रहस्यमय हवेली (भाग -५)

Mystery of mansion.

रहस्यमय हवेली (भाग-५)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
प्रत्येक जण आता महाराणी कुसुमारंगिनि यांच्या सोबत काय घडलं होतं? अचानक त्यांचा मृत्यू झाला की खून केला गेला, हवेली चे असे कोणते रहस्य असेल जे सोडवणे एवढं गरजेचं आहे हे सर्व जाणून घ्यायला उत्सुक होता. 

"जसं म्युझियम मध्ये तुम्हाला सांगण्यात आलं असेल, महाराणी कुसुमारंगीनि यांनी जेव्हा तलवार खरेदी केली तेव्हा पासून काही ना काही विचित्र घटना घडत राहिल्या. त्यांनी डायरीत सांकेतिक भाषेत काहीतरी लिहून ठेवले ज्याने बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे...." नीलाक्षि देवी बोलत होती. 

"म्हणजे तुम्हाला माहिती आहे का त्या सांकेतिक भाषेचा अर्थ? काय घडलं होतं तेव्हा?" कुणाल ने विचारलं. 

"नाही! त्या सांकेतिक भाषेचा अर्थ माहीत असणाऱ्या मोजून पाच व्यक्ती होत्या! त्या त्यांच्या विश्वासू माणसांना या बद्दल काही सांगणार त्याच्या आधीच त्यांचा शिरच्छेद झाला होता.... ते अजूनही कोडेच आहे." निलाक्षि देवी म्हणाली. 

"त्यांचा शिरच्छेद महाराणींनी केला होता का?" कुणाल ने पुढचा प्रश्न केला. 

"त्या बद्दल काहीही कल्पना नाही आम्हाला. पण, आम्ही पिढ्यानुपिढ्या हेच ऐकत आलो आहोत, महाराणींनी तत्कालीन शस्त्रेखेड म्हणून प्रचलित असणाऱ्या दूरवर स्थित एका परराज्यातून तलवार खरेदी केली आणि या घटना घडायला सुरुवात झाली. असं सांगितलं जातं, राजगुरू सुद्धा  त्यावेळी ही तलवार खरेदी करण्याच्या विरोधात होते पण, व्हायचं तेच झालं! महाराणींनी तलवार खरेदी केलीच... प्रथेप्रमाणे तलवारीचे पूजन झाले आणि दोन दिवसात ती हवेलीत आली! तलवार हवेलीत आली काय आणि पूर्ण हवेलीच रहस्यमय झाली... अचानक खोल्यांची दिशा बदलू लागली, जिथे एक खोली होती तिथे दोन झाल्या आणि बरेच काही बदल होत गेले...." निलाक्षि देवी ने सांगितलं. 

"तुम्ही एवढं खात्रीने कसं सांगू शकता? ही अंधश्रद्धा असू शकते ना! एवढ्या दगडाने बनलेल्या हवेलीच्या खोल्यांची दिशा बदलेल कशी?" कुणाल ने प्रश्न विचारला. 

सगळ्यांमध्ये आता आश्चर्य होतं! कुणाल च्या बोलण्यात सुद्धा तथ्य होतं! एवढ्या मजबूत बनलेल्या हवेलीच्या खोल्यांची दिशा बदलली जाणं, खोल्यांची संख्या कमी जास्त होणं हे शक्य तरी कसं आहे... प्रत्येक जण आपापसात कुजबुजत होता.... नक्की या लोकांना हवेली विकायची आहे की नाही का प्रसिध्दी साठी मुद्दाम काहीही सांगतायत याची शंका आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. 

"एक एक मिनिट! अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायचा बाकी आहे.... तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील..." निलाक्षि देवी ने सगळ्यांना शांत केलं. 

आता सगळ्यांमधली कुजबुज थांबली होती आणि प्रत्येक जण निलाक्षि देवी पुढे काय सांगतेय याच्या कडे लक्ष देऊन होते.... 

निलाक्षि देवी ने बोलायला सुरुवात केली; "खरंतर शस्त्रेखेड हे महाराणींना शस्त्र साठा पुरवणारे नवीन राज्य होतं! या राज्याच्या ओळखी आधी आजूबाजूच्या काही राज्यातून महाराणी शस्त्र खरेदी करायच्या! एकदा महाराणी समुद्र सफरी वर असताना समुद्रात अचानक वादळ निर्माण झाल्याने चालकाचा जहाजावरचा ताबा सुटला! त्यात भरीस भर म्हणून समुद्रात भोवरा निर्माण झाल्याने जहाज त्यात अडकले आणि भरकटले गेले. सगळे तिथेच बेशुद्ध झाले होते... ही खबर दरबारात आली तेव्हा सगळे काळजीत पडले आणि महाराणींची शोध मोहीम सुरू झाली. १५ दिवस उलटून गेले तरी काहीही थांगपत्ता लागत नव्हता! सगळ्यांनी आता आशा सोडल्या होत्या. महाराणींचा ज्येष्ठ पुत्र त्यांच्या सोबतच असल्याने त्यांचा धाकटा पुत्र विरप्रसाद याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. राजगुरूंनी एक शुभ मुहूर्त शोधला आणि त्या दिवशी राज्याभिषेकाची घोषणा झाली. त्याच्या दोनच दिवसात शस्त्रेखेड मधून महाराणींचा संदेश आला त्या सुखरूप असल्याचा! सगळ्या राज्यात पुन्हा उत्साह साजरा झाला. राज्याभिषेक रद्द झाला आणि तयारी सुरू झाली महाराणींच्या स्वागताची. विरप्रसाद सुद्धा खूप खुश होता. राज्यापेक्षा आपली माणसं परत येतायत याचा आनंद त्याला जास्त होता. संदेश आल्याच्या १५ दिवसांनी महाराणी राज्यात परतल्या. सोबत शस्त्रेखेड चे वरिष्ठ प्रधान सुद्धा आले होते.... त्यांचं यथोचित स्वागत आणि आदर सत्कार करण्यात आला. त्या नंतर ही दोन्ही राज्ये घनिष्ट मित्र झाली. नावाप्रमाणे शस्त्रेखेड हे शस्त्र विकास करत! त्यांची शस्त्र इतर राज्यांच्या तुलनेत खूपच आधुनिक आणि भिन्न होती... त्यात महाराणींना शस्त्र खरेदी ची आवड होतीच! महाराणी पुन्हा राज्यात येण्याआधी तिथल्या राजाने त्यांना काही शस्त्र भेट दिली होती. त्या शस्त्रांचा वापर महाराणींनी एका युध्दात केला आणि अगदी सहज रित्या त्या यशस्वी झाल्या. असेच प्रसंग दोन ते तीन वेळा आले... या शस्त्रांची आधुनिकता त्यांना फारच भावली होती... म्हणून त्यांना कधी शस्त्र खरेदी करायचे झाले की त्या शस्त्रेखेड मधून खरेदी करत असत! दोन्ही राज्यांच्या मैत्रीला जवळ जवळ दहा ते बारा वर्ष झाली कधीही आपसात वाद विवाद झाले नाहीत! डोळे झाकून एक मेकांच्या राज्यावर विश्वास ठेवणारी ही दोनच राज्ये! सगळीकडे यांच्या मैत्रीचे दाखले दिले जायचे!  सगळं काही सुरळीत असताना अचानक त्या तलवारी चा प्रस्ताव समोर आला.... अगदी सुबक नक्षी, भक्कम पोलादी मुठ, तीक्ष्ण आणि धारदार पातं, एका वारात दोन तुकडे होतील एवढी धार आणि यात वेगळेपण म्हणजे ही तलवार अगदी अचूक फेकून सुद्धा मारता यायची, कधीही नेम न चुकणारी अशी! हे सर्व पाहून महाराणी या तलवारीच्या प्रेमातच पडल्या! त्यांनी लगेच ती तलवार विकत घेतली. यात राजगुरूंना काहीतरी काळंबेरं वाटलं होतं म्हणून त्यांनी महाराणींना पुन्हा विचार करायला सांगितलं होतं! पण, ती वेळच वाईट होती... सतत राज्यावर कुणी ना कुणी आक्रमण करायला सुरुवात झाली होती म्हणून राज्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव महाराणींनी राजगुरूंचं बोलणं जास्त मनावर न घेता ती तलवार घेतलीच!" 

"मॅडम! सॉरी मध्येच बोलतोय पण, तेव्हा राजगुरूंना यात काही काळंबेरं का वाटलं होतं?" कुणाल ने निलाक्षि देवी ला मध्येच थांबवत विचारलं. 

"असं म्हणतात की त्या काळात शस्त्रेखेड राज्याकडे ही एकच तलवार होती जी एवढी आधुनिक होती... त्यांच्या पिढीजात तलवारी मध्ये त्यांनी हे बदल केले होते आणि हे राजगुरूंना त्यांच्या गुप्तचर यंत्रणांकडून समजले होते... शिवाय तलवारीचा प्रस्ताव आला आणि त्यांनतर लगेच राज्यावर आक्रमणं होऊ लागली.... म्हणून त्यांना हे सगळं विचित्र वाटत होतं!" निलाक्षि देवी ने स्पष्टीकरण दिलं.

"ही तीच तलवार आहे का जी तुम्ही म्युझियम मधून परत हवेलीत घेऊन आलात?" कुणाल ने विचारलं.

"हो! खरंतर आम्हाला वाटलं होतं या नक्कीच अंधश्रद्धा असणार कारण आम्ही स्वतः हे हवेलीच्या खोल्या बदलणं वैगरे अनुभवलं नव्हतं! ती तलवार एवढी खास आहे म्हणून कोणी ती विकू नये किंवा तिचा वारसा जपला जावा म्हणून या गोष्टी रचल्या गेल्या आहेत असं आम्हाला वाटत होतं! म्हणून आम्ही स्वतः ती तलवार म्युझियम मध्ये ठेवण्याच्या वस्तूंमध्ये ठेवली होती.... पण, रणवीर यांना अचानक काहीतरी हवेलीत बदल व्हायला सुरुवात झाली आहे असा मेसेज आला... त्यांना काही कळतच नव्हतं! या सगळ्यांच्या अपरोक्ष आम्ही ती तलवार इथे आणली होती... जेव्हा सगळ्यांनी ती बघितली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं नक्की काय घडलं ते.... म्युझियम मध्ये जेव्हा आम्ही सगळे बोलायला बाजूला गेलो होतो तेव्हा रणवीर यांनी मेसेज दाखवला आणि आम्हाला आमची चूक समजली. ती तलवार घेऊन आम्ही पुन्हा हवेलीत आलो... ती तलवार जिथे होती तिथे ठेवली त्यांनतर सगळं सुरळीत झालं असं आम्हाला वाटलं पण तसं काही झालेलं नाही..." निलाक्षि देवी थोडी काळजीच्या स्वरात म्हणाली.

"म्हणजे? अजून काही घडलं आहे का?" कुणाल ने विचारलं. 

"हो! आम्ही सांगतो काय घडलं ते...." रणवीर म्हणाला. 

नक्की काय असेल आणि हे असं खरचं शक्य आहे का याचे तर्क प्रत्येकजण आपापल्या परीने लावत होता. इन्व्हेस्टर्स मध्ये सुद्धा आता हवेली घ्यायची की नाही याचा प्रश्न पडला होता! हवेली घेऊन कुणी तिथे रिसॉर्ट बांधणार होतं तर कुणी फाईव स्टार हॉटेल! पण, आता ही कहाणी जगासमोर लाईव्ह गेल्याने या सगळ्याला प्रतिसाद मिळेल का आणि आपण invest केलेला पैसा मिळेल का याची चिंता त्यांच्यात दिसत होती. 

"त्या रात्री हवेलीत आम्ही महाराणी कुसुमरंगिनी यांच्या आत्म्याला बघितलं! तलवार इथून म्युझियम मध्ये घेऊन गेल्या बद्दल त्या आम्हाला जाब विचारत होत्या!" रणवीर बोलत होता. 

"एक मिनिट! हा सगळा काय बालिश पणा चालू आहे.... तुम्हाला काय आम्ही सगळे लहान मुलं वाटलो का गोष्टी सांगायला? थांबवा हे सगळं!" इन्व्हेस्टर्स सोबत इतका वेळ गप्प बसलेली सोनिया म्हणाली.

"नाही मॅडम! आम्ही गोष्टी नाही सांगत... जे आहे ते सगळ्यांसमोर येणं महत्त्वाचं आहे... उद्या काही अघटीत घडलं तर आधी आम्हाला कल्पना दिली नव्हती असं कुणीही बोलायला नको... म्हणून, जे खरं आहे ते सांगणं आमचं कर्तव्य आहे!" रणवीर सोनिया ला समजावत म्हणाला. 

"हो ऐकलं आता तुमचं सगळं! तुमच्याकडे हे जे काही घडलं त्याचे काही पुरावे आहेत का? कोणत्या काळात जगताय तुम्ही?" मारिया पुढे म्हणाली. 

"नाही! काही पुरावे नाहीयेत! पण, सगळ्यांना सावध करणं हे आमचं कर्तव्य आहे! प्लीज मॅडम थोडं शांत रहा आणि आम्हाला आमचं काम करू द्या." रणवीर तिला समजावत म्हणाला. 

"मी अजून शांतच आहे! आणि राहिला प्रश्न तुमचं काम करण्याचा तर तुम्ही समाजात अंधश्रद्धा पसरवताय... एक जागरूक नागरिक आणि वैज्ञानिक या नात्याने मी तुम्हाला हे करू देणार नाही..." मारिया ने स्पष्ट सांगितलं. 

"एक मिनिट! मॅडम आम्ही तुमच्या मताचा आणि पदाचा आदर करतो... पण, काही गोष्टी या विज्ञानाच्या पलिकडे आहेत! प्लीज समजून घ्या." आता रणजित कुमार ने समजावण्याचा प्रयत्न केला. 

"बाकी कोणाचं माहीत नाही माझा तरी या सगळ्यांवर विश्वास नाही.... मला इथे एक रिसर्च सेंटर सुरू करायचं आहे.... त्यासाठी मी हवी ती किंमत मोजायला तयार आहे..." सोनिया म्हणाली. 

"आम्ही समजू शकतो! म्युझियम मध्ये जेव्हा आम्ही ही लिलावाची घोषणा केली तेव्हा बऱ्याच लोकांना या हवेलीत रस होता.... पण,  या हवेलीत बरीच रहस्य आहेत! तुम्ही ही हवेली विकू शकणार नाही, किंबहुना मीच विकली जाऊ देणार नाही... हे सुद्धा त्या दिवशी महाराणींच्या आत्म्याने सांगितलं. म्हणून आम्हाला आता तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. या हवेलीच्या बदलत्या खोल्या, ती सांकेतिक भाषा या सगळ्याचा उलगडा करायला आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे." रणजित कुमार म्हणाला. 

"ठीक आहे! मी जर यात तुमची मदत केली तर ही हवेली मीच घेणार! मग लिलाव रद्द करून ही संपूर्ण हवेली वीस कोटी मध्ये मी घेणार! किंमत कमी आहे.... पण, त्या बदल्यात या हवेली चे रहस्य मी उलगडून देणार आहे." सोनिया ने प्रस्ताव मांडला. 

सगळ्यांमध्ये कुजबुज सुरु झाली.... ही अशी रहस्यमय हवेली, ती शापित तलवार आणि अजून काय काय असेल देव जाणे त्यात हा सोनिया चा असा निर्णय! महाराणी च्या वंशजांनी आपसात काहीतरी चर्चा केली... एक मेकांशी विचार विनिमय करून झाल्यावर ते निर्णयावर आले. 

"ठीक आहे! तुम्ही म्हणताय तर आम्ही तुम्हाला संधी देतो... पण, त्या आधी एक करार होईल... त्यात जे काही घडेल त्याला सर्वस्वी तुम्ही स्वतः जबाबदार असाल आम्ही कशाची ही जबाबदारी घेणार नाही असं लिहिलेलं असेल.... मान्य असेल तर सांगा." रणजित कुमार ने त्या सगळ्यांचा निर्णय सांगितला. 

"मान्य! पण, माझी एक अट आहे... करार झाल्या नंतर रहस्य सोडवायला मला इथेच राहावं लागेल... याव्यतिरिक्त काही वस्तू ज्या आत्ता लिलावात विकल्या गेल्या आहेत त्यांची गरज भासली तर त्या माझ्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची..." सोनिया म्हणाली. 

"ठीक आहे... तेवढी मदत आम्ही नक्कीच करू शकतो..." रणजित कुमार ने सहमती दर्शवली.

क्रमशः.... 
************************
खरंच असं काय रहस्य असेल त्या हवेली मध्ये? करार झाल्या नंतर सोनिया हे रहस्य सोडवू शकेल का? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कळवा.... 

🎭 Series Post

View all