Login

रहस्यमय हवेली (भाग -१२)

Mystery of mansion.

रहस्यमय हवेली (भाग-१२)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
सुशांत ने पाठवलेल्या रिक्षेच्या डिटेल्स वरून निनाद आणि गणेश त्या रिक्षा चालकाच्या घरी गेले. पण, सुशांत ने जो रिक्षावाल्याचा फोटो पाठवला होता तो तर हा नव्हताच! 

"तुझं नाव काय?" गणेश ने विचारलं. 

"माझ्या घरी येऊन मलाच नाव विचारतोस? कोण तू?" रिक्षा चालक नशेत म्हणाला. 

गणेश ने सी.आय.डी. च आयकार्ड दाखवलं! 

"सी.... सी... सी.आय.डी!" त्याची नशा एकदम उतरली. 

"बोल... नाव काय तुझं?" निनाद ने विचारलं. 

"ह... ह... हरी!" तो हात जोडून घाबरत म्हणाला. 

"हरी! मला सांग तुझी रिक्षा कुठे आहे?" गणेश ने विचारलं. 

"रिक्षा! चार दिवसा पूर्वी च चोरीला गेली... खायला सुद्धा पैसे नाहीत ओ.... तुम्हाला सापडली का माझी रिक्षा? द्या ना मला परत..." हरी रडत रडत म्हणाला. 

"चोरीला गेली? तू खोटं बोलत नाहीस कशावरून?" निनाद ने विचारलं. 

"या.. बाटलीची शपथ! आणि तक्रार पण केली होती मी पोलीस स्टेशन मध्ये..." हरी म्हणाला. 

"तक्रार केल्याचा पुरावा दाखव..." गणेश म्हणाला. 

 हरी ने तक्रार केल्याची कॉपी कशीबशी शोधली आणि त्यांना दाखवली! गणेश ने ती नीट बघितली.... 

"हम्म! कुठं ठेवली होतीस रिक्षा?" निनाद ने विचारलं. 

"माझीच चूक झाली! रात्री बार मध्ये गेलो आणि रिक्षेला चावी तशीच होती.... बाहेर आलो तेव्हा सुद्धा रिक्षेचं लक्षात नाही आलं! दुसऱ्या दिवशी नशा उतरल्यावर लक्षात आलं तेव्हा रिक्षा तिथे नव्हतीच!" हरी ने पुन्हा रडत रडत सांगितलं. 

"कळलं ना नशा किती वाईट ते! एवढं होऊनही तू आज पित च होतास!" निनाद म्हणाला. 

हरी काहीही बोलला नाही... मान खाली घालून नुसता उभा होता! 

"कोणत्या बार मध्ये गेला होतास?" गणेश ने विचारलं. 

"झुमो देशी बार!" हरी म्हणाला. 

"ठीक आहे! रिक्षा सापडली की कळवतो आम्ही.." गणेश म्हणाला. 

निनाद आणि गणेश तिथून निघाले... 

"सर, आता झूमो बार मध्ये जायचं का?" गणेश ने विचारलं.

"उपयोग नाही! हा हरी तिथे रात्री गेला होता..  शिवाय, तो बार आड वाटेला आहे!" निनाद म्हणाला. 

"मग आता काय करायचं?" गणेश ने विचारलं.

"सगळ्या शहरात त्या रिक्षाचा नंबर आणि सुशांत ने दिलेला फोटो पाठवूया! चेकिंग वाढवायला सांगू! त्या माणसाने रिक्षा बाहेर काढली की आपसूकच समजेल." निनाद म्हणाला.

गणेश ने लगेच सगळ्या शहरात नाकाबंदी करायला सांगून रिक्षेचे डिटेल्स पाठवले. त्या रिक्षा चालकाला संशय नाही आला पाहिजे याची खबरदारी सुद्धा घ्यायला सांगितली. 
************************
इथे नियती रिसर्च सेंटर मध्ये प्रत्येकावर नीट लक्ष ठेवून होती. कोण कोणाशी कसं बोलतं, कोण रवींद्र ला मिळालेलं असेल, त्यांचा नक्की कोणता रिसर्च सुरू होता! या सगळ्याची ती उत्तरं शोधत होती. 

"नियती! आज जरा तुला वेगळं काम करावं लागेल! तुझा कामातला काटेकोरपणा बघून तुला ही जबाबदारी द्यायचा मी विचार करतोय! करशील?" डॉ. अभिनव यांनी विचारलं.

"हो सर! नक्कीच! तुम्ही एवढ्या विश्वासाने सांगताय तर का नाही! पण, काम काय आहे?" नियती ने विचारलं.

"बरेच रिसर्च पेपर्स नीट मेंटेन केलेले नाहीयेत, काही स्टाफ डिटेल्स सुद्धा अपूर्ण आहेत तर ते काम तू करशील का? हे तुझं काम नाहीये मान्य पण, तुझा कामातला काटेकोरपणा, आटोपशीर बांधणी छान आहे." डॉ. अभिनव म्हणाले. 

"हो सर नक्की करेन! त्या निमित्ताने मी अजून काही गोष्टी शिकू सुद्धा शकते..." नियती स्मित करत म्हणाली.

डॉ. अभिनव यांनी तिला सगळा डेटा असलेला पेन ड्राईव्ह आणि एक लॅपटॉप दिला.
****************************
सी.आय.डी. ब्यूरो मध्ये सुयश सर आणि बाकी सगळे सोनिया च्या मुलीला कुठे ठेवलं असेल, पुढच्या काय हालचाली करता येतील यावर विचार करत होते... एवढ्यात निनाद आणि गणेश आला... 

"सर! शहरात सगळी कडे नाका बंदी लावली आहे... ती रिक्षा कुठे दिसली की आपल्याला लोकेशन येईल... तो रिक्षा वाला नक्कीच सोनिया मॅडम च्या मुलीला जिथे ठेवलं आहे तिथे जाण्याची शक्यता आहे... त्याच्या मागावर राहून आपल्याला काहीतरी नक्कीच समजेल..." निनाद म्हणाला. 

"ओके! गुड!" सुयश सर म्हणाले. 

इतक्यात सोनाली आणि ईशा बाहेरून आल्या! 

"सर! आम्ही दोघी रवींद्र च्या घरी गेलो होतो... ते घर मागचे सहा ते सात महिने बंदच आहे... आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा त्याला बरेच महिने बघितलं नाहीये..." सोनाली म्हणाली. 

"सर, आपण ते घर उघडून बघितलं तर? तो असा कोणता रिसर्च करत होता हे समजू शकलं तर बरं पडेल ना..." ईशा म्हणाली. 

"हो! निनाद, गणेश! तुम्ही दोघं इथे विक्रम ला मदत करायला थांबा! त्या रिक्षेचा ट्रेस लागला की नीट लक्ष ठेवा. मी ईशा आणि सोनाली बरोबर जाऊन रवींद्र च्या घरी तपास करतो." सुयश सर म्हणाले. 

"ओके सर!" गणेश आणि निनाद म्हणाले. 

सुयश सर, ईशा आणि सोनाली रवींद्र च्या घरी गेले. 
***************************
हवेली मध्ये सुशांत ती खरी तलवार कशी बाहेर काढता येईल याचा विचार करत होता! त्याने त्याच्या मित्राला त्या तलवारीचा फोटो पाठवून तशीच्या तशी तलवार तयार करायला सांगितली होती! एक तासात हवेलीच्या थोड्या अंतरावर तो आणून देणार होता! सोनिया ने तिच्या मैत्रिणीला फोन करून पूर्व कल्पना दिली होती आणि ती दोन तासांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये च जाणार होती... या दोन तासातच त्यांना काहीतरी हालचाली करून तलवार लॅब मध्ये पाठवायची होती... 

"काका! खूप भूक लागली आहे तुम्ही काहीतरी खायला करून आणाल का?" अभिषेक ने गोपाळ काकांना तिथून जाण्यासाठी म्हणून सांगितलं. 

"आणतो! आज जेवायला काय करायचं आहे ते पण सांगा म्हणजे थोड्यावेळात मी बाजारात जातोय तेव्हा भाज्या घेऊन येतो..." गोपाळ काका म्हणाले. 

"काहीही चालेल.... तुम्ही कराल ते आम्ही खाऊ... निदान आता दोन तास तरी आम्हाला डिस्टर्ब करू नका खूप महत्त्वाचं काम करायला आम्ही सुरुवात करणार आहोत!" सुशांत म्हणाला.

"बरं!" गोपाळ काका म्हणाले आणि आत स्वयंपाक घरात गेले. 

"अभिषेक! तुला आत्ता एक महत्वाचं काम करायचं आहे... मी अर्ध्या तासापूर्वी माझ्या मित्राला तशीच्या तशी तलवार तयार करायला सांगितली आहे... ती घेऊन तो येतच असेल... ती तलवार इथे घेऊन ये... नंतर ही खरी तलवार घेऊन तू आणि सोनिया मॅडम फॉरेन्सिक लॅबमध्ये जा! इथे सगळं मी सांभाळून घेईन..." सुशांत म्हणाला. 

"ओके... जाताना नीट जावं लागेल... जर मॅडम वर कोणी पाळत ठेवून असेल तर सावधपणे जावं लागेल..." अभिषेक म्हणाला. 

एवढ्यात गोपाळ काका त्यांना चहा आणि शेवयाचा उपमा घेऊन आले... त्यांना खायला दिलं आणि पुन्हा आत गेले. सगळ्यांचं खाऊन झाल्यावर सगळी आवरा आवर करुन ते बाजारात जायला निघाले... 

"काका! रात्री तुम्ही इडली, चटणी आणि सांबार करू शकता का? जरा रात्री हलकं जेवण होईल ना.... तुम्ही आत्ता बाहेर चालला आहात तर घेऊन या सामान..." सुशांत म्हणाला. 

"त्यासाठी त्या पुढच्या बाजारात जावं लागेल... इडली च पीठ आणायला.... यायला उशीर होईल... तुम्हाला चालेल का? तर जातो..." गोपाळ काकांनी विचारलं.

"हो चालेल... तसंही आता आम्ही कामात व्यस्त असणार.. तुम्ही कधीही या चालेल..." सुशांत म्हणाला. 

गोपाळ काका बरं म्हणून बाजारात गेले. एक दहा मिनिटात सुशांत च्या मित्राचा फोन आला... अभिषेक त्याच्याकडून ती तलवार घेऊन आला आणि सोबत काही नवीन कपडे आणि हेल्मेट सुद्धा त्याने आणले होते... 

"हे काय?" सुशांत ने विचारलं.

"हे सोनिया मॅडम तुमच्यासाठी! प्लीज पटकन हे नवीन कपडे घालून या... म्हणजे कोणी ओळखणार नाही... हेल्मेट सुद्धा आणला आहे..." अभिषेक म्हणाला. 

सोनिया तयार होऊन आली... सुशांत ची बाईक घेऊन अभिषेक आणि सोनिया खरी तलवार घेऊन लॅब मध्ये पोहोचले. तिथे सोनिया ची मैत्रीण आलीच होती! 

"काय कशी आहेस? किती वर्षांनी भेटतोय ना आपण!" अभिज्ञा सोनियाला मिठी मारून म्हणाली. 

"मी मस्त... तू आणि बाकी सगळे काय म्हणताय?" सोनिया ने विचारलं. 

"आम्ही सगळे पण छान... आत्ता मला डॉ. विजय नी सगळी कल्पना दिली आहे! माझी तुला जी जी मदत हवी ते सांग... जोवर आता तुझी मुलगी सापडत नाही तोवर मी इथेच आहे." अभिज्ञा म्हणाली. 

तिच्या या बोलण्याने सोनिया ला खूप रडू येत होतं! मुलीच्या विचाराने तिचं काळीज तुटत होतं! पण, अभिज्ञाने तिला सावरलं आणि त्या दोघी कामाला लागल्या. 

"हे बघ! ही त्या हवेलीत असणारी तलवार! मी यावर टेस्ट केल्या आहेत पण, मला जी शंका आहे ती खरी आहे का हे तुझ्या तोंडून ऐकायचं आहे..." सोनिया ती तलवार अभिज्ञाला देत म्हणाली.

अभिज्ञाने ती तलवार घेतली आणि टेस्ट करायला सुरुवात केली..... 

क्रमशः.... 
**************************
हो! हो! तुमची आवडती कथा लूप होल मधलीच ही तुमची लाडकी अभिज्ञा! ती आता सोनिया ला मदत करायला आली आहे.. सोनिया ला अशी कोणती शंका आली असेल? अभिज्ञा आता या केस मध्ये कशी मदत करेल पाहूया पुढच्या भागात.... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. 

या कथेचे पुढेचे भाग थोडे उशिरा पोस्ट होतील... तुमची लिंक तुटू नये म्हणून पुढचा भाग पोस्ट होण्याआधी आत्ता पर्यंत काय घडलं याचा थोडक्यात सारांश पोस्ट होईल...  तसदिबद्दल क्षमस्व! 

🎭 Series Post

View all