रहस्यमय हवेली (भाग -१६)

Finding the mystery of the mansion.

रहस्यमय हवेली (भाग -१६)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

आधीच्या भागात आपण पाहिलं; नियतीने दिलेल्या पेन ड्राईव्ह मधून रॉबिन आणि यशवंत अशी नावं समोर आली होती! रवींद्र च्या बँक खात्यात जवळ जवळ पन्नास लाख रुपये जमा झाले होते.... मोनिकाची औषधं ड्रोन च्या मदतीने नेली गेली.... आता पुढे...
***************************
सुयश सरांनी त्यांच्या डोक्यात जे सुरू आहे ते सगळ्यांना सविस्तर सांगितलं! सगळं काही प्लॅन प्रमाणे ठरल्यावर अभिषेक ने सुशांत ला या बद्दल कल्पना दिली. हवेलिमध्ये सोनिया च मन मोनिका साठी तुटत असलं तरी तिला काम करावं लागणारच होतं! ती त्या मेसेज मध्ये दिल्या प्रमाणे राज कडून आणलेल्या पेटीवर प्रयोग करत होती! एवढ्यात तिचा फोन वाजला...

"मोनिका! बाळा कशी आहेस? वेळेवर औषधं घेतेस ना?" त्या लोकांनी केलेला व्हिडिओ कॉल पाहून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि रडता रडता च तिने विचारलं. 

"हो... आई.... मला..." ती बोलत होती पण अजून काही तिला न बोलू देता त्या लोकांनी सोनिया समोरच तिच्या तोंडात रूमालाचा बोळा कोंबला! 

सोनिया ने घट्ट डोळे मिटून घेतले... तिला हे सगळं पाहवत नव्हतं... एका आई मधली दुर्गा जागी झाली होती पण, सुशांत ने तिला खुणेनेच शांत व्हायला सांगितलं. तो व्हिडिओ कॉल मध्ये दिसणार नाही याची काळजी घेत तो सगळं बघत होता.... 

"अजून थोडेच दिवस.... आम्हाला जे साध्य करायचं आहे ते झालं की तुम्ही दोघी मुक्त व्हाल कायमच्या.... हा... हा... हा..." तो अपहरणकर्ता हातातला मोठा सुरा दाखवत म्हणाला.

"न.. नाही... मोनिका ला काही करू नका... मी... मी... तुम्ही सांगाल ते सगळं करेन... कोणाला याबद्दल काही सांगणार पण नाही... पण, प्लीज मोनिका.... तिला काही करू नका..." सोनिया रडत रडत म्हणाली.

"ए चूप!.... अजून आहे वेळ तुमच्या दोघींकडे.... उगाच एवढं रडायचं काही कारण नाहीये....." ती व्यक्ती म्हणाली आणि फोन ठेवला. 

सोनिया धपकन खाली बसली... ओंजळीत चेहरा घेऊन ती खूप रडत होती! सुशांत ने तिला पाणी आणून दिलं... 

"नकोय मला काही.... या लोकांच्या हातून मरण्यापेक्षा मी स्वतः जाऊन जीव देते... निदान मोनिका तरी वाचेल..." ती म्हणाली. 

"मॅडम! मॅडम... प्लीज.... समजून घ्या अजून फक्त थोडावेळ...." सुशांत तिला अडवत म्हणाला. 

"किती वेळ झाला हेच ऐकतेय.... नाही आता सहन होत मला... माझी मुलगी, माझ्या काळजाचा तुकडा तिथे तडफडतोय आणि मी इथे शांत नाही बसू शकत.... मला माझ्या जीवाची पर्वा नाही..." ती डोळे पुसत उठून म्हणाली. 

एवढ्यात सुशांत चा फोन वाजला... 

"हे बघा.. सुयश सरांचा फोन आहे... नक्की त्यांना काहीतरी हाती लागलं असेल... प्लीज शांत व्हा..." तो म्हणाला आणि फोन उचलला. 

त्याचं आणि सुयश सरांचं बोलणं झालं! 

"काय झालं? मोनिका कुठे आहे समजलं? कधी येईल ती परत..." सोनिया ने प्रश्नांचा भडिमार सुरू केला. 

"हो.. हो.. सी.आय.डी. टीम ला समजलं आहे हे सगळं कोण करत असेल... आपल्याला ब्यूरो मध्ये बोलावलं आहे... मोनिका ला सगळे सोडवून आणतायत..." सुशांत म्हणाला. 

"चल मग.... मला कधी एकदा मोनिका ला बघतेय असं झालंय..." ती आनंदाने म्हणाली. 

"एक मिनिट... आपल्याला अजूनही गोपाळ काकांना बेसावध ठेवायचं आहे... तुम्ही एकदम नॉर्मल वागा.... काहीतरी कामानिमित्त बाहेर जावं लागतंय असं त्यांना सांगा..." सुशांत ने तिला समजावलं. 

दोघं तिकडून बाहेर पडले.... 
****************************
इथे नियती रिसर्च सेंटर मध्ये पोहोचली होती... तिचं अचानक तिकडून निघून जाणं हे केतकीच्या लक्षात आलं होतं... जर सुयश सरांनी तिच्यावर संशय घेतला आहे तर आपण सुद्धा सावध राहून सगळं बोलायला हवं या सगळ्या विचारात ती तिच्या जागेवर जाऊन बसली.... 

"नियती! अगं तू एवढ्या घाईत कुठे गेली होतीस? काय झालं ग? सगळं ठीक आहे ना?" केतकी ने विचारलं. 

"हो... आपण लंच ला बाहेर जाऊ तेव्हा बोलू सविस्तर..." नियती म्हणाली आणि पुन्हा कामात व्यस्त झाली. 

ती कामात असली तरी तिचं केतकी वर बारीक लक्ष होतं! सुयश सर जसं म्हणाले अगदी तसचं आता तिला वाटू लागलं होतं.... केतकी ची सतत होणारी चलबिचल, चेहऱ्यावरचे अचानक बदलेले भाव आणि सतत मोबाईल मध्ये बघणं तिला संशयास्पद वाटत होतं! पण, आपल्याला काहीही जाणवलं नाहीये याच आविर्भावात ती काम करत होती! लंच ब्रेक झाला तश्या दोघी बाहेर गेल्या... 

"नियती! काय झालं ग? काय बोलायचं आहे?" केतकी ने घाईत विचारलं. 

"अग तू म्हणाली होतीस ना त्या रवींद्र बद्दल... मी माहिती काढली... तेच सांगायचं होतं तुला... म्हणूनच मी आज बाहेर गेले होते...." नियती म्हणाली. 

आता नियती ला नक्की कोणती माहिती हाती लागली आहे आणि तिला आपल्या बद्दल तर काही समजलं नाही ना यामुळे तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला...  
***************************
दुसरीकडे आता सी.आय.डी. ब्यूरो मध्ये टीमच्या विभागण्या झाल्या होत्या! ईशा सोनिया सारखा वेश करून सुशांत बरोबर त्या गुप्त रस्त्याने हवेलीत असणाऱ्या बंद खोलीत जाणार होती.... विक्रम, सोनाली आणि निनाद ड्रोन ज्या दिशेने गेला होता तिकडे जाणार होते तर सुयश सर, नियती आणि अभिषेक केतकीचा पाठलाग करणार हे ठरलं होतं! या सगळ्यात सोनिया ची सुरक्षा सुद्धा महत्त्वाची होती... म्हणून, ती आणि गणेश ब्यूरो मध्येच थांबणार होते... 

"सर! तुमच्या या मिशन मध्ये माझ्या मोनिकाला काही ईजा नाही होणार ना?" तिने सुयश सरांचा प्लॅन ऐकुन काळजीने विचारलं. 

"नाही... मोनिकाला काहीही होणार नाही... ती आता आमची जबाबदारी आहे..." सुयश सर म्हणाले. आणि सगळे त्यांच्या प्लॅन नुसार ठरलेल्या ठिकाणी जायला निघाले. 

ईशा आणि सुशांत हवेली मध्ये त्या गुप्त रस्त्याने बंद खोलीत गेले.... सुशांत ला अभिज्ञाने जे सांगितले होते अगदी तेच त्या खोलीत होते... दोघांनी मिळून पुरावे म्हणून तिथल्या गोष्टींचे सँपल घेतले आणि फोटो काढून घेतले... आता फक्त त्यांच्या प्लॅन च्या पुढच्या टप्प्याची वाट त्यांना बघायची होती.... 
*************************
"सर! आम्ही पोहोचलो..." विक्रम ने सुयश सरांना फोन करून सांगितलं. 

"ओके... कबुतर येतंय... इथून उडालं आहे..." ते म्हणाले.

काही मिनिटात तिथे केतकी येताना दिसली... 

"सर... कबुतर आलं... जाळं फेकू?" विक्रम ने विचारलं. 

"नाही... आम्ही पण तिथे येतोय... हे फक्त प्यादं आहे... आपल्याला खऱ्या सूत्रधाराला पकडायचं आहे..." सुयश सर म्हणाले. 

"ओके..." विक्रम म्हणाला आणि ते सगळे तिथे लपून बसले. 

केतकी थोडी पुढे गेली आणि मागून सुयश सर, नियती आणि अभिषेक आले... 

"विक्रम! तू, सोनाली आणि निनाद त्या मागच्या रस्त्याने जा... आम्ही इथून जातो... ब्यूरो मध्ये जसं आपलं ठरलं अगदी तसाच वेढा आपल्याला त्या बंगल्याला घालायचा आहे... मुव फास्ट..." सुयश सर म्हणाले. 

सगळ्यांनी ठरल्याप्रमाणे आपापल्या पोजिशन घेतल्या.... तोपर्यंत केतकी आत बंगल्यात गेली होती... बंगल्याच्या मागच्या बाजूची खिडकी उघडी होती... तिकडून विक्रम लपून सगळं ऐकत होता... 

"तू इथे का आलीस? तुला सांगितलं होतं ना भेटायला अजिबात यायचं नाही...." ती बंगल्यातील व्यक्ती केतकी ला बघून म्हणाली. 

"हो... पण, काम तसंच होतं म्हणून आले... ती नियती! मी तुम्हाला सांगितलं होतं ना रिसर्च सेंटर मध्ये नवीन आली आहे... तिला रवींद्र सरांबद्दल समजलं आहे... आज ती या सगळ्याच्या मुळाशी जाणार असं म्हणाली मला..." केतकी ने सगळं सांगितलं. 

"अगं बावळट... मग तिचा सोक्षमोक्ष तिथेच लावायचा होता ना... इथे का आलीस??" ती व्यक्ती चिडून म्हणाली. 

"तेवढा वेळ नाही मिळाला... मी काही करायच्या आत तिने जे काही पुरावे गोळा केले आहेत ते सी.आय.डी. पर्यंत कसे पोहोचतील याची व्यवस्था केली होती... म्हणून मी इथे आले..." केतकी ने सांगितलं. 

"थांब जरा आता... ए जा त्या सोनियाच्या मुलीवर जरा नजर ठेव..." त्या व्यक्तीने तिथे असणाऱ्या एका दुसऱ्या माणसाला सांगितलं. 

तो तिथून बाहेर आला... सुयश सर, सोनाली आणि अभिषेक तिघांनी त्याला पाहिलं... सुयश सरांच्या सांगण्यावरून अभिषेक त्याचा पाठलाग करत गेला... 

"तू आता इथून जा... इतर कोणी पाहिलं तर आत्ताच आपली पोल खोल होईल... मी बघतो  काय करायचं... निघ लवकर...." ती व्यक्ती म्हणाली. 

एवढ्यात मागच्या दाराने विक्रम ची टीम आणि पुढून सुयश सर आणि सोनाली आत गेले... 

"तुमची आधीच पोल खोल झाली आहे..." सुयश सर म्हणाले. 

त्यांनी विक्रम ला खूण केली तसा तो आणि नियती अभिषेकच्या मदतीसाठी गेले.... केतकी पळून जायचा प्रयत्न करत होती पण सोनाली ने तिला पकडलं! 

"रणवीर! महाराणी कुसुमारंगीनी यांचे वंशज! बोला... का केलत हे? आणि तुमच्या त्या साथीदार त्या कुठे आहेत?" सुयश सरांनी रणवीरच्या खांद्यावर हात टाकून विचारलं. 

आता रणवीर ला चांगलाच घाम फुटला होता... इतक्यात बाहेरून रणजित कुमार आणि निलवंती आले... 

"काय चाललंय? कोण तुम्ही?" सगळा गोंधळ बघून रणजित कुमार ने विचारलं. 

"आम्ही सी.आय.डी. मधून आहोत..." निनाद  म्हणाला. 

हे ऐकुन आता निलवंती च्या चेहऱ्याचा रंगच उडाला. 

"ओह.. सॉरी सर... पण, काय झालं नक्की?" रणजित कुमार ने विचारलं. 

सुयश सरांनी सोनाली ला खूण केली तसं तिने नीलवंती ला हाताला धरून तिथल्या खुर्चीवर बसवलं... 

"तुम्ही दोघं सरळ सांगणार की...." सुयश सर आवाज चढवून म्हणाले. 

"हा काय प्रकार आहे ऑफिसर्स? तुम्ही सी.आय.डी. मधून आहात म्हणून तुमचा मान राखला... आम्ही कोण आहोत हे तुम्हाला माहीत असेलच...." रणजित कुमार म्हणाला. 

"सगळं माहितेय.... पण, तुम्हालाच माहीत नाहीये या लोकांनी काय केलंय..." सुयश सर म्हणाले. 

त्यांच्या आवाजाची धार आता वाढली होती... नक्की काहीतरी गंभीर आहे हे रणजित कुमार ला कळून चुकलं होतं! इतक्यात बाहेरून विक्रम मोनिकाला हातात उचलून घेऊन आला! अभिषेक ने त्या रवींद्र ला पकडलं होतं! 

"सर! मी सिटी हॉस्पिटल मध्ये जातोय..." विक्रम घाईत म्हणाला आणि मोनिकाला घेऊन निघाला. 

"सर, या रवींद्र आणि तिथल्या गुंडांसोबत झटापट झाली तेव्हा यानेच काहीतरी केलं मोनिकाला! ती अचानक बेशुद्ध झाली..." अभिषेक रवींद्र ची कॉलर धरून जोरात सुयश सरांकडे त्याला धक्का देऊन म्हणाला. 

आता सुयश सरांचा पारा आणखीन चढला होता! 
**************************
इथे ब्यूरो मध्ये सोनिया काळजीत होती... एवढ्यात तिचा फोन वाजला! 

"बापरे! मोनिकाच्या बाबांचा फोन आहे... काय सांगू त्यांना?" ती काळजीने म्हणाली. 

पहिल्या दोन वेळा तिने फोन उचलला नाही. 

"मॅडम, असं नका करू... फोन घ्या... त्यांना काळजी वाटेल... फोन स्पीकर वर ठेवा मी त्यांना सगळं खरं सांगतो..." गणेश म्हणाला. 

"काय सोनिया किती फोन करतोय... कुठे गेला आहात दोघी माय लेकी? मी घरी आलोय..." केदार म्हणाला. 

"ते मी आत्ता सी.आय.डी. ब्यूरो मध्ये आहे..." सोनिया रडत रडत म्हणाली. 

"काय? काय झालं? तू का रडतेय? आपली मोनिका? ती सुखरूप आहे ना? सी.आय.डी. ब्यूरो मध्ये का गेलीयेस?" त्याने काळजीने प्रश्न विचारायला सुरुवात केली. 

"सर! मी इन्स्पेक्टर गणेश! नका काळजी करू... तुम्ही इथे या सगळं सांगतो...." गणेश म्हणाला. 

केदार ने हो हो म्हणत फोन ठेवला आणि तो यायला निघाला. 

क्रमशः....... 
*****************************
मोनिका अचानक कशी बेशुद्ध झाली असेल? तिच्या बाबांना हे सगळं आत्ता समजेल! ते इतके दिवस कुठे होते? मोनिका यातून वाचेल? रणवीर आणि नीलवंती ने असं का केलं असेल? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.
पुढच्या भागापासून तुम्हाला वाचायला मिळेल रहस्यमय हवेली आणि लूप होल पर्व २ चा महासंगम.... 

🎭 Series Post

View all