Login

रहस्यमय हवेली (भाग -२०)

Finding the mystery of the mansion. Collaboration of the loop hole and mysterious mansion. Detective story.

रहस्यमय हवेली (भाग -२०)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथेच्या माध्यमातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. काही प्रसंग केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेले आहेत.)

मागील भागात आपण पाहिलं; केदार ने रणजित कुमार ला तोही हवेली चा वंशज आहे हे पटवून दिलं आहे. आता त्याला महाराणी कुमारांगिनी यांच्या आत्म्याला सूर्यकांत च्या ताब्यातून सोडवण्यासाठी एक पूजा करायची आहे. आता पुढे...
****************************
हे सगळं कल्पने पलीकडचं घडत असल्यामुळे हे स्वप्न तर नाही ना अशीच भावना रणजित कुमार च्या मनात तयार झाली होती. थोडा वेळ असाच शांत गेला. 

"मला कळतंय हे सगळं अचानक समोर आल्यामुळे तुम्ही पार गोंधळून गेला आहात. हे आत्मा, आपल्या महाराणी कुसूमारंगिनि यांची मुक्ती हे सगळं पचवायला अवघड आहे पण, विश्वास ठेवा! ही पूजा, त्या सूर्यकांत च्या विश्वात जाणं भाग आहे. काही गोष्टी या विज्ञानापलिकडच्या असतात!" केदार ने त्याला समजावलं. 

"ते आहेच! मी पूर्ण मदत करायला तयार आहे. तुम्ही आमचे धाकले बंधू! जी काही मदत लागेल ती निःसंकोचपणे सांगा." रणजित कुमार दीर्घ श्वास घेऊन म्हणाला. 

सोनिया आणि केदार आता निश्चिंत झाले होते. गोपाळ काकांना पूजेच्या साहित्याची यादी देऊन केदार, सोनिया आणि रणजित कुमार बाकी तयारी ला लागले. 

"केदार! मला एक सांगा, आपल्या महाराणी कुसूमारंगीनि यांना मुक्त करायला नक्की काय करावं लागणार आहे?" रणजित कुमार ने विचारलं. 

"त्याचं उत्तर आपलं आपल्याला शोधायचं आहे. यासाठी त्या तिकडे कश्या अडकल्या असतील, त्यांची कोणती इच्छा अपूर्ण राहिली होती का हे सगळं पडताळून पहावं लागेल आणि मला खात्री आहे त्याचं उत्तर या हवेली मध्येच आहे!" केदार चहू बाजूला नजर फिरवून म्हणाला.

"म्हणजे? आता इतके वर्ष झाली आहेत महाराणी जाऊन! कसं समजणार आपल्याला?" सोनिया म्हणाली. 

"समजेल... इथे खूप गुप्त रस्ते आहेत, खोल्या आहेत! त्यात काही ना काही मिळेलच. शिवाय महारणींची डायरी सुद्धा आहे. त्यातून येतील काही गोष्टी समोर... आपल्याला उद्या पासून पूजा करायची आहे... त्याआधी याचा शोध घेणं गरजेचं आहे." केदार म्हणाला. 

"आम्ही काय म्हणतो, तुम्हाला तर बऱ्याच विद्या येतात... त्याचा वापर करून तुमच्या गुरुंशी संपर्क करून याबद्दल विचारलं तर?" रणजित कुमार म्हणाला. 

"बाबांनीच सांगितलं आहे! प्रत्येक वेळी असा विद्येचा वापर करता येणार नाही. हा मनुष्य जन्म आहे. थोड्या अडचणींचा सामना हा करायलाच हवा! पण, त्यांनी एक क्लू सुद्धा दिला आहे. एक हत्यार आपल्याला शोधायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे." केदार म्हणाला. 

"हत्यार?" सोनिया म्हणाली. 

"तलवार तर नाही ना?" रणजित कुमार ने विचारलं. 

"तेच आपल्याला शोधायचं आहे. उद्या पुजे मध्ये ते आपल्याला सिद्ध करून घ्यायचं आहे. ते कोणतं हत्यार असेल याचं उत्तर सुद्धा आपल्याला आपोआप समजेल. चला, लागुया कामाला!" केदार म्हणाला. 

"एक मिनिट! आमच्याकडे महाराणींची डायरी आहे.. ती आम्ही घेऊन येतो... त्यातून त्यांच्या प्रिय वस्तू, छंद हे सगळं समजेल... आपलं काम सोपं होईल..." रणजित कुमार म्हणाला आणि ती डायरी आणायला गेला. 

केदार आणि सोनिया तिथेच बसले होते. लगेचच रणजित कुमार ती डायरी घेऊन आला. केदार ती नीट पाहत होता... त्या डायरीत जास्तीत जास्त हत्यारांविषयी माहिती होती. कोणत्या काळात ती खरेदी केली होती किंवा भेट म्हणून मिळाली होती याच्या सगळ्या नोंदी त्यात होत्या. सोनिया ने सुद्धा ती डायरी बघितली. 

"ही वेगळी डायरी आहे का? कारण, म्युझियम मध्ये होती ती वेगळी डायरी होती बहुतेक!" ती म्हणाली. 

"हो! म्युझियम मध्ये महाराणींच्या समुद्र प्रवासाची, त्यांच्या शौऱ्याची डायरी आहे. ही त्यांची खास डायरी आम्ही तिथे दिली नव्हती. यात त्यांनी कोणा कोणाशी व्यवहार केले होते, कोणत्या राज्यांशी काय काय करार झाले होते याची माहिती असणारी डायरी आहे. शिवाय पुढे पुढे त्यांचे छंद आणि त्यांच्या आवडीनिवडी आहेत यात म्हणून मग ही डायरी कायम सोबत ठेवण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला होता." रणजित कुमार म्हणाला. 

"पण, यात तलवारीचा काहीही उल्लेख नाहीये.. मला नाही वाटत आपण जे हत्यार शोधतोय ते तलवार आहे! नक्कीच काहीतरी वेगळं असणार..." केदार सगळी डायरी वरच्या वर चाळून म्हणाला. 

आता तलवार नाही तर दुसरं कोणतं हत्यार असेल याचा सगळे विचार करत होते. सोबतच ती डायरी अजून बारकाईने पाहत होते. 

"एक एक मिनिट केदार! जरा ते मागचं पान काढ..." सोनिया त्याला मध्येच अडवत म्हणाली. 

केदार ने आधीचं पान काढलं! त्यावर काहीतरी नक्षी होती... पण, नीट काही दिसत नव्हतं! 

"काय झालं? सगळ्याच डायरीत काही ना काही आकृत्या, नक्षी आहेत... तू याच पानावर का थांबवलं?" केदार ने गोंधळून विचारलं. 

"अरे! हे बघ... इथे खूप पुसट दिसत असलं तरी शस्त्रेखेड चा उल्लेख आहे आणि पूर्वी पासून आपण हेच ऐकत आलो आहोत की त्या राज्यातून जी हत्यारं आली ती शापित होती याचा काहीतरी संबंध असेल असं वाटतंय मला." सोनिया म्हणाली. 

"ओके.. तू हे काय लिहिलं आहे हे शोधू शकतेस का? म्हणजे आपल्याला हे काय आहे समजेल." केदार ने विचारलं. 

"हो.. मी लगेच यावर काय लिहिलं आहे बघते. भाऊजी, अजूनही ती प्रयोगाची खोली आहे तिकडे?" सोनिया ने रणजित कुमार ला विचारलं. 

त्याने हो म्हणताच ती डायरी घेऊन त्या खोलीत गेली. थोड्याच वेळात तिने दुसऱ्या कागदांवर त्यावर जे लिहिलं होतं याची प्रत काढून आणली. 

"हे बघ... हे आपण बघितलेल्या पानाची प्रत आहे. आणि बाकी सुद्धा डायरीची कॉपी मी केली आहे." सोनिया केदार च्या हातात ते देत म्हणाली.

केदार ने त्या सगळ्या कॉपी घेतल्या आणि बघू लागला. जिथे शस्त्रेखेड चा उल्लेख होता त्या पानावर एका खंजिराची आकृती होती. विशिष्ट नक्षी, तलवारी सारखे पाते अशी वेगळ्याच पद्धतीची त्याची ठेवण होती. 

"हा खंजीर आहे का इथे? वेगळाच वाटतोय जरा.. मला आता हेच आपलं शस्त्र असेल असं खूप वाटतंय..." केदार रणजित कुमार ला त्या खंजीराची आकृती दाखवत म्हणाला. 

"खरंतर आम्ही सुद्धा एक विशेष खंजीर आहे असं ऐकलं होतं आणि त्याचा शोध घेत होतो पण, आजवर कुठेही आम्ही तसा खंजीर पहिला नाहीये." रणजित कुमार म्हणाला. 

"ओके! मला वाटतंय आपण शोध घेणं सुरू करुया... तसंही आपल्याला गुप्त दार कुठे असेल याचा सुद्धा अंदाज घ्यायचा आहेच! या शोधतात आपल्याला खंजीर सुद्धा सापडेलच." केदार म्हणाला. 

रणजित कुमार लगेच पूर्ण हवेली चा नकाशा घेऊन आला. पूर्वी पासूनचे सगळे नकाशे सुद्धा त्यात होते. तिघे नकाशे बघत होते. 

"हे बघा, हवेली मध्ये जवळ जवळ १० गुप्त रस्ते आहेत. यातून आपण जाऊन बघूया. यात नक्की कोणत्यातरी रस्त्यातून गुप्त खोली सुद्धा असेल ज्यात आपल्याला खंजीर मिळेल." रणजित कुमार सगळ्यांना नकाशा दाखवत म्हणाला. 

"नाही.. मला वाटतंय हे एवढेच रस्ते नसणार. तुम्ही लीलवात जे नकाशे काढले होते त्याच्या अजून कॉपी आहेत का? किंवा ते मागवून घेऊ शकता का?" सोनिया ने विचारलं.

"कॉपी तर नाहीयेत. पण थोड्याच वेळात मी ते मागवून घेतो." रणजित कुमार म्हणाला आणि कोणालातरी फोन केला. 

साधारण दुपारी चार पर्यंत ते नकाशे मिळणार होते. तोवर जे गुप्त रस्ते आहेत त्यात शोध घेण्याचं ठरलं. तिघे तीन वेगळ्या रस्त्यांनी गेले. 

सोनिया ज्या रस्त्याने गेली होती त्या रस्त्यांच्या भिंतीवर बरीच चित्र होती. तिने त्याचे फोटो काढून घेतले. तिथे कोणतीही खोली किंवा पेट्या नव्हत्याच! रणजित कुमार आणि केदार ला सुद्धा काहीही सापडलं नाही. त्यांनी सुद्धा भिंतीवरच्या आकृत्यांचे फोटो काढून घेतले होते. दुसऱ्या रस्त्यांमध्ये सुद्धा तेच झालं! आता फक्त एक शेवटचा रस्ता बाकी होता जो सगळ्यात मोठा होता. 

"हा रस्ता सगळ्यात मोठा आहे. इथे कधीच कोणी आलं नाही. त्यामुळे इथे नक्की काय असेल याचा काहीही अंदाज नाहीये." रणजित कुमार म्हणाला. 

तिघे एकत्रच आता त्या मार्गाने गेले. तिथे सुद्धा भिंतीवर चित्र होतीच! थोडं आत गेल्यावर तिथे काही पेट्या होत्या. पण, त्यात फक्त फार जुन्या काळातली नाणी आणि माणके होते. अजून आत गेल्यावर काही उंची वस्त्र होती पण, एवढ्या वर्षांनी त्यांना धस लागला होता. पार तुकडे तुकडे झाले होते. सगळे पुन्हा बाहेर आले. 

"आपल्याला अजूनही तो खंजीर मिळाला नाहीये. तो खंजीर जोवर मिळत नाही तोवर आपण काहीही करू शकत नाहीये." केदार थोडा हताश होत म्हणाला. 

"मिळेल! आपण आत्ता जे काही फोटो काढून आणले आहेत ते सुद्धा बघून घेऊ... कदाचित त्यातून काही क्लू मिळाला तर?" सोनिया म्हणाली. 

क्रमशः....
***************************
खंजीर शोधायचा हा निर्णय बरोबर असेल का? केदार काय करणार आहे नक्की? महाराणी कुसुमारंगिनी यांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल? अगम्य लूप होल मध्ये कधी जाईल? हे सगळं जाणून घेण्यासाठी वाचत राहा लूप होल पर्व दोन आणि रहस्यमय हवेली.

🎭 Series Post

View all