रहस्यमय हवेली (भाग -७)

Mystery of mansion.

रहस्यमय हवेली (भाग-७)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
डॉ. विजय आणि नियती ने एकमेकांकडे पाहिलं. सुयश सर ज्या अर्थी एवढं सांगतायत म्हणजे नक्की काहीतरी मोठं काम असणार हे दोघांना समजलं.

"तुम्ही दोघं अर्थात लॅब सांभाळून हे करा! तुम्हाला त्या सोनिया मॅडम वर सतत नजर ठेवायची आहे.... प्रत्येक बारीक हालचाल बघा... त्यांना नक्की काय प्रॉब्लेम आहे आपल्याला आधी शोधून काढायचं आहे... ते काम तुम्हाला या सात दिवसात करावं लागेल.." सुयश सर म्हणाले. 

"हो चालेल! तुम्ही निश्चिंत मनाने तुमची ट्रेनिंग पूर्ण करून या... आम्ही दोघं सांभाळतो सगळं." डॉ. विजय सुयश सरांना आश्वस्थ करत म्हणाले.

"मी लगेच मोबाईल कंपनीशी बोलून सोनिया मॅडम चे बाकी डिटेल्स तुम्हाला पाठवतो." विक्रम म्हणाला. 

नियती ने मानेने च हो म्हणलं. लगेचच विक्रम ने मोबाईल कंपनी ला फोन लावून लिलावाच्या वेळी तिथे हजर असणाऱ्या सगळ्या नंबर्स चे डिटेल्स मागवले.... त्यातून सोनिया चे सगळे डिटेल्स यांना मिळाले. विक्रम ने लगेचच सगळे डिटेल्स डॉ. विजय आणि नियती ला दिले. 

"हे सोनिया मॅडम चे काही बेसिक डिटेल्स आहेत! पण, त्यांचं कामाचं ठिकाण आणि इतर गोष्टी तुम्हाला शोधायच्या आहेत. हे काम तुमच्यासाठी नवीन आहे पण, दुसरा पर्याय नाही आपल्याकडे.... ही बातमी कुठेही लीक होता कामा नये म्हणून तुमची मदत लागणार आहे." सुयश सर म्हणाले. 

"हो सर.. नका काळजी करू... जमेल आम्हाला. सुशांत सुद्धा उद्या घरी येईल... त्याची सुद्धा मदत होईलच..." नियती म्हणाली. 

"ठीक आहे... All the best... माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे..." सुयश सर म्हणाले. 

सगळ्यांची जेवणं आटोपली होती.... पुन्हा सगळे गाडीत बसून निघाले.... 
************************
दुसऱ्या दिवशी सुयश सरांची टीम सज्ज झाली त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी! सगळे ठरलेल्या वेळी एकत्र भेटले आणि सुरू झाला त्यांचा सी.आय.डी. ऑफिसर होण्याचा प्रवास! आठवडा भराचं आवश्यक सामान घेऊन सगळे निघाले..... नव्या उमेदीने, देशाच्या सेवेसाठी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी सगळ्यांमध्ये च एक उत्साह संचारला होता.... गप्पा मारता मारता सगळे ट्रेनिंग सेंटर वर पोहोचले. त्यांच्या सारखे अजून बरेच पोलीस तिथे ट्रेनिंग साठी आलेले होते..... काहींची बेसिक तर काहींची अॅडवान्स ट्रेनिंग चालू होती... सगळ्यांना आपापले पोलीस ट्रेनिंग चे दिवस आठवत होते.... दिलेल्या वेळेत नकाशा पाहून योग्य ठिकाणी पोहोचणे, फायरिंग ची प्रॅक्टिस, सकाळी लवकर उठून व्यायाम, स्वसंरक्षणाचे धडे सगळं डोळ्यासमोरून जात होतं! 

"किती मजा असायची ना ट्रेनिंग मध्ये.... एकदम कडक शिस्त असली तरी आपलेपणा एक टीम बनून कसं काम करायचं याचे धडे गिरवले आपण इथे...." विक्रम म्हणाला. 

"हो सर! कडक शिस्तीबरोबर च कुटुंबा सारखी वागणूक सुद्धा मिळायची.... कोणाला काही लागलं किंवा कोणी आजारी असेल तर सगळे मिळून त्याची काळजी घ्यायचे." ईशा म्हणाली. 

एवढ्यात तिथे ट्रेनर आले... सगळ्यांनी त्यांना जय हिंद म्हणून सेल्युट केला. पोलीस ट्रेनिंग असली तरी आता काही अॅडवान्स ट्रेनिंग इथे होणार होत्या.... काही बेसिक चाचण्या करून सगळ्यांच्या ट्रेनिंग चा श्री गणेशा झाला. 
**************************
दुसरीकडे डॉ. विजय आणि नियती लॅब मध्ये आले होते..... सुयश सरांनी जी जबाबदारी सोपवली आहे त्यावर त्यांचा विचारविनिमय सुरू होता. 

"सर, मी सोनिया मॅडम ची माहिती काढली.... पुरातन वास्तू, वस्तू आणि त्यांची रहस्य याबद्दल त्या रिसर्च करतात. काही दंत कथांप्रमाणे खरचं तसं काही असू शकेल का याचा अभ्यास त्या करतात. त्यांच्या टीम मध्ये सगळ्यात ज्युनिअर मेंबर आहेत त्या. आत्ता काहीतरी सहा महिन्यांपूर्वी च त्यांनी हे रिसर्च सेंटर जॉईन केलं आहे." नियती ने सांगितलं. 

"ओके.... अजून काही संशयास्पद किंवा आधी त्या कुठे काम करायच्या काही माहिती?" डॉ. विजय नी विचारलं. 

"संशयास्पद असं नाही पण, आधी सुद्धा त्या अश्याच एका रिसर्च सेंटर मध्ये काम करत होत्या. मी आज तिथे जाणार आहे तेव्हा बघू काही हाती लागत का!" नियती म्हणाली. 

डॉ. विजय आणि नियती लॅबच्या रूटीन कामाला लागले. दुपार नंतर नियती ने सोनिया आधी जिथे काम करत होती तिथे जाऊन तिची माहिती काढली. त्या माहितीतून सुद्धा काही संशयास्पद असं समोर आलं नाही.... 

"नियती, मला वाटतं आपण आता डायरेक्ट सोनिया शी कसा संपर्क साधू शकतो हे बघूया... नक्कीच कुठेतरी पाणी मुरत असणार." डॉ. विजय म्हणाले. 

"हम्... आज सुशांत घरी आला असेल... आपण उद्या पासून त्याची मदत घेऊ... त्याला अनुभव सुद्धा आहे आणि आपलं काम एकदम चोख सुद्धा होईल...." नियती म्हणाली. 

"हा! तू जी काही माहिती आत्ता पर्यंत गोळा केली आहेस ती सुद्धा कामी येईल.... कारण, आपल्याला यात काही विशेष वाटलं नसलं तरी कुठे ना कुठे सुशांत आणि आपली सुयश सरांची टीम याचा वापर करेलच!" डॉ. विजय म्हणाले. 

"सर! अजून एक सांगायचं राहिलं, काल विक्रम ने जे डिटेल्स दिले आहेत त्या पत्त्यावर सोनिया राहत नाही.... आपल्याला नवीन पत्ता शोधून काढावा लागेल." नियती म्हणाली. 

"एक काम कर, विक्रम ने जो नंबर दिला आहे त्या नंबर वर फोन करून पत्ता काढायचा प्रयत्न कर..." डॉ. विजय म्हणाले. 

नियती ने दोन मिनिटं डोळे बंद करून काहीतरी विचार केला आणि त्या नंबर वर फोन केला... 

"हॅलो!...." समोरून सोनिया म्हणाली. 

"हॅलो मॅडम! मी रिसर्च कमिटी मधून बोलतेय.... तुमच्याकडे काही महत्त्वाचे कागदपत्र पाठवायचे आहेत म्हणून तुमचे काही रेसिडेन्शिअल  डिटेल्स कन्फर्म करायचे होते... तर, मी जे सांगतेय ते डिटेल्स बरोबर आहेत का बघा." नियती म्हणाली. 

"ओके..." सोनिया थोड्या दबक्या आवाजात म्हणाली. 

नियती ने तिचं नाव, सध्याचा फोन नंबर, कामाच्या ठिकाणचा पत्ता आणि घरचा पत्ता सगळं सांगितलं. 

"सगळे डिटेल्स बरोबर आहेत! फक्त माझा घरचा पत्ता काही महिन्यांसाठी बदलला आहे तो अपडेट करा प्लीज." सोनिया म्हणाली. 

नियती ने सध्याचा तिचा पत्ता लिहून घेतला आणि थँक्यु बोलून फोन ठेवला. 

"सर, मिळाला सोनियाचा नवीन पत्ता." नियती डॉ. विजय ना तो पत्ता दाखवत म्हणाली. 

"गुड! तुला काही जाणवलं का फोन वर बोलताना?" डॉ. विजय नी विचारलं. 

"हो खरंतर... मला हेच सांगायचं होतं! सतत असं वाटत होतं की कोणीतरी त्यांच्यावर दबाव आणतंय, कोणत्यातरी प्रेशर खाली त्या बोलत होत्या." नियती म्हणाली. 

"एक काम कर... या पत्त्यावर तू आत्तच काही टेक्निकल भाषेत लिहिलेले डॉक्युमेंट्स घेऊन जा... आणि जरा काही माहिती मिळते का बघ...." डॉ. विजय म्हणाले. 

नियती ने लगेच टेक्निकल भाषेत डॉक्युमेंट्स तयार केले आणि ती त्या पत्त्यावर जायला निघाली. थोड्याच वेळात ती त्या पत्त्यावर पोहोचली... नियती ने दारावरची बेल वाजवली... 

"कोण आपण? काय हवंय?" एका माणसाने दार उघडून विचारलं. 

"मी रिसर्च कमिटी मधून आले आहे... काही डॉक्युमेंट्स वर सोनिया मॅडम च्या सह्या हव्या होत्या." नियती म्हणाली. 

"द्या इकडे... ती आत्ता झोपली आहे... तुम्ही सांगाल तिथे उद्या आणून देतो..." तो म्हणाला. 

"नाही! असं आम्ही कोणाच्याही हातात देऊ शकत नाही... मला त्यांची सही घेऊन लगेच ऑफिस मध्ये हे सबमिट करायचं आहे..." नियती म्हणाली. 

तो माणूस ऐकायलाच तयार नव्हता! त्यांचा आवाज ऐकून सोनिया च बाहेर आली.... त्या माणसाने तिच्याकडे एकदम रागाने पाहिलं! नियतीच्या नजरेतून हे सुटलं नाही. 

"गुड इविनिंग मॅडम! मगाशी तुम्हाला डॉक्युमेंट्स बद्दल सांगायला फोन आलाच असेल ना! त्यावर च सह्या घ्यायच्या होत्या." नियती म्हणाली आणि डोळ्याने काहीतरी इशारा केला. 

सोनिया ला नक्की सुयश सरांनी च मदत पाठवली असेल याची खात्री झाली. 

"ओके... द्या मी करते सह्या." असं म्हणून तिने डॉक्युमेंट्स ची फाईल नियती कडून घेतली. 

"व्यवस्थित सगळं वाचून मग सही करा... आपल्या रेकॉर्ड मध्ये हे सगळं ठेवायचं आहे तर सगळं बरोबर च असलं पाहिजे..." नियती म्हणाली. 

तो माणूस सुद्धा त्या फाईल मध्ये डोकावून डोकावून बघत होता... पण, इंग्लिश आणि त्यात टेक्निकल भाषा वापरल्याने त्याला काही समजलं नाही... त्याची खात्री झाली नक्की काहीतरी कामाचं आहे... 

"मला जरा पाणी मिळेल का प्लीज." नियती त्या माणसाला म्हणाली. 

तो काही न बोलता आत गेला... तेवढ्यात नियतीने सोनिया ला कोरा कागद दिला आणि नक्की काय घडलं आहे हे त्यावर लिहायला सांगितलं. तो पाणी घेऊन येई पर्यंत नियतीने तो कागद ठेवून पण दिला. पाणी पिऊन होईपर्यंत सोनियाच्या सह्या सुद्धा करून झाल्या. 

"थँक्यू मॅडम! आम्ही सगळ्यांनी तुम्ही आता हवेलीचा सुद्धा रिसर्च करणार आहात हे ऐकलं आहे जर तुम्हाला मदतनीस हवा असेल तर आज आलेल्या हेल्पलाईन वर फोन करून तुम्ही तसं सांगू शकता..." नियती म्हणाली. 

सोनिया ने फक्त मानेने हो म्हणलं. नियती तिथून निघाली. थोडं पुढे आल्यावर तिने डॉ. विजय ना फोन लावला. 

"बाबा! मी आपल्या घरी जातेय.... आपण घरी बोलूया.... आई ची पण भेट होईल...." नियती म्हणाली. 

"बरं! मी इथून निघतो च आहे अर्ध्या तासात... तोपर्यंत तुमच्या माय लेकीच्या गप्पा चालू दे!" डॉ. विजय हसत म्हणाले. 
 
नियती लग्न झाल्यानंतर बरेच दिवसांनी माहेरी गेली होती.... दोघी माय लेकिंच्या मनसोक्त गप्पा झाल्या.... अनुजाने तिच्या आवडीचे मस्त पैकी कांदा पोहे आणि चहा केला! एवढ्यात डॉ. विजय सुद्धा घरी आले.... त्यांनी सुद्धा फ्रेश होऊन चहा घेतला आणि पुन्हा कामाचं बोलणं सुरु झालं! 

"बसा आता पुन्हा कामाचं बोलत.... मी जाते बाई शेजारच्या काकूंकडे...." असं म्हणत अनुजा तिथून गेली. 

"आई ला वाईट वाटलं बघा आता..." नियती म्हणाली. 

"असुदे ग! ती पण गंमत करते.... तिला माहितेय आपलं काम कसं आहे ते... आणि रागावली तरी मी समजावेन तिला! तू बोल..." डॉ. विजय नी नियती ला समजावलं. 

नियतीने सोनिया च्या घरी जे घडलं ते त्यांना सांगितलं! दोघं थोडावेळ विचार करत शांत बसून होते..... 

"बघू त्या सोनिया मॅडम ने कागदावर काय लिहून दिलं आहे...." डॉ. विजय म्हणाले. 

नियतीने तो कागद डॉ. विजय ना दाखवला. 
क्रमशः...... 
**************************
काय असेल त्या कागदावर? सोनिया खरचं मोठ्या संकटात असेल का? का तिचा वापर हवेलीचे रहस्य सोडवण्यासाठी केला जातोय? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. 

🎭 Series Post

View all