रहस्यमय हवेली (भाग -१९)

Finding the mystery of the mansion. Collaboration with loop hole.

रहस्यमय हवेली (भाग -१९)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथेच्या माध्यमातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. काही प्रसंग केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेले आहेत.)

मागील भागात आपण पाहिलं; अभिज्ञा, सोनिया, केदार सगळे बोलत असताना तो हवेली चा वंशज आहे हे सगळ्यांना सांगतो. त्यानंतर रात्री केदार ला बाबांनी स्वप्न लोकातुन पुन्हा मुंबई ला जायला सांगितले आहे. आता पुढे...
*****************************
राहुल ने या तिघांना बस स्थानकावर सोडले. थोड्याच वेळात पुण्याची बस मिळाली आणि तिघांना बस मध्ये बसवून राहुल गेला. आता बस सुरू झाली होती.. मंद हवेची झुळूक सुखावून जात होती. केदार ने आता सगळं सांगितल्यामुळे त्याच्या मनावरचं बरंच ओझं कमी झालं होतं! आज खूप दिवसांनी त्याला एकदम हलकं वाटत होतं. हवेच्या झुळुकेमुळे मोनिकाला कधीच झोप लागली होती. सोनियाच्या मनात आता अभिज्ञा जे काही बोलली होती तेच विचार सतत घोळत होते. 

"मी अगम्य ला समजून घेतलं नाही पण, तू ती चूक करू नकोस... केदार ने जेव्हा तुला सत्य सांगितलं तेव्हा मी तुझ्या डोळ्यात एक राग बघितला आहे... पण, त्याला समजून घे..." हीच वाक्य सतत तिच्या डोक्यात घोळत होती. 

"काय ग? कसला विचार करतेय?" केदार ने तिला शांत पाहून विचारलं. 

त्याने हे बोलल्यावर एवढा वेळ थोपवून ठेवलेले अश्रू अचानक तिच्या डोळ्यातून ओघळू लागले.. 

"काय झालं? काही सांगशील का? सॉरी ना.. मी तुझ्यापासून काही लपायला नको होतं! पण..." केदार बोलत होता. 

त्याला मध्येच तोडत ती म्हणाली; "अरे नाही.. मी तुझ्यावर रागावली नाहीये... उलट मीच सॉरी! तुझ्यावर मी मनातून का होईना पण चिडले होते... तू काहीतरी खूप मोठा गुन्हा केल्यासारखी भावना माझ्या मनात निर्माण झाली." 

"शांत हो... बास बास... यात माझी पण चूक होतीच! तू नको सॉरी बोलू.. आता आधी डोळे पुस..." केदार म्हणाला. 

"चला पुणे... पुणे...." कंडक्टर ओरडला तसे दोघं भानावर आले. 

सोनिया ने मोनिकाला उठवलं आणि तिकडून मुंबई ची बस पकडली. 

"अगं बघ या सगळ्यात तुला एक सांगायचं राहिलं...." केदार म्हणाला.

"काय?" सोनिया ने काळजीने विचारलं. 

"बाबांनी मला एक पूजा करायला सांगितली आहे. आता ती का करायची आहे आणि माझा याच्याशी काय संबंध हे मला माहीत नाही. कदाचित हवेली चा मी सुद्धा वंशज आहे हे सिद्ध झालं की मग ते याचा उलगडा करतील." केदार एकदम शांतपणे म्हणाला.

"बरं... तिथे गेल्यावर एकदा हे सिद्ध होऊ दे.. म्हणजे मग मी तुला पूजेसाठी काय काय तयारी करावी लागेल यासाठी मदत करते." सोनिया म्हणाली. 

त्यांचा या सगळ्या विचारात मुंबई पर्यंतचा प्रवास झाला. मुंबई ला उतरल्यावर सोनिया ने अभि ला फोन करून कळवलं आणि ते तिघे घरी गेले. बॅगा ठेवून आणि थोडं फ्रेश होऊन आता त्यांना हवेलीच्या वंशज; रणजित कुमार कडे जायचं होतं. मोनिका ला शेजारच्या काकूंकडे सोडून दोघं निघाले. 

"केदार! तुला वाटतंय का रे त्यांना सहजासहजी हे पटेल का?" सोनिया ने काळजी ने विचारलं. 

"बघूया आता... हे पटवण फार महत्त्वाचं आहे.. आज त्यांच्याशी जाऊन बोलू... माझ्याकडे आहेत काही पुरावे ते दाखवेन मी त्यांना!" केदार म्हणाला. 

दोघं त्या हवेली जवळ पोहोचले. तिथे असणाऱ्या गोपाळ काकांची भेट त्यांनी घेतली. 

"तुम्ही तर त्या प्रयोग करणाऱ्या मॅडम ना?" गोपाळ काकांनी सोनिया ला बघून लगेच ओळखलं. 

"हो... तुम्ही तुमच्या साहेबांना बोलवून घ्या ना आमचं जरा काम आहे त्यांच्याकडे." सोनिया म्हणाली. 

ते दोघं आत गेले... गोपाळ काकांनी रणजित कुमार ला फोन करून याची कल्पना दिली. थोड्याच वेळात रणजित कुमार तिथे पोहोचला. 

"मॅडम! सॉरी... मला माहितेय आमच्या मुळे तुम्हाला त्रास झाला आहे... तुमची मुलगी बरी आहे ना?" त्याने आल्या आल्या विचारलं. 

"हो.. ती बरी आहे... आम्ही दोघं जरा वेगळ्याच कामासाठी आलो आहे.." सोनिया म्हणाली. 

रणजित कुमार ने गोपाळ काकांना आत पाठवलं आणि त्यांना बसायची खूण करून तो सुद्धा तिथे बसला. 

"नमस्कार! मी केदार. खरंतर आत्ता मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते ऐकुन तुम्हाला धक्का बसेल... पण, मी पुरावे पण आणले आहेत." केदार म्हणाला. 

रणजित कुमार आता पार गोंधळून गेला होता. अजून जास्त ताणून न धरता केदार ने बोलायला सुरुवात केली. 

"मी सुद्धा या हवेली चा एक वंशज आहे. आपण सख्खे चुलत भाऊ आहोत... मला माहितेय हे ऐकुन एकदम गोंधळ झाला असेल पण मी आधी जे बोलतोय ते ऐकुन घ्या." त्याने रणजित कुमार काहीतरी बोलणार हे जाणून आधीच सांगितलं. 

रणजित कुमार ने हातानेच बोला म्हणून खूण केली. केदार ने त्याच्या पणजोबां बद्दल सविस्तर सगळं सांगितलं. तो घेऊन आलेला फोटो, काही नकाशे ते सगळं पण दाखवलं आणि हवेली बद्दल ज्या गुप्त गोष्टी इतर कोणालाही माहीत नव्हत्या म्हणजे, त्या एका गुप्त रस्त्याखेरिज अजून कोणते गुप्त रस्ते आहेत, कोणत्या गुप्त खोल्या आहेत, त्याच्या भिंतींवर कोणते संदेश कोरलेले आहेत हे सगळं सांगितलं. 

"ओके... मला पूर्ण नाही विश्वास यावर... या मॅडम नी इथे बरेच दिवस काम केलं आहे आता कशावरून त्यांनी या सगळ्याची माहिती तुम्हाला पुरवली नसेल?" रणजित कुमार म्हणाला. 

"हो.. मला मान्य आहे... असा सहजासाजी विश्वास तुम्ही माझ्यावर नाही ठेवणार! मी डी. एन. ए. टेस्ट करायला तयार आहे. मग तर विश्वास ठेवाल?" केदार म्हणाला. 

हा अगदी डी. एन. ए. टेस्ट साठी तयार होतोय म्हणजे नक्की खरं बोलत असेल हा विचार रणजित कुमार च्या डोक्यात येऊन गेला. पण, तसं काहीही न दाखवता त्याने त्याच्या ओळखीतल्या डॉक्टरांना लगेच तिथे बोलवून घेतलं. रिपोर्ट्स दुसऱ्या दिवशी येणार होते... 

"चला आम्ही येतो... उद्या रिपोर्ट आले की खरं खोटं तुम्हाला समजेल... पण, यापुढे आम्हाला तुमची साथ लागणार आहे तेव्हा मदत कराल हि अपेक्षा!" केदार म्हणाला. 

त्यांचं बोलणं झाल्यावर दोघं पुन्हा घरी आले. मोनिका सोबत वेळ घालवता घालवता रात्र सुद्धा झाली. सगळे झोपले मात्र केदार त्या हवेलीच्या विचारातच होता. बाबांनी असं का सांगितलं असेल हा प्रश्न त्याला सतत खात होता. जेमतेम कशीबशी त्याला झोप लागली. 

"गुड मॉर्निंग बाबा! चला ना आपण मॉर्निंग वॉक ला जाऊया..." मोनिका केदार ला उठवत म्हणाली. 

तिच्या आवाजाने केदार उठला आणि आवरून घेतलं. 

"काय रे हिने उठवलचं का तुला? अग बाळा बाबांना रात्री उशीर झाला ना झोपायला का बरं उठवलं त्यांना तू? सांगितलं होतं ना मी आपण जाऊ बाबांना आत्ता नको उठवू..." सोनिया मोनिकाला म्हणाली. 

"असुदे... अग मी कधीतरीच असतो ना तिच्या बरोबर.... जा मोनिका आवर तुझं आपण जाऊया..." केदार म्हणाला. 

ती आनंदात तिचं आवरायला गेली. 

"बरं ऐक.. मी मोनिकला फिरवून आणतो... जास्त लांब नाही घेऊन जाणार.. अजूनही त्रास होतो तिला चालायला... आम्ही आलो की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे..." केदार म्हणाला. 

एवढ्यात मोनिका आली. ते दोघं गेले फिरायला. सोनिया बाकी कामं आवरत होती इतक्यात तिचा फोन वाजला. 

"हॅलो! गुड मॉर्निंग अभि!" सोनिया ने तिचा नंबर पाहून आनंदात फोन उचलला. 

"गुड मॉर्निंग! काय आज खूप आनंदात दिसतेय...." अभिज्ञा म्हणाली. 

"तुझा फोन बघून आनंदी होणारच ना... बरं बोल काय झालं ग? काही टेंशन नाही ना?" सोनिया ने विचारलं. 

"छे ग! उलट मगाशी त्या नाशिकच्या बाबांचा फोन आला होता... त्यांनी सांगितलं आहे की त्या सूर्यकांत चा अंत जवळ आला आहे. फक्त ते जसं सांगतील तसं करायचं..." अभिज्ञा म्हणाली. 

"अरे वा... मस्त.... आज आत्ता केदार पण मला काहीतरी सांगणार आहे... दोघं बाप लेक गेलेत बाहेर... आले की होईल बोलणं.... मला वाटतंय याच विषयावर त्याला बोलायचं असेल. बघूया आता.. बोलणं झालं की सांगते तुला." सोनिया म्हणाली.

"बरं... अग ऐक ना... मी तुला नंतर फोन करते आमचा अदु उठला आहे." अभिज्ञा म्हणाली आणि फोन ठेवला. 

सोनिया ने नाश्त्याची तयारी केली एवढ्यात मोनिका आणि केदार बाहेरून आले. दोघं फ्रेश होऊन लगेच नाश्त्याला आले. खाऊन झाल्यावर मोनिका तिच्या खोलीत खेळायला गेली आणि केदार, सोनिया बोलत बसले. 

"काल रात्री बाबांनी स्वप्न लोकतुन मला सांगितलं की, महाराणी कुसुमरांगिनी यांचा आत्मा पण त्या सूर्यकांत च्या ताब्यात आहे. तो सुद्धा तिथून मुक्त केला पाहिजे.... आणि हे फक्त हवलीचा वंशज करू शकतो. पण, एक प्रॉब्लेम आहे..." केदार बोलत होता. 

"काय?" त्याला तोडत मधेच सोनिया म्हणाली. 

"हो... मलाच हे करावं लागेल.. पण, त्याच्या विश्वात मला त्या पुस्तकातून जाता येणार नाहीये." केदार म्हणाला. 

"मग?" सोनिया ने विचारलं. 

"तेच आता शोधायचं आहे... बाबांनी सांगितलं की पूजा संपन्न झाली की तुला आपोआप मार्ग दिसेल. आता फक्त रणजित कुमार ला माझी ओळख पटली पाहिजे. त्या हवेली मध्येच पूजा करायची आहे." तो म्हणाला.

"नको टेंशन घेऊ... आपण खरे आहोत ना मग पटेल त्यांना. आज रिपोर्ट्स येणार आहेत.. बाजूच्या काकूंना सांगते मोनिका वर लक्ष ठेवायला आपण जाऊ तिकडे." सोनिया म्हणाली. 

दोघं हवेलीत पोहोचले. आधीच रणजित कुमार येऊन तिथे थांबला होता. 

"तुम्ही खरं बोलत होतात... आपण सख्खे चुलत भाऊ आहोत! सॉरी वहिनी... तुम्हाला आणि सगळ्यांनाच खूप त्रास झाला आहे. मला आता खूप अपराधी वाटतंय..." तो म्हणाला. 

"दादा! दादा आहात तुम्ही आमचे... नका असं वाईट वाटून घेऊ... आता आपली एकजूट महत्त्वाची आहे. मी अजून काहीतरी तुम्हाला सांगणार आहे यात तुम्ही मदत करा बास..." केदार म्हणाला. 

त्याने सगळं रणजित कुमार ला सांगितलं. आधी त्याचा विश्वास बसत नव्हता पण, केदार ने त्याच्या विद्या वापरून त्याला हे सत्य आहे हे दाखवून दिलं. 

क्रमशः.....
*************************
आता नक्की हे काय नवीन समोर आलं आहे? केदार जर पुस्तकातून सूर्यकांत च्या विश्वात नाही जाऊ शकत तर कुठून जाईल? त्याची पूजा संपन्न होईल का? पाहूया पुढच्या भागात. पुढे आता सूर्यकांत चा अंत होतो की नाही हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा लूप होल पर्व दोन आणि रहस्यमय हवेली. 

🎭 Series Post

View all