रहस्यमय हवेली (भाग -२२)

Finding the mystery of the mansion. Colabration of loop hole and mysterious mansion.

रहस्यमय हवेली (भाग -२२)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथेच्या माध्यमातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. काही प्रसंग केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेले आहेत.)

मागील भागात आपण पाहिलं; केदार पूजेला बसला आहे. हवेली मध्ये असणारी गुप्त खोली आणि तो विशिष्ट खंजीर त्यांना सापडला आहे. तिकडे अगम्य आणि अभिज्ञा पुस्तकात गेले आहेत. आता पुढे...
**************************
केदार ची पूजा होतंच आली होती आणि आता त्याची सूर्यकांत च्या विश्वात जाण्याची वेळ जवळ आली होती. त्याने पूजा झाल्यावर तो खंजीर डोक्याला लावून त्याला नमस्कार केला. रणजित कुमार आणि सोनिया ला आता अंदाज आला होता तो आता त्या गुप्त खोलीतून जाणार... पण, केदार ने आधीच काही सूचना देऊन ठेवल्यामुळे दोघं गप्प होते. केदरची पूर्ण पूजा झाली आणि त्याने पुन्हा डोळे मिटून घेतले आणि नंतर त्या खोलीकडे जायला उठला. केदार उठला तशी सोनिया आणि रणजित कुमार सुद्धा उभे राहिले. सोनिया ने अंगठा उंचावून त्याला ऑल द बेस्ट केलं आणि डोळ्यांनीच त्याला सर्व ठीक होईल असं म्हणून स्मित केलं... तो सुद्धा फक्त स्मित करत त्या खोलीकडे जायला निघाला. आता सोनियाच्या मनात सतत धाकधूक होत होती. 

"नका काळजी करू... होईल सगळं नीट.. केदार ना खूप मोठ्या विद्या प्राप्त आहेत! काहीही होणार नाही." रणजित कुमार ने सोनिया ला धीर दिला. 

"हम्म! पण, काळजी तर वाटतेय... अभि आणि अगम्य सुद्धा तिकडे आहेत... सगळं नीट होऊ दे..." ती देवाला हात जोडून म्हणाली. 
**********************
तिकडे केदार त्या तडा गेलेल्या आरश्यातून काही मंत्र पुटपुटत आत गेला. काही क्षण त्याच्या डोळ्यासमोर एवढा तीव्र प्रकाश आला की त्याला काहीच दिसेनासे झाले! पण, त्या विश्वात जराही कानाडोळा करून चालणार नाही हे जाणून त्याने मनाच्या डोळ्यांनी सर्वत्र पाहायला सुरुवात केली. फार पूर्वीच्या काळ वाटत होता तो! अगदी राजे महाराजेंचा काळ! रस्त्यावर तैनात सैन्य, हत्ती, घोडे आणि घाबरून कावरी बावरी असलेली जनता! बाहेरचा प्रकाश आता निवळला आहे हे जाणून केदार ने डोळे उघडले आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळत तो चालत होता. 

"नवीन दिसताय इथं!" एक माणूस मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. 

केदार थोडा दचकला आणि पटकन मागे वळून पाहिलं. त्याच्या नजरेत खूप प्रश्न होते. या अश्या भयानक विश्वात हा माणूस कोण? त्यातूनही ज्या अर्थी याने मला हात लावला त्या अर्थी नक्कीच हा सूर्यकांत चा माणूस नाही. हे सगळं त्याच्या डोक्यात फिरत होतं. 

"तुम्ही इथून लवकर चला.. वाईट शक्तींनी तुम्हाला बघितलं तर पंचाईत होईल.. चला.." तो माणूस जवळ जवळ केदार ला ओढत म्हणाला. 

केदार त्या माणसाबरोबर तो नेईल तिकडे गेला. एका गुहेत ते दोघं आले होते. राज्याबाहेर असलेली ती गुहा होती. केदार आजू बाजूचा परिसर बघत होता. आत्ताच्या काळात हवेलीच्या आजूबाजूला जसा परिसर होता अगदी त्याच्याशी साधर्म्य असलेला तो वाटत होता. 

"तुम्ही महाराणी कुसुमारंगिनीं ना वाचवायला आला आहात ना?" ती व्यक्ती म्हणाली. 

"अं? तुम्ही..?" केदार गोंधळून म्हणाला. 

"मी या राज्याच्या राजगुरू! महाराणी तर काही वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाल्या. पण, इथे एका दुष्ट शक्तीने वर्चस्व प्रस्थापित केलं अन् त्यांचा आत्मा आता इथे त्या शक्तीच्या कैदेत आहे." ती व्यक्ती म्हणाली. 

"पण, तुम्हाला हे सगळं कसं माहीत? आणि तुम्ही मला कसे ओळखता?" केदार ने विचारलं. 

"मी या राज्याचा राजगुरू आहे. पिढ्यान् पिढ्या आम्ही फक्त नक्षत्र बघून भविष्यवाणी केली. त्या अभ्यासावरुन च मला हे ठावूक होतं नक्कीच या राज्यावर मोठं संकट येणार जे काहीही केल्या टाळता येणार नाही. तरीही मी माझ्या परीने हे टाळण्याचा प्रयत्न केला होता... पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं!  व्हायचं तेच झालं... महारणींनी त्या शस्त्रे खेड राज्यावर विश्वास ठेवला आणि तेव्हा पासून सगळी अधोगती सुरू झाली. याला भरीस भर म्हणून तो सूर्यकांत आला आणि सगळीकडे वाईट साम्राज्य पसरलं." ती व्यक्ती बोलत होती. 

केदार अगदी बारकाईने सर्व ऐकत होता. त्याला बाबांनी सांगितलच होतं; तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं आपोआप मिळतील... तेच सगळं आता घडत होतं... राजगुरू त्याला बरीच माहिती देऊ शकत होते ज्यामुळे त्याची लढाई सोपी होणार होती. म्हणूनच त्याच्या मनातली चलबिचल थोडी कमी झाली होती. अचानक त्याला एकदम शांत आणि प्रसन्न वाटत होतं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. 

"गुरुवर्य! तुम्हाला तर आता सर्व ज्ञात आहेच. आता तुम्हीच मार्ग दाखवा." केदार हात जोडून म्हणाला. 

"हो... तुझ्याकडे वेळ फार कमी आहे. सध्या तो सूर्यकांत दुसऱ्या ठिकाणी आहे. तोवर तुला हवेलीत जाऊन महाराणी कुसुमारंगीनी यांना मुक्त करायचं आहे." राजगुरू म्हणाले. 

"पण, त्या नेमक्या आहेत कशात? म्हणजे त्या सूर्यकांत च्या आत्म्याने त्यांना कशात बंधिस्त केलं आहे?" केदार ने विचारलं.

"सांगतो.. सगळं सांगतो... हवेली मध्ये एक सिंहासन आहे! त्या सिंहासना मध्येच महाराणी कुसुमारंगीनी यांचा आत्मा कैद आहे. सूर्यकांत चा आत्मा सतत त्या सिंहासनावर आरूढ असतो. तो तिथे असताना तुला काहीही करता करता येणार नाही... तू खंजीर सुद्धा सिद्ध करून आणला असशीलच! त्या खंजीराने जेव्हा तू ते सिंहासन फाडशील तेव्हा महाराणी मुक्त होतील आणि त्यांची शक्ती सूर्यकांत ला कमकुवत करायला मदत करेल." राजगुरू म्हणाले. 


"बरं... पण, मला एक कळत नाहीये की महाराणी कुसुमारंगीनी सूर्यकांत च्या जाळ्यात कश्या अडकल्या? आणि त्या शस्त्रे खेड चा नक्की संबंध काय आहे?" केदार ने त्याच्या डोक्यात जो गोंधळ सुरू होता तो बोलून दाखवला. 

"वेळ आल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. महाराणी मुक्त झाल्या की त्याच तुला सगळं सांगतील. काळजी करू नकोस..." राजगुरू म्हणाले. 

"बरं... तुमचा आशीर्वाद असुदे.. मी माझे पूर्ण प्रयत्न करेन." केदार त्यांना नमस्कार करत म्हणाला. 

"यशस्वी भव... आजवर कोणतीही वाईट शक्ती जास्त काळ तग धरू शकलेली नाही. ही सुद्धा तग धरू शकणार नाही. फक्त लक्षात ठेव सूर्यकांत आत्ता जरी तिथे नसला तरी तो एकावेळी दोन ठिकाणी राहू शकतो. त्याला भरकटवणं सोपं काम नाही." राजगुरू म्हणाले. 

"मी तुम्ही दिलेल्या सगळ्या सूचना तंतोतंत पाळेन! धन्यवाद आपण मला सहाय्य केलत! चला येतो.." केदार हात जोडून म्हणाला.

"ये... मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेव, यश तुझंच आहे." राजगुरू म्हणाले. 

केदार आता हवेलीच्या दिशेने निघाला. मनातून सतत त्याचा देवाचा धावा सुरू होताच! जस जशी हवेली जवळ येत होती त्याला तिथे असणाऱ्या वाईट शक्तींची जाणीव व्हायला लागली होती. थोड्या अंतरावरून त्याला हवेलीच्या बाहेर पहारा देणारे सैनिक दिसले. डोक्यावर भला मोठा बुक्याचा काळा भोर टिळा, अंगात काळी वस्त्रे आणि दिसायला सुद्धा एकदम क्रूर अशी सगळी माणसं होती. केदार ने नक्कीच हे सूर्यकांत चे सैन्य असणार हे जाणले होते. त्याला हवेलीत जर प्रवेश मिळवायचा तर आपण सुद्धा वाईट आहोत हे त्यांना दाखवून देणं भाग होतं. थोडा विचार करत केदार तिथेच उभा होता. त्याने मुद्दाम डोळ्यात बोट घालून डोळे लाल करून घेतले, खाली पडलेल्या टोकदार दगडाने हातावर थोडे ओरखडे ओढले आणि थोडे रक्त चेहऱ्याला लावून तो हवेलीच्या दाराजवळ गेला! 

"कोण आपण? काय हवंय आपल्याला?" द्वार पालांनी हातातले भाले दारासमोर धरून केदार ला अडवत विचारलं. 

"मला ओळखलं नाही... मला? मी कुविद्या प्रकांड पंडित, अघोरी विद्या माझ्या पायाशी लोळण घेतात एवढा महाशक्ती निर्जन बाबा!" केदार मोठ मोठ्याने क्रूर आवाज काढत म्हणाला. 

त्याचा एकंदरीत पेहराव आणि आवाजाची धार बघून त्या द्वार पालांना काहीही समजलं नाही आणि त्यांनी लगेच त्याला आत सोडलं. 

केदार हवेली बघत बघत आत गेला. आत्ता जशी आहे तशीच हवेली होती! थोडेफार बदल होते फक्त... बाकी जशीच्या तशीच! बाहेरच्या सैनिकांना जरी त्याने चकवा दिला असला तरी आत कोणी त्याला बघणार नाही याची काळजी तो घेत होता. लपून लपून सगळं बघता बघता तो एका खोली जवळ आला. आत्ताच्या हवेली मध्ये जिथे  ती आरश्याची गुप्त खोली होती तीच ही खोली! त्याने आजूबाजूला पाहिलं... खोलीच्या मध्यभागी एक लाल रंगाचं मऊ मऊ रेशमी गादीचं सिंहासन होतं! ते एवढं आकर्षक होतं की कोणीही ते बघून लगेच त्या सिंहासनाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला थांबवू शकणार नाही. एक प्रकारे संमोहन केल्यासारखे वातावरण त्या खोलीत तयार झाले होते. पण, केदार ला राजगुरू जे काही म्हणाले होते ते आठवलं आणि त्याच्या विद्यांमुळे त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. केदार तिथेच आड बाजूला लपून संपूर्ण खोली बघत होता. पूर्ण खोली बघून झाली तरी त्याला सूर्यकांत कुठेही दिसला नाही. 

"बहुदा तो अजून दुसऱ्या कथेत अडकला असेल.. हीच वेळ आहे सिंहासन फाडायची!" तो मनात म्हणाला. 

एक दीर्घ श्वास घेऊन आणि देवाचं नाव घेऊन तो त्या सिंहासनाच्या जवळ जाणार एवढ्यात त्याला तिथे सूर्यकांत दिसू लागला. तो पुन्हा लपून बसला. 

"लपू नकोस... ये... ये... समोर ये... मी तू हवेलीत आला तेव्हाच पाहिलं होतं... त्या अगम्य आणि त्याच्या बायकोची मदत करायला आलास खरा पण आता इथून तुम्ही तिघे सुद्धा जाऊ शकणार नाही... हा.. हा.. हा..." सूर्यकांत चा आत्मा जोर जोरात हसत बोलत होता. 

त्याचा आवाज ऐकुन केदार समोर गेला. त्याच्या हातात त्याने खंजीर घट्ट धरून ठेवला होता. 

"ए सूर्यकांत! गप... आजवर कधीही वाईट शक्ती जिंकल्या नाहीत आणि आत्ता सुद्धा जिंकणार नाहीत.... हिम्मत असेल तर सिंहासन सोड आणि लढ माझ्याशी..." केदार त्याला खिजवत म्हणाला. 

"कळेलच तुला कोणती शक्ती जिंकते ते..." सूर्यकांत म्हणाला आणि सिंहासन सोडून तो केदार जवळ येऊ लागला. 

केदार च्या शक्ती मुळे त्याच्या भोवती एक वलय तयार झालं होतं जे सूर्यकांत ला कधीही भेदता येणार नव्हतं. सूर्यकांत ने त्याच्यावर खूप वार केले पण सगळे फोल ठरत होते. केदार फक्त डोळे मिटून तिथे उभा होता. सूर्यकांत एकावेळी दोन ठिकाणी राहू शकतो याचा त्याने फायदा उचलला होता. त्यामुळे एक सूर्यकांत सिंहासनावर तर एक केदार सोबत झटापट करत होता. पण, केदार ने टेलेपथी वापरून अगम्य सोबत संवाद साधला. थोड्याच वेळात तिथे अगम्य आणि अभिज्ञा आले. केदार ने आधीच त्याला प्लॅन सांगितल्यामुळे आता सूर्यकांत ची पंचाईत झाली होती. 

"अगम्य! ते बघ ते दार आहे पुढच्या कथेत जाण्याचं... तू जा तिकडे...." केदार मुद्दाम ओरडून बोलला. 

त्याच्या आवाजाने सिंहासनावर बसलेला सूर्यकांत भानावर आला आणि अगम्य च्या मागे लागला. दुसऱ्या सूर्यकांत च केदार वरून लक्ष उडण्यासाठी अभिज्ञा सिंहासनाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. सूर्यकांत च लक्ष नाही हे पाहून केदार ने लगेच तो सिद्ध केलेला खंजीर डोक्याला लावला आणि नमस्कार केला! तसा तो खंजीर हवेत उडू लागला आणि प्रकाशाच्या वेगाने जाऊन सिंहासनावर छेद दिला. खंजिरचा छेद लागताच एक तीव्र प्रकाश त्यातून बाहेर आला आणि महाराणी कुसुमरंगिनि मुक्त झाल्या. हे पाहून आता सुरुकांत चा पारा आणखीन चढला. त्याला काही कळायच्या आत महाराणी कुसूमारंगिनीं नी त्याच्यावर हल्ला केला... त्यामुळे एका वेळी दोन ठिकाणी असण्याची क्षमता तो गमावून बसला. 

"अजूनही तुम्ही सगळे माझ्या विश्वात आहात लक्षात ठेवा! तुम्हाला कोणालाच मी इथून बाहेर पडू देणार नाही... हा.. हा.. हा..." तो मोठ मोठ्याने हसत म्हणाला आणि एका दाराजवळ पळू लागला. 

"लवकर जा... नाहीतर तो पुढच्या कथेत जाण्याचं दार बंद करून टाकेल..." महाराणी पटकन बोलल्या. 

त्यांचं ऐकुन अगम्य आणि अभिज्ञा पटापट पुढे जाऊ लागले. महाराणी कुसुमारंगीनीं नी केलेल्या वारामुळे तो थोडा कमजोर पडला होता... त्यामुळे त्याच्या आधीच अगम्य आणि अभिज्ञा पुढच्या कथेत गेले. 

"महाराणी! त्या दोघांना काही होणार नाही ना?" केदार ने हात जोडून विचारलं. 

"नाही.... त्या दोघांना काहीही होणार नाही. त्या सूर्यकांत ची शक्ती आता जवळ जवळ निम्मी झाली आहे. नको काळजी करुस...." त्या म्हणाल्या. 

"बरं.... महाराणी तुम्ही इथे कश्या अडकलात? नक्की काय झालं होतं तेव्हा?" केदार ने विचारलं. 

"शस्त्रे खेड! त्या राज्याच्या राजाला संमोहन विद्या प्राप्त होती. त्यानेच आम्हाला संमोहित करून शापित शस्त्रे दिली आणि नंतर हा सूर्यकांत आला. सगळीकडे वाईट साम्राज्य पसरलं होतं त्यामुळे वाईट शक्तींना जास्त बळ मिळत होतं.... पण, आता तसं काही नाही होणार.... आता चांगल्या शक्ती वाढत चालल्या आहेत... त्या सूर्यकांत च्या पापांचा घडा आता भरला आहे." त्या म्हणाल्या. 

केदार सगळं शांतपणे ऐकत होता. एवढ्यात तिथे राजगुरू आले. 

"तू तुझं काम चोख केलंस.... आता तुला इथे जास्त काळ थांबता येणार नाही... तू तुझ्या विश्वात जाण्यासाठी आता मोकळा आहेस." ते आरश्याकडे बोट दाखवत म्हणाले. 

केदार ने दोघांना नमस्कार केला आणि आरश्यातुन पुन्हा आजच्या काळात आला. तिथे रणजित कुमार आणि सोनिया काळजीत बसलेले होतेच. इथे आल्या आल्या त्याला थोडा श्वास घ्यायला त्रास झाला पण डॉक्टरांनी लगेच उपचार केले. 

"तू ठीक आहेस ना केदार? काही त्रास होतोय का अजून? आणि अभि, अगम्य? ते ठीक आहेत ना तिकडे?" सोनिया डोळे पुसत म्हणाली. 

"हो.. मी ठीक आहे... सूर्यकांत आता खूप दुबळा झाला आहे... अगम्य आणि अभिज्ञा सुद्धा थोड्याच वेळात त्यांचं मिशन संपवून येतील... मग सूर्यकांत चा कायमचा बंदोबस्त होईल." केदार म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून सोनिया ला जरा धीर आला. त्याला थोडावेळ आराम करायला लावून तिने त्याच्यासाठी भाताची पेज बनवली. त्याचं खाऊन झाल्यावर तो म्हणाला; "चल सोनिया! आपल्याला आता अगम्य च्या घरी जायचं आहे. ते दोघं तिकडून परते पर्यंत आपण जाऊ तिथे." 

सोनिया "हो" म्हणाली आणि घरी जाऊन मोनिका ला अर्धवट झोपेतून उठवून तिघे कॅब बुक करून श्रीरंगपुर ला जायला निघाले.  

समाप्त. 
***************************
केदार ने तर त्याचं मिशन पूर्ण केलं... पण, अभि आणि अगम्य सुखरूप बाहेर येतील का? त्यांना काही त्रास तर होणार नाही ना? सूर्यकांत ची शक्ती पुन्हा वाढणार तर नाही ना? जाणून घेण्यासाठी वाचत राहा लूप होल पर्व दोन. 

दोन कथांचा संगम करण्याचा हा पहिलाच प्रयत्न! या दोन्ही कथा तुम्हाला कश्या वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. 

🎭 Series Post

View all