रहस्यमय हवेली (भाग -१)

Mystery of mansion.

रहस्यमय हवेली (भाग-१)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
आज पोलीस स्टेशन मधलं वातावरण जरा हलकं फुलकं होतं! सगळे निवांत बसले होते.... गणेश काही फाईल्स नीट लावत होता, कोणी असंच मोबाईल घेऊन बसलं होतं आणि सोबत गप्पा सुद्धा चालल्या होत्या...

"गेले काही दिवस किती छान वाटतंय ना... म्हणजे जरा शांतता आहे ना... बघा ना, आपण बिच्छु गँग ला पकडल्या नंतर कोणत्याही तक्रारी आल्या नाहीयेत! कुठेही चोरी, खून काही नाही...." ईशा म्हणाली. 

"हो ते तर आहेच! पण, आपल्या कामाचा काही भरोसा नाही.... कधी कोणाच्या डोक्यात काय येईल आणि आपल्याला काम लागेल सांगता येत नाही...." विक्रम म्हणाला. 

एवढ्यात सुयश सर आले.... सगळे छान गप्पा मारत बसले होते... त्यांचं लक्ष सरांकडे गेल्यावर सगळे उभे राहिले आणि सॅल्यूट केला.

"काय कसली एवढी चर्चा रंगली आहे?" सुयश सरांनी विचारलं. 

"काही नाही सर, ईशा म्हणत होती बिच्छु गँग ला पकडल्या पासून जरा शहरात शांतता आहे... तेच बोलत होतो..." अभिषेक म्हणाला. 

"बरं... चालू दे तुमचं... माझी कमिशनर साहेबांसोबत संध्याकाळी मीटिंग आहे... बिच्छु गँग चे सगळे रिपोर्ट्स द्यायचेत त्याची तयारी करतो मी..." सुयश सर म्हणाले. 

ते पुढे केबिन कडे जायला लागले पण पुन्हा माघारी फिरले... 

"अरे हा... एक संगायचंच राहिलं, हे म्युझिअम चे पास... जा सगळे जण छान फिरून या... तसंही इथे काही काम नाहीये..." सुयश सर म्हणाले. 

"सर पण तुम्ही इथे काम करणार आणि आम्ही तिथे मजा करायची... नको सर... आपण नंतर जाऊ सगळे एकत्र..." विक्रम म्हणाला. 

"अरे तसं काही नाही... आत्ता खरंच तुम्ही सगळे जावा... आज पासून नियती सुद्धा लॅब जॉईन करणार होती तिला आणि डॉ. विजय ना पण घेऊन जा... त्यांना जरा सावरायला मदत होईल... मी तिथे असेन तर उगाच सगळ्यांना दडपण येईल कोणी एन्जॉय करू शकणार नाही.... जावा तुम्ही..." सुयश सर म्हणाले.

सुयश सर आता काही ऐकणार नाहीत हे जाणून विक्रम आणि बाकी सगळे तयार झाले... सगळ्यांची स्वारी आता लॅब कडे वळली.... लॅब मध्ये डॉ. विजय पुस्तकं घेऊन कसला तरी अभ्यास करत होते आणि नियती कसल्यातरी फाईल चाळत बसली होती..... 

"गुड मॉर्निंग सर! गुड मॉर्निंग नियती!" सोनाली म्हणाली. 

डॉ. विजय आणि नियती ने सुद्धा सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं. 

"सर, हे काय कसली परीक्षा देताय का? एवढा कसला अभ्यास सुरू आहे?" अभिषेक ने विचारलं. 

"नाही, कसली परीक्षा देत नाहीये... पण, विज्ञानात जेवढं शिकावं तेवढं कमी असतं! रोज नवीन नवीन काही ना काही येत राहतं! मग त्या बदला प्रमाणे आपण सुद्धा अपडेटेड राहायला नको का? त्याचाच अभ्यास चालला आहे...." डॉ. विजय म्हणाले. 

"बापरे एवढं जाडं पुस्तक! कॉलेज मध्ये असताना मी तर अश्या जाडजूड पुस्तकांपासून चार हात लांबच राहायचो... आणि आता तर संबंधनच येत नाही पुस्तकांशी!" निनाद डॉ. विजयंच्या समोरचं पुस्तक बघत म्हणाला. 

"हो म्हणूनच ते डॉक्टर आहेत तू नाही..." अभिषेक म्हणाला. 

त्याच्या या बोलण्याने सगळे हसले... थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या... त्यावरून डॉ. विजय आणि नियती आता सावरले आहेत हे लक्षात आलं होतं! 

"तुम्ही सगळे एकदम इथे? कोणती केस सुरु आहे का?" नियती ने विचारलं. 

"अगं नाही... सध्या कोणतीच केस नाहीये बघ... आम्ही तुम्हाला दोघांना आमच्या बरोबर घेऊन जायला आलो आहोत..." सोनाली म्हणाली. 

"कुठे जायचंय? आणि मग सुयश सर कुठे आहेत?" डॉ. विजय नी विचारलं. 

"सुयश सरांनी म्युझिअम चे पास दिलेत... आपण सगळे तिथेच जातोय... सरांची मीटिंग आहे त्यामुळे ते आले नाहीत..." विक्रम ने सगळं सांगितलं. 

"ओके... जाऊया... आज लॅब मध्ये पण काही काम नाहीये..." डॉ. विजय म्हणाले. 

सगळे लॅब मधून निघाले.... लॅब च्या बाहेर असणाऱ्या सिक्युरिटी गार्ड ला सगळ्या सूचना करून नीट लॉक लावून नियती सुद्धा आली... सगळे एकाच मोठ्या गाडीतून चालले होते.... अभिषेक ड्राइविंग करत होता, त्याच्या बाजूला विक्रम बसला होता, मागच्या सीट वर नियती, सोनाली आणि ईशा... आणि त्या मागच्या सीट वर डॉ. विजय आणि गणेश बसले होते... मस्त गप्पा मारत मारत नियतीला थोडं चिडवत त्यांचा प्रवास सुरु होता... 

"अरे एक विचरायचंच राहिलं! आपण कोणत्या म्युसिझम मध्ये चाललोय?" नियती ने विचारलं. 

"हे तू आता विषय बदलायला विचरतेयस ना..." ईशा म्हणाली. 

"अगं नाही... खरंच! त्या जुन्या पेंटिंग्स आणि राजे - महाराजेंच्या वस्तू संग्रहित केलेल्या आहेत तिथे चाललोय का? आज म्हणे तिथे एका खूप जुन्या महाराणी ची पेंटिंग आणि त्या काळातल्या काही वस्तू आणणार आहेत... आपल्याला ते सुद्धा बघायला मिळेल मग..." नियती म्हणाली. 

"हो! आपण तिथेच चाललोय.... आपल्याला हे सगळं बघता यावं आणि जे काही घडलं त्यातून जरा दुसरीकडे लक्ष जावं म्हणूनच कदाचित सुयश सरांनी हे पास दिलेत!" विक्रम म्हणाला. 

"नियती, तुला कसं गं माहित एवढं त्या पेंटिंग आणि वस्तुंबद्दल..." निनाद ने विचारलं. 

"मला ना या सगळ्याची आधी पासूनच आवड आहे.... आता आज आपण जातोय तिथे महाराणी कुसुमारंगिनी यांच्या काही वस्तू आणि पेंटिंग येणार आहेत.... असं म्हणतात त्यांनी त्यांच्या काळात खूप काही कमावलं.... त्यांच्या कारकिर्दीत कोणीही त्यांचे नियम मोडण्याचा प्रयत्न केला नव्हता! जर कोणी कायद्याच्या विरोधात गेलं तर त्यांची एक खास तलवार होती त्या स्वतः त्या माणसाची मान धडापासून वेगळी करायच्या..... त्यांचं राज्य खूप दूरवर पसरलं होतं! अजूनही त्यांची हवेली 'कुसुम' दूर डोंगरात आहे.... त्यांच्या सगळ्या पिढ्या तिथेच राहिल्या आणि अजूनही राहतात...." नियती म्हणाली. 

"तू तर पूर्ण अभ्यास केलायस की महाराणी कुसुमारंगिनी चा!" निनाद म्हणाला. 

"पण, मला एक कळत नाहीये, जर त्यांची हवेली आहे आणि त्यांचा वंशज सुद्धा तर ते लोक सगळं म्युझिअम मध्ये ठेवायला का देतायत?" अभिषेक ने विचारलं. 

"अरे असं ऐकण्यात आलंय की, ते सगळे ती हवेली सुद्धा लिलाव करून विकणार आहेत! त्यांना आता भारतात राहायचं नाहीये ते सगळे आपापल्या कामानिमित्त वेगवेगळ्या देशात जाणार आहेत! आणि त्यांचं एवढं मोठं घराणं आहे, त्याची कारकीर्द दूर दूर पर्यंत लोकांना कळावी म्हणून काही सामान म्युसिझम मध्ये ठेवणार आहेत!" नियती ने सगळं सांगितलं. 

"चला आता आपण म्युझिअम मध्ये पोहोचलो आहे.... आता अजून माहिती आत गेल्यावर कळेल..." विक्रम म्हणाला. 

सगळे गाडीतून उतरले.... म्युझिअम च्या बाहेर बरीच गर्दी जमली होती.... पत्रकार, अँटिक्स डिपार्टमेंट चे लोक, सामान्य जनता अशी बरीच गर्दी होती.... महाराणी कुसुमारंगिनी च्या पेंटिंग आणि खास वस्तूंची गाडी अजून यायची होती म्हणून सगळे प्रवेश द्वाराशी वाट पाहत उभे होते.... त्यांचे वंशज स्वतः येणार म्हणून त्यांच्या स्वागताची तयारी म्युझिअम तर्फे करण्यात आली होती.... ते लोक आल्यावर आधी म्युझिअम चा स्टाफ सगळ्या वस्तू आत प्रदर्शनासाठी ठेवणार होते आणि मगच बाकी सगळ्यांसाठी दार उघडण्यात येणार होतं! सगळा कार्यक्रम ठरला होता.... वस्तूंची मांडणी झाल्यावर म्युझिअम च्या पहिल्या माळ्यावर असणाऱ्या हॉल मध्ये महाराणींचे वंशज त्या बद्दल थोडक्यात बोलणार होते आणि तेव्हाच हवेलीच्या लिलावाची तारीख जाहीर करणार होते.... सगळ्यांची आपापसात कुजबुज सुरु होती.... जे मोठ मोठे इन्व्हेस्टर्स होते त्यांचं हवेली विषयी बोलणं सुरु होतं! 

"कितीही करोडो मध्ये असली ना ती हवेली तरी मीच घेणार ती... तुम्ही फक्त बघत रहा..." त्यातला एक इन्व्हेस्टर म्हणाला. 

"ते तर लिलावाच्या दिवशी समजेल... कोण होतंय त्या आलिशान आणि इतिहास सोबत असलेल्या हवेलीचा मालक..." दुसरा म्हणाला. 

तिसरा इन्व्हेस्टर फक्त त्या दोघांचं बोलणं ऐकत होता.... तो सुद्धा काही बोलणार एवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला.... सगळ्यांचं लक्ष आता तिथे लागलं.... एकामागोमाग सहा मोठ्या गाड्यांनी आत प्रवेश केला..... पहिल्या आणि शेवटच्या गाडीत सिक्युरिटी साठी हातात रायफल असणारे चार  गार्ड्स होते.... ते उतरले दोघांनी दुसऱ्या गाडीचे दार उघडले आणि दोघांनी तिसऱ्या..... दुसऱ्या आणि तिसऱ्या गाडीतून महाराणी चे वंशज उतरले.... एकदम उच्च स्तरातील कपडे, महागडे घड्याळ, हातात जाड ब्रेसलेट असा पुरुषांचा पेहराव होता... एकदम महागातल्या साड्या, गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस, हातात हिऱ्याची मोठी अंगठी आणि हिरे जडीत लहान पर्स! असा स्त्रियांचा पेहराव..... चौथ्या आणि पाचव्या गाडीत म्युझिअम मध्ये ठेवण्याचं सामान आणि त्यांच्या कडे काम करणारा फार अनुभवी आणि विश्वासातला माणूस होता... 
          सगळे गाडीतून उतरल्यावर पत्रकारांची त्यांच्या भोवती गर्दी जमली... चहू बाजूंना कॅमेरा चे फ्लॅश उडत होते.... सगळ्यांचीच घाई सुरु होती त्यांच्याशी बोलण्यासाठी आणि त्या सगळ्या वस्तू बघण्यासाठी.... सिक्युरिटी गार्ड ने सगळ्यांना बाजूला केलं... म्युझिअम मधल्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या वस्तू आत घेऊन जायला सुरुवात केली.... सगळे मानकरी आत गेले.... थोड्याच वेळात म्युझिअम चे मुख्य दार उघडले.... पत्रकार आणि बाकी मंडळी सुद्धा वर हॉल मध्ये गेले.... पहिल्या दोन रांगांमध्ये पत्रकार आणि इन्व्हेस्टर्स बसले.... बाकी मंडळी त्यांच्या मागे येऊन बसत होती.... आपली सुयश सरांची टीम चौथ्या रांगेत बसली.... संपूर्ण हॉल माणसांनी गजबजला होता.... त्या सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं.... 

"नमस्कार! तुम्हाला सगळ्यांना महाराणी कुसुमारंगिनी माहित आहेतच! आम्ही त्यांची एकविसावी पिढी! मी रणवीर... या आमच्या अर्धांगिनी, 'निलाक्षी देवी'! हे आमचे थोरले बंधू, 'रणजित कुमार' आणि त्यांची पत्नी 'निलवंती देवी'! या आमच्या भगिनी, 'निलांबरी'! आता 'रणजित कुमार' तुमच्याशी बोलतील...." रणवीर ने सगळ्यांची ओळख करून दिली.... 

'रणजित कुमार' बोलायला उभा राहिला... सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या... आता नक्की त्या हवेली चं काय होणार आणि कोणत्या वस्तू म्युझिअम मध्ये राहणार, कोणत्या वस्तू लिलावात निघणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले होते..... 'रणजित कुमार' ने बोलायला सुरुवात केली...

"आमचा इतिहास सगळ्यांना कळावा म्हणून आम्ही हा मोठा निर्णय घेतला आहे.... म्युझिअम मध्ये आत्ता आम्ही ज्या वस्तू आणल्या आहेत त्या प्रत्येक वस्तू मागे काही ना काही इतिहास आहेच! तुम्हाला इथून गेल्यावर ते सगळं पाहायला मिळेलच! त्या सगळ्या इतिहासाची माहिती सगळ्यांना मिळावी म्हणून आमची दोन माणसं इथे काम करतील... इथे येणाऱ्या प्रत्येकाला महाराणी कुसुमारंगिनी आणि त्यांच्या वंशजांबद्दल माहिती देण्याचं काम त्यांचं असेल.... आमच्या काही वैयक्तिक कारणांमुळे आम्ही हवेली सुद्धा लिलावात काढतोय! बरोबर आठ दिवसांनी हवेलीच्या बाहेरच लिलावाचा कार्यक्रम होईल...." 

पुन्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.... एवढी मोठी हवेली, एवढ्या पुरातन वस्तू या सगळ्या बाबत सगळे आपापसात कुजबुजत होते... 

"सर, तुम्ही हवेली आणि या वस्तूंशिवाय तुमचे खानदानी दागिने सुद्धा लिलावात काढणार आहात का?" पत्रकारांनी विचारलं. 

"सगळेच नाही! पण, त्यातले काही दागिने आहेत जे आम्ही काढणार आहोत! आता काय काय तिथे असेल हे तुम्हाला त्याच दिवशी समजेल..." रणजित कुमार ने सांगितलं. 

एवढं बोलून झाल्यावर तिथून निघण्यासाठी सगळे उठून उभे राहिले.... त्यांना पाहून सभागृहातले सगळे उठले... ते तिथून जायला लागले... इन्व्हेस्टर्स जिथे बसले होते त्यातल्या काहीजणांशी नजरा नजर झाली... निलांबरी आणि निलवंती मध्ये काहीतरी कुजबुज झाली... आणि ते सगळे तिथून निघाले. खाली सगळ्या वस्तू व्यवस्थित मांडून झाल्या होत्या... एकदा सगळीकडे नजर फिरवून महाराणी चे वंशज निघणार इतक्यात त्यांचा विश्वासू माणूस; 'गोपाळ काका' रणजित कुमार जवळ आले आणि त्यांना काहीतरी सांगितलं! रणवीर आणि रणजित कुमार मध्ये काहीतरी बोलणं झालं... 

"माफ करा! पण, आम्हाला हि तलवार इथे नाही ठेवता येणार... हि तलवार आम्ही घेऊन जातोय..." रणजित म्हणाला. 

सगळ्यांमध्ये आता कुजबुज सुरु झाली! पत्रकारांनी त्यांना पुन्हा घेरलं! 

"का सर? तुम्ही तलवार इथे का नाही ठेवणार? काहीतरी कारण असेल ना!" पत्रकारांनी विचारलं. 

"एक एक मिनीट.. काहीतरी गैरसमज झाला आहे..." निलवंती म्हणाली आणि ते सगळे थोडे बाजूला झाले. 

"तू हे काय बोलतेयस? आपल्याला इथे हि तलवार नाही ठेवता येणार माहितेय ना? दोन्ही  तलवारी एकत्रच हवेलीत च असल्या पाहिजेत... नाहीतर काय घडू शकतं हे तुला चांगलंच माहितेय.." रणजित म्हणाला. 

"पण...." निलवंती बोलत होती.. तिचं काही न ऐकता रणजित कुमार तलवार घेऊन सरळ बाहेर गेला.

क्रमशः....
***************************
रणजित कुमार असं का म्हणाला असेल? काय असेल या मागचं कारण? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. 

🎭 Series Post

View all