Jan 19, 2022
Love

मी छोटू

Read Later
मी छोटू

मी छोटू

हेलो मी छोटू. काय नाव विचारलत. म्हणजे बघा,आई मला कधी छकुल्या म्हणते कधी गोडुल्या. बाबा मला सोनू म्हणतात. आजी बरंच काय काय म्हणते बंडू,गुंडू..असं. आजोबा छोटू म्हणतात मला.

अजून माझा पहिला हँपी बर्थडे व्हायचाय. थांबा मी सांगतो तुम्हाला माझी हिस्ट्री..म्हणजे नं पहिलं माझ्या आईच्या टमीत होतो. तिथे पाणी असतं..त्यात मी भरपूर खेळायचो. आई  कसली कसली गाणी ऐकायची. मलाही ऐकू यायचा तो आवाज. मला ते संगीत फार आवडायचं. आताही आईने ते गाणं लावलं की मी बरोबर ओळखतो. मला ना ते..
राजाराणीची नको
काऊमाऊची नको
गोष्ट मला सांग आई रामाची
वेळ माझी झाली आता झोपेची.. हे गाणं खूप म्हणजे खूप आवडतं.

मी कधी रडू लागलो ना तर माझी पणजी आजी माझ्यासाठी गाणं म्हणते..रडू नको रे तान्ह्या बाळा
हसण्यासाठी जन्म आपुला..मग मी खुदकन हसतो.
माझ्या पणज्या आजीलाही दात नाहीत. माझ्यासारखंच बोळकं आहे तिचं. 

मी जेव्हा आईच्या पोटात होतो ना तेव्हा माझी दिदी आईच्या पोटाला कान लावायची आणि माझा आवाज ऐकायची. मला ती जॉनी जॉनी एस पापा म्हणून दाखवायची परत..ते टेडी बेअर टेडी बेअर टर्न अराऊंडणपण म्हणायची. 

नऊ महिने झाल्यावर आई एडमिट झाली. तिला फार दुखत होतं. मला त्या गुहेत रहायचा खरंच कंटाळा आला होता कारण मी मोठा झालो होतो व त्या जागेत मावत नव्हतो. मी बाहेर यायचे खूप प्रयत्न करत होतो आणि शेवटी सुळक्कन आलो बाहेर. 

नर्सने मला शंभो घातली,पुसलं व सरळ आईच्या दुधाला लावलं. मीपण अगदी सराईतासारखं दुधू पिऊ लागलो. आई माझ्या केसांना कुरवाळत होती. माझ्या लालगुलाबी गालांवरून हात फिरवत होती. 

त्यानंतर सगळीजणं आत आली. माझे बाबा,माझी दिदी व माझ्या दोन्ही आजी. सगळ्यांनी मला डोळे भरुन पाहिलं. दिदूला तर मी तिच्या मांडीवरच हवा होतो. ती मला खाली ठेवायलाच मागत नव्हती. शेवटी कसंतरी बाबा तिला घरी घेऊन गेले. 

दिदूने माझं नाव गोट्या ठेवलय. थोडे दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो.  एक आजी,माझ्या आईची आई,सरुआजी रात्री झोपायला यायची. दुसरी आजी सकाळी यायची. ही दुर्गा आजी,माझ्या बाबांची आई. ती माझ्या सरुआजीसाठी व आईसाठी पोळीभाजीचा डबा व थर्मासमधून चहा घेऊन यायची. थोडा वेळ दुर्गाआजी व सरुआजी माझ्याशी गप्पा मारायच्या.

 दुर्गा आजी मला कोवळ्या उन्हात धरायची. कोणकोण नातेवाईक यायचे. ते माझ्याकडे बघत हा या आजोबांसारखा दिसतो,याचे कान मामासारखे आहेत,डोळे डिट्टो आईसारखे आहेत,ताईसारखा हसतो,काकासारखा पाठीला डाग आहे असं माझं डिटेक्शन करायचे. मी मनात म्हणायचो,"अरे,आता ठेवा रे मला खाली नायतर अजून माझं कायकाय कोणाकोणासारखं दिसतं करत बसाल."

डॉक्टरांनी आम्हाला डिस्चार्ज दिला. मला आणण्यासाठी बाबा,काका,दिदू सगळे आले होते. दाराजवळ येताच आजीने आमच्यावरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला. माझ्या डोळ्यांना पाणी लावलं. 

काकाने तर मला सारं घर दाखवलं. पाचव्या दिवशी माझी पाचवी केली. बारशाला तर खूपजणं आली होती. आत्याने माझ्यासाठी झबली,टोपडी शिवून आणली होती. माझ्या पाळण्याला फुलांच्या माळा लावल्या होत्या. आत्याने माझ्या कानात कुर्र केलं व माझं नाव ठेवलं..वरद. सगळीजणं मला उचलून घेत होती. मी जाम चिडलो होतो. शेवटी रडू लागलो तेव्हा कुठे त्यांनी आईच्या स्वाधीन केलं मला.

दुसऱ्या दिवशी मात्र एकेक नातेवाईक गेले. माझी सरुआजीही आजोबांसोबत तिच्या गावी गेली. जाताना तिने खूप पाप्या घेतल्या माझ्या. 

दुर्गाआजी मला आठवड्यातून तीनदा बाळगुटी भरवते. तिची पाथर आहे. त्यावर थोडं पाणी घालून एकेक औषध  झरवते ती. बरंच काय काय आहे तिच्या बटव्यात लेंडी पिंपळी,मुरुडशेंग,बालहिरडा,बदाम,सुंठ,वेखंड,ज्येष्ठमध..असं बरंच आईला नावं सांगत असते. 

आजी मला दोन पायांत धरते. एक बोट माझ्या तोंडात घालून तिच्या चिऊच्या चमच्याने मला औषध भरवते. खूपच कडू औषध असतं ते. मी फुर्र फुर्र करुन टाकून द्यायला बघतो पण आजीला माझ्या ट्रीक्स माहिती आहेत. ती मला औषध पाजूनच शांत होते. मी बराच वेळ हुंदके देऊन रडतो. 

आजी मला उभं धरुन माझ्या पाठीवरून हात फिरवते. मी मग ढुरुक ढुरुक ढेकर काढतो. मी रडत असताना दिदू बाजूला असली तर ती मला खुळखुळं वाजवून दाखवते,नाचून दाखवते. तिला मी रडलेलं आवडत नाही. 

आजोबा मला मांडीवर घेऊन टिव्ही बघत बसतात,माझ्याशी बोलतात,खेळतात. मीही माझं बोळकं पसरुन हसून दाखवतो. माझ्या हातांच्या मुठी चोखायला खूप आवडतं मला. आता मला सायकल चालवता येते पायांची. 

बाबांनी खिडकीला रंगीत पताका,फुगे लावलेत. ते वाऱ्यासोबत डोलतात मग मी माझ्या पायांची सायकल चालवतो. माझ्या जीभेवर दिदू हळूच रसनाचा थेंब ठेवते. मी तो मिटक्या माळत चोखतो. 

काका मला खेळवायला त्याच्या रुममधे घेऊन जातो. तो मला त्याचा फ्रैंडच समजतो. एकदोनदा मी काकाच्या शर्टवर फवारा सोडलाय. एकदा तर त्याचे पेपर्स भिजवलेले पण तो माझ्यावर रागवत नाही. उलट म्हणतो,"बस काय राजे,हीच जागा भेटली तुम्हाला फवारणी करायला. कामं वाढवून ठेवता तुम्ही आमची." मी त्याला खुदकन हसून दाखवतो.

आत्या तिच्या सासरी गेलेय खरी पण तिचा अर्धा जीव इथेच असतो मग ना काका तिला व्हिडीओ कॉल लावतो. ती व्हिडिओतून बोलते माझ्याशी. मला फ्लाईंग किस देते. 

मला सातवा महिना लागला नि आम्ही मामाच्या गावी गेलो,झुकझुकगाडीतून. मामाचं घर छान चिरेबंदी आहे. तिथे गेल्यावर आजीने आमच्यावरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला. मामाचा मोती तर आम्हाला बघून उड्या मारु लागला. मामाचं घर शेणाने सारवलेलं आहे. सरुआजीने माझ्यासाठी छानछान गोधड्या शिवल्या आहेत. मी झोपतो त्यांच्यावर. 

या आजीचा बाथरुम माडाच्या मुळात आहे,नारळाच्या झावळ्यांनी बांधलेला. आत एक मोठी फडतर आहे. आजी चुलीवर मोठ्या मडक्यात पाणी तापवते. ते बादलीत घेते. मामी त्यात थंड पाणी घालते,ज्याला इस्वान म्हणतात. मग आजी फडतरीवर बसते. नेसन वर खोचून घेते. मामी मला आजीच्या मांडीवर ठेवते.

 तितक्यात आई  बेसन,आंबेहळद पाण्यात मिक्स करुन आणते. आजी तिची बोटं पाण्यात घालून पाण्याचं तापमान बघते व तांब्याने माझ्या अंगावर पाणी ओतते. पाणी अंगावर पडताच मी अंग काढतो. आजी मला उटणं चोळते. माझी पाठ,हात,पोट,नाक,तोंड सगळं चोळून काढते. मामी माझ्या अंगावर पाणी ओतते. मग पुन्हा आजी मला साबण लावते. माझं नाक हळूहळू ओढते. मी आजीच्या अंगावर फवारा सोडून देतो. आजी खुदकन हसते. मग ती मला मांडीवर बसवते व माझ्या अंगावर पाणी ओतते. माझ्या कानात कुर्र कुर्र करते. 

मला थंडी वाजेल म्हणून आई दुपटं घेऊन दारात उभी असते. आजी मला दुपट्यात गुंडाळून मामीकडे देते. मामा एका तव्यात ओव्या,धुपाची धुरी करुन बसलेला असतो. तो मला धुरीवर धरतो. तंदुरीसारखा मला शेकून काढतो. मी कधीकधी धुरीतपण धार सोडतो. दिदूला हे सगळं बघायला फार आवडतं. धुरी झाली की आई मला आजीच्या साडीत गच्च गुंडाळते. माझे पाय,हात बांधून घालते. मला टोपरं घालते. आजी मला थोडी काळी तीट लावते. आई मला दुधू देते. मी पेंगू लागतो आणि थोड्याच वेळात झोपी जातो. 

रात्रीचं आईला उठवायला मला अजिबात आवडत नाही पण मला जोराची शू लागली की मला बांधलेलं सगळंच ओलं होतं. मी कुडकुडतो मग टेंटें करतो. आई मला त्यातून सोडवते,डेटॉलच्या पाण्याने पुसते व परत गुंडाळते व दुधू देते. 

काल मामाने मला मांडीवर घेऊन चांदीच्या वाटीतून चांदीच्या चमच्याने खीर भरवली..गोड होती. आता मीपण हळूहळू वरणमाम खायला लागणार. दिदूच्या बाजूला बसून दिदूसोबत जेवणार मी मोठा झालो की.

मामीलाही बाळ होणारय म्हणत होती आजी म्हणजे मी दादू होणार. मला मामाने भरपूर खेळणी आणली आहेत. खूप साऱ्या गाड्या..मला त्यांचे रंग आवडतात. मी जे दिसेल ते तोंडात घालतो मग दिदू मला डोळे मोठे करुन दाखवते. 

मामा मला घराच्या अवतीभवती फिरवतो. सगळं हिरवंगार,मस्त वाटतं. मोती आमच्या मागेमागे फिरतो. मी आता ढोपरावर फिरतोना तर मांजर मला पाहिलं की पळत सुटतात कारण मी त्यांना पकडतो नि चावतो.

 त्यादिवशी मी उंबऱ्यावरुन गोलांटीउडी मारली. ओठ फुटला. लाललाल रक्त आलं आईने चटकन मला दुधूला धरलं मग मी शांत झालो. अशा उचापती मी करतच असतो. 

परवा मला डॉक्टरकाकांकडे न्हेलेलं. कसलंतरी इंजेक्शन माझ्या ढुंगुवर दिलं त्यांनी. घरी येईस्तोवर ढुंगू सुजला माझा,त्या पायाची मांडीही सुजली. रात्रभर मामा मला उचलून घेऊन फिरवत होता. माझ्या पायाला आई,मामी शेक देत होत्या. सगळीच जागी होती. मी रडलो की दिदूपण रडायची. सकाळी कुठे माझ्या ढुंगुची सूज उतरली. 

अशी माझी एकंदरीत मजा चालू आहे..या आजीकडून त्या आजीकडे. सगळेजण माझे भरपूर लाड करतात. चला मला गाई आली आता. मी झोपतो. शुभरात्री.

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now