रहस्यमय हवेली (भाग -६)

Mystery of mansion.

रहस्यमय हवेली (भाग-६)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
आता तर सोनिया हवेली घेणार आणि रहस्य सोडवणार हे निश्चित झालं होतं! बाकी इन्व्हेस्टर्स ना आता या हवेलीत पैसा गुंतवून त्यातून काही रिटर्न्स मिळतील असं वाटतच नव्हतं! त्यामुळे त्यांचा यातून रस उडला उडला होता.... 

"आम्ही चार दिवसात कराराचे पेपर्स तयार करतो.... त्यावर तुमच्या सह्या झाल्या की मगच तुम्हाला इथे राहता येईल...." रणजित कुमार ने स्पष्ट सांगितलं.

"चालेल! पण, मी जी अट सांगितली आहे ती सुद्धा त्यात नमूद करा." सोनिया म्हणाली. 

"हो नक्कीच! चला आता आपला हा कार्यक्रम सुद्धा झाल्यात जमा आहे.... अजून फक्त दहा ते पंधरा मिनिटं! मगाशी जसं आम्ही रहस्य सोडवणाऱ्याला मिळणाऱ्या बक्षिसाबद्दल बोललो होतो त्या बद्दल एक घोषणा केली की आपल्या आजच्या या लिलावाच्या कार्यक्रमाची सांगता होईल." रणजित कुमार म्हणाला.

आता अजून कोणते रहस्य आहे आणि नक्की काय बक्षीस असणार याकडे सगळे लक्ष देऊन होते.... 

"आम्ही तुम्हाला इथून जाताना महारणींची जी खास डायरी होती त्याची एक प्रत देणार आहोत! त्यामध्ये असलेल्या सांकेतिक भाषेचा जो कोणी अर्थ शोधून काढेल त्याला हा हिरा भेट म्हणून देण्यात येईल..." रणजित कुमार ने एक छोटी सुटकेस उघडून हिरा दाखवला. 

लहानशा सुटकेस मध्ये लाल मखमली गादीवर ठेवलेला, साधारण एक ते दीड इंचाचा तो हिरा संध्याकाळच्या सूर्य किरणांत लखलखत होता... तो हिरा बघून सगळ्यांचेच डोळे चमकले.... करोडो रुपयांचा तो हिरा असा सरळ बक्षीस म्हणून देणे म्हणजे नक्कीच त्या डायरीत लिहिलेला तो मजकूर काहीतरी खास असणार हे सगळ्यांना कळून चुकलं होतं! 

"सर, तुम्ही एवढा महाग हिरा का देताय बक्षीस म्हणून?" कुणाल ने विचारलं.

"आमच्या माहिती नुसार त्या लिपी मध्ये महाराणी कुसूमारंगिनि यांनी त्यांच्या अंताचे रहस्य जसे लिहिले आहे तसेच त्याच लिपी मध्ये त्याच डायरीत कुठेतरी छुप्या पद्धतीने एका अश्या राज्या विषयी लिहिले आहे जे आजही असू शकते... पूर्ण सोन्याचे राज्य! ज्या राज्याच्या भिंती हिर्‍या माणक्यांनी बनलेल्या आहेत! जर हे असे राज्य खरचं अस्तिवात असेल तर त्याचा आम्ही फक्त एक टक्का भाग घेऊ... बाकी सर्वाचा आपल्या देशाच्या विकासासाठी वापर केला जाईल." रणजित कुमार ने सांगितलं.

"सर, तुम्हाला खरचं वाटतं का की असं कोणतं राज्य असेल? कारण, सध्याच्या तंत्रज्ञानाची प्रगती बघता माणूस समुद्र तळा पासून ते चंद्रा पर्यंत जाऊन आला आहे.... जर असं काही असतं तर आधीच लक्षात आलं असतं!" कुणाल म्हणाला. 

कुणालच्या बोलण्यात तथ्य होतं! हे आता उगाच काहीतरी सांगतायत असं सगळ्यांना वाटू लागलं. 

"नियती! खरचं असं काही असू शकेल का ग? मला तर नाही वाटत..." ईशा नियती ला हळूच म्हणाली. 

"मला पण वाटत नाहीये.... जोपर्यंत काही पुरावे दिसत नाहीत तोपर्यंत सांगणं कठीणच आहे..." नियती म्हणाली. 

सगळ्यांमध्ये आता कुजबुज सुरू होती हे असं कसं शक्य आहे... 

"एक मिनिट! ऐकून घ्या!"रणजित कुमार सगळ्यांना शांत करत म्हणाला. 

सगळे आता एकदम गप्प झाले होते.... त्याला काय म्हणायचं आहे हे सगळे ऐकू लागले... 

"आमच्या अनेक पिढ्यांनी यासाठी शोध घेतले आहेत! त्या भाषेचा अर्थ अजूनही कोणाला उलगडता आला नाही.... कदाचित ही अतिशोक्ती असू शकते कारण, एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे काही गोष्टी येताना त्यात थोडे बदल होतातच! पण, एवढी खात्री नक्की आहे की ज्या अर्थी असं काही सांगण्यात येत होत म्हणजे काहीतरी खास असणारच! शिवाय त्या डायरीत तुम्हाला काही सोन्याच्या भिंतीसारखे चित्र सुद्धा पाहता येईल जे महाराणींनी स्वतः काढले आहे..." रणजित कुमार म्हणाला.

"ओके सर! असं मानून चालुया अगदी राज्य नाही निदान हीरे माणक्यांनी भरलेल्या मोठ्या पेट्या सापडतील पण, मगाशी तुम्ही म्हणालात त्या खऱ्या डायरी च्या प्रती तुम्ही देणार आहात! जर त्यात गुप्त रित्या या बद्दल लिहिलेलं आहे तर ते प्रती मध्ये कसं समजणार?" कुणाल ने विचारलं.

"या साध्या प्रती नाहीत! आम्ही विशेष तंत्रज्ञान वापरून या प्रती तयार केल्या आहेत... त्यामुळे त्याची चिंता नसावी..." रणजित कुमार ने सांगितलं.

त्या नंतर तिथे उपस्थित सगळ्यांना त्या प्रतींचं वाटप झालं! कार्यक्रमाची सांगता झाली होती... सगळे तिथून निघायच्या तयारीत होते... इतक्यात राज त्याच्या जागेवरून उठून उभा राहिला आणि बोलू लागला; "मला तुमच्या सगळ्यांची दोन मिनिटं हवी आहेत!" 

सगळ्यांनी त्याच्याकडे वळून पाहिलं.... कुणाल ला त्याने मगाशी सगळ्यांसमोर पेटी उघडेन असं सांगितल्यामुळे त्याला अंदाज होता... राज सगळ्यांच्या समोर ती पेटी घेऊन आला... 

"मगाशी लिलावात घेतलेली ही पेटी मला तुमच्या सगळ्यांसमोर उघडण्याची इच्छा आहे..." असं म्हणून त्याने ती पेटी तिथल्या टेबल वर ठेवली.

आता त्या पेटीतून नक्की काय बाहेर येईल हे सगळे एकदम लक्ष देऊन पाहत होते... राज ने त्या पेटी साठी एवढी रक्कम मोजली होती निदान तेवढी तरी त्याला परत मिळतेय का हे सगळे पाहण्यात गर्क झाले.... राज ने त्याला मिळालेल्या डायरी चे एक पान उघडले.... त्यावरचा मजकूर वाचला आणि ते अनोखे सिंहाच्या तोंडासारखे कुलूप उघडले... सगळे आता खूपच अधीर झाले होते त्यात काय आहे हे पाहण्यासाठी! कुलूप उघडताच त्यात अजून एक लहान पेटी होती... राज ने सगळ्यांसमोर ती काढली.... मिश्र धातूंपासून बनवलेली ती पेटी सुद्धा विशेष आकर्षक नक्षी कोरलेली होती... त्याला साधे कुलूप होते.... राज ने त्या कुलुपाची चावी शोधायला सुरुवात केली.... त्याच लहान पेटीच्या एका फुलाच्या नक्षी मध्ये ती बेमालूम पणे लपवलेली चावी त्याला दिसलीच! त्याने दुसरी पेटी सुद्धा उघडली.... त्या पेटीत तत्कालीन मोहरा, दोन तीन अस्सल मोत्याच्या माळा आणि सगळ्यात विशेष म्हणजे पाच हिरे असलेला एक लहानसा बटवा होता! 

"वाह सर! तुमचा तर खूप छान फायदा झाला... ही पेटी घेण्याचा तुमचा निर्णय एकदम बरोबर होता..." कुणाल म्हणाला.  

"हो! मी म्हणलं नव्हतं माझा निर्णय कसा योग्य आहे हे मी सगळ्यांना दाखवून देईनच!" राज स्वतःची कॉलर टाईट करत म्हणाला. 

सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं! कुणाल ने त्याचा इंटरव्ह्यू घेतला आणि आता सगळे परतीच्या वाटेला लागले.... पुन्हा सगळ्यांचे चेकिंग करून एक एक जण हवेलीच्या बाहेर पडत होता..... बाहेर पडल्यावर सुद्धा पुन्हा पुन्हा वळून त्या भव्य हवेली कडे प्रत्येक जण बघत होता.... आपली सुयश सरांची टीम सुद्धा बाहेर पडली.... पुन्हा एकदा मनसोक्त त्या हवेली ला मनात साठवून सगळे निघाले.... विक्रम आणि निनाद गाडी आणायला पार्किंग मध्ये गेले.... बाकी सगळे मेन रोड वर वाट बघत होते...

"किती मस्त वाटलं ना आज! किती छान आहे ती हवेली...." सोनाली म्हणाली. 

"हो! या साठी नियती तुला खूप खूप थँक्यू.... तू जर ते कूपन च शोधून काढलं नसतं तर आपल्याला काही समजलच नसतं.... किती कमी सामान्य लोक आले होते... आणि जे होते ते अगदी तुझ्या सारखे हुशार महाराणी कुसूमारंगीनि यांचा पूर्ण अभ्यास असलेले...." ईशा म्हणाली. 

"बास ग! किती वेळा थँक्यु म्हणशील.... उद्या पासून तुम्हा सगळ्यांची ट्रेनिंग आहे ना... म्हणून माझ्याकडून हे एक रिफ्रेशमेंट गिफ्ट समजा..." नियती म्हणाली. 

"अरे हो बरं तू विषय काढलास! मला जरा तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे... विक्रम आणि निनाद आले की बोलू...." सुयश सर म्हणाले. 

एवढ्यात विक्रम आणि निनाद गाडी घेऊन आले.... सुयश सरांच्या सांगण्यानुसार सगळे एका ढाब्यावर जेवायला गेले.... मस्त पैकी चुलीवर चे गरमा गरम जेवण करत गप्पा सुरू झाल्या. 

"सर, तुम्हाला काय बोलायचं होतं?" ईशा ने विचारलं. 

"हा! तर सगळ्यात आधी, उद्या पासून आपली ट्रेनिंग आहे! आता मस्ती मुड मधून सगळ्यांनी बाहेर येऊन ट्रेनिंग वर फोकस करुया.... आपल्याला देशाची सेवा करण्याची जी चांगली संधी मिळाली ती शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडायची." सुयश सर म्हणाले. 

"हो सर! तुमची शिकवण आहेच! आता मजा मस्ती संपली.... आता फोकस स्वतःच्या ट्रेनिंग वर... आणि प्रत्येक श्वास देशासाठी!" सोनाली म्हणाली. 

सुयश सरांनी एक स्मित केलं. त्यानंतर सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी कुठे आणि कधी भेटायचं याचं प्लॅनिंग झालं! डॉ. विजय आणि नियती ने पुढच्या ट्रेनिंग साठी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. 

"अरे अजून एक सांगायचं राहिलं... आपल्याला नंतर जरा त्या सोनिया मॅडम ची मदत करावी लागणार आहे..." सुयश सर म्हणाले. 

"पण, सर नक्की काय? काही झालंय का?" विक्रम ने विचारलं.

"अजून काही झालं नाहीये.... पण, तिथून निघताना सोनिया मॅडम नी मला हळूच ही चिठ्ठी दिली होती ज्यात help असं लिहिलेलं आहे." सुयश सर ती चिठ्ठी सगळ्यांना दाखवत म्हणाले. 

"सर, त्यांना नक्की काय म्हणायचं असेल?" अभिषेक ने विचारलं. 

"बहुतेक त्यांना त्या हवेली च्या रहस्या बद्दल काहीतरी माहीत आहे.... मला सतत तिथे त्या मॅडम वर कोणीतरी नजर ठेवून आहे असंच वाटत होतं! त्या बोलताना जरी confident वाटल्या तरी नक्की काहीतरी वेगळं तिथे घडत होतं!" सुयश सरांनी व्यवस्थित सगळं सांगितलं. 

"सर, मला सुद्धा त्या सोनिया मॅडम वर संशय येत होता... त्या वैज्ञानिक असल्या तरी त्यांच्याकडे एवढा फंड आणि पॉवर दोन्ही नाहीये की त्या रिसर्च सेंटर सुरू करू शकतील..." नियती ने सांगितलं. 

"हं... आता समजतंय त्या बाकी लिलावात एकदम गप्प बसून होत्या... जणू त्यांच्यावर कोणीतरी प्रेशर देत होतं! त्यांचं सतत त्या वंशजांकडे बघून काहीतरी इशारे करणं सुद्धा विचित्र वाटत होतं! सोनाली, ईशा आणि मी जेवायला यायच्या आधी हेच बोलत होतो..." अभिषेक म्हणाला.

"ओके... आता बघूया नक्की काय ते... आता चार दिवस तरी त्यांचा करार होई पर्यंत आपल्या हातात आहेत! तीन दिवस बाकी प्रोसेस मध्ये जातील.... तोपर्यंत आपली ट्रेनिंग सुद्धा होऊन जाईल.... डॉ. विजय आणि नियती... या काळात तुमची साथ मोलाची असेल... यात तुम्ही दोघं आमची मदत करणार आहात..." सुयश सर म्हणाले. 

क्रमशः..... 
*************************
सोनिया ने help अशी चिठ्ठी का सुयश सरांना दिली असेल? नक्की काय झालं असेल? काय असेल त्या हवेलीचे रहस्य? पाहूया पुढच्या भागात.... तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय हे नक्की सांगा.... 

🎭 Series Post

View all