रहस्यमय हवेली (भाग -३)

The secret of mansion.

रहस्यमय हवेली (भाग-३)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
जी माहिती म्युझियम मध्ये मनीष आणि दीप ने दिली होती त्या व्यतिरिक्त अजून बरीच माहिती त्या पुस्तकात होती... लहान मुलं जशी खेळात रमून जातात आणि कशाचंच भान त्यांना राहत नाही अगदी तसंच सगळे पुस्तकात गढून गेले होते.... इतक्यात सुयश सर तिथे आले!

"जय हिंद सर!" सगळ्यांनी खुर्चीतून उठून सुयश सरांना सॅल्युट केला. 

"विक्रम जरा आत ये.." सुयश सर म्हणाले आणि केबिन मध्ये गेले.

त्यांच्या मागोमाग विक्रम सुद्धा केबिन मध्ये गेला. एरवी असं कधीच न वागणारे सर आज असे तडकाफडकी आत का निघून गेले याची सगळ्यांना काळजी वाटू लागली. पोलीस ठाण्यात एकच नीरव शांतता पसरली होती... नक्की काहीतरी सिरियस झालं असणार हे सगळ्यांना कळून चुकलं होतं! प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होतं पण, जोवर सुयश सर किंवा विक्रम बाहेर येत नाही तोवर काही समजणार सुद्धा नव्हतं! 

"या आधी सर असे वागले आहेत का?" ईशा ने हळूच सोनाली ला विचारलं. 

"नाही गं! नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार... म्हणून त्यांनी विक्रम सरांना बोलावलं असेल..." सोनाली म्हणाली. 

एवढ्यात सुयश सर आणि विक्रम बाहेर आले. दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी दिसत होती... सुयश सरांच्या हातात कसलीतरी पाकिटं होती. सगळे एकमेकांकडे बघत होते... 

थोडं खोकून सुयश सरांनी बोलायला सुरुवात केली; "तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल मी आल्या आल्या आत का गेलो आणि ही कसली पाकिटं माझ्या हातात आहेत...."

"हो सर! आमचं काही चुकलं आहे का? तुम्ही थोडे काळजीत सुद्धा वाटताय..." निनाद म्हणाला. 

"नाही कोणाचं काही चुकलं नाहीये... पण, कारण तसं काळजीचंच आहे! मी स्पष्टच सांगतो, आज माझी कमिशनर साहेबांसोबत मीटिंग झाली! त्यांना सगळे रिपोर्ट्स मी सुपूर्त केले... त्यांनी सगळ्यांचं खूप कौतुक सुद्धा केलं! पण, बीच्छु गँग ला पकडताना आपण काही नियम मोडले आहेत आणि म्हणूनच आता आपल्याला पोलीस म्हणून काम करता येणार नाही... त्याचंच हे लेटर आहे!" सुयश सरांनी सांगितलं.

सगळे एकदम काळजीत पडले... सगळीकडे बीच्छू गँग ला पकडून दिल्याबद्दल कौतुक होत असताना हे असं काही घडणं अनपेक्षित होतं! पुढे काय बोलावं कोणाला काही सुचत नव्हतं!  

"म्हणजे सर आता आपण पोलीस म्हणून कधीच काम नाही करू शकणार?" सोनाली ने धीर करून विचारलं.

"नाही! पण, सी.आय.डी. ऑफिसर म्हणून करू शकणार आहोत!" सुयश सर एकदम आनंदात म्हणाले.

एक मिनिट भर कोणाला काही समजलच नाही... सगळे स्तब्धच उभे होते...

"काय? खरं?" सोनाली ने पुन्हा विचारलं.

"हो! हो! आपल्या सगळ्या टीम च प्रमोशन झालं आहे.... आता आपण देशाची सेवा एक सी.आय.डी. ऑफिसर म्हणून करणार आहोत!" विक्रम म्हणाला. 

पोलीस स्टेशन मध्ये एकच उत्साह साजरा होत होता... सुयश सरांच्या सांगण्यावरून गणेश लगेच बाहेर सगळ्यांसाठी पेढे आणायला गेला. सगळे खूप आनंदी झाले होते.... आपल्या कष्टाचं चीज झालं याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता.... विक्रम ने सगळ्यांना लेटर्स दिले. 

"थांबा थांबा! गणेश ला येऊ दे... मग हे लेटर उघडा... अजून एक खास सरप्राइज आहे!" सुयश सर म्हणाले. 

सगळे आता विक्रम कडे बघत होते.... 

"एक एक मिनिट... मला फक्त आपलं प्रमोशन झालं हेच माहीत होतं! अजून आता सरांना काय सांगायचं आहे मला नाही माहित..." विक्रम ने आधीच सांगून टाकलं.

"हो! त्याला काहीही माहीत नाहीये.. गणेश ला येऊ दे सगळं कळेलच!" सुयश सर म्हणाले.

सगळ्यांचा उत्साह फार वाढलेला होता... काही वेळापूर्वी एकदम टेंशन असणारं वातावरण या बातमीने हलकं फुलकं झालं होतं! दोन च मिनिटात गणेश आला. गणेश ने पेढ्याचा पुडा सुयश सरांच्या हातात दिला. त्यांनी स्वतः सगळ्यांना पेढे दिले आणि बोलायला सुरुवात केली; "तर... अजून एक सरप्राइज म्हणजे येत्या २६ जानेवारी ला आपल्याला पुरस्कृत करण्यात येणार आहे...." 

आता पोलीस स्टेशन मध्ये सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं! सगळे मिळून हा आनंद साजरा करत होते.... सुयश सरांनी फोन करून डॉ. विजय आणि नियती ला सुद्धा तिथे बोलावून घेतलं... या दोघांची सुद्धा बिच्छु गँगला पकडायला तेवढीच मदत झाली होती म्हणून, टीम च सी.आय.डी. मध्ये प्रमोशन झालं असलं तरी फॉरेन्सिक च काम हेच दोघे बघणार होते! डॉ. विजय आणि नियती तिथे आल्यावर सुयश सरांनी सगळ्यांना पार्टी साठी म्हणून एका हॉटेल मध्ये जेवायला घेऊन गेले. तिथे गेल्यावर जेवण येई पर्यंत आज म्युझियम मध्ये काय काय घडलं याची सविस्तर माहिती सगळ्यांनी मिळून सुयश सरांना दिली. मस्त गप्पा मारत मारत जेवणं झाली. आज सगळ्यांनी सुयश सरांचं एक वेगळंच रूप अनुभवलं होतं! एरवी अतिशय कडक शिस्तीचे सर आज वेगळेच भासत होते... कामाच्या वेळी काम आणि तेव्हा शिस्त पाळली गेलीच पाहिजे हा सरांचा स्वभाव आज सगळ्यांनी अनुभवला. 

"चला आता निघुया.. उद्या पोलीस स्टेशन मध्येच या सगळ्यांनी! आपल्याला सगळे रिपोर्ट्स तयार करायचे आहेत आणि तीन ते चार दिवसात नवीन टीम येईल त्यांना आपलं काम हँड ओव्हर करून सगळं नीट समजावून त्या नंतर ४ दिवसांनी पुढच्या ट्रेनिंग ला आपल्याला जावं लागेल... एका आठवड्याच्या ट्रेनिंग नंतर आपण सगळे सी.आय.डी. ऑफिसर म्हणून मुंबई च्या सी.आय.डी. ब्यूरो मध्ये कामाला लागणार!" सुयश सरांनी सगळं समजावलं. 

"ओके सर!" निनाद म्हणाला. 

"सर, म्हणजे आपण हवेलीच्या लिलावाच्या दिवशी तिथे जाऊ शकतो... खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला तिथे बघायला मिळतील. जाऊया का आपण सगळे? मी लिलाव बघायला कूपन मिळवले आहेत!" नियती ने विचारलं.

"हो नक्कीच जाऊया..." सुयश सरांनी सुद्धा परवानगी दिली. 

"कसे मिळाले? तिथे तुझ्या ओळखीचं आहे का कोण?" सोनाली ने नियतीला विचारलं.

"नाही... आपल्याला तिथून जे पुस्तक मिळालं आहे त्याच्या मागे काही प्रश्न होते... त्याची उत्तरं मेल करायची होती... मी बरोबर उत्तरं मेल केली आणि मला कूपन मिळालं! एका कूपन मध्ये पाच जण जाऊ शकतात." नियती ने सांगितलं.

"आपण सगळे तर नऊ जण आहोत! सुशांत ला धरून दहा होतील..." ईशा ने तिची शंका बोलून दाखवली. 

"अगं मी बाबांच्या पुस्तकात सुद्धा प्रश्न होते त्याची उत्तरं त्यांच्या आय.डी. वरून मेल केली... त्यांना पण कूपन मिळालं आहे.. आपण जाऊ शकतो... आणि सुशांत येणार नाही... तो कामानिमित्त बाहेर गेला आहे." नियती ने सविस्तर सगळं सांगितलं. 

"अरे वा बरं झालं तू सगळं पुस्तक वाचलं म्हणून कळलं तरी असे कूपन मिळणार होते." सोनाली म्हणाली.

"माझ्या पुस्तकात नव्हते प्रश्न..." ईशा म्हणाली.

"अगं ते महाराणी कुसुमारंगिनी यांचं पुस्तक आहे.... शेवटचं पान मला जरा इतर पानांपेक्षा जाड वाटलं म्हणून ते मी यू. व्ही. लाईट मध्ये धरून बघितलं तर त्यात काहीतरी लिहिलेलं आहे असं मला दिसलं! मग, मी ते हलेच मधोमध फाडले  तर त्यात प्रश्न होते आणि एक वेबसाईट सुद्धा होती! त्यावर जाऊन याबद्दल माहिती घेतली तर हे कूपन च समजलं! मग लगेच सगळ्या प्रश्नाची उत्तरं मेल केली आणि कूपन मिळवलं...." नियती ने सगळं सांगितलं.

"ओके... बरं तुला लगेच सगळं सुचलं..." निनाद म्हणाला. 

"हो! महाराणींचं पुस्तक आणि त्यात काही वेगळेपण नाही असं होणार नाही याची मला खात्री होती!" नियती म्हणाली.

सगळे आनंदात आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी पासून जोमाने काम सुरू झालं! सगळे रिपोर्ट्स तयार करण्यात मग्न होते.... एखादी चोरी किंवा फवणुकीची तक्रार आलीच तर या कामासोबत त्यांनी या केस सुद्धा सोडवल्या. ईशा, सोनाली आणि अभिषेक च्या डोक्यात सतत हवेली, ती सांकेतिक भाषा आणि तलवार हे विचार असायचेच! काम करताना सुद्धा त्यांचं या विषयी बोलणं होतच असायचं! कधी एकदा हवेलीच्या लिलावाचा दिवस उजाडतो असं सगळ्यांना झालं होतं! असेच दोन दिवस संपले. नवीन टीम आली... सगळं हस्तांतर करून समजावून सांगेपर्यंत अजून दोन दिवस गेले.... आणि उजाडला तो त्यांच्या उत्सुकतेचा दिवस! हवेलीच्या लिलावाचा दिवस! 
**************************
हवेलीच्या बाहेर असणाऱ्या मोठ्या अंगणात लिलाव पार पडणार होता... एक स्टेज त्यावर सहा खुर्च्या, समोर टेबल, मिनरल पाण्याच्या बाटल्या, माईक ही सगळी व्यवस्था महाराणीच्या वंशज आणि वकील यांच्यासाठी केली होती. स्टेज समोर लिलावासाठी येणाऱ्या इन्व्हेस्टर, मीडिया आणि काही मोजके नागरिक ज्यांनी कूपन मिळवले होते त्यांच्यासाठी खुर्च्या मांडल्या होत्या. बरीच सिक्युरिटी तिथे केलेली होती... हळूहळू माणसं यायला सुरुवात झाली.. मीडिया वाले सगळ्यात आधी तिथे पोहोचले आणि तिथलं सगळं रिपोर्टिंग लाईव्ह प्रसारणाला सुरुवात झाली! 

"इथली सगळी तयारी तुम्ही बघू शकताय... थोड्याच वेळात आता लिलावाला सुरुवात होईल..." कुणाल ने रिपोर्टिंग सुरू केलं!

हळूहळू आता इन्व्हेस्टर्स  सुद्धा येऊ लागले... 

"सर सर तुम्हाला आजच्या या लिलावा बद्दल काय वाटतंय? कोण घेईल हवेली?" कुणाल ने एका इंवेस्टर ला विचारलं. 

"दुसऱ्या कोणाचं माहीत नाही पण, ही हवेली मीच घेणार.... सगळी तयारी च करून आलोय.." तो इन्वेस्टर एकदम जोशात म्हणाला. 

सगळेच अगदी त्याच उत्साहात होते... प्रत्येक इन्वेस्टर ला ती हवेली आपलीच व्हावी असं वाटत होतं! कुणाल ने पुन्हा बाकी रिपोर्टिंग करायला सुरुवात केली. 
*************************
सुयश सरांची टीम या कार्यक्रमासाठी यायला निघाले.... सगळ्यांनाच फार कुतूहल होतं त्या हवेली च! डोंगरात असणारी ती हवेली आज प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायची संधी मिळतेय म्हणून सगळे खुश होते... दोन गाड्या करून सगळे तिथे चालले होते... पहिल्या गाडीत सुयश सर, निनाद, अभिषेक आणि डॉ. विजय होते. दुसऱ्या गाडीत बाकी मंडळी! सगळे गप्पा मारता मारता हवेली च्या बाहेर आले... पार्किंग मध्ये गाडी पार्क करून सगळे आत गेले. कार्यक्रम सुरू व्हायला अजून १० मिनिटं होती... तोपर्यंत सगळ्यांनी बाहेरूनच हवेली बघितली. एखदी कॉलेज ची बिल्डिंग असावी एवढी मोठी ती हवेली त्या डोंगरात रुबाबात उभी होती.. हवेलीच्या भिंतींवर नक्षी कोरलेली होती, मोठं च्या मोठं प्रवेश द्वार! सहा फूट उंच माणूस सुद्धा तिथे बुटका वाटेल एवढं मोठं! दारावरची नक्षी सुद्धा लक्षवेधी होती.... जुन्या पद्धतीचं कासवासारखं कुलूप त्या दाराची शोभा अजूनच वाढवत होतं! 

"किती छान आहे ही हवेली... कारागिरांनी स्वतःचं केवढ कसब लावलं असेल ही बांधताना... खरचं! एकही तडा नाही की कुठे नक्षी खराब झालेली नाही..." सोनाली म्हणाली.

"हो! दार पण बघितलं किती मोठं आणि छान नक्षीदार आहे..." नियती म्हणाली. 

एवढ्यात महाराणी चे वंशज आणि वकील आले म्हणून सगळी टीम जागेवर येऊन बसली.

क्रमशः.... 
************************ 
आपल्या टीम च आता प्रमोशन झालं आहे... काही दिवसांच्या ट्रेनिंग नंतर सगळे सी.आय.डी. ऑफिसर म्हणून काम करतील... हवेलीच्या लिलावाला तर आपली टीम आली पण आता हा लिलाव शांततेत पार पडतो की आपल्या टीम ला वेगळचं काम लागतंय पाहूया पुढच्या भागात! तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा.  

🎭 Series Post

View all