर का सोडा.... म्हणून मी पण घरी निघून आलो... आणि आत्ता तुम्ही आलात तेव्हा मला वाटलं रामू ला सगळं समजलं आणि म्हणून त्याने तुम्हाला इथे मला पकडायला पाठवलं." मंग्या ने सगळं सांगितलं. 

"कोण होता तो माणूस? त्याचं नाव, गाव काही माहित आहे का?" निनाद ने विचारलं. 

"नाही.... पण, हा सर त्याने जेव्हा मला चार हजार रुपये काढून दिले तेव्हा त्याच्या खिशातून एक कागद पडला.... तो आहे माझ्याकडे... त्याच्या काही कामाचा असेल आणि तो मागायला आला तर असावा म्हणून मी जपून ठेवलाय...." मंग्या म्हणाला. 

"दे तो कागद... आणि पुन्हा जर असं काही केलंस ना तर फ्रॉड केला म्हणून तुला आत टाकू..." निनाद म्हणाला. 

"हो! पुन्हा अशी चूक नाही होणार...." मंग्या तो कागद देत म्हणाला. 
************************
इथे पोलीस स्टेशन मध्ये सगळे त्या मेहंदी च्या डिजाईन चा काय अर्थ असेल याचा विचार करत होते..... 

"सर! मला वाटतंय या डिजाईन मध्ये काहीतरी मेसेज लपला असेल... नवऱ्या मुलाचं जसं नाव मेहंदीत लपवतात तसं काही असेल तर?" ईशा म्हणाली. 

"हो.... हि शक्यता सुद्धा नाकारता येत नाही..." विक्रम म्हणाला. 

"हम्म... ईशा एक काम कर, ब्युटी पार्लर मध्ये जा आणि कोणाला हा मेसेज डिकोड करता येतोय का बघ..." सुयश सर म्हणाले. 

"येस सर!" ईशा ने सॅल्यूट केला आणि ती तो कागद घेऊन निघाली. 

एवढ्यात डॉ. विजय तिथे आले.... 

"सर, मी आज नियती च ड्रेसिंग केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, तिच्या शरीरात ते केमिकल एखाद्या पेनाच्या निफ मधून गेलं आहे...." डॉ. विजय म्हणाले. 

"तुम्ही एवढं खात्रीने कसं सांगताय?" गणेश ने विचारलं. 

"मी जेव्हा नियती ची जखम उघडली, तेव्हा तिच्या हातावर आधी थोडी पेन खर्चटल्यावर कसा शाई चा व्रण येतो तसा पुसटसा व्रण मला दिसला आणि नंतर प्रेशर देऊन ते तिच्या शरीरात टाकण्यात आलं आहे.... नक्कीच त्या पेनाच्या टोकाला ते केमिकल लावलं असणार..." डॉ. विजय म्हणाले. 

"ओके... आता आपण ते फुटेज बघूया.... त्यात काही मिळाले तर बरंच आहे...." सुशांत म्हणाला. 

त्याने ते फुटेज सुरु केलं..... 

"खरंच त्याने पेनाने च हे काम केलं आहे..." गणेश म्हणाला. 

"हो! पण, त्याने चेहरा दिसणार नाही याची बरोबर काळजी घेतली आहे.... पाठमोराच दिसतोय हा..." सुयश सर म्हणाले. 

"सर, मी दुसऱ्या अँगल च्या कॅमेराचं पण फुटेज आणलं आहे... त्यात बघूया..." सुशांत म्हणाला. 

त्याने दुसऱ्या कॅमेराचे फुटेज सुरु केलं... पण, त्याने डोळ्यावर गॉगल घातला होता आणि मफलर ने तोंड झाकलेलं होतं.... त्या फुटेज चा सुद्धा काही उपयोग झाला नाही..... 

"शी.... हे लोक ना खूप फुंकून फुंकून पावलं उचलतायत... एकदा सापडू दे तावडीत मग बघतो..." सुशांत ने टेबलावर जोरात हात आपटला आणि रागात म्हणाला. 

डॉ. विजय नि त्याला शांत केलं.... एवढ्यात ईशा तिथे पोहोचली... तिच्या मागोमाग अभिषेक आणि निनाद पण आले... 

"सर! मी या डिजाईन बद्दल चौकशी केली यात, उलटी गिनती शुरु...  असा मेसेज आहे..." ईशा म्हणाली. 

"ओह! पण, हे डिजाईन कोणाकडून तरी काढून घेतले असेलच ना.... डिजाईन मध्ये मेसेज लपवणं काही सोपं काम नाहीये ना..." विक्रम म्हणाला. 

"हो सर! मी चौकशी केली पण, हे डिजाईन कॉम्पुटराईज आहे... त्यामुळे हे शोधून काढणं म्हणजे गवताच्या ढिगातून सुई शोधण्यासारखं आहे...." ईशा म्हणाली. 

"बरं... निदान आपल्याला मेसेज काय आहे हे तरी समजलं.... अभिषेक, निनाद तुम्हाला काय मिळालं? सापडला का तो माणूस?" 

अभिषेक ने सगळा घडलेला प्रकार सांगितला... निनाद ने मंग्या ने दिलेला कागद सुयश सरांना दिला... 

"काय आहे यात?" सुयश सरांनी विचारलं. 

"सर, तुम्हीच बघा..." निनाद म्हणला. 

सुयश सर ती चिठ्ठी उघडून बघणार एवढ्यात त्यांचा फोन वाजला..... सोनाली ने फोन केला होता.... 

"बोल सोनाली काय झालं?" सुयश सर म्हणाले. 

"सर, आत्ता इथे मेहंदी चे कोन आले आहेत... पण, नियती च्या बोलण्यावरून ती तिची पार्लर वाली नव्हती हे समजतंय.... त्या कोन मध्ये काही गडबड असेल तर?" सोनाली म्हणाली. 

"ओके... तू त्या कोन चा फोटो पाठव... ईशा घरी येताना अगदी तसेच कोन घेऊन येईल... मग ते अदला - बदली करा..." सुयश सर म्हणाले. 

"ओके सर!" सोनाली म्हणाली आणि तिने फोन ठेवला.... 

"सर, नियती ने मला संध्याकाळी घरी येऊन दाखव म्हणून सांगितलंच आहे.... मी लक्ष ठेवीन तिथे...." सुशांत म्हणाला. 

"सर, सोनाली ने फोटो पाठवले.... मी आता येऊ का? कारण दुपार पर्यंत येते असं सांगून आली आहे मी...." ईशा म्हणाली. 

"हो! फक्त सावध रहा... आणि आठवणी ने कोन बदला..." सुयश सर म्हणाले. 

"आणि ईशा... ते बदलेले कोन माझ्या ड्रॉवर मध्ये ठेव... हि त्याची चावी... अनुजा काही त्या ड्रॉवर ला हात नाही लावत..." डॉ. विजय ईशा ला चावी देत म्हणाले. 

ईशा ती चावी घेऊन निघाली....

क्रमशः.....
**************************
मंग्या ने दिलेल्या चिठ्ठीत काय आहे.... त्या मेहंदी च्या कोनात काही मिक्स असेल का? आणि सुशांत संध्याकाळच्या कार्यक्रमात कसा जाईल पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा... 

🎭 Series Post

View all