मिस्टीरिअस मेसेज (भाग-१७)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-१७)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, मॉल मॅनेजर मनोज आणि सिक्युरिटी गार्ड ला ताब्यात घेतलं आहे.... सुयश सरांनी ईशा ला कार्यालयात थांबायला सांगितलं आहे आणि बाकी सगळे आजी आजोबांच्या घरी जाणार आहेत आता पुढे...)
******************************
सुयश सरांच्या म्हणण्या प्रमाणे विक्रम ने अभिषेक ला फोन लावला.... त्या दोघांचं बोलणं झाल्यावर तो पुन्हा सुयश सरांकडे आला... 

"सर! अभिषेक म्हणतोय त्यांना घरात एका फोटो फ्रेम च्या मागे कपाटाची चावी मिळाली आहे..... त्या कपाटात एक लॉकर आहे त्याचा क्लु तो आपल्याला पाठवतोय.... तो पासवर्ड क्रॅक झाला की ते लॉकर उघडता येईल.... मग त्यात काय आहे आपल्याला समजेल.... आपण तिथे जाण्याची गरज नाहीये.... ते दोघं हँडल करतील... त्यांचं काम झाल्यावर मी त्यांना पुन्हा इथेच बोलावलं आहे..." विक्रम ने सुयश सरांना सगळे डिटेल्स दिले. 

"बरं! मग तोपर्यंत मला वाटतंय आपण मनोज जसं म्हणाला तसं सगळं घडवून आणूया..." सुयश सर म्हणाले. 

"म्हणजे? आपण नक्की काय करायचं?" सोनाली ने विचारलं. 

"कुणाल ला फोन करून बोलावून घे... तो आल्यावर सगळं सांगतो." सुयश सर म्हणाले. 

सोनाली ने कुणाल ला सुयश सरांचा निरोप दिला. 

"सर! तो येतोय अर्ध्या तासात." सोनाली ने सांगितलं. 

"सर! अभिषेक चा मेसेज आला... हा बघा क्लु, 'LKEOKJ'." विक्रम सुयश सरांना क्लु दाखवत म्हणाला. 

"काय असेल याचं उत्तर? उलट सुलट कसंही लिहिलं आहे...." विक्रम म्हणाला. 

"सगळी अक्षरं फिरवून बघा.... काही जुळतंय का?" सुयश सर म्हणाले. 

सगळेजण प्रयत्न करत होते.... पण, एकही अर्थपूर्ण शब्द तयार होत नव्हता! 

"या पेक्षा encryption परवडलं असतं! निदान एखाद्या कॉम्पुटर एक्स्पर्ट ला दाखवून आपल्याला लगेच काय लिहिलं आहे समजलं असतं!" विक्रम म्हणाला. 

"सर! मला पुन्हा एकदा बघू तो शब्द!" सोनाली विक्रम ला म्हणाली. 

विक्रम ने तिला तो शब्द दाखवला..... ती एक एक अक्षरानंतर बोटं मोजत काहीतरी पुटपुटत होती.... 

"सर! याचा अर्थ poison असा होतो..." सोनाली म्हणाली. 

"नक्की? तुला कसं समजलं?" विक्रम ने विचारलं. 

"सर, याला सायफर टेक्स्ट म्हणतात. आम्ही लहानपणी डिटेक्टिव्ह गेम खेळायचो तेव्हा हीच आमची सिक्रेट भाषा असायची.... यामध्ये जो अल्फाबेट लिहिला असेल त्याच्या पुढचा चौथ्या क्रमांकाचा अल्फाबेट घ्यायचा असतो! आता यात बघा पहिलं आहे 'L' म्हणजे त्यानंतर चे तीन अल्फाबेट्स सोडले कि चौथा येतो 'P,' मग 'K' आहे तर त्यांनतर चा चौथा येतो 'O', तसंच सगळं केलं की Poison हा शब्द तयार होतोय...." सोनाली ने सगळं नीट समजावून सांगितलं. 

"ग्रेट! गुड जॉब सोनाली.... विक्रम, अभिषेक ला पासवर्ड मेसेज कर...." सुयश सर म्हणाले. 

विक्रम ने अभिषेक ला मेसेज केला.... इतक्यात तिथे कुणाल आला..... 
****************************
अभिषेक ला विक्रम चा मेसेज मिळाला होता... 

"गणेश हे बघ... सरांनी पासवर्ड पाठवला आहे... Poison हा पासवर्ड टाक आणि उघड लॉकर..." अभिषेक ने गणेश ला सांगितलं. 

गणेश ने लगेच पासवर्ड टाकून ते लॉकर उघडलं. दोघांना ते सामान बघून धक्काच बसला. 

"सर! हे एवढे पासपोर्ट, विग... काय आहे हे सगळं?" गणेश ते सगळं बघून म्हणाला. 

"नक्कीच ते लोकं दरवेळी खोटी ओळख घेऊन त्यांचं काम करत असणार.... त्याचंच हे सगळं सामान दिसतंय...." अभिषेक म्हणाला. 

दोघांनी ते सगळे पासपोर्ट उघडून बघितले.... जवळ जवळ दहा ते बारा खोटे पासपोर्ट होते... वेगवेगळ्या प्रकारचे केसांचे आणि दाढी मिश्यांचे विग सुद्धा होते... 

"सर! हि चावी बघा... कसली आहे काय माहित... पण, या बॉक्स मध्ये नीट जपून ठेवली होती..." गणेश अभिषेक ला त्याला मिळालेली चावी देत म्हणाला. 

"आपल्याला हे सगळं सरांना दाखवावं लागेल... एक काम कर evidence बॅग मध्ये हे सगळं भरून घे..." अभिषेक ने सांगितलं. 

"ओके सर! सर, हे सगळं आजी आजोबांच्या घरात मिळालं आहे.... याचा काय अर्थ आहे? आजी आजोबा तर...." गणेश म्हणाला. 

"हे सगळं खोटं असेल तर बरंय.... याचा नियतीला खूप त्रास होईल.... असो! आत्ता चल इथून... पुढे काय करायचं ते आता सरचं सांगतील." अभिषेक म्हणाला. 

ते दोघं पुन्हा कार्यालायत जायला निघाले. 
****************************
कार्यालयात आता बरेचसे विधी झाले होते.... आता वधू वरांची पंगत जेवायला बसली होती... दोघांच्या ताटाभोवती छान मोत्याची रांगोळी मांडली होती.... ताट सुद्धा सगळ्या पक्वान्नांनी सजलं होतं..... जेवायला सुरुवात करायच्या आधी अनुजा ने, "ओटीत घातली मुलगी विहिण बाई।
सांभाळ करावा हीच विनवणी पायी।।" हे गाणं म्हणलं. नियती आणि बाकी सगळेच यामुळे थोडे भावुक झाले होते.... अनुजा जरी जन्मदात्री आई नसली तरी नियतीला ती त्यापेक्षाही खूप जास्त होती.... काही महिन्यांपूर्वी मिळालेलं हे कुटुंबाचं प्रेम! पण, आता सासरी जावं लागणार म्हणून प्रत्येक मुलीच्या मनात जशी उलथा पालथ सुरु असते अगदी तसंच नियतीच्या मनात सुरु होतं.... 

"बास नियती! अगं थोडे अश्रू पाठवणी साठी ठेव...." ईशा तिला हसवायला म्हणाली. 

"आता कशी छान दिसतेस.... नेहमी हसत रहा..." सुशांत तिला हसताना बघून म्हणाला. 

नियती आणि सुशांत ने एकमेकांना भरवून उखाणे घेऊन जेवणाला सुरुवात केली.... सगळे खूप आनंदात होते.... सगळ्यांची जेवणं सुद्धा आटोपली.... आणि पुढचे विधी सुरु झाले....
*****************************
"सर! काही प्रॉब्लेम आहे का? मला इथे का बोलावलं?" कुणाल ने सुयश सरांना विचारलं. 

सुयश सरांनी जे काही तिथे घडलं होतं ते सगळं कुणाल ला समजावून सांगितलं. 

"सर, यात मी काय मदत करू शकतो तुमची? मला समजलं नाही." कुणाल म्हणाला. 

"तू या हॉल च आत्ता शूटिंग करून घे.... आणि ग्राफिक्स च्या मदतीने इथे स्मोक बॉम्ब अटॅक झाला त्यात बऱ्याच जणांचा मृत्यू झाला हि बातमी प्रसारित कर...." सुयश सरांनी त्यांच्या डोक्यात जो प्लॅन सुरु होता तो त्याला समजावून सांगितला. 

"ओके सर! मला एक तासाभराचा वेळ द्या मी लगेच कामाला लागतो." कुणाल म्हणाला. 

"ओके... गुड... जेवढं लवकरात लवकर करता येईल तेवढं कर..." सुयश सर म्हणाले. 

कुणाल हो म्हणून त्याच्या कामाला लागला.... 

"विक्रम! तू आणि सोनाली आता इथेच थांबा... ईशा ला मदतीची गरज पडू शकते... अभिषेक आणि गणेश सुद्धा इथे येतील तेव्हा त्यांची मदत कर... मी आणि निनाद पुन्हा त्या मनोजशी एकदा बोलून बघतो... तुम्ही सगळे आता इथे सांभाळून घ्या..." सुयश सर म्हणाले. 

"ओके सर!" सोनाली आणि विक्रम सुयश सरांना सॅल्यूट करून म्हणाले. 

सुयश सर पोलीस स्टेशन ला जायला निघाले... विक्रम आणि सोनाली पुन्हा कार्यालायत गेले... सोनाली ने आत्तापर्यंत जे काही झालं ते वेळ बघून ईशा च्या कानावर घातलं.  
******************************
"निनाद! मनोज आणि त्या सिक्युरिटी गार्ड ला घेऊन ये..." सुयश सर म्हणाले. 

निनाद त्या दोघांना बाहेर घेऊन आला.... 

"सर, आम्हाला जे माहित होतं ते आधीच आम्ही सांगितलं.... आता आम्हाला काही माहित नाही.... आमच्या कुटुंबाला तेवढं वाचवा ओ आता...." मनोज सुयश सरांसमोर हात जोडून म्हणाला. 

"हो! हो! मला सांगा, ते लोक तुम्हाला जेव्हा गाडीतून कुटुंबाला भेटायला घेऊन जात होते तेव्हा आजू बाजूचे आवाज तर कानी पडले असतील ना... आत्ता आपण पुन्हा मॉल पासून प्रवास सुरु करायचा आहे.... तुमच्या दोघांच्या डोळ्यावर आम्ही पट्टी बांधू.... अंदाज घेऊन तुम्ही सांगा तुम्हाला कुठे घेऊन जायचे ते लोक..." सुयश सर म्हणाले. 

"हो.. हो... सर... काही आवाज आहेत जे लक्षात आहेत..." सिक्युरिटी गार्ड म्हणाला. 

ठरल्याप्रमाणे निनाद ने गाडी काढली.... मॉल पाशी आल्यावर दोघांच्या डोळ्यावर सुयश सरांनी पट्टी बांधली.... आणि त्यांचा प्रवास सुरु झाला..... 

"सर, जवळ जवळ दोन मिनिटं गाडी सरळ जायची... ४० ते ५० स्पीड असेल... मग, कधी कधी गाडी थांबायची.... तेव्हा खूप हॉर्न चे आवाज यायचे... असं वाटायचं सिग्नल आहे..." मनोज ने सांगितलं. 

त्याच स्पीड ने निनाद ने दोन मिनिटं गाडी चालवली... सिग्नल आला... 

"बरोबर... असाच आवाज असायचा... नंतर उजवीकडे गाडी वळायची...." सिक्युरिटी गार्ड ने सांगितलं. 

निनाद ने उजवीकडे गाडी वळवली.... 

"हा... आता जास्त कसले आवाज यायचे नाहीत... मधेच लहान मुलं खेळण्याचे आवाज यायचे... बागेत कसे येतात तसे...." मनोज ने सांगितलं. 

"हो सर, इथून पुढे डावीकडे वळलं कि एक बाग आहे..." निनाद म्हणाला. आणि बागेच्या दिशेने त्याने गाडी वळवली.... 

"आता या नंतर पाच एक मिनिटं कसलाच आवाज यायचा नाही... आणि मग देवळात घंटा वाजल्यावर जसा आवाज येतो तसा यायचा..." मनोज म्हणाला.

निनाद ने त्याने सांगितल्याप्रमाणे गाडी नेली... पाच मिनिटांनी एक देऊळ आलं... 

"सर, हा रस्ता तर आजी आजोबांच्या घराकडे जातो..." निनाद म्हणाला. 

"बघूया... हा बोल रे पुढे कुठे जायची गाडी?" सुयश सर म्हणाले. 

"नंतर गाडी डाव्या हाताला वळायची.... आणि मग आधी पेक्षा गार वारा यायचा... पक्ष्यांचे आवाज यायचे.... असं वाटायचं शहरापासून आपण खूप लांब आलो आहोत! त्या रस्त्यावर दोन मिनिटं गाडी चालायची आणि मग ते लोक आम्हाला उतरवायचे आणि कोणत्यातरी घरात न्यायचे...." सिक्युरिटी गार्ड ने सांगितलं. 

निनाद ने त्याने सांगितल्या प्रमाणे गाडी आणली..... गाडी बरोबर आजी आजोबांच्या घरासमोर उभी होती.... 

"सर, हे आजींचं घर आहे.... पण, आत्ता अभिषेक आणि गणेश इथेच होते.... त्यांना तर इथे कोणी भेटलं नाही...." निनाद म्हणाला. 

"तू आत्ता फक्त कुठेतरी आड वाटेला गाडी लाव..." सुयश सर म्हणाले. 

निनाद ने तसंच केलं.... "सर, असं का सांगितलं तुम्ही?" त्याने विचारलं. 

"जस्ट वेट अँड वॉच..." सुयश सर म्हणाले. 
*****************************
तिथे अभिषेक आणि गणेश कार्यालयात  पोहोचले होते..... विक्रम आणि बाकी सगळ्यांना दोघांनी डिटेल्स दिले... पासपोर्ट आणि ती चावी सुद्धा दाखवली... 

"सर! मला वाटतंय आपण नियती ला विचारुया या चावी बद्दल.... कदाचित तिला काही माहित असेल तर...." सोनाली म्हणाली. 

सगळे आता नियती त्यांना एकटी कधी भेटतेय याची वाट बघत होते..... 

क्रमशः....
**************************
आजी आजोबांचा हा डाव आता समोर येईल की त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी दुसरंच हे करतंय पाहूया पुढच्या भागात.... हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा... 

🎭 Series Post

View all