मिस्टीरिअस मेसेज (भाग-२)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-२)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, नियती आणि सुशांत च्या जीवाला धोका आहे.... सोनाली ला एक कागद मिळाला आहे... आता पुढे...)
********************** 
सगळे नियती च्या घरून निघाल्यावर घरी न जाता पोलीस स्टेशन ला येतात... 

"आपल्याला लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास केला पाहिजे... बघू तो कागद!" सुयश सर म्हणाले. 

विक्रम ने त्याच्या जवळ ठेवलेला कागद सुयश सरांना दिला.... ते कागद बघू लागले.... त्या विंचवाच्या चित्राशिवाय काहीही दिसत नव्हतं...  उजेडात धरून बघितला तरी काही दिसलं नाही...  

"गणेश जरा मेणबत्ती घेऊन ये..." सुयश सर म्हणाले.

सगळ्यांना प्रश्न पडला होता मेणबत्ती का? गणेश मेणबत्ती घेऊन आला... सुयश सरांनी ती लावली आणि तो कागद मेणबत्ती जवळ नेला... तशी त्यावर अक्षरं दिसू लागली.... 

"सर! तुम्हाला कसं समजलं मेणबत्ती मध्ये कागद धरला कि त्यावर काहीतरी दिसेल..." निनाद ने विचारलं. 

"अरे... या कागदाचा मी वास घेतला तेव्हा मला लिंबाचा वास आला... म्हणजे कोणीतरी लिंबाच्या रसाने यावर लिहिलं होतं... आणि जेव्हा हा कागद मेणबत्ती मध्ये धरला तेव्हा थोडा गरम झाला आणि आपल्याला दिसलं काय लिहिलंय..." सुयश सर म्हणाले. 

 त्यावर लिहिलं होतं; "लवकरच तुमच्या सगळ्यांची मुक्ती निश्चित!"

सगळ्यांनी ते वाचलं... आता सगळ्यांना कळून चुकलं होतं, फक्त नियती आणि सुशांतच्याच जीवाला धोका नाही तर हे बिच्छु गँग वाले सगळ्या डिपार्टमेंट च्या जीवावर उठले आहेत...

"सर! त्या सदू ला उचलू का? त्याला नक्की काहीतरी माहित असेल..." विक्रम म्हणाला. 

"नको एवढ्यात! उद्या एक नवीन ऑफिसर; ईशा, आपल्या डिपार्टमेंट मध्ये जॉईन होतेय... तिला आपण तिथे वेष बदलून पाठवू..." सुयश सर म्हणाले. 

"पण, सर ती कोणत्या कारणाने जाईल त्यांच्या घरी?" सोनाली ने विचारलं. 

"मी उद्या डॉ. विजय शी या विषयावर बोलून घेतो... तेव्हाच ठरवू... आत्ता खूप उशीर झालाय... आपण सुद्धा घरी जाऊया आता... फक्त नीट सावध रहा..." सुयश सर म्हणाले. 

सगळ्यांनी सुयश सरांना सॅल्यूट केला आणि सगळे आपापल्या घरी गेले.... 
*************************
दुसरीकडे नियतीच्या घरी सगळे खूप आनंदात होते.... फक्त डॉ. विजय ना विक्रम ने थोडी कल्पना दिली होती म्हणून थोडी काळजी वाटत होती.... हे काही नियती च्या नजरेतून सुटले नाही... ती म्हणाली; "बाबा, तुम्ही काळजीत दिसताय! काय झालं?" 

"काही नाही... आता तू लग्न होऊन दुसरीकडे जाणार म्हणून...." डॉ. विजय नी कशीबशी सारवासारव केली... 

"सकाळी आई पण असंच वागत होती... आता तुम्ही पण?? नका काळजी करू.... खूप उशीर झालाय... आपण आता झोपूया... तुम्ही दोघं पण खूप दमला आहात जरा आराम करा..." नियती डॉ. विजय आणि अनुजा ला म्हणाली. 

"हो.. बरं ऐक बाळा! उद्या तू लॅब ला नको येऊ... उद्या पासून तुला सुट्टी... नंतर पुन्हा आरामात जॉईन हो..." डॉ. विजय म्हणाले. 

"पण...." नियती बोलत होतीच पण, तिला मधेच तोडत डॉ. विजय म्हणाले, "मी तुझा सिनिअर आहे... एका बापाच्या नात्याने नाही तर एका बॉस च्या नात्याने सांगतोय... This is an order!" 

"ओके बाबा! सॉरी सॉरी ओके सर!" नियती म्हणाली. 
सगळे हसले आणि झोपायला गेले... 

"काय ओ... तुम्ही कसल्या टेन्शन मध्ये आहात? मगाशी नियतीला तुम्ही जे सांगितलं ते काही मला पटत नाहीये..." अनुजा डॉ. विजय ना त्यांच्या खोलीत आल्यावर म्हणाली. 

"तू टेन्शन घेणार नसशील तर सांगतो!" डॉ. विजय म्हणाले. 

"नाही घेणार... कारण मला विश्वास आहे माझी मुलगी आणि नवरा सगळ्या संकटांचा सामना करण्यासाठी समर्थ आहेत.." अनुजा अगदी आत्मविश्वासाने म्हणाली.

"सांगतो! पण, यातलं नियती ला काही सांगू नकोस... उगाच ती हे सगळं एन्जॉय करायचं सोडून काळजी करत बसेल..." डॉ. विजय म्हणाले. 

"नाही सांगणार!" अनुजाने प्रॉमिस केलं.
डॉ. विजय नी जे काही विक्रम ने त्यांना सांगितलं होतं ते सगळं सांगितलं. 

"नका काळजी करू.... सुयश सरांच्या टीम ला हे माहित आहे ना... मग ते आपल्या नियती आणि सुशांत ला काही नाही होऊ देणार... शांत पणे झोपा तुम्ही... मी दिवसभर नियती ला नजरेआड होऊ देणार नाही..." अनुजा ने डॉ. विजय चा हात हातात घेऊन अगदी आश्वास्थ पणे सांगितलं. 
दोघांना हि नाही म्हणलं तरी थोडं टेन्शन होतच... कशीबशी रात्र संपली....
***********************
दुसऱ्या दिवशी सगळे थोडे लवकरच पोलीस स्टेशन ला आले... सुयश सर आले आणि त्यांनी डॉ. विजय ना फोन करून बोलावून घेतलं.... एवढ्यात तिथे नवीन सब इन्स्पेक्टर ईशा आली... 
"जय हिंद सर! सब इन्स्पेक्टर ईशा रेपोर्टींग" ईशा सॅल्यूट करून म्हणाली. 

सुयश सरांनी तिची सगळ्यांना ओळख करून दिली.... तिला सगळ्यांनी वेलकम केलं... 
ईशा! एक कर्तबगार आणि धाडसी पोलीस ऑफिसर.... गडचिरोली मधून तिची पोस्टिंग आता मुंबई ला झाली होती... तिच्या कामाचा आलेख हा चढता होता.... एवढी कर्तबगार ऑफिसर आपल्या डिपार्टमेंट मध्ये आली म्हणून सगळे खुश होते.... शिवाय सोनाली ला सुद्धा आता एक नवीन मैत्रीण मिळाली होती... तिच्या मनमिळावू स्वभावामुळे लगेच तिने सगळयांना लळा लावला.... सुयश सर आणि विक्रम ने मिळून तिला सध्याच्या केस बद्दल समजावून सांगितले.... इतक्यात डॉ. विजय तिथे आले... 

"बोला सर... काही हाती लागलं का?" डॉ. विजय नी विचारलं. 

"नाही.. त्यासाठीच एक प्लॅन बनवला आहे... म्हणून तुम्हाला बोलावलं... हि ईशा! आपली नवीन ऑफिसर.... हि तुमच्या घरी काही दिवस वेडिंग प्लॅनर म्हणून राहायला येईल... तुम्ही तसं नियती आणि बाकी सगळयांना सांगा... घरातल्या हालचालींवर ईशा नीट लक्ष ठेवेल आणि आम्हाला रिपोर्ट करेल.... पण, हि गोष्ट फक्त आपल्यातच राहिली पाहिजे..." सुयश सर म्हणाले. 

"ओके सर! मी घरी कळवतो तसं... एक वेडिंग प्लॅनर घरी येतेय..." डॉ. विजय म्हणाले. 

"सर! एक मिनीट... हे घ्या... एकदा चेक करून बघा यात काही गडबड आहे का?" अभिषेक एक टिशू पेपर डॉ. विजय ना देत म्हणाला. 

"म्हणजे?" डॉ. विजय ना काही न कळल्या मुळे त्यांनी विचारलं. 

"काल जेव्हा मी नियातीचा ज्युस बदलला तेव्हा अभिषेक ने माझ्या सांगण्यावरून टिशू पेपर ज्युस मध्ये बुडवून त्या ज्युस चे सॅम्पल घेतले होते.... तेच आहे हे... या ज्युस मध्ये काही हानिकारक पदार्थ मिसळला नव्हता ना एवढं चेक करून सांगा..." विक्रम ने सांगितलं. 

"आणि हा! हि चिठ्ठी पण चेक करून सांगा.. यावर कोणाच्या बोटांचे ठसे असतील तर..." सुयश सर डॉ. विजय च्या हातात चिठ्ठी देत म्हणाले. 

"ओके... सांगतो..." डॉ. विजय तो टिशू पेपर आणि ती लिंबाच्या रसाने लिहिलेली चिठ्ठी घेऊन गेले. 
ईशा सुद्धा एका वेडिंग प्लॅनर ला शोभेल असे फॉर्मल कपडे आणि लॅपटॉप घेऊन नियती च्या घरी गेली.... सोबत सोनाली होतीच! डॉ. विजय नि आधीच फोन करून सांगितल्यामुळे अनुजा ला तशी कल्पना होतीच! 

"हाय सोनाली... आज सकाळी सकाळी?" नियती ने विचारलं. 

"हो अगं! काल सरांनी मला सांगितलं होतं ना कोणी ओळखी मध्ये चांगली वेडिंग प्लॅनर असेल तर सांग म्हणून मी ईशा ला घेऊन आले... माझी जुनी मैत्रीण आहे... आणि खूप छान काम करते..." सोनाली म्हणाली. 

सोनाली ने दोघींची ओळख करून दिली आणि ती तिथून निघाली. 

रस्त्याने जाता - जाता वाटेत तिला सुशांत ने बघितलं... 

"हाय सोनाली... इथे कुठे?" सुशांत ने बाईक साईड ला घेत तिला हाक मारून विचारलं.

"नियती च्या घरी गेले होते... माझी एक मैत्रीण वेडिंग प्लॅनर आहे ना तिला नियातीचं घर दाखवायचं होतं..." सोनाली म्हणाली. 

"बरं चल मी सोडतो तुला पोलीस स्टेशन ला.. मी पण, तिथेच चाललो आहे..." सुशांत म्हणाला.

"का? असं अचानक?" सोनाली ने विचारलं.

"हो! हो! पोलीस स्टेशन ला पोहोचल्यावर सांगतो...." सुशांत म्हणाला.

सोनाली आणि सुशांत पोलीस स्टेशन ला आले... 
क्रमशः.....
**************************
त्या ज्युस मध्ये काही मिळेल का? या सगळ्यात सदू चा हात असू शकतो? सुशांत का पोलीस स्टेशन ला येतोय? पाहूया पुढच्या भागात.... तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा... 

🎭 Series Post

View all