रहस्यमय हवेली (भाग -२१)

Finding the mystery of the mansion. Collaboration with loop hole. Detective story.

रहस्यमय हवेली (भाग -२१)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथेच्या माध्यमातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. काही प्रसंग केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेले आहेत.)

मागील भागात आपण पाहिलं; केदार, रणजित कुमार आणि सोनिया त्या खंजिराच्या शोधात आहेत. तो खंजीर जोवर मिळत नाही तोवर नक्की तेच हत्यार आहे का हे सुद्धा समजत नाहीये. रणजित कुमार ने लिलावात लिलाव केलेले जुने नकाशे मागवले आहेत. आता पुढे.
************************
ते सगळे जण फोटो बघायला सुरुवात करणार एवढ्यात रणजित कुमार ने मागवलेले नकाशे आले. 

"चला बरं झालं... लवकर मिळाले नकाशे..." केदार म्हणाला. 

सगळे जण ते पाहू लागले. सगळ्यात जुने तीन नकाशे होते ते! पूर्णपणे जीर्ण झालेले कागद! पण, तरीही हाताळता येतील एवढे व्यवस्थित!, थोडी पुसट अक्षरं! पण, भिंगाने दिसत होती. तिघांनी मिळून नवीन नकाशे आणि जुने नकाशे एकत्र बघायला सुरुवात केली. 

"हे बघा! हा रस्ता... जो सगळ्यात मोठा आहे तिथे आपल्याला काहीही विशेष दिसलं नव्हतं! पण, या जुन्या नकाशा नुसार नक्की इथे एक गुप्त खोली आहे. आता ती आपल्याला शोधावी लागेल." सोनिया नकाशा दाखवत म्हणाली. 

"हम्म! मला वाटतंय ती खूपच काळजी घेऊन बांधली गेली असणार जेणेकरून सहजा सहजी दिसू नये. महाराणींच्या डायरीत काही सापडतं आहे का बघूया..." केदार म्हणाला. 

सोनिया ने तयार करून आणलेली कॉपी सगळे बघत होते. त्यात काही चित्र होती जी त्या तिघांनी फोटो काढून आणलेल्या भिंतीच्या चित्रासारखी होती. त्याचा नक्कीच काहीतरी त्या गुप्त खोलीशी संबंध होता. 

"हे बघा, आपण जे फोटो काढून आणले आहेत ते आणि ही चित्र यात खूप साम्य आहे. मला वाटतंय यात काहीतरी संकेत आहे जो आपण शोधला तर ती गुप्त खोली आपल्या समोर येईल." रणजित कुमार म्हणाला. 

सगळ्या रस्त्यांमध्ये जी चित्र होती ती सगळी एकत्र पाहिल्यावर जणू एक नकाशाच त्यामधून तयार होत होता. 

"मला वाटतंय आपण पुन्हा त्या रस्त्याने जाऊ.. तिकडे गेल्यावर काहीतरी समजेलच ते दार कसं उघडायचं.... त्यात आता ३:३० वाजून गेले आहेत. आपल्याला लवकरात लवकर पूजा करायला सुरुवात करायची आहे." केदार म्हणाला. 

सगळे पुन्हा त्या मोठ्या रस्त्याने गेले. यावेळी त्यांच्या सोबत ती डायरी, नकाशे आणि काही केमिकल्स सुद्धा होती. साधारण पाच ते सात मिनिटं चालल्यावर त्या रस्त्याचा शेवट आला. 

"सोनिया! बघ इथे काही आहे का..." केदार ने तिला सांगितलं. 

तिने लगेच नकाशा, सगळ्या चित्रांचे फोटो आणि डायरी बघितली. त्या डायरीत जसं एक चित्र होतं अगदी तशीच भिंत त्यांच्यासमोर होती. पण, त्या डायरीत त्या भिंतीवर एक धातूचा पत्रा होता जो इथे दिसत नव्हता. सोनिया ने तिच्या बरोबर मेटल डिटेक्टर सुद्धा आणलं होतंच! लगेच तिने त्या भिंतीची तपासणी केली. एका कोपऱ्यात मेटल डिटेक्टर ने साईन दिली. लगेच तिथली धूळ साफ करून सोनिया ने तिकडे काय आहे पाहिलं.. तर तिकडेच धातूचा पत्रा होता! त्यावर काहीही नव्हतं... तिने स्वच्छ तो घासुन साफ केला. 

"हे बघा, या नकाशा आणि डायरी वरून हेच समजतंय की इथे कोणतं तरी चित्र बसवायचं आहे. चित्राचा तुकडा या डायरी मधून मिळेल.. पण, नक्की कोणतं चित्र इथे येईल याचा विचार करावा लागेल.." सोनिया; केदार आणि रणजित कुमार ला तो पत्रा आणि डायरी दाखवून म्हणाली. 

"मला वाटतंय इथे हे चित्र येईल..." केदार एका चित्रावर बोट ठेवून म्हणाला. 

"आम्हाला सुद्धा तेच वाटतंय... कारण, बाकीच्या सगळ्या चित्रांमध्ये महाराणी एकट्या आहेत. पण, हे एकच चित्र शस्त्रे खेड च्या महाराजांबरोबर आहे." रणजित कुमार ने सुद्धा केदार ला सहमती दर्शवली. 

"हम्म.. आणि आपण शस्त्रे खेड बद्दल खूप काही ऐकुन पण आहोत.. हे चित्र इथे लावून बघते." सोनिया म्हणाली.

लगेचच तिने ते चित्र त्या पत्र्यावर लावले. बराचवेळ काहीही झाले नाही पाहून केदार ने त्याच भिंतीवर जोरात हात आपटला तर तो पत्रा आत दाबला गेला आणि एक गुप्त दार समोर आले. अचानक असा बदल झाल्यामुळे आधी सगळे चक्रावले. हळूहळू स्वतःला सावरत तिघे आत गेले. खूप मोठी खोली, पूर्णपणे जाळ्या आणि धुळीने माखलेली, कुबट वास आणि स्वतःचीच बोटं डोळ्यात घातली तरी दिसणार नाही एवढा अंधार! सगळ्यांनी लगेच टॉर्च चालू केल्या. त्यांना वाटली होती त्यापेक्षा खूप मोठी खोली पाहून सगळे चकित झाले. कारण, त्या एवढ्या मोठ्या खोलीत फक्त एक तडा गेलेला आरसा होता. 

"म्हणजे इथे सुद्धा?" केदार हताश होत म्हणाला. 

"मिळेल काहीतरी... चल आत जाऊन बघूया.. इथे धुळीची अक्षरशः चादर आहे. त्याखाली काही असेल तरी समजणार नाही.. चल आत जाऊन बघू.." सोनिया म्हणाली. 

तिघे आत गेले. पायात चप्पल असून सुद्धा त्या धुळीची जाणिव पायाला होत होती. सगळ्यांनी तोंडाला रुमाल बांधून घेतला होता. हळूहळू चालत ते त्या आरश्या जवळ गेले. केदार ने तो आरसा हळूच खाली काढला आणि अचानक डोळे मिटले. साधारण दोन मिनिटं तो तसाच स्तब्ध होता. 

"काय रे! तुला इथे जीव घुसमटतोय का?" सोनिया ने त्याला असं पाहून काळजीने विचारलं. 

"अगं काही नाही.. सांगतो नंतर आत्ता नाही.. तुम्ही दोघं इथेच थांबा मी लगेच येतो." केदार तिला खांद्याला धरून म्हणाला. आणि तो लगेच जरा पुढे गेला. 

तिथे गेल्यावर एका विशिष्ट अंतरापर्यंत पावलं मोजत तो चालला आणि तिथली धूळ साफ करून एक खाली पडलेलं हत्यार उचललं आणि पुन्हा रणजित कुमार आणि सोनिया कडे आला. 

"हे काय.." रणजित कुमार बोलत होता पण त्याला मध्येच अडवत केदार ने फक्त गप्प बसण्याची खूण केली आणि तो आरसा तिथेच ठेवून ते हत्यार घेऊन तिघे बाहेर आले. 

"केदार! आता तरी सांगशील का नक्की काय झालं? आणि हे काय घेऊन आला आहेस तू?" सोनिया ने विचारलं. 

"अगं आपण आत होतो तेव्हा मला बाबांनी संपर्क केला! त्यांच्या आज्ञेनुसार मी वागलो. तो जो तडा गेलेला आरसा आहे त्यातून मला उद्या त्या सूर्यकांत च्या विश्वात जायचं आहे. तिथे मी काहीही बोललो नाही म्हणजे त्याला आपल्याला सावध करायचं नव्हतं आणि याचं म्हणशील तर हेच ते आपलं हत्यार! हाच खंजीर आपण शोधत होतो. आता ४ वाजून गेले आहेत! अगम्य आणि अभिज्ञा त्या पुस्तकात दुपारीच गेले असतील. आपल्याला सुद्धा आता पूजेची तयारी करायला घ्यायला हवी. हा खंजीर सिद्ध करता करता मला अगम्य ला सुद्धा मनोबल पुरवाव लागणार आहे. आधीच आता त्याची तब्येत नरम गरम असते... त्याला काहीही होऊ द्यायचं नाहीये..." केदार म्हणाला. 

जास्त काही बोलत बसायला आता वेळच नव्हता. पटपट सगळी पूजेची मांडणी करून केदार पूजेला बसला. त्याच्या मदतीसाठी म्हणून सोनिया आणि रणजित कुमार तिथेच बसले होते. पूजा सुरू करण्याआधी केदार ने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागला; "सोनिया! मी आता जे सांगतोय ते शांतपणे ऐक! अजिबात घाबरु नकोस.. अभिज्ञा आणि अगम्य त्यांच्या कामाला लागले आहेत. तू डॉक्टरांना फोन करून ठेव. ते विश्व आणि आपलं विश्व वेगळं आहे म्हणून फक्त एक सावधानता म्हणून एक डॉक्टर इथे असावेत. देव न करो मी तिकडून आल्यावर जर काही त्रास झालच तर म्हणून.. दुसरी गोष्ट म्हणजे बाबा अगम्य च्या घरी आहेत. काही गरज पडलीच तर ते मला संपर्क करतीलच! आता शस्त्र सिद्ध करायला जरा वेळ आहे... मी आता एकदा पूजेला बसलो की मला काहीही बोलता येणार नाही. शस्त्र सिद्ध झालं की लगेच मला त्या विश्वात जायचं आहे. तेव्हा सुद्धा मला काही बोलता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही दोघं माझ्या मागे तिकडे येणार नाही." 

"ओके.. तू आता बस पूजेला. तू जे काही सांगितलं आहेस ते मी तंतोतंत पाळते." सोनिया त्याच्या हातावर हात ठेवून त्याला आश्वस्थ करत म्हणाली. 

केदारने पूजेला सुरुवात केली. सोनिया ने बाहेर जाऊन लगेच एका डॉक्टरांना फोन करून तिथे बोलवून ठेवलं. हे नक्कीच खूप मोठं काम आहे त्यातून नक्की तिथे काय होणार याची माहिती सुद्धा नव्हती! त्या काळजीत ती पुन्हा आत जाऊन बसली. तिथे केदार ची पूजा सुरूच होती. त्याच्या मस्तकातून विशिष्ट लहरी निघत होत्या ज्या स्पष्ट दिसत होत्या. थोड्याच वेळात त्याचं अगम्य ला मनोबल देण्यासाठीची पूजा झाली आणि आता शस्त्र सिद्ध करण्यासाठी त्याची पूजा सुरू झाली. 

क्रमशः...
*************************
केदार ला आता त्या विश्वात जाण्यासाठी कुठून जायचं याचा मार्ग सुद्धा सापडला आहे आणि खंजीर सुद्धा! पुढे आता काय होईल? केदार हे सगळं सांभाळून घेईल का? अगम्य आणि अभि सुखरूप येतील ना बाहेर? जाणून घेण्यासाठी वाचत राहा लूप होल पर्व दोन आणि रहस्यमय हवेली.

🎭 Series Post

View all