मिस्टीरिअस मेसेज (भाग-१४)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-१४)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, ईशा ने सांगितल्या प्रमाणे कोड टाकून सगळ्यांचा जीव वाचला... आजी कुठे सापडत नाहीयेत... गणेश, डॉ. विजय आणि निनाद ला आणायला आजोबांच्या घरी गेला आहे... आता पुढे...)
****************************
नियती आता छान तयार झाली होती.... मुंडावळ्या, नाकात नथ, केसांची छान हेअर स्टाईल, थोडा डार्क मेकअप, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, गळ्यात सोन्याचा नेकलेस आणि त्या वरचेच कानातले!

"वाव.... काय मस्त दिसतेस... आत्ता सुशांत तुझ्याकडेच बघत बसेल...." सोनाली म्हणाली. 

"गप गं! थांब तुझं लग्न ठरू दे तुला पण कशी पिडते ते बघ....." नियती थोडी लाजत म्हणाली. 

एवढ्यात खोलीचं दार वाजलं..... ईशा आणि अनुजा आली होती.... 

"वा... वा... काय मस्त दिसतंय माझं बाळ...." अनुजा नियतीची हनुवटी हाताने वर करत म्हणाली. 

"खरंच यार नियती, खूप छान दिसतेयस...." ईशा सुद्धा तिच्या जवळ जात म्हणाली. 

"चला.... आता सुयश सर आले की ते तुला मंडपात घेऊन जातील..... गुरुजींनी तयारी सुरु केली आहे.... मुहूर्त जवळ आलाय..." अनुजा म्हणाली. 

इतक्यात सुयश सर आलेच..... सगळे तिथेच थांबले होते..... गुरुजींनी मुलीला घेऊन या म्हणून सांगितलं..... सुयश सर नियती चा हात धरून तिला घेऊन चालले होते.... मागून ईशा करवली म्हणून निघाली.... 

"मॅडम चला तुम्ही पण...." सोनाली म्हणाली. 

"अगं नाही.... आई ने मंगलाष्टका ऐकायच्या नसतात... तू जा...." अनुजा म्हणाली. 

सगळे जण खाली आले..... गुरुजींनी सुरुवात केली..... 
****************************
दुसरीकडे गणेश आजोबांच्या घरी पोहोचला.... मुख्य दार उघडचं होतं..... हातात रिव्हॉल्वर घेऊन गणेश कसलाही आवाज न करता डॉ. विजय आणि निनाद चा तपास करू लागला.... सगळी कडे शोधता शोधता त्याला एक खोली  बाहेरून बंद आहे हे लक्षात आलं..... हळूच त्याने त्या खोलीचं दार उघडलं... आणि समोर बंदूक रोखली..... पण, तिथे डॉ. विजय आणि निनाद ला एका खुर्ची ला बांधून ठेवलं होतं..... बाकी कोणीही तिथे नव्हतं... गणेश ने पटकन रिव्हॉल्वल ठेवली आणि तो त्या दोघांच्या जवळ गेला.... दोघं हि बेशुद्ध होते.... गणेश ने किचन मधून पाणी आणून दोघांच्या तोंडावर मारलं आणि त्यांना शुद्धीवर आणलं..... 

"सीई...आ..." डॉ. विजय ना डोक्याच्या मागे वेदना होत होत्या... निनाद ची सुद्धा तीच अवस्था होती.... 

गणेश ने दोघांना धरून बाहेर सोफ्यावर आणून बसवलं.... आणि पटकन दोघांच्या डोक्याला रुमाल बांधला.... डोक्याच्या मागच्या बाजूला जोरात वार केल्यामुळे थोडी जखम झाली होती.... 

"नक्की काय झालं? कोणी केलं हे?" गणेश ने विचारलं. 

"आम्ही दोघं इथे आजोबांना घ्यायला आलो होतो.... पण, ते म्हणाले तुम्ही बसा मी आवरून येतो..... बराच वेळ झाला तरी ते बाहेर आले नाहीत म्हणून आम्ही आत जाऊन बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं! बाहेरून कोणीतरी दार बंद केलं.... निनाद ने दार तोडलं... आम्ही बाहेर आलो पण, आजोबा इथेच बाहेर होते.... त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच कुत्सित हास्य होतं.... आम्हाला दोघांना काही कळायच्या आत मागून कोणीतरी डोक्यात मारलं आणि नंतर च काही माहित नाही.... तू आलास तेव्हाच आम्ही शुद्धीत आलो आहोत!" डॉ. विजय डोक्याच्या मागच्या बाजूला धरूनच बोलत होते....

"चला आता आधी आपण हॉस्पिटल मध्ये जाऊन येऊया...." गणेश दोघांना आधार देत उठवत म्हणाला. 

त्याने दोघांना बाहेर आणून बसवलं.... आणि रिक्षा घेऊन आला.... दोघांना सावकाश पणे रिक्षेत बसवून तिघं हॉस्पिटल ला जायला निघाले....

"एव्हाना नियती आणि सुशांतच लग्न लागलं असेल ना... आपण नंतर जाऊया का पट्टी बांधायला..." डॉ. विजय म्हणाले. 

"नाही! अजिबात नाही.... नियतीला सुद्धा हे आवडणार नाही... मी सोनाली मॅडम ना फोन करून सांगतो.... त्या सुयश सरांच्या कानावर घालतील...." गणेश म्हणाला. 

त्याने लगेच सोनाली ना फोन लावला... मोबाईल हातातच वायब्रेट वर असल्यामुळे तिला लगेच समजलं.... बाजूला जाऊन तिने फोन उचलला... गणेश ने तिला तिथे घडलेलं सगळं सांगितलं.... 

"ओके... मी सांगते सुयश सरांना... इथे सुद्धा आजी मगाच पासून कुठे दिसत नाहीयेत... त्यांना पण शोधलं पाहिजे..." सोनाली म्हणाली. 

"तुम्हाला काय वाटतंय मॅडम हे सगळं आजी आजोबा तर?...." गणेश म्हणाला. 

"काय माहित... ते सगळं तुम्ही इथे आल्यावर बघूया... निनाद आणि सरांना लवकर घेऊन ये.. अनुजा मॅडम मगाच पासून शोधतायत त्यांना..." सोनाली म्हणाली. 

"हो! आम्ही हॉस्पिटल च्या जवळच पोहोचलो आहोत... १५ ते २० मिनिटात येतो..." गणेश म्हणाला. 
****************************
एव्हाना आता मंगलाष्टकांचा विधी झाला होता... सुशांत आणि नियती पुन्हा तयार व्हायला खोलीत गेले.... बाकी पाहुणे मंडळींची जेवायला जायची गडबड सुरु होती.... अनुजा प्रत्येकाला अगदी आवर्जून जेवूनच जायचं हा म्हणून सांगत होती.... 

"ईशा... दिसले का गं आमचे हे कुठे?" अनुजाने ईशा ला हाक मारून विचारलं. 

"मॅडम.... बहुतेक ते जेवणाच्या इथली व्यवस्था बघतायत.... म्हणजे मी त्यांना तिथे जाताना बघितलं..." सोनाली ने मागून येऊन सगळं सावरलं... 

"हो का! मी पण बघून येते जरा..." असं म्हणत अनुजा बाहेर जाऊ लागली.... 

"काकू! काकू! राहूदे.... म्हणजे सर काय पटकन तयार होतील... पण, आत्ता नऊवारी साडी ची थीम आहे ना.... तुम्हाला वेळ लागेल..." ईशा अनुजा ला बाहेर जाण्यापासून थांबवत म्हणाली. 

कसंबसं अनुजा ला बाकी आवरायला पाठवलं..... इतक्यात तिथे सुयश सर आणि बाकीचे आले.... 

"सर! गणेश चा फोन आलेला..." सोनाली ने बोलायला सुरुवात केली आणि सगळं सांगितलं. 

"बरं! आता आधी आपण आजींचा तपास करायला हवा.... या वयात हे एवढं सगळं घडवून आणणं मला जरा अवघड वाटतंय.... नक्की कुठेतरी पाणी मुरतंय...." सुयश सर म्हणाले. 

तेवढ्यात गणेश डॉ. विजय आणि निनाद ला घेऊन आला.... 

"आता बरं वाटतंय ना?" विक्रम ने विचारलं. 

"हो! जास्त काही झालं नव्हतं... डोक्याला मागच्या बाजूला वार झाल्यामुळे थोडी जखम झाली आहे आणि म्हणून चक्कर येत होती.... पण, डॉक्टरांनी ड्रेसिंग करून एक इंजेक्शन दिलं आहे..... आता बरं वाटतंय..." निनाद म्हणाला. 

"नक्की काय घडलं हे पूर्ण मुद्देसूद पणे नीट सांगा..." सुयश सर म्हणाले. 

डॉ. विजय नि सगळं नीट सांगितलं.... 

"म्हणजे तिथे आजोबांशिवाय अजून एक व्यक्ती होती.... तुम्हाला काही आठवतंय का? तुम्हाला तिथे बांधून ठेवल्यावर बेशुद्ध होई पर्यंत त्या दोघांच्यात काही बोलणं झालं का? किंवा ओझरतं असं काही दिसलं का तुम्हाला?" विक्रम ने विचारलं. 

"नाही... काही आठवत नाहीये...." डॉ. विजय म्हणाले. 

"सर! मला एवढं नीट आठवत नाहीये पण, कदाचित त्याच्या डाव्या हातावर भाजल्या सारखा व्रण दिसला असं वाटतंय...." निनाद म्हणाला. 

"ठीक आहे! डॉ. विजय... तुम्ही आत्ता इथे असणं गरजेचं आहे.... आम्ही बघतो काय ते...." सुयश सर म्हणाले. 

"सर, मला वाटतंय या उंदराला जर बिळातून बाहेर काढायचं असेल तर कसलं तरी आमिष दाखवावं लागेल..." विक्रम म्हणाला. 

"हम्म.... पण, अजून आपल्याला नक्की माहित नाहीये या सगळ्यात आजी आजोबा सामील आहेत की नाही.... कि त्यांच्या जीवाला धोका आहे.... प्रत्येक पाऊल आपल्याला फुंकून फुंकून टाकावं लागेल...." सुयश सर म्हणाले. 

"सर, मला एक सांगायचं होतं...." सोनाली ला काहीतरी आठवलं आणि ती पटकन म्हणाली. 

"बोल ना..." विक्रम म्हणाला. 

"सर, जेव्हा आजींना मी मदत करायला गेले होते तेव्हा आधी तर त्या मला मेकअप वैगरे कर म्हणाल्या... पण, नंतर अचानक काय झालं माहित नाही, त्यांनी मला हात सुद्धा लावून दिला नाही.... फक्त हेअर स्टाईल करून घेतली आणि बाकी काही नको करू म्हणाल्या..." सोनालीने सांगितलं. 

"हे तू मला आधी का नाही सांगितलं?" ईशा म्हणाली. 

"तू आलीस तेव्हा हे सगळं माझ्या डोक्यातून गेलं होतं.... आणि त्यांचं वय झालंय, क्षणांत हो नाही होऊ शकतं म्हणून मग मी दुर्लक्ष केलं.... पण, आता आजोबांचं पण हे असं वागणं म्हणून मग हे सांगावंसं वाटलं..." सोनाली म्हणाली. 

"सर, हे आजी आजोबा दिसतायत तसे नाहीयेत असं वाटतंय...." अभिषेक म्हणाला. 

"आपल्याला आत्ता कोणत्याही निष्कर्षावर नाही जाता येणार... डॉ. विजय ना जसं तस्करीच्या प्रकरणात अडकवलं होतं तसंही असू शकतं किंवा खरंच आजी आजोबा हे करत असतील.... पण, या सगळ्यात नियती ची काळजी घेतली पाहिजे... नियतीला आता बऱ्यापैकी कल्पना आहे या सगळ्याची.... तिला विश्वासात घेऊन काहीतरी प्लॅन बनवला पाहिजे आणि लवकरात लवकर या बिच्छु गँग ला पकडलंच पाहिजे..." सुयश सर म्हणाले. 

"अनुजा ला यातलं बाकी काही माहित नाहीये... तिचं काय? एकतर आता ही डोक्याची पट्टी बघून तिचे अजून प्रश्न सुरु होतील याचीच काळजी वाटतेय..." डॉ. विजय म्हणाले. 

"काकूंना नाही कळणार या पट्टी बद्दल.... माझ्याकडे आयडिया आहे... हि बघा हि फेट्यासारखी टोपी! यामुळे तुम्हाला दुखणार सुद्धा नाही आणि तुमची पट्टी झाकली जाईल..." ईशा डॉ. विजय ना फेटा देत म्हणाली. 

"थँक्स! मी एकदा जाऊन अनु ला भेटून येतो... त्याशिवाय तिचा जीव भांड्यात नाही पडणार..." डॉ. विजय म्हणाले. 

"हो! पण त्यांनी आजोबांविषयी काही सांगू नका..." विक्रम म्हणाला.

"मला वाटतंय आपण त्यांना आजी घरी गेल्या आहेत आणि दोघं आता संध्याकाळी येतील असं सांगूया का?" सोनाली ने विचारलं. 

"हो चालेल.... म्हणजे काही काळजीचं कारणच नाही..." डॉ. विजय म्हणाले. 

ईशा, सोनाली आणि डॉ. विजय पुढच्या तयारी ला गेले... 

क्रमशः.....
****************************
हे सगळं खरंच आजी आजोबांनी केलं असेल का? डॉ. विजय आणि निनाद वर कोणी वार केला असेल? विक्रम ला त्या ऑडिओ क्लिप मधला आवाज ओळखीचा वाटला होता तो त्याला आठवेल का? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा... 

🎭 Series Post

View all