मी बाप्पा बोलतोय

It's the truth which realizes to me ,no intension to hurt anyones feeling ,whatever I felt , I put it in words

मी बाप्पा बोलतोय

गणेश चतुर्थी जवळ आली आणि मनात एक रुखरुख वाटायला लागली की,आपण या वर्षी सगळे एकत्र येऊन साजरी करू शकत नाही ,मोठ्या दिरांचा फोन आला,ते म्हणाले, आपण बाप्पाला घरी आणतो त्याची पुजा अर्चा करतो आणि विसर्जनाच्या वेळी साकडे घालतो ,

जाहले भजन, आम्ही नमितो तव चरणा,वारुनिया विघ्ने,देवा रक्षावे दिना,

निरोप घेता आता ,आम्हा आज्ञा असावी,चुकले आमचे काही,त्याची क्षमा असावी.

 आपण सगळ्यांवरचं विघ्न टाळण्यासाठीच एकत्र न येण्याचा निर्णय घेत आहोत आणि त्याबद्दल हवं तर देवाची क्षमा ही मागू, या वर्षी आपण ऑनलाइन आरती करू ,तसेही त्यांच्या शब्दाबाहेर कुणी नाही,सगळे हो म्हणाले.

गूगल मीट वर सगळे आपापल्या घरातून जॉईन झाले, गणपती प्रतिष्ठापनेचा सगळा विधी सगळ्यांनी आपापल्या घरातून अटेंड केला ,आरतीच्या वेळी सगळे उभे राहिले ,प्रत्येकाच्या घरात आरतीचे ताट तयार होते,एकाच वेळी सगळीकडे आरती चालू होती ,आरती करत असताना देव्हा-यातल्या बाप्पाकडे एकटक पाहत असताना असं जाणवलं,की बाप्पा बोलायला लागला आणि म्हणाला, मी बाप्पा बोलतोय,मी ह्या वर्षी नेहमी प्रमाणे सगळ्यांच्या भेटीला आलो आहे , नेहमीप्रमाणे तुम्ही सर्वांनी माझे छान स्वागत केले ,पण या वेळी जो साधेपणा होता ना ,तो माझ्या मनाला खूप भावला.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली,तसं करण्यामागचा त्यांचं उद्दिष्ट वेगळेच होते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गणेशोत्सवाला व्यावसायिक रूप प्राप्त झाले होते .  गणपती उत्सवात भक्ती कमी आणि मनोरंजन जास्त प्रमाणात वाढले होते, गणपती मंडळे आपला कार्यक्रम जास्त छान व्हावा ,म्हणून लोकांवर देणग्या लादू लागली ,तिथे माझं मन कुठंतरी खट्टू व्हायचं, देणगी स्वत:हून देणे आणि जबरदस्ती करणे यात फरक असतो , काहींची परिस्थिती नसली तरी त्यातही काटकसर करून ते देणगी द्यायचे ,पण कमी देणगी देणाराला जी वागणूक मिळते ती पाहून मन उदास व्हायचं आणि असं वाटायच हा सण नेमका तुम्ही माझ्यासाठी साजरा करत आहात की , एकमेकांना कमी लेखण्यासाठी,तुम्ही हे ही विसरलात की,देव हा भक्तीचा भुकेला असतो ,त्याची उदाहरणं तुमच्या समोर असताना देखील तुम्ही असे कसे वागू शकतात ,जसं कृष्णाला सुदाम्याचे पोहे आवडायचे ,रामाला शबरीची बोरं,तरी तुम्ही लोकं नुसतच्ं भौतिक सुखाच्या मागे जे धावत आहात ,याचा अंत चांगला नाही. एकिकडे तुम्ही माझ्यासाठी खूप पैसे खर्च करत असता आणि दुसरीकडे एखादा भूक लागलेला मनुष्य जर तुमच्या कार्यक्रमात आला, तर त्याला हाकलून लावण्यात कोणतीच कसर बाकी ठेवत नाही. मी माणसाला सगळ्यात बुध्दिमान बनवले ते यासाठी की,त्याने बुध्दीचा वापर करून सगळ्यांचे हित चिंतावे ,पण तुम्ही सगळे तर विनाशाच्या मार्गावर जात आहात ,कधी कळणार तुम्हाला की ,मी तुमच्या प्रत्येकात आहे,चांगली कर्मे करा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता,तुम्हाला त्यातून जे समाधान मिळेल ना त्याची तुलना तुम्ही कशाशीच करू शकत नाही,माझी जास्त अपेक्षा नाही तुमच्या कडून,माणूस आहात ,माणूस म्हणून जगा आणि दुस-यालाही माणूस म्हणून जगू द्या.

यावर्षी मला इथे शांततेत राहायला मिळाले,त्या बद्दल मी तुम्हां सर्वांचा खरचं खूप आभारी आहे,नाही तर तुम्ही जे लाऊड स्पीकर लावायचे ,मला नेहमीच कानात बोळे घालावे लागायचे ,त्यामुळे तुम्ही जी प्रार्थना करायचे ,ते ऐकू येत नव्हते ,पण तुम्ही या गोष्टींचा कधी विचारच नाही केला ,तुम्ही नेहमी स्वत:तच गर्क असायचे. या वर्षी मला तुमच्या प्रार्थना ऐकायला आल्या आणि टाळ मृदुंगाच्या तालावर जेव्हा तुम्ही भजन म्हणत होतात ,तेव्हा मीही तल्लीन होवून नाचत होतो ,इतर वेळी मात्र डीजे समोर तुम्ही नाचायचे आणि हतबल होवून मी पाहत राहायचो. यावर्षी जी आरास तुम्ही लोकांनी स्वतःच्या हाताने केली ,त्याने माझं मन अगदी भरून आलं. तुम्ही तर आपापल्या घरात राहून माझी पुजा आरती करत आहात ,पण काही लोक इकडे तिकडे जाऊन मला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत ,तर मला त्यांची कीव येते , त्यांना स्वतःची काळजी नाहीच,पण ते दुस-यांनाही धोक्यात टाकत आहे. तुम्ही माझी प्रार्थना करून मला साकडे घातले आहे की ,मी तुमचं रक्षण करावं ,पण मी तुम्हाला आधीच सांगितल की ,मी तुमच्या प्रत्येकाच्या मनात आहे ,अरे वेड्यांनो,तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका , मी तुम्हांला मदत करायला तयार आहे ,पण तुम्ही स्वत:ही तुमची स्वतःची मदत केली पाहिजे,तर मी काही तरी करू शकतो . तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी न घेता सगळीकडे फिरणार आणि म्हणणार,माझा देवावर विश्वास आहे,मला काही नाही होणार ,तर मी तुला म्हणून सांगतो,जो स्वतःची मदत करतो ,त्यालाच मी मदत करू शकेन. यावर्षी काही सार्वजनिक मंडळांचे मला कौतुक करावस्ं वाटतं की, त्यांनी यावर्षी ब्लड डोनेशन कंपू लावले ,गरजू लोकांना मदत केली, सीमेवर लढणा-या सैनिकांच्या घरच्यांना मदतीचा हात दिला. अजून एक सांगायचे राहिले ,तुम्ही लोक मला नवस करता , नवस करताना असे करा ,की माझे हे काम झाले तर मी अनाथ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेईन,एखाद्या वृध्दाश्रमात जाऊन त्यांना एक दिवस का होईना आनंद देईल,माझ्या कुवती प्रमाणे मदत करेल,ज्यांना जेवण मिळत नाही ,त्यांना जेवायला घालेन , ज्यांना मेडिकल सुविधची गरज आहे ,त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे मदत करेल,असं करून पाहा ,तुम्हाला यात जास्त आनंद मिळेल. खरं सांगू का तुमचे जे नवस पूर्ण होतात ना ,ते केवळ तुमच्या जिद्दीमुळे,मेहनतीने,चिकाटीने आणि सचोटीने,मी फक्त नाम मात्र असतो,तसा माझा आशिर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी असतो ,काही जण नेहमीच मला प्रश्न विचारतात की,देवा माझ्या वाट्यालाच एवढं दु:ख का ?

मी त्यांना सांगू इच्छितो की, दु:ख अनुभवल्यानंतर जे सुख चाखण्यात मजा असते ना ,ती अवर्णनीय असते आणि एक वेगळेच समाधानही लाभते . काही जण मला प्रश्न विचारतात की ,मी मेहनत घेतो तरी मला यश लवकर मिळत नाही आणि त्याला काही न करता यश लवकर मिळते ,त्यांना मला असं सांगावस वाटतं की, तुमची यशाची व्याख्या एकदा तपासून पाहा ,यश ते असते जे मेहनतीने आणि चांगल्या मार्गाने मिळवलेले असते आणि जे मिळवताना  तुम्ही कुणालाही दुखावलेले नसते ,रात्री झोपताना पडल्या पडल्या झोप लागते.

आयुष्यात संकट आले की ,आपण अजून निपुण होतो आणि आपल्या आतील सूप्तगुणांचा विकास होतो ,कारण तो पर्यंत आपल्याला आपल्या त्या गुणांची माहितीही नसते, म्हणून आयुष्यात संकट येत राहतात ,जेणे करून तुम्ही तुमचं स्वत:च आस्तित्व शोधू शकता आणि स्वत:ला सिध्द करु शकता . आता ही करोनामुळे सगळेच धास्तावले आहात, या सगळ्या परिस्थितीमुळे तुम्हाला या गोष्टीची पूर्ण कल्पना आली आहे की,भौतिक सुखापेक्षा आंतरिक सुख जास्त महत्त्वाचं, जीवनाचा काही भरोसा नाही तर एकमेकांशी सगळे रागलोभ विसरून आनंदाने रहा , सध्याच्या परिस्थितीत तरी जो आरोग्यदायी आयुष्य जगत आहे ,तो सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोण कसं आहे ,याचा प्रत्यय तुम्हाला आलाय ,राजकारणातील व्यक्तिंच खरं रूपही तुमच्या समोर आलं असेल तर पुढे तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल ,कारण सत्य परिस्थिती तुमच्या समोर आहे.महाभारतात युध्द झालं कारण,एकिकडे श्रीकृष्णाच ऐकणारा अर्जून होता जो धर्माची बाजू होता आणि दुसरीकडे अधर्मी दुर्योधन होता ,या धर्म युध्दात उशीरा का होईना,विजय धर्माचाच झाला म्हणजे सत्याचा झाला आणि आता पर्यंतचा इतिहास जर पाहिला,तर सत्याला नेहमीच परिक्षा द्यावी लागते ,कारण त्याला इतिहास रचायचा असतो आणि इतरांना प्रेरणा द्यायची असते ,सध्याच्या परिस्थितीत असंच काहीतरी चालू आहे ,तेव्हा सत्य आणि सचोटीची कास सोडू नका ,कारण रात्रीनंतर दिवस हा सृष्टीचा नियमच आहे ,जसं दु:खानंतर सुख ,तसचं -हास त्यानंतर प्रगती आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे होतं ते चांगल्यासाठी,सगळ्यांच्या भल्यासाठी आता हेच बघा ना शेजारील राष्ट्रांनी सुध्दा, या काळात आपले रंग दाखवले आणि त्यामुळे आपली सेना नवीन उपकरणांनी आणि तंत्रज्ञानी जास्त मजबूत केली गेली ,जे वर्षोंनूवर्षे झालं नाही ,ते आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी लगेच अंमलात आणलं गेलं,मनुष्य स्वभाव आहेच असा की,जो पर्यंत संकटात पडत नाही ,तोवर प्रयत्न आणि बुध्दिला चालना देत नाही.

आता किती काही केलं तरी तुमच्या बुध्दिला हा प्रश्न पडला असेल की,तुम्हांला हे सांगून मला काय मिळणार ,त्यात तुमची काही चूक नाही मनुष्य स्वभाव आहे तो ,तरी तुमच्या समाधानासाठी सांगतो ,माझा यात काही स्वार्थ नाही,तुम्हीही काही गोष्टी निस्वार्थपणे करा आणि माझ्या सारखाच आनंद लुटा आणि हो पुढच्या वर्षी पण माझे जंगी स्वागत करा ,पण त्यावेळी सांगितलेल्या गोष्टींचा विचार करून आमलात आणण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या भावना तुमच्या पर्यंत पोहोचावायचं काम केलं ,बाकी तुम्ही सुज्ञ आहात, तसंही माझी प्रस्थानाची वेळ झाली आहे .

मुर्ती एकदम शांत होते ,या दिवसांत एवढ्या सा-या गोष्टी बाप्पाने त्याच्या नजरेतून उमगल्या त्यामागे त्याच काही तरी उद्दीष्ट असेल आणि मी एक माध्यम असेल ,म्हणून हा लेख लिहिण्यास प्रारंभ केला,कारण जास्त उशीर होण्याआधी सूचना दिलेली कधीही चांगली नाही का ?

हा लेख वाचून अभिप्राय अवश्य द्या आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर बाप्पा तर खुश होईलच ,पण माझा ही हा लेख लिहिण्या मागचे उद्दीष्ट साध्य होईल, कारण सद्य परिस्थितीत काही बदल झालेच पाहिजे ही काळाची गरज आहे,ही गोष्ट मान्य करा ,तरच आमलात आणण्यास मदत होईल, हा लेख लिहिण्यामागे कुणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही,जर दुखावल्या असतील तर क्षमस्व ,पण जर नीट विचार केला तर ,विचार नक्की पटतील ह्याची खात्री वाटते,धन्यवाद .

वाचत रहा,हसत रहा,आनंदात रहा ,आयुष्य भरभरून जगा.

रुपाली थोरात