रहस्यमय हवेली (भाग -१८)

Finding the mystery of the mansion. Loop hole and mysterious mansion maha sangam

रहस्यमय हवेली (भाग -१८)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कथेच्या माध्यमातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. काही प्रसंग केवळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेले आहेत.)

मागील भागात आपण पाहिलं, सी.आय. डी. टीम ने मोनिका ची सुटका केली, तिला रवींद्र ने दिलेल्या इंजेक्शन मुळे ती आय.सी. यू. मध्ये होती त्यातूनही वाचली.... रवींद्र, रणवीर, केतकी आणि निलवंती यांनी त्यांच्या कृत्याची कबुली दिली.... केदार कडे असणाऱ्या अघोरी विद्या सोनिया समोर आल्या आणि ते अभिज्ञाच्या घरी जायला निघाले होते... आता पुढे... 
**************************
सोनिया, केदार आणि मोनिका अभिज्ञा च्या घरी पोहोचले होते. त्यांचं यथावकाश स्वागत झालं आणि सगळे एकत्र बसले होते. 

"थँक्यू ग अभि! तू माझी खूप मदत केलीस म्हणून आज आमची मोनिका सुखरूप आहे." सोनिया म्हणाली. 

"हो... तुम्ही जर वेळेत आला नसतात तर... विचार पण करवत नाहीये...." केदार म्हणाला. 

"बास आता फॉर्मालिटी!" अभिज्ञा म्हणाली. तोवर त्यांच्या नोकराने सगळ्यांना पाणी आणून दिलं. 

अभिज्ञाने त्यांना गेस्ट रूम दाखवली आणि त्यांची विश्रांती, खाणं पिणं झाल्यावर सगळे पुन्हा एकत्र जमले. 

"अभि! मला एक सांग तू जेव्हा मुंबईत आली होतीस तेव्हा मी तुझं थोडं बोलणं ऐकलं होतं! काय भानगड आहे ग नक्की?" सोनिया ने विचारलं. 

"बघ, तुला तर माहीत आहे आमच्या घराण्याला त्या सूर्यकांत चा श्राप आहे. त्याचा अंत केल्याशिवाय काही या सगळ्यातून आमची सुटका नाही. मागच्या वेळी तो एका पेंटिंग मध्ये होता पण ती पेंटिंग जळताना त्याचा एक तुकडा पुस्तकावर उडाला आणि आता तो आमच्या राशीला येऊन त्या पुस्तकात बसला आहे... आमावस्येला अगम्य त्या पुस्तकात जाणार आहे! तेव्हाच काय ते आम्हाला या सगळ्यातून मुक्ती मिळेल." अभिज्ञा त्रासिक सुरात म्हणाली. 

"नको ग काळजी करुस... होईल सगळं नीट.." सोनिया तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली. 

अभिज्ञा ने तिच्याकडे पाहून स्मित केलं. 

"मला जरा तुम्हाला सगळ्यांनाच काहीतरी सांगायचं आहे..." केदार घसा साफ करून म्हणाला. 

सोनिया ला सुद्धा पूर्ण कल्पना नसल्याने तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि नक्कीच काहीतरी गंभीर असणार हे जाणून अभिज्ञा म्हणाली; "आदू! जा मोना दीदी ला तुझे टॉईज दाखव... पण, मस्ती जास्त नाही हा करायची... दीदी ला बरं नाहीये ना.." 

इतकावेळ अगम्य च्या मांडीवर बसलेला आदू लगेच टुणकन उडी मारून मोनिकाला त्याची खेळणी दाखवायला अगदी सावकाशपणे तिचा हात धरून घेऊन गेला. 

"तर मी म्हणत होतो की, तुम्ही ज्या नाशिकच्या बाबांचा सल्ला घेताय त्यांचाच मी शिष्य आहे. मला स्वप्न लोकातून त्यांनी इथे यायची आज्ञा दिली आणि म्हणूनच मी जहाजावरुन लगेच मुंबईत आलो.... त्यांनी मला इथे येण्याचा आदेश दिला आणि पुढे काय करायचं हे पण तेच सांगतील. मला टेलेपथी येते त्याचा नक्कीच काहीतरी उपयोग होईल म्हणून त्यांनी मला इथे पाठवलं असावं..." केदार म्हणाला. 

"खरंच बाबा धन्य आहेत... आमची आता अजून काळजी कमी झाली." अहिल्याबाई म्हणाल्या. 

"हो आऊ! आता फक्त आपल्याला आमावस्येची वाट बघायची आहे..... सोनिया! तू आधी का नाही मला सांगितलं या बद्दल?" अभिज्ञाने विचारलं. 

"मला पण हे आजच समजलं आहे...." सोनिया म्हणाली. 

"हो! तिला यावर विश्वास बसेल की नाही, ती कशी रिअॅक्ट होईल मला अंदाज नव्हता म्हणून मी तिला इतके वर्ष काहीही सांगितलं नव्हतं!" केदार म्हणाला. 

थोडावेळ अश्याच गप्पा झाल्या आणि पुन्हा हवेली चा विषय निघाला. 

"मला अजून एक सांगायचं आहे..... सोनिया तुझ्यासाठी हा पण एक धक्का असेल माहितेय मला पण, हेच सत्य आहे...." केदार बोलता बोलता थोडा थांबला. 

आता अजून काय नवीन हा प्रश्न सगळ्यांनाच होता. जास्त उत्सुकता न ताणता त्याने बोलायला सुरुवात केली; "मी सुद्धा त्या हवेली चा वंशज आहे.... रणवीर, रणजित कुमार हे सगळे माझे सख्खे चुलत भाऊ आहेत! कदाचित त्यांना हे माहीत पण नसेल... ही गोष्ट  आजोबांनी माझ्या बाबांना सांगितली होती आणि त्यांनी मला सांगितलं पण, इतक्या वर्षांनी या सगळ्यात नको पडायला म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं..." 

"म्हणजे? नीट समजेल असं सांग ना..." सोनिया त्याला मध्येच तोडत म्हणाली. 

"अगं माझ्या पणजोबांनी त्या काळी प्रेम विवाह केला होता म्हणून त्यांना सगळ्यातून बेदखल करण्यात आलं.... त्यांनी सुद्धा प्रेम निवडलं आणि सगळं शून्यातून निर्माण केलं... त्यांना विश्वास होता आपलीच माणसं आहेत ही कधी ना कधी तर आपला नाही तर आपल्या पुढच्या पिढीचा तरी स्वीकार करतील म्हणून त्यांनी ही गोष्ट आजोबांना सांगितली, आजोबांनी बाबांना आणि बाबांनी मला..." केदार म्हणाला. 

"केदार हे तू काय बोलतोयस? अरे आजच तुझं हे वेगळं रूप समोर आलं आणि आता हे..." सोनिया थोडी गोंधळून म्हणाली. 

"हो ग! मला माहितेय हा पण तुझ्यासाठी एक धक्का आहे... पण, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते.... त्या योग्य वेळेची वाट बघत होतो. कदाचित हे आपण सुद्धा आता त्या हवेली चे वंशज आहोत हे कधी मी सांगितलं नसतं पण, नेमकं त्याच हवेलिमुळे आपली मोनिका अडकली म्हणून सांगितलं आणि तू काळजी करू नकोस... आपण नाही जाणार आहोत तिकडे... त्या सगळ्या प्रॉपर्टी पेक्षा मला तुम्ही दोघी महत्वाच्या आहात..." केदार म्हणाला. 

सोनिया चे डोळे पाण्याने डबडबले होते. एवढ्यात मोनिका आणि आदू बाहेर आले... 

"आई... मोना दीदी आनी मी खूप खेळलो.. तिने मला गोष्ट पण सांगितली माझी फेवरेट वाली..." आज्ञांक अभिज्ञा च्या कुशीत शिरून म्हणाला. 

"हो का... मस्त... चला आता जेवणाची वेळ होतच आली आहे... एवढं खेळून भूक लागली की नाही...." अभिज्ञा म्हणाली. 

"हो...." आज्ञांक म्हणाला. 

सगळे जेवणासाठी गेले. मुलांच्या गप्पा गोष्टी ऐकत छान जेवणं झाली.... सोनिया ने येताना सगळ्यांसाठी पुण्याहून चिक्की आणली होती ती सुद्धा सगळ्यांनी खाल्ली आणि सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले. तसंही आज बराच स्ट्रेस होता! मोनिका ला हॉस्पिटल मधून सोडलं असलं तरी तिची पथ्य पाणी, औषधं, आजचा प्रवास आणि या बऱ्याच गोष्टी ज्या अचानक समोर आल्या होत्या. या सगळ्याचा विचार करत करत सोनिया ने मोनिकाला झोपवलं आणि तिला सुद्धा झोप लागली. बराच वेळ होऊनही केदार ला झोप लागत नव्हती. सारखी कुस बदलत बदलत तो पण झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सोनिया उठली तेव्हा मोनिका आणि केदार अजून झोपेतच होते... तिने तिचं आवरलं आणि अभिज्ञा ला मदत करायला खाली आली. थोडीफार कामं झाल्यावर मोनिकाला आणि केदार ला उठवायला ती वर खोलीत गेली. 

"अरे! केदार काय झालं? असा का बसला आहेस?" सोनिया ने केदार ला टेंशन मधे बघून विचारलं. 

"सांगतो... चल जरा बाहेर बोलूया.. मोनिका झोपली आहे अजून.. तिची झोप मोड होईल..." तो म्हणाला. 

दोघं खोलीच्या बाहेर आले, खोलीचं दार लावून घेतलं आणि तिथे वऱ्हांड्यात उभे राहिले. 

"बोल... काय झालं?" सोनिया ने काळजीने विचारलं. 

"आपल्याला पुन्हा मुंबई ला निघावं लागेल... आजच... थोड्याच वेळात..." केदार म्हणाला.

"अरे पण का? आपलं ठरलं आहे ना इथे अभि आणि अगम्य ला मदत करायची..." सोनिया म्हणाली. 

"अगं हो त्या साठीच! माझं पूर्ण ऐकुन तर घे.." केदार म्हणाला. 

सोनिया शांत झाली आणि हाताची घडी घालून तो काय म्हणतोय या कडे लक्ष देऊ लागली. 

"काल मला स्वप्न लोकांतून बाबांनी संदेश दिला आहे, आजच्या आज मुंबईला जा आणि तू त्या हवेली चा वारस आहेस हे पटवून दे... हे त्या सूर्यकांत च्या आत्म्याला नष्ट करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे..." केदार ने सांगितलं. 

"काय? अरे पण नक्की काय संबंध आहे त्या हवेली चा? सूर्यकांत तर पुस्तकात आहे ना..." सोनिया ने गोंधळून विचारलं. 

"हो ग! पण, बाबांनी सांगितलं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी असेल... जेव्हा मी पटवून देईन की हवेली चा वंशज मी सुद्धा आहे तेव्हा ते त्यांनी असं का सांगितलं आणि पुढे अभिज्ञा, अगम्य ची मदत कशी करायची हे सांगणार आहेत... म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर असणार... म्हणून..." केदार म्हणाला. 

"ओके.. ओके.. आपण अभि, अगम्य साठी काहीही करू.... पण, तू त्यांना कसं पटवून देणार याचा विचार केला आहेस का? कारण, त्याच हवेलीत इतके दिवस मी काम केलं, मोनिका च अपहरण करण्यात पण त्यांचा हात होताच... त्यांना आता आपण हे नाटक करतोय असं नको वाटायला..." सोनिया म्हणाली. 

"तू म्हणतेस ते बरोबर आहे... घरी माझ्याकडे काही सगळ्या पिढ्यांचे फोटो आहेत ते घेऊन जाऊ आपण... मी पटवून देण्याचा प्रयत्न करीनच... तरीही ऐकायला तयार नसतील तर शेवटचा एक पर्याय आहे डी. एन. ए. टेस्ट!" केदार विचार करून म्हणाला. 

"ओके.. मी मोनिका ला उठवून तिचं आवरते तोवर तू आपल्या बॅग, मोनिका ची औषधं सगळं घे... खाली जाऊ तेव्हा अभिशी बोलते मी मग निघुया..." सोनिया म्हणाली. 

सोनिया ने पटपट सगळी आवरा आवरी केली आणि सगळ्या सामना सकट ते खाली आले. तोवर सकाळच्या नाश्त्यासाठी सगळे जमलेले होते. 

"अरे हे काय? सोनिया सगळं सामन घेऊन कुठे चाललीस?" अभिज्ञा ने विचारलं. 

"मी सांगतो..." असं म्हणून केदार ने त्याच्या स्वप्नात बाबांनी जो संदेश दिला आहे तो सगळ्यांना सांगितला. 

"आता पुन्हा हे नवीन... या सूर्यकांत ने तर पार वेठीस धरलं आहे आपल्याला." अगम्य त्रासिक सुरात म्हणाला. 

"नको काळजी करुस... यावेळी त्याची हार नक्की होणार...." केदार म्हणाला. 

"आधी तुम्ही तिघांनी बसून घ्या... खाऊन घ्या आणि मग मुंबई ला जायला निघा... बाबांनी सांगितलं आहे म्हणजे नक्की चांगलं होईल काहीतरी..." अहिल्याबाई म्हणाल्या. 

सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घेतलं आणि राहुल त्यांना बस स्थानकावर पोहोचवायला गेला. 

क्रमशः.....
*************************
बाबांनी स्वप्नलोकतून येऊन केदार ला हवेली विषयी का सांगितलं असेल? काय संबंध असेल हवेली चा आणि सूर्यकांत चा? यावेळी तरी त्या सूर्यकांत चा अंत होईल का? जाणून घेण्यासाठी लूप होल आणि रहस्यमय हवेली चा पुढचा भाग नक्की वाचा आणि तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all