मीच मला सावरतांना

स्त्री मनातल्या हळुवार भावना.

मीच मला सावरतांना एक पाय मागेच राहिला

कोणाला दिसो ना दिसो, मी स्वत:त दोषच पाहिला.

नीट घातली साडी तरी. बगलेत, कधी खांद्यावर हात

व्यवस्थित पीन लावली तरी लक्ष सारं मेल्या पदरात.

केस मोकळे सोडावेत का? नको आपली वेणीच बरी

गालावर रुळनारी बट, मला ही आवडत असली तरी.

हलका- सलकाच मेकअप, तरी विचार जास्तच झालं

म्हणणार तर नाही ना कोणी, अग बाई! हे काय केलं.

सगळ नीट जमलं तरी पायात अखेर घालतांना चप्पल

यात ही मॅचींग असतं म्हणे, मला मेलीला कुठली अक्कल

मीच मला सावरतांना, मला आवडेल तसंच केलं

मग का मी स्वतः ला, इतरांच्या नजरेतून पाहिलं.

warsha Paddha