रहस्यमय हवेली (भाग -१४)

Finding the mystery of the mansion.

रहस्यमय हवेली (भाग -१४)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
अभिषेक, सोनिया आणि अभिज्ञा हवेलीत जायला निघाले! त्यांच्या प्लॅन नुसार सगळ्यांना त्या गुप्त रस्त्याने आत जायचं होतं! सगळे कोणाच्याही न कळत हवेलीच्या मागच्या बाजूला गेले! सुशांत ला सुद्धा फोन करून अभिषेक ने या बद्दलची कल्पना दिली होती. 

"इथे या नकाशा प्रमाणे या क्षेत्रात कुठेतरी ते गुप्त दार असेल... चला आसपास बघूया..." अभिषेक म्हणाला. 

सगळे आजूबाजूला बघत होते! हवेलीच्या बाहेर बरीच फुल झाडं, फळांची झाडं यांची दाटी होतीच! हा भुयारी रस्ता म्हणजे खूप गुप्त पद्धतीने बांधला गेला असणार याचा सगळ्यांना अंदाज होताच! त्या नजरेनेच सगळे शोधाशोध करत होते... 

"ही हवेली पुरातन दिसताना तरी दिसतेय म्हणजे जर खरंच राजे महाराजे यांच्या काळातील असेल तर सैन्याला गुप्त पद्धतीने आदेश देण्यासाठी हे भुयारी रस्ते बांधले गेले असणार! त्या सगळ्याचा विचार करून शोधायचं झालं आणि या नकाशाच्या हिशोबाने इथे १२ ते १५ फुटांच्या अंतरावर असायला हवं ते दार!" अभिज्ञा मनात विचार करून स्वतःशीच बोलली. 

तिने विचार केल्या प्रमाणे पुढे तिला एक मोठं झाड दिसलं! ढोली सारखं काहीतरी त्या झाडाला दिसत होतं! 

"सोनिया!" तिने हळूच सोनिया ला हात उंचावून हाक मारली. 

सोनिया आणि अभिषेक तिथे लगेच आले! 

"मला ही ढोलीच गुप्त दार आहे असं वाटतंय! आपण जाऊन बघूया का?" अभिज्ञाने त्या ढोलिकडे बोट दाखवून सगळं सांगितलं. 

"एक मिनिट! मी आधी जाऊन बघतो! आत काही धोका असेल तर मला आधी समजेल." अभिषेक म्हणाला आणि त्या ढोलीच्या रस्त्याने आत गेला. 

अत्यंत विकसित तंत्रज्ञान वापरून आतला भुयारी रस्ता बांधला गेला होता! आसपास ची पाहणी करत करत अभिषेक पुढे चालत होता! सुशांत सुद्धा त्या रुम मध्ये कुठे गुप्त दार असेल हे बघत होता! सगळी कडे शोधून झाल्यावर सुद्धा त्याला तिथे काही दिसलं नाही... तिथे असणाऱ्या मोठ्या कपाटाचं दार त्याने उघडलं! एवढं मोठं कपाट असून सुद्धा त्यात एकही कप्पा नव्हता की काही सामान नव्हतं! सुशांत ला हेच ते गुप्त दार असणार याची शंका आली! सगळीकडे नीट तपासणी करून त्याने ते दार उघडलं! आता खोलीतला उजेड भुयारी रस्त्यात येत होता! अभिषेक पूर्ण सावधानतेने पुढे गेला! 

"सोनिया मॅडम आणि अभिज्ञा मॅडम?" सुशांत ने अभिषेक ला एकट्याला पाहून विचारलं. 

"त्या बाहेरच आहेत! मी आधी पाहणी करण्यासाठी आलो... तू इथे सांभाळून घे मी त्या दोघींना घेऊन येतो!" अभिषेक म्हणाला आणि मागे फिरला. 

तो अर्ध्या रस्त्यापर्यंत आला असेल तोवर सोनिया आणि अभिज्ञा आल्याच होत्या! 

"तुम्ही? मी तुम्हाला तिकडेच थांबायला सांगितलं होतं ना? इथे जर काही धोका असता तर?" अभिषेक काळजीने म्हणाला. 

"हो! पण, आम्हाला कोणीतरी येतंय अशी चाहूल लागली म्हणून आम्ही आलो..." सोनिया म्हणाली. 

"बरं! चला लवकर... गोपाळ काका बागेत आले असतील..." अभिषेक म्हणाला. 

सगळे त्या रिसर्च सुरू असणाऱ्या खोलीत आले. एव्हाना दुपार झालीच होती. अभिषेक आणि सुशांत ने मिळून ते दोघं तिथे दिनेश आणि रामा या नावाने वावरतात हे अभिज्ञाला सांगून ठेवलं होतं! तसं तर अभिज्ञा काही गोपाळ काकांच्या समोर कधी येणार नव्हती पण, अचानक काही घडलं आणि ती काकांना दिसली तर तिला सगळं माहित पाहिजे म्हणून त्यांनी तिला सगळी कल्पना देऊन ठेवली. 
************************
"ईशा! आपण रवींद्र च्या घरून जे काही गोळा केलं आहे ते डॉ. विजय ना टेस्ट साठी दे! मी येतोच थोड्यावेळात.." सुयश सर म्हणाले.

"ओके सर!" ईशा म्हणाली आणि डॉ. विजयं सोबत लॅब मध्ये गेली. 

"विक्रम! रिक्षेचा काही तपास लागला?" सुयश सरांनी विचारलं. 

"सर, त्या रीक्षेचा काही पत्ता लागला नाहीये अजून... कोणत्याही नाक्यावरून ती पास झाली नाहीये... बहुदा सारखी तीच रिक्षा वापरून तो जो कोणी आहे तो पकडला जाऊ नये याची काळजी घेत असणार!" विक्रम म्हणाला. 

"हम्म! मोनिका नाव आहे ना तिचं? आणि विक्रम, सुशांत ने जो फोटो पाठवला आहे तो नीट बघ, हा एक पाय आर्टिफिशियल वाटतोय! म्हणजे तिची औषधं सुद्धा सुरू असण्याची शक्यता आहे! सुशांत बरोबर एकदा याच्यावर बोलून घे! सोनिया काय सांगतेय ते बघ आणि त्या प्रमाणे पुढच्या हालचाली करू आपण." सुयश सर म्हणाले. 

"ओके सर! सर, निनाद आणि गणेश त्या रविंद्रचे सगळे रेकॉर्डस् घ्यायला गेले आहेत येतीलच थोड्यावेळात..." विक्रम म्हणाला.

"बरं! सोनाली! तू आता विक्रम ची यात मदत कर! मी लॅब मध्ये जाऊन येतो..." सुयश सर म्हणाले आणि ते लॅब च्या दिशेने गेले. 
****************************
इथे हवेलीत आता पुन्हा गोपाळ काकांना कसं बाहेर काढता येईल यावर सगळे विचार करत होते पण सोनियाचं लक्ष सतत मोबाईल वर लागलं होतं! 

"मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय.... मोनिका ची काळजी नका करू.... सगळी सी.आय.डी. टीम तिचा शोध घेतेय..." अभिषेक तिला अस्वस्थ पाहून म्हणाला.

"तिची काळजी तर वाटणारच ना! आत्ता साधारण महिन्याभरापूर्वी तिचं पायाचं ऑपरेशन झालं आहे... तिची औषधं सुरू आहेत, अजूनही तिला थोडा आधार द्यावा लागतो.. मग मला काळजी वाटणारच ना! आज आठवडा झाला आहे मागची औषधं आणून.... उद्यासाठी तिला औषधं लागतील! मी मेडिकल मध्ये मागवून ठेवली आहेत पण अजूनही त्या लोकांचा फोन किंवा मेसेज आला नाहीये म्हणून मला जास्त काळजी वाटतेय..." सोनिया रडत रडत म्हणाली. 

अभिज्ञाने तिला समजावलं आणि शांत केलं! एक आई म्हणून तिला होणारा त्रास हा साहजिक होता पण, सत्य स्वीकारून मोनिकाला कसं शोधता येईल आणि हवेलीत असं काय विशेष आहे हे शोधणं सुद्धा गरजेचं होतं! 

"मॅडम! मला सांगा तुम्ही कोणत्या मेडिकल मधून औषधं मागवता?" सुशांत ने विचारलं. 

"स्टेशन ला आहे.... वेलनेस मेडिकल! मागच्या वेळी त्या लोकांनी आणलं होतं औषध... मला फोन करून सगळे डिटेल्स घेतले होते! मी मेडिकल वाल्याशी फोन वर बोलले तेव्हा त्याने त्यांना औषधं दिली होती! पण, यावेळी अजून काही मेसेज आणि फोन आला नाही म्हणून मला काळजी वाटतेय..." सोनिया म्हणाली. 

"आम्ही बघतो काय करायचं... तुमच्या मुलीला काहीही होणार नाही..." अभिषेक म्हणाला आणि त्याने लगेच विक्रम ला फोन करून याबद्दल कल्पना दिली. 

"सोनिया! बघ, तुला काय वाटतंय मी समजू शकते! पण, आता खंबीर झालं पाहिजे... मागच्यावेळी सुद्धा त्या लोकांनी मोनिका ला औषधं दिली होती म्हणजे यावेळी पण देतीलच.... त्यांना तिला काही करायचं नाहीये फक्त तुझ्याकडून दबावाखाली काम करून घ्यायचं आहे बस! आता आपण कामाला लागू..." अभिज्ञा म्हणाली. 

सोनिया ने आता स्वतः ला सावरलं होतं! हे सगळं होई पर्यंत जेवणाची वेळ झाली होती... गोपाळ काका त्यांना जेवायला बोलावण्यासाठी आले होते! त्यांनी दारावर टकटक केली! आवज ऐकुन अभिषेक ने दार उघडलं! 

"जेवण तयार आहे... चला जेवून घ्या..." गोपाळ काका म्हणाले. 

"रामा! जा इथेच घेऊन ये सगळ्यांचं जेवण... आपल्याला वेळ नाहीये... काम लवकर संपवायचं आहे..." सुशांत म्हणाला. 

"हो.. आणतो.." अभिषेक म्हणाला. 

गोपाळ काका आणि तो किचन मध्ये गेले. गोपाळ काकांनी तिघांना पानं वाढली! अभिषेक ने थोडी जास्त भूक लागली आहे असं सांगून थोडं थोडं जास्त जेवण वाढून घेतलं आणि तो पुन्हा खोलीत आला. सगळ्यांनी जेवण करून घेतलं. एवढ्यात सोनिया चा फोन वाजला! 

"दिनेश! हे बघ... मी मागच्यावेळी म्हणलं होतं ना काय काम करायचं याचा मेसेज येतो.. तोच मेसेज आला आहे..." सोनिया सुशांत ला फोन दाखवत म्हणाली. 

त्या मेसेज मध्ये लिलावाच्या दिवशी बंद पेटी होती त्यात जे काही सापडलं असेल त्याचा अभ्यास करायला सांगितलं गेलं होतं. पुढे आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत मेडिकल मध्ये त्यांचा माणूस मोनिकाचं औषध आणायला जाणार आहे तर गोपाळ काकांसोबत तिची फाईल ४:३० पर्यंत मेन रोड ला पाठवायला सांगितली होती. सुशांत ने तो मेसेज जसाच्या तसा त्याच्या मोबाईल वरून विक्रम ला पाठवला. 

"मॅडम! आता तुम्ही कसलीच काळजी करू नका. मोनिकाला औषध मिळतील आणि यावेळी ती सुखरूप घरी सुद्धा येईल... आपल्याला आता थोड्याच वेळात गोपाळ काकांना बाहेर पाठवायचं आहे तेव्हा अभिज्ञा मॅडम आणि तुम्ही काम करून घ्या! त्यांना तिकडे जाऊन येई पर्यंत साधारण १ तास लागेल... त्याच वेळात आपलं सगळं काम झालं पाहिजे..." सुशांत म्हणाला. 

"हो! पण, आज ते लिलावाच्या दिवशी बंद पेटीत असलेलं सामान का टेस्ट करायला सांगितलं असेल? या लोकांना नक्की काय हवंय माझ्याकडून मलाच कळत नाहीये... कशाचाही क्लू लागत नाहीये... की उगाचच त्रास द्यायचा म्हणून हे सगळं चाललं आहे!" सोनिया वैतागून म्हणाली. 

"सर, पॉइंट आहे! कधी हे कर कधी ते कर असं हिला सांगितलं जातंय... नक्की काहीतरी वेगळी गोम आहे यात!" अभिज्ञा म्हणाली. 

"हम्म! आपल्याला तेच तर शोधायचं आहे... एकदा त्या रवींद्र बद्दल माहिती मिळाली की बरीच कामं सोपी होतील... कुठेतरी या सगळ्या मागे त्याचा हात आहे असं वाटतंय..." सुशांत म्हणाला. 

"मला वाटतंय आपण गोपाळ काकांना ती पेटी आणायला सुद्धा पाठवू! त्या दिवशी आय थिंक ती पेटी राज ने घेतली होती!" सोनिया म्हणाली. 

"ओके! तुम्ही एक काम करा, या हवेलीच्या वंशजांपैकी कोणाला तरी फोन करून राज चे डिटेल्स मागवून घ्या... त्यांना याबद्दल कल्पना द्या आणि मग आपण गोपाळ काकांना तिकडे पाठवू..." अभिषेक म्हणाला. 

सोनिया ने लगेच निलाक्षी देवी ला फोन करून याबद्दल सांगितलं! थोड्याच वेळात तिने सगळे डिटेल्स सोनिया ला पाठवले. आता या सगळ्यांना अजून थोडा वेळ मिळणार होता! गोपाळ काकांना या कामासाठी म्हणून बाहेर पाठवल्यावर ते नक्की गेले आहेत याची खात्री अभिषेक ने करून घेतली! आता अभिज्ञा आणि सोनिया त्या तलवार ज्या ठिकाणी ठेवली होती तिथे आल्या! अभिज्ञाने सगळी पाहणी केली! त्यातली खोटी तलवार बाजूला करून ही खरी तलवार त्यात ठेवली! 

"तू ही ढाल जोरात दाबून धर... मी तलवारीची मुठ एका विशिष्ट पद्धतीने फिरवते... बघूया काय होतंय..." अभिज्ञा म्हणाली. 

सोनिया ने तिने सांगितल्या प्रमाणे केलं! अभिज्ञाने जशी तलवारीची मूठ फिरवली तसं तिथे एका कळी सारखं काहीतरी दिसलं! ती कळ दाबल्यावर अचानक हवेलीच्या खोल्या बदलायला लागल्या! लाईट चालू बंद व्हायला सुरुवात झाली आणि तिथे असणारी महारणीची पेंटिंग बोलतेय असं वाटू लागलं! लिलावाच्या दिवशी जे काही वंशजांनी सांगितलं होतं अगदी तेच आवाज येत होते! अभिज्ञाने लगेच पुन्हा कळ दाबली आणि ढाल, तलवार होती तशी ठेवली! सगळं होतं तसं केल्यावर त्या पेंटिंग मधून आवाज येणं थांबलं आणि आता खोल्या सुद्धा जागच्या जागी स्थिर झाल्या! 

"आपला संशय खरा ठरला!" अभिज्ञा म्हणाली. 

"हो! म्हणजे लिलावाच्या दिवशी ते लोक खरं बोलत होते..." सोनिया म्हणाली. 

"मॅडम! तुम्ही म्हणताय की संशय खरा ठरला म्हणजे तुम्हाला आधी पासून हे माहीत होतं?" अभिषेक ने विचारलं. 

"हो! कसं आणि हे नक्की काय आहे हे नंतर आम्ही सांगू... अजून या पूर्ण हवेलीची आम्हाला तपासणी करायची आहे..." सोनिया म्हणाली. 

त्या दोघी पूर्ण हवेलिभर फिरल्या! फक्त त्यांच्या रिसर्च च्या खोलीच्या बाजूला असलेली खोली तेवढी यांना पाहता आली नाही! त्या खोलीचं कुलूप बघून ती वर्षानुवर्ष उघडली गेली नसणार हे लक्षात येत होतं! त्यांनी काही टेस्ट केल्या त्यातून ती हवेली पुरातन आहे हे पण सिद्ध झालं! 

गोपाळ काका ते सामान घेऊन येतील म्हणून सगळे पुन्हा त्यांच्या खोलीत गेले! सोनिया ने बाहेरच मोनिकाच्या औषधांची फाईल काढून ठेवली होती. ते कधी येऊन ती पेटी तिथे ठेवून फाईल घेऊन गेले समजलं सुद्धा नाही! एव्हाना आता रात्र झाली होती! गोपाळ काका हवेलीच्या बाहेर असणाऱ्या घरात झोपायला जायचे... सगळी कामं आवरून यांना काही हवं नको ते विचारून काका बाहेर गेले! 

"मॅडम! तुम्ही दोघी वर तिकडे सोनिया मॅडम ना रुम दिली आहे राहायला तिकडे झोपा! आम्ही दोघं इथेच पहारा देणार आहोत... जर गोपाळ काका लवकर आले तर तुम्हाला आम्ही सावध करू..." सुशांत म्हणाला. 

"नाही नको... सोनिया! तू खूप दमली आहेस.. तू झोप जाऊन... सर, मी इथेच थांबेन! तसंही मी रात्री झोपणार नाहीये..." अभिज्ञा म्हणाली. 

हो नाही करत करत सोनिया झोपायला गेली. तिला अजून कसलं टेंशन नको म्हणून अभिज्ञाने तिच्या घरी काय घडतंय हे सांगितलं नव्हतं! अभिषेक आणि सुशांत बाहेर त्यांचं काम करत बसले होते! अभिज्ञा त्या रिसर्च च्या खोलीत एकटीच होती! अगम्य झोपू नये म्हणून तिने त्याला फोन लावला! तिचं फोनवर बोलणं झाल्यावर तिने फोन ठेवला! तिला बाजूच्या खोलीतून कसलातरी आवाज येतोय असं वाटत होतं! त्या नकाशा प्रमाणे त्या खोलीला सुद्धा गुप्त रस्ता आहे हे तिला आठवलं आणि कसलाही विचार न करता ती तिकडे गेली! तिथे जे काही तिने पाहिलं ते हे सगळं बदलवून टाकणारं होतं! दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तिने सुशांत आणि अभिषेक ला याबद्दल सांगितलं! आज ती पुन्हा तिच्या घरी जायला निघणार होती! 

"थँक्यू अभी! तू माझ्या एका फोनवर इथे आलीस आणि खूप मदत केलीस!" सोनिया तिला मिठी मारून म्हणाली. 

"बस का! मैत्रीत एवढं तर करूच शकते मी! खरंतर मोनिका सापडे पर्यंत मी इथे थांबायला हवं! पण, मी इथे थांबू शकत नाहीये याचं मला खूप वाईट वाटतंय...." ती म्हणाली. 

"तू नको वाईट वाटून घेऊ! खूप मदत केली आहेस तू... आता आपली सी.आय.डी. टीम शोधेल मोनिका ला! मला आता कसलीच काळजी नाहीये... तू स्वतःची काळजी घे! मी रात्री खाली आले होते तेव्हा तू फोनवर बोलताना तुझं बोलणं ऐकलं! तुला स्वतःचे एवढे व्याप असताना माझ्यासाठी तू इथे आलीस हेच खूप आहे माझ्यासाठी! तू स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे..." सोनिया म्हणाली. 

"हो..." अभिज्ञा म्हणाली आणि पुन्हा त्या दोघी एकमेकींना भेटल्या! 

अभिषेक तिला गुप्त रस्त्याने बाहेर घेऊन गेला! 

क्रमशः..... 
**************************
अभिज्ञाने काय पाहिलं असेल त्या खोलीत? गोपाळ काका फाईल घेऊन गेले होते ती संधी आपल्या ऑफिसर्स नी अशीच घालवली तर नसणार! त्यांना यातून काय हाती लागलं असेल? त्या खोल्या बदलणं आणि तो आवाज येणं हे कसं होत असेल? पाहूया पुढच्या भागात! अभिज्ञा आणि अगम्य आता पुस्तकात जाणार आहेत! तेव्हा नक्की काय घडेल हे जाणून घेण्यासाठी लूप होल चा पुढचा भाग वाचायला सुद्धा विसरू नका! तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. 

🎭 Series Post

View all