मिस्टीरिअस मेसेज (भाग-४)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-४)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिले, नियती आणि सुशांत च्या ज्युस मध्ये एक हानिकारक ड्रग मिक्स होते..... ईशा ने सदू चे कॉल डिटेल्स चेक करायला सांगितले आहेत आणि साक्षगंध सोहळ्याचे ई - फोटो सुयश सरांना मेल केले आहेत. आता पुढे....)
************************
संध्याकाळ झालेली असते..... नियती ईशा च्या खोलीत येते....

"ईशा.... चल आपल्याला जायचं आहे ना... मी आई ला सांगून येते तोवर तू तयार हो..." नियती म्हणाली. 

"हो... आलेच पाच मिनिटात..." ईशा म्हणाली. 

नियती बाहेर गेल्यावर ईशा ने तयारी केली आणि त्या दोघी बाहेर जाणार आहेत असा सुयश सरांना मेसेज केला... 

"ओके.... तुझ्या फोन च लोकेशन आम्ही ट्रॅक करत राहू... काहीही मदत लागली तरी सांग आणि सावध राहा..." सुयश सरांचा रिप्लाय आला. 

ईशा आणि नियती दोघी निघायच्या तयारीत हॉल मध्ये आल्या.... 

"पोरींनो सांभाळून जावा आणि लवकर परत या..." अनुजाच्या सूचना सुरु होत्या...

"हो आई... चल आता आम्ही निघू का म्हणजे लवकर येऊ..." नियती म्हणाली. 

"हो! जावा..." अनुजा म्हणाली. 

अनुजा ची अनुमती मिळताच दोघी निघाल्या.... 

"नियती, तू ठरवलं आहेस का कोणत्या दुकानातून गिफ्ट घ्यायचं ते?" ईशा ने विचारलं.

"हो! आपण सदाबहार मॉल मध्ये जातोय... तिथे एक गिफ्ट शॉप आहे तिथूनच आपण गिफ्ट घ्यायचं आहे..." नियती म्हणाली. 

"ए सदाबहार मॉल म्हणजे मागच्या महिन्यात तिथे बॉम्ब स्फोट झाला होता तोच ना..." ईशा म्हणाली. 

"हो! पण, आता सगळं पुन्हा नीट झालं आहे तिथे..... लोकांनी पुन्हा तिथे जायला सुरुवात केली आहे आणि नावाप्रमाणेच आता तो सदा बहरलेला असतो!" नियती म्हणाली. 

"ओके.... मग काय घ्यायचं ठरवलं आहेस?" ईशा ने विचारलं.

"आत्ता नाही सांगणार... तिथे गेल्यावरच बघ..." नियती म्हणाली. 
***********************
दुसरीकडे पोलीस स्टेशन मध्ये सुयश सर आणि अभिषेक ईशा ने पाठवलेले फोटो आणि व्हिडिओ बघत होते... एवढ्यात सोनाली आली...

"सर! आपल्या रेकॉर्डस् प्रमाणे असं कोणीही ड्रग डीलर नाहीये जे आत्ता आत्ता जेल मधून सुटलं असेल.... आणि बिच्छु गँग शी संबंध सुद्धा नाहीये कोणाचा!" सोनाली म्हणाली. 

"ठीक आहे! निनाद त्या सदू चे कॉल रेकॉर्डस् बघतो आहे तोपर्यंत आपण हे व्हिडिओ आणि फोटो बघूया..." सुयश सर म्हणाले. 

अभिषेक त्यातला एक व्हिडीओ सुरु करतो.... 

"सर! यात कोणावरही संशय येईल असं काही घडलं नाहीये.... सगळे ओळखीचेच आहेत!" सोनाली म्हणाली. 

"हम्म! अभिषेक आता आपण फोटो बघूया..." सुयश सर म्हणाले. 

अभिषेक ने फोटो स्लाईड मोड वर टाकले... एक एक फोटो आपोआप पुढे सरकत होता....

"एक मिनीट! अभिषेक या फोटोच्या आधी चा फोटो एकदा पुन्हा दाखव.." सुयश सर म्हणाले. 

अभिषेक तो फोटो पुन्हा दाखवतो.... 
"हे बघा... यात हा ज्युस वाटणारा माणूस स्नॅक्स ची प्लेट घेऊन काहीतरी करतोय.... अभिषेक जरा हा फोटो झूम कर..." सुयश सर म्हणाले. 

अभिषेक ने तो फोटो झूम केला... त्या माणसाच्या हातात कसलं तरी स्टिकर होतं, जे तो त्या प्लेट ला लावत होता....

"सर, म्हणजे विक्रम सरांना जी प्लेट मिळाली होती ती या माणसाच्या प्लॅन मुळेच!" सोनाली म्हणाली. 

"हो! अभिषेक, हा फोटो क्रॉप करून ईशा ला पाठव आणि तिला सांग, या माणसाबद्दल बाकी कोणाला काही माहित आहे का बघ..." सुयश सर म्हणाले. 

अभिषेक ने तो फोटो ईशा ला सेंड केला..... एवढ्यात निनाद सदू चे कॉल डिटेल्स घेऊन आला... 

"सर! हे सदू चे कॉल रेकॉर्डस्.... पण, यात काही गडबड नाहीये.... मला हा सदू जेन्युअन वाटतोय..." निनाद म्हणाला. 

"ओके! आपण आता ईशा च्या उत्तराची वाट पाहू.... मी डॉ. विजय आणि सुशांत ला सुद्धा हा फोटो पाठवतो, बघूया त्याला या माणसाबद्दल काही माहित आहे का..." सुयश सर म्हणाले. 

सुशांत ला सुयश सरांनी पाठवलेला फोटो मिळतो.... पण, त्याला या बद्दल काही माहित नसतं! थोड्याच वेळात डॉ. विजय चा सुद्धा मेसेज येतो; "सदू ला या विषयी माहित असेल... कारण तोच त्याच्या एका मित्राला काल घेऊन येणार होता त्याच्या मदतीसाठी... मी विचारून बघतो त्याला." 

"नको! ईशा तिच्या पद्धतीने विचारेल... तुम्ही विचारलंत तर उगाच त्याला संशय नको यायला." सुयश सर डॉ. विजय चा मेसेज वाचून रिप्लाय करतात. 
**************************
इथे ईशा आणि नियती मॉल मध्ये पोहोचतात... नियतीला ज्या शॉप मध्ये जायचं असतं तिथे दोघी जातात.... 

"वेलकम मॅडम... काय दाखवू तुम्हाला?" दुकानदार विचारतो. 

"Long डिस्टन्स ब्रेसलेट सेट दाखवा..." नियती सांगते. 

ईशा आणि नियती मिळून एक सेट निवडतात... यात एक ब्रेसलेट निळ्या आणि दुसरे लाल रंगाचे असते.... दोघी शॉपिंग झाल्यावर शॉप मधून बाहेर पडतात...

"तुला राग येणार नसेल तर मी एक विचारू?" ईशा नियतीला विचारते. 

"हो विचार ना! राग का येईल..." नियती म्हणते. 

"बघ म्हणजे आता सुशांत आणि तुझं लग्न होणार आहे तुम्ही आता एकत्रच असणार मग हे long डिस्टन्स ब्रेसलेट का घेतलंस?" ईशा विचारते. 

"अगं कसं आहे ना, सुशांत सुद्धा एक अंडर कव्हर कॉप आहे.... त्याला बऱ्याच वेळा बाहेर जावं लागतं.... म्हणून मग मी हा सेट घेतला आहे.... यामुळे जर मला कधी त्याच्याशी बोलायचं असेल पण, समज मला अंदाज नसेल कि तो बोलू शकतो की नाही तर मी या ब्रेसलेट ला टॅप केलं की त्याच्या ब्रेसलेट वर वायब्रेशन जाणवतील आणि तो मला मेसेज किंवा फोन करू शकेल म्हणून..." नियती म्हणाली. 

"वा! कितना दूर का सोचा है आपने मॅडम... मानना पडेगा..!" ईशा नियतीला चिडवत म्हणाली. 

अश्याच दोघी गप्पा मारत मारत अजून थोडी फार शॉपिंग करतात आणि आईसक्रीम खायला जायचं ठरवून तिथून निघतच असतात की एका माणसाचा धक्का नियती ला लागतो सगळं सामान खाली पडतं! 

"अरे ए! बघून चालता येत नाही का..." नियती त्या माणसाला बोलत असते.... पण, तो तिथून निघून जातो...

ईशा ते सामान उचलते.... पण, त्या सामानाच्या खाली विंचवाच्या चित्राचा कागद दिसतो... नियतीच्या न कळत ईशा पटकन तो कागद स्वतःच्या जीन्स च्या खिशात टाकते.....

"नियती, आपण आता घरी जाऊया... आईस्क्रीम नंतर कधीतरी खाऊ..." ईशा, नियतीच्या जीवाला धोका आहे हे ओळखून बोलते.

"अरे! तू त्या माणसामुळे का मूड ऑफ करून घेतेस?" नियती सामानाच्या पिशव्या उचलत बोलते.

"तस काही नाही गं..... एक मिनीट तुझा हात दाखव..." ईशा अचानक बोलता बोलता नियातीचा हात बघते... 

"हे काय लागलं आता? आई ने बघितलं ना तर उगाच काळजी करत राहील..." नियती स्वतःचा हात बघत बोलते.

"मला वाटतंय त्या माणसाच्या हातात काहीतरी असणार जे तुला लागलं... आपण, डॉक्टर कडे जाऊन मग घरी जाऊया... बघ तुझा हात सुजायला लागला आहे... उगाच रिस्क नको..." ईशा म्हणाली. 

"हो... चालेल... ऐन लग्नाच्या गडबडीत काही allergy नको!" नियती म्हणते. 

दोघी रिक्षेने डॉक्टर कडे जायला निघतात.... रिक्षेत बसल्यावर ईशा हळूच सुयश सरांना मेसेज करते. 
क्रमशः....
********************
नियतीच्या हाताला काय लागलं असेल? हे तिच्या जीवावर तर बेतणार नाही ना? आणि ईशा ला जो कागद मिळाला आहे त्यावर काय असेल? पाहूया पुढच्या भागात.... तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा.... 

🎭 Series Post

View all