रहस्यमय हवेली (भाग -२)

Mystery of the mansion.

रहस्यमय हवेली (भाग-२)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
इथे सगळ्यांच्या मनात नक्की काय घडलं आहे याचे प्रश्न होते.... तलवार का इथे ठेवत नाहीयेत याचा अंदाज जो तो त्याच्या - त्याच्या परीने लावत होता... 

"मॅडम! नक्की काय झालंय? रणजित कुमार ती तलवार घेऊन असे तडक का गेले?" पत्रकारांनी विचारलं. 

"काही नाही... ती तलवार चुकून इथे आणली गेली होती... ती तलवार हवेलीत च राहील... आणि हे पण सांगते जो ती हवेली विकत घेईल त्याच्याच मालकीची ती असेल." निलाक्षी देवी  म्हणाली. आणि सगळेच बाहेर पडले. 

"सर, हे असं काही घडणं जरा विचित्र नाही वाटत?" ईशा म्हणाली. 

"आपल्याला आता सगळं पारखायची सवय झाली आहे म्हणून असेल... जाऊदे... खरंच कोणीतरी चुकून या सामानात ती ठेवली असेल.." विक्रम म्हणाला. 

एव्हाना आता सगळं वातावरण नॉर्मल झालं होतं! महाराणी कुसुमारंगिनी चा इतिहास संगण्यासाठी जी माणसं ठेवली होती ती त्यांचं काम चोख करत होते.... म्युझिअम मध्ये ठेवलेली जी चित्र होती त्या मागची कहाणी, त्यावेळी कोणता प्रसंग घडला होता सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलं! त्यांची स्वतःची विशेष अशी एक डायरी सुद्धा होती! त्याची पानं जीर्ण झाली असली तरी त्याची कॉपी बनवून तिथे ठेवलेली होती.... 

"या डायरीत काय आहे?" नियती ने विचारलं. 

"हि त्यांची स्वतःची कायदे, नियम आणि ते मोडणाऱ्यांसाठी शिक्षा काय असेल हे लिहून ठेवण्याची डायरी आहे.... याची पानं जीर्ण झालीयेत.... हीच त्याची दुसरी कॉपी! प्रत्येक गुन्हा आणि त्याची शिक्षा यात आहे..." तिथे माहिती द्यायला उभा असलेला मनीष नियती ला त्याच्या हातातली दुसरी डायरी दाखवत म्हणाला. 

"बरं! मी बघू शकते का हि?" नियती ने विचारलं. 

मनीष ने त्याच्या देखरेखी खालीच नियतीच्या हातात ती डायरी दिली.... नियतीने पानं उघडायला सुरुवात केली.... 
"चोरी; ५ वर्ष कारावास आणि चोरी केलेल्या मालापेक्षा २०% अधिक रक्कम दंड.
फसवणूक; तेल लावलेल्या पाठीवर पोकळ बांबूचे फटके आणि नंतर त्यावर लाल तिखटाचा लेप.
खून; तलवारीने शीर धडापासून वेगळे..." असे बरेच कायदे, नियम त्यात होते...

"बापरे! एवढे कडक कायदे!" नियतीच्या बाजूलाच असलेली सोनाली म्हणाली. 

"हो! त्यांचे कायदे एवढे कडक होते म्हणूनच त्यांच्या राज्यात सगळं शांततेत आणि सुरक्षित होतं! जेवढे कडक कायदे होते तेवढीच मोकळीक पण होती... महाराणी सगळ्या चांगल्या कामांना पाठिंबा द्यायच्या स्वतः लक्ष घालून प्रत्येकाला सरळमार्गी लावायला मेहनत घ्यायच्या..." मनीष म्हणाला. 

"तुमच्या बोलण्यावरून तरी तुम्ही स्वतः अनुभवलं आहे असं वाटतंय..." निनाद म्हणाला.

"आमच्या सगळ्या पिढ्यांनी हे अनुभवलं आहे... गावातल्या सगळ्या सामान्य जनतेला त्यांनीच स्वतःच्या पायावर उभं केलं..." मनीष हसत म्हणाला. 

"हे काय लिहिलं आहे? म्हणजे कोणती भाषा आहे ही?" नियती ने मनीष ला डायरी दाखवत विचारलं. 

"सॉरी मॅडम! आम्हाला सुद्धा माहित नाही ही कोणती भाषा आहे.... महाराणींची हि गुप्त भाषा होती.. त्यांच्या मोजक्या काही विश्वासू माणसांना हि माहित होती... त्यांच्या शेवट शेवट च्या काळात त्यांनी हे लिहिलं आहे... असं ऐकलं आहे की त्या त्यांच्या जाण्याच्या चार दिवस आधी खूप काळजीत होत्या... कधी नव्हे ते त्यांनी बराच कडेकोट बंदोबस्त केला होता आणि या डायरीत काहीतरी लिहिलं.. चार दिवसांनी त्यांचा देहांत झाला आणि सगळं राज्य उध्वस्त व्हायला सुरुवात झाली.... कोणी म्हणायचं की शत्रू राज्यांनी त्यांचा खून केला, कोणी म्हणायचं त्यांनी जी दुसरी तलवार घेतली होती ती आधी पासूनच शापित होती... म्हणून त्या तलवारीने च त्यांचा खात्मा केला... खरं खोटं तर आता तो देव जाणे!" मनीष म्हणाला. 

"दुसरी तलवार म्हणजे? त्यांची खास तलवार तर आत्ता पुन्हा हवेलीत घेऊन गेले ना?" ईशा ने विचारलं. 

"हो... दुसरी तलवार म्हणजे अगदी त्या तलवारी सारखीच हुबेहूब होती... महाराणींना तलवार, कट्यार, वाघ नखं अशी शस्त्र खरेदी करायला आवडायची म्हणून त्यांनी ती तलवार घेतली होती... त्या नंतर काही विचित्र घटना सुद्धा राज्यात घडल्या आणि दीड ते दोन महिन्यांच्या आत हे सगळं झालं!" मनीष म्हणाला. 

"विचित्र घटना? नक्की काय झालं होतं तेव्हा?" सोनाली ने विचारलं. 

"ते काही आम्हाला सांगता येणार नाही... हवेलीच्या लिलावाच्या दिवशी बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल.... तिथे तुम्हाला काय ते कळेल.." मनीष ने सांगितलं. 

"बरं! चला आता पुढे बघूया..." विक्रम बराच वेळ एका ठिकाणी जातोय म्हणून म्हणाला. 

सगळे पुढे सरकले.... तिथे महाराणींची एक खास पेटी होती... त्यात दिशा दर्शक, काही जुने नकाशे, एक दुर्बीण असं काही सामान होतं! 

"महाराणी समुद्र प्रवास करताना हि पेटी सोबत घेऊन जायच्या... काही बेटं होती जी त्यांनी स्वतःच्या पराक्रमाने जिंकून घेतली आणि तिथे होणाऱ्या अन्यायाला संपवलं! त्यांचा स्वभाव खूप न्यायप्रिय होता... जेवढे त्यांचे मित्र होते त्या पेक्षा जास्त शत्रू! तरीही त्यांनी कधीही न डगमगता स्वतः सगळ्या मोहिमा हाती घेऊन त्या पूर्णत्वाला नेल्या." मनीष सोबत असलेला दुसरा सहकारी; दीप म्हणाला. 

"खरंच! किती कर्तृत्ववान होत्या महाराणी कुसुमारंगिनी..." नियती म्हणाली. 

"हो! महाराज केदारपंतांचे निधन झाले आणि तेव्हा स्वतःला सावरून त्यांनी प्रजेला सुद्धा सावरलं... फार कमी वयात त्यांनी हि जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली... त्या काळात एका स्त्री ने एवढं सगळं हाताळण सोपं काम नव्हतं त्यातून जर घरातलेच पाठीत खंजीर खुपसणारे असतील तर नक्कीच नाही... त्याही परिस्थितीत त्यांनी शून्यातून सगळं उभं केलं!" दीप अगदी व्यवस्थित सगळं सांगत होता. 

"तेव्हा नक्की काय घडलं होतं?" अभिषेक ने विचारलं. 

"हे बघा, हे जे पत्रक आहे त्यावर धोक्याने महाराणींची मोहर घेऊन त्यांच्या दरबारात काम करणाऱ्या वरिष्ठ प्रधानाने सगळं स्वतःच्या हाती घेतलं आणि तो नवीन राजा झाला." दीप ने त्या पेटीतून एक कागद काढला आणि त्या सर्वांना दाखवत म्हणाला. 

सगळं अगदी डोळ्यासमोर एखादी गोष्ट घडत आहे असंच वाटत होतं! आपल्या टीम बरोबरच तिथे उपस्थित बाकी लोक सुद्धा सगळ्या गोष्टी अगदी मन लावून ऐकत होते... दीप काही क्षण बोलायचा थांबला. सगळ्यांच्या नजरा आता तो पुढे काय सांगतो यावर होत्या... 

त्याने बोलायला सुरुवात केली; "या कागदावर काय लिहिलं आहे कदाचित तुम्हाला समजलं नसेल... मोडी लिपी मध्ये हे मजकूर आहेत! यानुसार, ज्या क्षणी महाराणींनी यावर त्यांची मोहर लावली त्या क्षणापासून त्यांनी त्यांचं पद, राजवाड्यातील स्थान सगळं काही गमावलं! एवढंच नाही तर त्यांचं स्त्री धन, जे पुढे जाऊन त्यांच्या सुनांना मिळणार होतं ते सुद्धा गेलं! पण, महाराणी अश्या हार मानणार नव्हत्या! त्यांनी बराच विरोध केला, त्यांचा स्वभाव माहित असल्याने बरीच लोकं सुद्धा त्यांच्या बाजूने होती... पण,..... जे व्हायचं तेच झालं! त्या धूर्त प्रधानाने सगळ्यांना त्याच्या पदाचा गैरवापर करून त्रास दिला आणि महाराणींवर खोटे देशद्रोहाचे आरोप लावून त्यांना त्यांच्याच राज्यातून हद्दपार केलं आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचे गुप्त आदेश सैनिकांना दिले." 

"पुढे? त्या कश्या वाचल्या यातून? महाराणींनी कसं सगळं परत मिळवलं?" गर्दीतल्या एका इसमाने दीप ला शांत झालेलं पाहून उत्सुकतेने विचारलं. 

"त्या सेनेचा सेनापती प्रतापसिंग यांना हे मान्य नव्हतं! त्यांनी गुप्त रित्या महाराणी कुसुमारंगिनी यांना याबद्दल सूचना दिली... एका रात्रीत सगळ्या हालचाली करून महाराणी त्यांच्या मुलांसह तिथून निसटल्या. त्या तिथून सुखरूप बाहेर पडल्या आहेत याची खात्री करून त्या जिथे थांबल्या होत्या तिथे सेनापती प्रतापसिंग यांनी हल्ला करण्याच्या सूचना दिल्या... हल्ला करून झाल्यावर सेनापतींनी स्वतः खात्री करून घेतल्याचे नाटक केले आणि सगळे पुन्हा परत आले.... दुसऱ्या दिवशी नवीन महाराज युवराज यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे सर्व झाले आहे असे सांगण्यात आले... तिथे महाराणी सुखरूप होत्या आणि इथे हा कपटी राजा मोठा पराक्रम केल्याच्या आविर्भावात!" दीप ने सगळा उलगडा केला. 

सगळे आपापसात चर्चा करू लागले. अगदी गोष्टीच्या पुस्तकात जसे असते तसे सर्वांना वाटत होते... सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुढे काय झालं असेल हेच भाव दिसत होते.. ते ओळखून दीप ने पुन्हा बोलायला सुरुवात केली; "तुमची उत्सुकता मला समजतेय... म्हणूनच आम्ही महारणींच्या पराक्रमाचे एक पुस्तक छापले आहे... इथून बाहेर पडल्यावर तुम्हा सर्वांना ते मिळेलच! त्यातून तुम्ही अजून सखोल अभ्यास करू शकता.."

सगळी माहिती सांगून झाल्यावर दीप आणि मनीष ने सर्वांना हवेलीचे काही फोटो दाखवले... महाराणींनी बनवलेले काही छुपे रस्ते, दारूगोळा साठवण्याची जागा असे बरेच फोटो आणि त्यांची माहिती सुद्धा दिली. सगळ्यांनी अगदी मन लावून सगळं ऐकलं आणि पाहिलं.... सगळा इतिहास समजल्यावर आवर्जून सर्वांनी पुस्तक घेतलं आणि आपापल्या वाटेने निघाले... विक्रम आणि इतर सहकारी सुद्धा पुन्हा पोलीस स्टेशन ला जायला निघाले. म्युझियम मधून निघे निघे पर्यंत संध्याकाळ झालीच होती... 
***************************
दुसरीकडे सुयश सरांची कमिशनर साहेबां सोबत मीटिंग सुरू झाली होती... 

"जय हिंद सर!" सुयश सर कमिशनर साहेबांच्या समोर येऊन म्हणाले. 

कमिशनर साहेबांनी सुद्धा त्यांना जय हिंद करून बसायला सांगितलं... 

"तर, सगळ्यात आधी तुमचं आणि तुमच्या टीम च मनापासून अभिनंदन! बिच्छु गँग सारख्या मोठ्या अपराध्यांना तुम्ही सर्वांनी मिळून गजाआड टाकलंत!" कमिशनर साहेब खुर्चीवरून थोडे पुढे झुकत स्मित करत म्हणाले.

"थँक्यू सर!" सुयश सर सुद्धा स्मित करत म्हणाले. 

"बरं आता आपण ज्या कामासाठी भेटलो आहोत ते सगळे रिपोर्ट्स द्या." कमिशनर सरांनी सांगितलं.

सुयश सरांनी लगेच सगळे रिपोर्ट्स त्यांच्या हवाली केले... कमिशनर सरांनी सगळी पडताळणी केल्यावर फाईल्स बाजूला ठेवल्या आणि थोडे सिरियस भाव चेहऱ्यावर आणत बोलायला सुरुवात केली; "आपले काही प्रोटोकॉल असतात! काही अटी नियम हे आपल्याला पाळावेच लागतात... तुमच्या टीम चे कर्तृत्व महान च आहे.... पण, आता तुम्हाला आणि तुमच्या टीम ला इथून पुढे पोलीस म्हणून काम करता येणार नाही."

"काय? सर, पण का? मान्य या मुळे काही नियम मोडले गेले पण, सगळं कायद्याच्या चौकटीत राहूनच झालंय..." सुयश सर काळजीत येऊन म्हणाले. 

"एक एक मिनिट! ही ऑर्डर वरून आलेली आहे.... ही घ्या ऑर्डर! हे वाचा तुम्हाला अंदाज येईलच." कमिशनर साहेब एक पाकीट सुयश सरांना देत म्हणाले. 
************************
इथे विक्रम आणि बाकी मंडळी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचली... सगळे आता सुयश सरांची वाट बघत होते.... त्यांच्यामुळे आज सगळे खूप एन्जॉय करून आलेले... म्युझियम मधल्या बऱ्याच गोष्टी त्यांना सरांना सांगायच्या होत्या. 

"आपल्याला हवेलीच्या लीलावा दिवशी सुट्टी मिळाली तर बरं होईल ना... हवेली प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता येईल." ईशा म्हणाली. 

"कठीण आहे! जर काही काम लागलं तर मिळणार नाही... आणि कोणीही सरांना यासाठी सुट्टी मागायची नाही. ते बोट दिल्यावर हात पकडल्या सारखं होतं!" विक्रम ने सगळ्यांना आधीच सांगून ठेवलं.

"हो सर! सॉरी." ईशा म्हणाली.

"अगं इट्स ओके... तिथे सगळ्या गोष्टी ऐकून, ते सगळे फोटो बघून असं वाटणं साहजिक आहे! पण,... यात सुद्धा एक मार्ग आहे... आपल्याला जर तिथेच सिक्युरिटी साठी ड्युटी मिळाली तर काम पण होईल आणि आपली इच्छा सुद्धा पूर्ण होईल." विक्रम म्हणाला.

"हम्म.. सरांना बराच वेळ लागला ना? काही सिरियस नसेल ना?" ईशा ने तिची काळजी बोलून दाखवली.

"नसेल... बघुया आता सर आल्यावर समजेलच. आपण तर्क लावून काहीही होणार नाही. त्यापेक्षा महाराणी कुसूमारंगिनी आणि हवेलीच्या बद्दल च पुस्तक आज मिळालं आहे ते वाचूया... अगदीच आपल्याला हवेली बघायला जाता नाही आलं तरी खूप माहिती मिळेल त्यातून." विक्रम म्हणाला. 

अजूनही काहीही काम नसल्यामुळे सगळे ते पुस्तक वाचू लागले. 

क्रमशः....
*************************
महाराणी कुसुमारंगीनी यांचा अजून काय इतिहास असेल? त्यांनी त्या डायरीत गुप्त भाषेत काय लिहिलेलं असेल? त्यात हवेलीची रहस्य असतील की अजून काही? आत्ता सुयश सरांना कोणती ऑर्डर मिळाली असेल? काय असेल त्यात? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.

🎭 Series Post

View all