रहस्यमय हवेली (भाग -४)

Mystery of mansion.

रहस्यमय हवेली (भाग-४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सगळ्यांमध्ये आता कुजबुज सुरू झाली होती.... कधी एकदा कार्यक्रम सुरू होतो असं सगळ्यांना वाटत होतं!

"नमस्कार! तुमच्या सगळ्यांचं इथे मनापासून स्वागत.... जसं आम्ही म्युझियम मध्ये सांगितलं होतं, हवेली सोबत काही वस्तू लिलावात असतील... त्यानुसार आपण आधी त्या वस्तूंचा लिलाव करणार आहोत! मग शेवटी हवेलीच्या लिलावाचा कार्यक्रम!" रणजित कुमार म्हणाला.

सगळ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

"सर! काय काय वस्तू आहेत लिलावात?" कुणाल ने विचारलं.

"हो! हो! सगळं समजेल.... त्या वस्तू काय आहेत काय नाही ते आपण हवेलीच्या आत जाऊन बघणार आहोत. वस्तूंचा लिलाव तिथेच होईल त्यानिमित्त तुम्हा सर्वांना हवेली बघायला सुद्धा मिळेल म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. वस्तूंचा लिलाव झाला की, पुन्हा इथे येऊन हवेलीचा लिलाव करण्यात येईल." रणजित कुमार ने सांगितलं.

आता हवेली आतून सुद्धा बघता येणार म्हणून सगळे आनंदी झाले.

"नियती खरंच थँक्यू! तुझ्यामुळे आज एक ऐतिहासिक वास्तू बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा पाहता येणार आहे." ईशा तिच्या बाजूलाच बसलेल्या नियती ला म्हणाली.

"अरे त्यात काय! आता ही सगळी औपचारिकता राहुदे! मस्त सगळे एन्जॉय करूया..." नियती म्हणाली.

हवेली चे दार आता उघडण्यात येणार होते... रणजित कुमार आणि बाकी सदस्य त्याच्या मागे गेले... कासवाच्या आकाराचे कुलूप रणजित कुमार ने एका विशिष्ट पद्धतीने उघडले... कुलूप उघडल्यावर ते प्रशस्थ दार उघण्यात आले.... पत्रकारांचे लाईव्ह रिपोर्टिंग सुरूच होते... 

बाहेरून जशी नक्षी होती त्याप्रमाणे आतून सुद्धा पूर्ण नक्षी काम केलेलं होतं! आरश्या सारखे चमकणारे भले मोठे झुंबर, मऊ मऊ राजेशाही सोफे, गालिचे या सगळ्यांनी दिवाण सजले होते.... भिंतींवर सजलेले मोठ्या सुळांच्या हत्तीचे मस्तक, वाघाचे कातडे, ढाल आणि तलवारी, वाघ नखे हे सर्व महाराणींच्या शौर्याची चिन्ह दर्शवत होते... तिथेच सर्वांच्या बसण्याची व्यवस्था केली होती.... एक मोठे टेबल आणि त्यावर लाल मखमली कापड झाकलेले होते.... टेबलाच्या दोन्ही बाजूला सुरक्षारक्षक तैनात होते... त्याच्या बाजूलाच एक कुलूप असलेली पेटी ठेवलेली होती... फार पुरातन, नक्षीदार आणि सिंहाच्या तोंडासारखं कुलूप त्या पेटीला होतं! हे सर्व पाहत पाहत च सगळे स्थानापन्न झाले....

"कसली भारी आहे यार ही हवेली." निनाद म्हणाला.

"हो ना! आपलं सगळं घर मिळून इथली एक खोली होईल...." अभिषेक त्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला.

"चला तर मग! आता जास्त उत्सुकता न ताणता आम्ही तुम्हाला काय काय वस्तू लिलावात असतील हे दाखवतो..." रणजित कुमार म्हणाला.

सगळ्यांचे डोळे आता त्याच्यावर लागले होते... इतक्या पुरातन आणि ऐतिहासिक वस्तू म्हणजे त्याची किंमत सुद्धा तशीच असणार हे सगळे जाणून होते.... रणजित कुमार बाजूला असलेल्या टेबलाजवळ गेला आणि त्यावरचे लाल मखमली कापड बाजूला केले... काही पुरातन काळातल्या सोन्याच्या मोहरा, महाराणी कुसुमरंगिनी यांनी स्वतः तयार केलेले काही खास नकाशे, अवजारे आणि दागिने त्यावर ठेवलेले होते.

"कसले मस्त आहेत ना दागिने..." सोनाली म्हणाली.

"हो! मोहरा आणि अवजारे सुद्धा किती मस्त आहेत..." ईशा म्हणाली.

टेबलाच्या जवळ जाऊन पत्रकार त्या सगळ्या वस्तूंचं सुद्धा रिपोर्टिंग करू लागले.... सगळं शूटिंग झाल्यावर पत्रकार पुन्हा जागेवर येऊन बसले.

"सर! त्या बंद पेटीत काय आहे?" कुणाल ने विचारलं.

"खरंतर त्यात काय आहे हे आम्हाला सुध्दा माहीत नाहीये.... वर्षानुवर्ष ती पेटी उघडली च गेली नाहीये.... पण, आमच्या पूर्वजांच्या मते त्या पेटीत सुद्धा काहीतरी विशेष च आहे.... जी तो पेटी घेईल त्याच्या मालकीचं त्यातलं सामान होईल..." रणजित कुमार ने सांगितलं.

"सर! पण, त्यात काहीतरी खूपच मौल्यवान असेल तर? तुम्ही ही पेटी लिलावात का ठेवली?" कुणाल ने पुढचा प्रश्न केला.

"आम्ही आता तसंही इथे राहणार नाहीये... एवढ्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणं आता आम्हाला शक्य नाही... त्यापेक्षा इतिहास साक्षी असलेल्या सगळ्या वस्तू आम्ही लिलावात काढतोय." रणजित कुमार ने स्पष्टीकरण दिलं.

"चला आता आपण लिलावाला सुरुवात करुया..." नीलवंती देवी म्हणाली.

सगळे आता उत्सुक होते.... कोणती वस्तू पहिली लिलावात निघणार आणि त्याची पहिली बोली किती ची लागणार...

"सगळ्यात आधी आपण नकाशाची बोली लावणार आहोत! तुम्हाला हे साधे नकाशे वाटत असले तरी महाराणींनी आणीबाणीच्या परिस्थितीला पैसा अडका असावा म्हणून गुप्त धन लपवले होते... त्याचे हे नकाशे आहेत." लिलावासाठी आलेल्या वकिलाने (सूरज) सांगितले.

सगळ्यांमध्ये आता कुजबुज सुरू झाली... नकाशाची किंमत देऊन दडवलेले गुप्त धन मिळणार यामुळे सगळ्यांचे डोळे चमकले होते.

"तर! कोण लावणार याची पहिली बोली?" सूरज ने प्रश्न केला.

"८००० रुपये!" इन्व्हेस्टर च्या गर्दीतून राहुल ने पहिली बोली लावली.

"८५००" राहुलच्या पुढच्या खुर्चीत बसलेला अनुज म्हणाला.

"१००००" एका कोपऱ्यात बसलेला राज म्हणाला.

सामान्य लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली... एका नकाशाच्या तुकड्यासाठी एवढे पैसे! जर तिथे गुप्त धन नसेल च तर? अशी काहीशी कुजबुज सुरु होती...

"अजून कोण आहे का दहा हजार पेक्षा जास्त?" वकिलांनी विचारलं.

कोणीही काही बोलत नाही पाहून वकिलांनी बोलायला सुरुवात केली; "दहा हजार एक... दहा हजार दोन... दहा हजार तीन..." एवढं बोलून हातोडा मारला.

"अभिनंदन मिस्टर राज! नकाशा आता तुमच्या मालकीचा आहे..." वकिलांच्या मदतीला आलेली स्विटी म्हणाली आणि राज च्या हातात नकाशा दिला.

"चला! आता आपण त्या सोन्याच्या मोहरा लिलावात काढतोय... त्या बटव्यात एकूण १०० मोहरा आहेत! शुद्ध सोन्याच्या आणि पुरातन  मुद्रा असलेल्या." सूरज म्हणाले.

"३००००" राज ने पहिली बोली लावली.

"४५०००" राहुल म्हणाला.

"८००००" अनुज ने पुढची बोली लावली.

"एक लाख बारा हजार" इतक्यावेळ गप्प असलेली मारिया म्हणाली.

तिच्या पुढे कोणीच काही न बोलल्यामुळे मोहरा तिला मिळाल्या. त्यानंतर दागिने आणि हत्यारं सुद्धा विकले गेले.... आता ती पेटी लिलावात आली.... ज्यात काय आहे हे कोणालाच माहीत नाही...

"आता! आपण ही पेटी लिलावात काढतोय.... यात रिस्क मोठी असली तरी त्यातून जे काही निघेल ते तुम्ही भरलेल्या रकमेपेक्षा खूप मौल्यवान सुद्धा असू शकतं! सगळ्यांना ऑल द बेस्ट... बघूया आता ही पेटी कोणाच्या मालकीची होते...." स्विटी म्हणाली.

"३००००" राहुल ने सुरुवात केली.

"५००००" मारिया म्हणाली.

"७००००" अनुज म्हणाला.

आता पुढे कोण काही बोलतय का याची सगळे वाट पाहू लागले. कोणी काही बोलत नाही हे पाहून सूरज ने बोलायला सुरुवात केली; "७०००० एक, ७०००० दोन...."

एवढ्यात राज ने "९००००" ची बोली लावली.

ती पेटी राज च्या मालकीची झाली.

"अभिनंदन..... पेटी उघडाल तेव्हा आम्हाला सुद्धा सांगा हा त्यात काय होतं! आता दुपार झालीच आहे.... हवेलीच्या मागच्या बाजूला जेवणाची व्यवस्था आहे.... आपण पुन्हा १ तासाने इथे भेटू..." रणजित कुमार म्हणाला.

सगळ्यांमध्ये आता हवेली कोण घेईल याची उत्सुकता होतीच! तासा भरात आता तो निकाल सुध्दा लागणारच होता... त्याच उत्सुकतेने सगळे जेवायला गेले...

"ईशा, तू एक गोष्ट बघितली? त्या डाव्या कोपऱ्यात एक बाई बसली होती ती जरा विचित्र नाही वाटली का? निलांबरी देवी, निलवंती आणि निलाक्षी देवी या तिघी सुद्धा त्या बाई कडे बघून काहीतरी खाणा खुणा करत होत्या." सोनाली म्हणाली.

"हो पाहिलं मी... कदाचित ती बाई त्यांच्या ओळखीची असेल...." ईशा म्हणाली.

"नाही नाही... मला तसं वाटत नाहीये... ते बघा तिकडे... ती बाई सगळ्या इन्व्हेस्टरर्स सोबत आहे..." अभिषेक म्हणाला.

"काय चालू आहे तुमचं? सगळे चला आता जेवायला..." त्यांच्या पुढे गेलेला विक्रम ईशा, सोनाली आणि अभिषेक ला म्हणाला.

सगळे हो म्हणून तिथून गेले... एक छान जागा बघून सगळे एकत्र जेवायला बसले... सुयश सर आणि त्यांच्या टीम ला कुणाल ने आधीच बघितलं होतं! तो सुद्धा त्यांच्यात येऊन बसला.

"काय सर? आम्हाला तुमच्या प्रमोशन ची खबर कळली बरं का! तुमच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन!" कुणाल म्हणाला.

सगळे त्याला थँक्यू म्हणाले. जेवण करता करता कुणाल कडून बऱ्याच हवेलीच्या गोष्टी या सगळ्यांना समजल्या.

"चला सर! भेटू पुन्हा! आता मला ज्यांनी लिलावाच्या वस्तू घेतल्या आहेत त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत.... विशेषतः त्या पेटीत काय आहे ते बघायचं आहे...." कुणाल म्हणाला आणि त्याच्या कामासाठी गेला.

एव्हाना सगळ्यांची जेवणं झाली होती.... हळूहळू सगळे हवेलीच्या पुढच्या बाजूला येऊन आपापल्या जागी बसायला लागले होते... कुणाल ने सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि तो आता राज ला शोधत होता... एका कोपऱ्यात राज पेटी घेऊन बसलेला त्याला दिसला.

"सर! तुम्ही ही पेटी घेतलीत हा तुमचा निर्णय योग्य असेल का? तुम्ही ही पेटी कधी उघडणार आहात?" कुणाल ने विचारलं.

"हो! मला खात्री आहे मी हा योग्यच निर्णय घेतला आहे.... ही पेटी कशी उघडायची आहे हेच मी पाहतोय.... जसं मला समजेल तशी मी पेटी सगळ्यांसमोर च उघडेन.... मला सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे माझा निर्णय योग्य आहे ते..." राज म्हणाला.

"ओके सर!" कुणाल म्हणाला.

इतक्यात महाराणी चे सगळे वंशज आणि वकील आले.... त्यांना येताना पाहून सगळे तिथे येऊन बसले.

"चला तर मग! आता तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्षेची घडी संपली... आता तो क्षण आला आहे... हवेलीच्या लिलावाचा! पण, त्या आधी काही गोष्टी सांगायच्या आहेत.... नीलाक्षी देवी त्या तुम्हाला सांगतीलच..." रणजित कुमार म्हणाला.

आता काय सांगायचं असेल याची चर्चा सगळ्यांमध्ये सुरू झाली.

"तुम्हाला आठवतंय म्युझियम मध्ये आपल्याला सांगण्यात आलं होतं हवेलीच्या लिलावाच्या दिवशी बऱ्याच गोष्टी समोर येतील... त्या बद्दलच काहीतरी असावं असं वाटतंय..." नियती तिच्या बाजूलाच बसलेल्या डॉ. विजय, सोनाली आणि ईशा ला म्हणाली.

"हो असेल! बघूया..." ईशा म्हणाली.

नीलाक्षी देवी बोलण्यासाठी खुर्चीतून थोडी पुढे झुकली... सगळे आता एकदम कान देऊन ती काय बोलणार याकडे लक्ष देऊन होते... तिने बोलायला सुरुवात केली; "म्युझियम मध्ये तुम्हाला ठराविक काही गोष्टी समजल्याच असतील.... पण, अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आज समजतील... या हवेलीची काही रहस्य आहेत! ती सुद्धा जो कोणी सोडवेल त्याला एक खास भेट देण्यात येणार आहे...."

"म्हणजे? मॅडम तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? तुम्ही एकदा ही हवेली विकली की तुमचा यावर कसा हक्क राहिल?" कुणाल ने विचारलं.

"सांगते सगळं सांगते! जोवर रहस्य सुटणार नाही तोवर आम्ही agreement करणार नाही... हे सर्वांच्याच भल्याचं आहे..." नीलाक्षी देवी ने स्पष्टीकरण दिलं.

क्रमशः....
***********************
काय सांगायचं असेल नीलाक्षी देवीला? काय असेल रहस्य जे सोडवण इतकं गरजेचं आहे... त्या पेटीत काय असेल? पाहूया पुढच्या भागात.... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.

🎭 Series Post

View all