मिस्टीरिअस मेसेज (भाग-१५)

Finding codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-१५)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, नियतीचं लग्न लागलं.... निनाद आणि डॉ. विजय ना गणेश घेऊन आला पण, दोघांवर कोणीतरी हल्ला केला आहे.... प्राथमिक दृष्टया हा संशय आजी आजोबांवर जातोय... आता पुढे...)
*******************************
"सर, काय करायचं मग आता?" अभिषेक ने विचारलं. 

"आपण पुन्हा एकदा ज्या घटना घडल्या आहेत त्या क्रमाक्रमाने आठवण्याचा प्रयत्न करूया... अगदी मिशन मुंबई केस पासून.... कारण बिच्छु गँग ची सुरुवात तिथूनच झाली होती... काहीतरी आहे जे आपल्या नजरेतून सुटतंय...." सुयश सर म्हणाले.

"सर! आपल्या त्या केस मध्ये अचानक सदाबहार मॉल मध्ये एका सुसाईड बॉम्बर ने बॉम्ब फोडला आणि या सगळ्याची सुरुवात झाली..." गणेश म्हणाला. 

"नंतर आम्ही सगळे तिथे गेलो.... मी स्वतः तिथे उपस्थित सगळ्यांची चौकशी केली होती... सोनाली ने सगळे फुटेज तपासले होते.... आणि गणेश त्या हल्ल्यात जखमी झालेल्या माणसाची चौकशी करायला गेला होता..." विक्रम म्हणाला. 

"नंतर मग आपण प्रेस कॉन्फरन्स बोलावली... त्यात सुद्धा एक बॉम्ब होता जो कुणाल ने डिफ्युज केला..." सुयश सर म्हणाले. 

"मग हळू हळू आपण याचा छडा लावत गेलो तेव्हा तो तुफान न्यूज चॅनेल चा रिपोर्टर सिड आणि तिथे जखमी झालेला माणूस मॉन्टी या दोघांना आपण पकडलं..." निनाद म्हणाला. 

"मग चौकशी करता करता सिड ने आत्महत्या केली..." अभिषेक म्हणाला. 

"तेव्हा विक्रम सरांमुळे मुंबई वाचली होती... बिच्छु गँग वाले तेव्हा आपल्या हाती आले नाहीत! तेव्हा सुद्धा फक्त ऑडिओ वरून ते धमक्या देत होते...." सोनाली म्हणाली. 

"या वेळी सुद्धा ते लोक तेच करतायत.... नेहमी काही ना काही कोडं असतं जे सोडवल्यावर आपल्याला नवीन गोष्टी कळतायत..." अभिषेक म्हणाला. 

"या केस मध्ये सुरुवात नियतीच्या साखरपुड्याच्या दिवसापासून झाली.... ती लिंबाच्या रसाची चिठ्ठी मिळाली आणि आपण सावध झालो..." सोनाली म्हणाली. 

"तरीही त्या लोकांनी सदाबहार मॉल मध्ये नियती वर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाच!" ईशा म्हणाली. 

"सर! मला आठवलं... मी तुम्हाला ऑडिओ क्लिप ऐकताना म्हणालो होतो ना मला हा आवाज ओळखीचा वाटतोय.... तो त्या मॉल मॅनेजर मनोज चा आवाज आहे सर! त्याने आवाज बदलून बोलायचा पूर्ण प्रयत्न केला पण तरी त्याची ती बोलण्याची स्टाईल पकडण्यात येतेय...." विक्रम घाई घाईत म्हणाला. 

"हो सर! विक्रम सर बरोबर बोलतायत.... तो मॅनेजर जेव्हा घाबरतो किंवा टेन्शन मध्ये येतो तेव्हा अचानक त्याचा आवाज बदलतो... हे मी सुद्धा अनुभवलंय..." सोनाली विक्रम च्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली. 

"या मॉल मधेच कुठेतरी पाणी मुरतंय... एवढी सिक्युरिटी असताना सुद्धा तिथे अश्या घटना घडतात म्हणजे नक्कीच योगायोग नाही...." अभिषेक म्हणाला. 

"जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा हे असं होतं..." गणेश न कळत बोलून गेला... 

"निनाद! तू कुठे हरवलास?" ईशा कोणतीच प्रतिक्रिया न देता स्तब्ध असलेल्या निनाद ला म्हणाली. 

"एक एक मिनीट... गणेश तू आत्ता काय म्हणालास?" निनाद एकदम काहीतरी आठवल्या सारखं पटकन म्हणाला. 

"कुठे काय काही नाही..." गणेश ला एकदम काही न समजल्या मुळे तो गोंधळून म्हणाला. 

"नाही नाही.... तू म्हणालास जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा हे असं होतं.... एकदम बरोबर आहे तुझं.... सर, म्हणजे मी खात्री ने नाही सांगत पण, मला वाटतंय त्या मॉल च्या एका सिक्युरिटी गार्ड च्या हातावर तसाच भाजल्या सारखा व्रण आहे जो मी आज बघितला..." निनाद म्हणाला. 

"सर, पण हा मॉल मॅनेजर त्याच्याच मॉल मध्ये हे सगळं का घडवून आणत असेल? म्हणजे तो त्याच्या स्पर्धक मॉल मध्ये सुद्धा हे सगळं घडवून आणू शकला असता!" ईशा म्हणाली. 

"जर निनाद च्या म्हणण्या प्रमाणे तो सिक्युरिटी गार्ड सुद्धा यात सामील असेल तर त्याला त्याच्याच मॉल मध्ये हे सगळं घडवून आणणं सोपं जात असेल.... शिवाय त्याच्यावर संशय सुद्धा येणार नाही... म्हणून असेल कदाचित..." सुयश सर म्हणाले. 

"हो सर! सर, आता आपल्याला समजलंच आहे तर त्याला उचलून आणू का... एकदाचा सोक्षमोक्ष लागेल..." विक्रम म्हणाला. 

"नाही! अजिबात नाही.... त्याचे अजून कोणी साथीदार आहेत की नाही किंवा आजी आजोबांच्या जीवाला धोका आहे का हे आपल्याला काहीही माहित नाहीये... आजी आजोबांच्या जीवाला धोका होईल असं आपल्याला काहीही करायचं नाहीये...." सुयश सर म्हणाले. 

"पण, मग आता काय करायचं? या उंदरांना बाहेर कसं काढायचं?" अभिषेक ने विचारलं. 

"मला वाटतंय तो माणूस असणार इथेच कुठेतरी... फक्त समोर यायला हवा...एक प्लॅन आहे.... हो पण यात एकही चूक होता कामा नये...." सुयश सर म्हणाले. 

"सर! नाही होणार चूक... तुम्ही फक्त सांगा..." विक्रम म्हणाला. 

सुयश सरांनी प्लॅन समजावून सांगितला.... प्रत्येकाचं काम जोखमीचं होतं.... एकतर कार्यालयात एवढ्या माणसांमध्ये त्या माणसाला पकडायचं आणि तेही कोणतीही दहशद न पसरता म्हणजे अजूनच कठीण होतं! पण, सुयश सरांनी तयार केलेलीच टीम ती! सगळे जिद्दीने तयार झाले..... स्वतःचे १००% देण्यासाठी... प्रत्येकाला त्याच्या जबाबदारी ची जाणीव होती.... आणि दिलेल्या कामाची गंभीरता सुद्धा! एका कडून जरी हलगर्जी पणा झाला तरी त्याचा संपूर्ण परिणाम सरळ सरळ जीवावर बेतणाराच होता!.... जे ते त्याच्या त्याच्या कामाला लागलं.... 
****************************
दुसरीकडे नियती आता छान तयार झाली होती... मस्त जांभळ्या रंगाची पैठणी नऊवारी, नाकात सोन्याची नथ, हातात चुडा आणि मोत्याच्या बांगड्या, सोन्याचा नेकलेस, ठुशी, त्याचेच कानातले आणि वेल सुद्धा! केसांची नऊवारी ला शोभेल अशी हेअर स्टाईल, त्याला साजेसा मेकअप, कंबरेला मेखला आणि पायात पैंजण... 

"ये ये ईशा... चल तू सुद्धा लवकर तयार हो... मी आहे खाली..." अनुजा नियतीच्या खोलीतून बाहेर येत म्हणाली. 

अनुजा जशी बाहेर गेली तशी ईशा ने नियती ला बाजूला बोलावलं.... 

"काय झालं ईशा? तू थोडी काळजीत वाटयेस..." नियती म्हणाली. 

"आता मी सांगते ते नीट ऐक! तुला आता समजलंच आहे तुझ्या जीवाला धोका आहे.... सुयश सरांनी प्लॅन बनवला आहे त्या गँग ला पकडण्यासाठी... म्हणून तुला सावध करतेय..." असं म्हणून तिने नियतीला सगळा प्लॅन समजावून सांगितला.... 
******************************
तिथे दुसरीकडे सुयश सरांच्या प्लॅन प्रमाणे गणेश आणि अभिषेक पुन्हा आजोबांच्या घरी पाहणी करायला गेले..... निनाद फोटोग्राफर च्या वेशात सगळ्या पाहुण्यांवर लक्ष ठेवणार होता.... सोनाली सफाई करणाऱ्या मुलीच्या वेशात सगळीकडे फिरणार होती.... सुयश सर वाढपी बनून बाहेर लक्ष ठेवणार होते.... विक्रम आणि ईशा; सुशांत आणि नियती सारखे तयार होऊन सतत त्यांच्या अवती भोवती राहणार होते.... जर एवढं होऊनही त्या दोघांवर कुठून हल्ला करण्याचा प्रयत्न झालाच तर त्या दोघांच्या रक्षणासाठी आणि हल्लेकराचं लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळं ठरलं होतं! सगळे प्लॅन प्रमाणे कोणालाही कसलाही संशय येणार नाही याची काळजी घेऊन आपापल्या जागी गेले..... 
           गणेश आणि अभिषेक सुद्धा आजोबांच्या घरी पोहोचले... घरात आत गेल्यावर तिथे टेबल वर एक कागद ठेवलेला गणेश ला दिसला.... 

"सर! आम्ही जेव्हा इथून निघालो होतो तेव्हा हा कागद इथे नव्हता..." गणेश अभिषेक ला तो कागद दाखवत म्हणाला. 

"म्हणजे नंतर इथे कोणीतरी येऊन गेलं आहे.... बघ त्या कागदावर काय आहे..." अभिषेक म्हणाला. 

गणेश ने तो कागद उघडला.... त्यावर लिहिलं होतं; "मला माहित होतं तुम्ही पुन्हा इथे येणार... म्हणूनच तुमच्या माहिती साठी सांगतो, यावेळी नक्कीच ती तुमची डॉक्टरीण आणि तिचा तो अतिहुशार नवरा मारला जाणार.... आता तुम्ही पुन्हा इथून तिथे जाई पर्यंत त्या दोघांची मेलेली तोंडचं तुम्ही बघाल.... चू... चू... चू... आत्ता तुमची पडलेली तोंडं बघायला मिळाली असती तर खूप मजा आली असती... तुमच्या त्या ए.सी.पी. ला काय वाटलं आम्ही सहजा सहजी हाती लागू.... अरे हट... बिच्छु गँग काय पाकीट मार वाटली का रे तुम्हाला.... तुम्ही सगळे तिथून निघालात हीच चूक केली.... आता पुढे बघा काय होतंय ते.... तुमचं नशीब बलवत्तर म्हणून वाचलात... अजून थोडावेळ तिथे थांबला असतात तर तुम्हाला सुद्धा शहीद जाहीर केलं गेलं असतं ना.... बघा किती चांगली संधी गमावलीत ना तुम्ही शहीद होण्याची..." 

दोघांनी ती चिठ्ठी वाचली आणि एकमेकांकडे बघून हसले.... कारण त्या सगळ्यांना आता माहित होतं, हे सगळं तो मॉल मॅनेजर मनोज आणि सिक्युरिटी गार्ड मिळून करतायत... त्यांना गाफील ठेवायलाच सगळी टीम कार्यालयातून बाहेर पडली होती आणि वेष बदलून तिथे कोणाच्याही न कळत पुन्हा तिथे गेले होते... 

गणेश आणि अभिषेक ने सगळीकडे शोधाशोध सुरु केली.... शेवटी त्यांना आजी आजोबा कुठे आहेत हे सुद्धा शोधायचं होतं! दोघांनी मिळून सगळं घर पिंजून काढलं.... पण, काहीही संशयास्पद मिळालं नाही.... आता फक्त एक कपाट तेवढं बघायचं राहिलं होतं... तेसुद्धा ते लॉक होत म्हणून...

"हे बघ गणेश! हे एवढं एकच कपाट बघायचं राहिलं आहे... लॉक आहे हे... जरा बघ याची चावी कुठे दिसते का..." अभिषेक म्हणाला. 

दोघं मिळून चावी शोधू लागतात... 
क्रमशः....
**************************
त्या कपाटात काही सापडेल का? सुयश सरांचा प्लॅन कामी येऊन आता तरी बिच्छु गँग तावडीत येईल का? नियती आणि सुशांत ला काही होणार नाही ना... पाहूया पुढच्या भागात... 

🎭 Series Post

View all