Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

माय वर्ल्ड मम्मा

Read Later
माय वर्ल्ड मम्मा


स्पर्धा - "राज्य स्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा"

विषय - आणि ती हसली

शीर्षक - माय वर्ल्ड मम्माचमचमत्या चांदण्यांचा
कैफ आज अंबरात
हळव्या त्या ममतेचा
बंध आज या उरात
जाईन जरी कुठवरी
वंदनीय तिचे पाय
माझी माय .. माझी माय .. माझी माय..
माझी माय…… !

रेडिओवर एका गायिकेची मुलाखत चालू होती त्यामध्ये तिने हे गीत गुणगुणलं .. आणि पुढे मुलाखत कंटिन्यू झाली . रिक्षात बसलेली राणी तल्लीन होऊन हे गीत ऐकत होती आणि जसं हे गीत संपलं तसं ती तिच्या आई जवळ गाण्यासाठी हट्ट करायला लागली .

"आई ऽ ते....ते...पायजे ."

ड्रायव्हरने तिरप्या नजरेने तिच्याकडे पाहिल , तसा तो रिक्षात बसल्यापासून तिरप्या नजरेने राणीकडे पाहतच होता . पण शारदाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं . जी व्यक्ती पहिल्यांदा राणीला पाहील ती पुन्हा वळून तिला पाहायची हे शारदाच्या अंगवळणी पडलेलं . तिने आधी राणीला हळू आवाजात समजावलं नंतर रिक्षावाल्याला विचारलं ,

"अजून किती टाईम ?"

"हे घ्या पोचला."

रिक्षावाला पानाची पिचकारी रस्त्याच्या कोपऱ्यात मारत बोलला .

"आव दादा , आस कुठं बी थुकू न्हाई ."

तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो मीटर बघत बोलला ,
"पन्नास रूपये "

तिने मान हलवत आपल्या पिशवीतून पाकीट काढून त्याच्या हातावर पन्नासची नोट ठेवली‌ आणि रस्त्याने चालू लागली . त्या उंच उंच इमारती , तिथली स्वच्छता , येणारे जाणारे श्रीमंती दाखवणारे कपडे घातलेले लोकं , त्यांच कानावर पडणार फाडफाड इंग्लिश हे सगळं पाहून ती बावरली .

\"कसे असतील ते लोक ? माझ्यासारख्या गरीब बाईला कामावर ठेवतील ना ? त्यांना माझ्या राणीचा तरास तर होणार न्हाई ना आणि राणी ? तिला कसं सांभाळू काम करताना ?\"

एक ना अनेक प्रश्नांनी शारदाच्या डोक्यात रिंगण घातलेलं .  हाताला हिसका बसल्यावर तिच आपल्या मुलीकडे लक्ष गेलं . ती डोळ्यांच्या बाहुल्या वरती करून अप्रूप पाहिल्यासारखं त्या उंच उंच इमारती पहात उड्या मारत चालत होती .

कागदावरील पत्त्याची खात्री करून ती बिल्डिंग जवळ गेली . पण वॉचमनने तिला तिच्या कपड्यांवरून हटकलं .  तो  तुसडेपणाने बोलला ,

" ए बाई,  तू इथे काय करतेस?"

त्याच्या अशा खसकन बोलल्याने शारदा बावरली . ती अडखळत बोलली,
"ते दुसऱ्या मजल्यावरच्या बाईंच्या इथ कामासाठी आलोय."

"फ्लॅट नंबर किती ?"
त्याने अविश्वासाने विचारलं .

शारदाने पटकन कविताला फोन करून खात्री करून त्याला फ्लॅट नंबर सांगितल्यावर वाॅचमनने त्याच्या डायरीत एन्ट्री केली . 

समोरचा मेन काचेचा लॉक दरवाजा , आतून कोणीतरी आल्यामुळे उघडल्यावर वॉचमन ने तिला लगेच सांगितलं ,

"तो दरवाजा बंद झाला तर दुसरं कोणी येईपर्यंत पुन्हा इथेच अडकशील , पटकन जा."

त्याला नमस्कार करून हातातील पिशवी सांभाळत शारदा राणीला घेऊन पायऱ्यांनी दुसऱ्या मजल्यावर गेली .  रूमच्या बाहेर गेल्यावर तिने राणीचे केस नीट केले आणि तिला पुन्हा प्रेमाने समजावलं ,
" बाळा आयला इथ काम लागलं तर आय तुला खाऊ दिलं . तू यका कोपऱ्यात गपचूप बस .  काय खायला प्यायला मागायचं न्हाई . आय..आय करत माझ्या मागं माग करायचं न्हाई ."

डोळ्यांच्या भावल्या वर करत राणीने डाव्या उजव्या बाजूला मान हलवली . आणि शारदाने अस्वस्थपणे दरवाजाची बेल वाजवली . दोन मिनिटांनी दरवाजा उघडला . मध्यम वयाच्या  नीलिमा ताई चष्म्यातून तिच्याकडे निरखून पाहत होत्या .

समोर पंजाबी ड्रेसमध्ये कानाच्या थोडं खालपर्यंत काळे पांढरे केस असलेली , श्रीमंत चेहऱ्याची , चष्म्यातून  निरखत असलेली व्यक्ती पाहून शारदा अवघडल्या सारखी गालात हसली .

"कोण ?" , नीलिमा ताईंनी कपाळावर आठी आणत विचारलं .

शारदा थोडी बावरली,
"ते कविताने पाठवलेलं .  घर कामाला बाई पायजे व्हती ना ?"

"हो , काय काय येतं तुला ?"
त्या आतमधून बोलल्या .

"बगा म्हंजी, धुणीभांडी  , लादीपोछा , सैपाक सगळं करतो  मी ."
शारदा दरवाजातूनच बोलली .

नीलिमाताईंना तिची भाषा खटकली . कविता ही त्यांची पहिली विश्वासू कामवाली.
\"कविताला माझ्या कामाच्या पद्धत माहिती असून तिने हिला कसं पाठवलं ?\"
नीलिमा ताईंनी मनातच विचार केला आणि त्यांनी पुढचा प्रश्न विचारला ,
"शिक्षण किती ?"

शारदा संकोचून बोलली,
"सातवी पास"

नीलिमाताईंना तिला तिथूनच \"जा बाई \" असं बोलावं वाटलं पण दोन दिवस झालेले शिफ्ट होऊन , कपडे साठलेले , भांडी किचन मध्ये वाट पाहत होती . तिला अजूनही दरवाज्यातच उभं पाहून त्या सूचकपणे बोलल्या .

"आत जाऊन भांड्यांच बघ , आणि हो , मला काम चोख लागतं बरं . काम आवडलं तर ठीक -"

"व्हय बाईसाहेब "
शारदाने एकदा राणीकडे पाहिलं . तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत नीलिमा ताईंना बोलली .

"माझं काम होईस्तवर माझ्या लेकराला एका कोपऱ्यात बसू द्याल का ?"

"चालेल "
नीलिमा ताई पेपर उचलत बोलल्या .

   नीलिमा ताईंची पेपर वरून नजर सहज राणीकडे गेली . एक सात आठ वर्षाची मुलगी हाताची घट्ट घडी घालून थोडीशी मान हलवत डोळ्यांच्या बाहुल्या वर करून बसलेली .

\"ती वर का पाहते ?\" हे बघायला  नीलिमा ताईंनी सुद्धा वर पाहिलं . त्यांना वाटलं राणी अप्रूपाने पाहत असेल पण दहा मिनिटानंतर सुद्धा राणीची नजर तशीच होती . तेव्हा त्यांना थोडे विचित्र वाटलं. त्या तिच्याकडेच पाहत होत्या. 

राणीने सरळ नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि एक-दोन सेकंदात पुन्हा तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या वर गेल्या . त्या थोड्याशा थरथरत होत्या. नीलिमा ताईंना राणीच बघणं खूपच विचित्र वाटलं .

\"जाऊ दे ,मला काय करायचं आहे ?
अशी ही सातवी शिकलेली कामवाली मला नकोच आहे .\" त्या मनातच बोलल्या .

आज त्यांनी गरजेपोटी तिला काम करायला सांगितलेलं , पण त्या पुन्हा शेजाऱ्यांच्या ओळखीने दुसरी कामवाली पाहणार होत्या .
थोड्यावेळाने भांडी , कपडे झाल्यावर शारदा लादी कापडाने पुसू लागली .

"लादी पुसण्यासाठी माॅप आहे."

"व्हय बाईसाहेब , पण त्याला कापडाची सर न्हाय . त्यानं कोपऱ्यातलं , सोप्या खालचं , बेड खालचं न्हाई पुसता येत ." ती तशीच लादी पुसत बोलली .

\"तिला आजच्या दिवसाचे पैसे देऊन घालवायचं \" हे नीलिमा ताईंच आधीच ठरलेलं , त्यामुळे तिचं काम झाल्यावर त्या पॉकेट आणण्यासाठी आतमध्ये गेल्या आणि किचन कट्यावरील स्वच्छ चमकणारी भांडी , दोरीवर अगदी त्यांच्यासारखेच नीटनेटके वाळत घातलेले कपडे पाहून त्यांना तिचं काम आवडलं , लादी सुद्धा एकदम स्वच्छ होती आणि लगेच त्यांचा निर्णय बदलला .

     
       त्यांनी तिला कामावर ठेवून घेतलं . शारदा मनापासून सगळी कामे चोखपणे करत होती . दररोज राणी एका कोपऱ्यात बसून पंख्याकडे बघत बसायची . नीलिमा ताईंना तिचं कोड सुटत नव्हतं .

काही दिवसांनी शारदा सुद्धा थोडीशी मोकळी झालेली . एक दिवस सगळी कामे झाल्यावर दुपारची भाजी साफ करताना नीलिमा ताईंनी तिला विचारलंच,

" ही नेहमी वर पाहते ?"

नीलिमा भाजी साफ करत शांतपणे बोलली,
" तिच्या डोळ्यांच्या भावल्या वरती हायेत."

" म्हणजे हिला दिसतं की दिसत… ??"

" समद दिसतं. "

नीलिमा ताई तिच्याकडे कुतुहलाने पाहत होत्या . हळूहळू त्यांची राणी सोबत ओळख झाली . त्यांच्या विषयी राणीची सुद्धा भीड चेपलेली .
शारदा कडून काम करताना त्यांना तिच्याबद्दल बरीच माहिती झाली . कधी भांडी घासताना , कधी लादी पुसताना ,कधी साफसफाई करताना त्यांनी एक एक प्रश्न विचारून तिच्याबद्दल बरीच माहिती काढलेली आणि शारदा सुद्धा कोणताही आड पडदा न ठेवता जे आहे ते सत्य मांडत होती .

" हिच नाव कोणी ठेवलं ?"

"मीच ! नावात तरी शिरीमंती असावी म्हणून ."

" हिला शाळेत का नाही पाठवत ? "

" वरडोळी बोलून सगळी पोरं चिडवत्यात .  तिच्याकडं बघून हसत्यात . मग ती रडती , आणि ती दुसऱ्यांसारखी न्हाय . थोडं उशिरा समजत तिला . "

"तू तिला स्पेशल चाइल्ड असलेल्या शाळेत का नाही पाठवल .?"
त्यांच्या या प्रश्नावर नीलिमा हसलेली .

" इकडं पोटाची खळगी भरताना माझ्या नाकी नऊ येत ."
आणि थोडी गंभीर होत बोलली ,

"आणि पोरीची जात  !
माझा कुणावरच ईश्वास न्हाई ."

"तुझा नवरा काय काम करतो?"

"माणूस परत्येक कामातनं चार पैक काढायला लागलं , तर कुत्र तरी उभं करल का ? बसला असल कुठल्या पानपट्टी वर बिडी वढत ."

"घरी कोण कोण असतं?"

" सासूपणा मिरवणारी म्हातारी सासू हाय की."

"तुझं घर कसं चालतं?"

" मीच बघतो सगळं ."

" तू सातवीच्या पुढे का नाही शिकलीस ?"

"आई बापाची परिस्थिती नव्हती.
शाळा सोडल्यावर  तीन-चार वर्षांनी लगीन लावून दिलं."


एकदा नीलिमा ताईंनी राणीला रंगबिरंगी मण्यांची मोठी पाटी आणलेली . ती पाटी राणीच्या हातात दिल्यावर राणी धावतच डोळ्यांच्या बाहुल्या वर करत किचनमध्ये गेली आणि ही ऽ  ही ‌ऽ  हसत पाटी   शारदाला दाखवली . तिने ती पाटी पाहिली आणि राणीला तिच्या परीने समजावत बोलली ,

"बाईसाहेबांनी दिली ना ऽ तू त्यांना ही परत दे . आस कुणाचं घ्याच नसतं बाळा . माझा पगार झाल्यावर मी बी तुला असलीच पाटी आणतो , पण् यवढी मोठी नसलं ती ." तिचं बोलणं ऐकून राणीचे ओठ थरथरायला लागले . ती गाल फुगवून रडवेली झाली. तरीपण तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत शारदा पुन्हा बोलली ,

"आग माणसान आयुष्यभर बारीकच र्हाव . ना मोठं व्हावं , ना मोठापणा मिरवावा .. आसल त्यात आनंदी र्हाव ."

तिचं बोलणं राणीला किती समजलं माहित नाही पण तिच्या जीवनाच तत्वज्ञान नीलिमा ताई ऐकतच राहिल्या . त्या मनात बोलल्या ,

\"किती मोठी गोष्ट बोलली ही ! \"


            दिवसा मागून दिवस जात होते निलीमाताईंना सुद्धा आता शारदा आणि राणीचा विरंगुळा झालेला . नवरा आणि मुलगा घरी येईपर्यंत त्या अशाही एकट्याच असायच्या पण आता त्यांनी एकटेपणा या दोघींसोबत वाटून घेतलेला .     एक दिवस दुपारी शारदा सगळी काम उरकून घेतली आणि नीलिमा ताई काढत असलेल्या पेंटिंग कडे बघत बसलेली . नीलिमाताई त्यांचे अनुभव तिच्याशी शेअर करत होत्या . त्यातलं काही तिला कळत होतं तरं काही डोक्यावरून जात होतं पण नीलिमाताईंना कोणाशी तरी अनुभव शेअर केल्याचं समाधान मिळत होतं . त्यांनी सहज तिला विचारल ,

"शारदा तू कधीपर्यंत राणीला सांभाळणार ?
तुझ्या नंतर तिचं काय? कधी विचार केलास ?"

शारदा मांडीवर झोपलेल्या आपल्या आठ वर्षाच्या राणीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत  भाऊक झाली आणि डोळ्याला पदर लावत कातर स्वरात बोलली ,

"जोपर्यंत मी हाय तवर मी तिला माझ्या परिन राणी सारखी सांभाळीन आणि जव्हा जायची येळ यील ,  तव्हा माझ्यासोबतच घेऊन जाईल ."

हे ऐकून नीलिमा ताईंचा ब्रश हातातून गळल्यासारखा झाला . त्यांनी झटक्यात मान वळवून तिच्याकडे पाहिलं ,

" काय बोलतेस तू ?
तुला कळतंय का ?"

शारदा पदरान डोळे पुसत  नाक ओढत बोलली ,
"जग लय वंगाळ ..माझा कुणावरच ईश्वास न्हाई , तिच्या बापावर सुद्धा न्हाई .

मरण कोणाच्या हातात असतं व्हय . पण जर मला आधीच कळलं माझी येळ आलीये तर....
   तिला बी माझ्या सोबतच घेऊन जाणारं ."

तिचं उत्तर ऐकून नीलिमाताई सुन्न झालेल्या .

        त्या दिवसानंतर नीलिमा ताईंनी त्यांचा दुपारचा संपूर्ण वेळ राणीला द्यायचं ठरवलं . शारदा काम करेपर्यंत त्या राणीला मराठी आणि इंग्रजी शिकवू लागल्या .  ती लिहायला - वाचायला कंटाळली की त्या तिला चित्र काढायला शिकवायच्या . ते ती आवडीने करायची . आपल्या लेकीला असं आनंदी पाहून शारदा मुद्दाम काम करायला थोडा वेळ लावायची .

राणीच्या तोंडून अडखळत का होईना इंग्रजी शब्द ऐकताना शारदाचे कान तृप्त होत होते . ती आपल्या लेकीसाठी नवीन स्वप्न बघायला लागलेली .


राणीला पण नवीन काही तरी शिकायला हुरूप येत होता . तिथ कोणी तिच्या वर हसणार नव्हतं , तिला चिडवणार नव्हत , तरं प्रेमाने आणि मायेने बोलणार होतं.. तिला पुन्हा पुन्हा न कंटाळता समजावणार होतं .


         राणी अशी की तिला फक्त बोललेलं कळायचं . किती कळायचं हे शारदालाही  माहीत नव्हतं . तिच्यासाठी ती जगत होती .  तिच्यासाठी कष्ट करत होती पण राणी स्वतःहून अजून पर्यंत कधी व्यक्त झाली नव्हती .  फक्त काही पाहिजे असेल तर तुटक शब्दात बोलायची . अशा आपल्या अंतर्मुख असलेल्या
मुलीला लिहिण्या - वाचण्यात  , चित्र काढण्यात आनंद मिळतोय हे पाहून शारदाही मनोमन आनंदी होती .

एक दिवस निलीमाताईंनी शारदाला आवाज दिला,
"शारदा , आधी हातातलं काम सोडून बाहेर ये ."

शारदा गडबडीने पदराला हात पुसत बाहेर आली .
नीलिमा ताई राणीच्या हातातील कागद शारदाला देत आनंदाने बोलल्या ,

" हे बघ तुझ्या लेकीने काढलं आहे ."

शारदाने तो कागद पाहिला . त्यावर एका बाईच चित्र होतं .   साडी नेसलेली हातात पिशवी घेतलेली आणि वरती स्केच पेनने वाकड्या तिकड्या शब्दांत काहीतरी लिहिलेलं .

" भारी काढलय की !" नीलिमा  हसत बोलली .

" अगं त्यावर  लिहिलेलं  वाच की !"

" मला कुठं कळतं इंग्रजी ?"
शारदा त्या अक्षरावरून प्रेमाने बोटे फिरवत बोलली .

" अगं तिने लिहिलंय,
\" माय वर्ल्ड मम्मा \" ...!

म्हणजे , तू तिचं जग आहेस . तिच्यासाठी सगळं काही आहेस आणि हे लिहायला मी नाही सांगितलं बरं . तिचं तिनेच लिहिलंय .... स्वतः हून ..!"

त्यांचं बोलणं ऐकून शारदाने आपल्या लेकीकडे पाहिलं . डोळ्यांच्या बाहुल्या वर करून ही ऽ ही ऽ  हसत राणी लाडात आपल्या आईकडे पाहत होती . पण डोळ्यातल्या पाण्याने राणी तिला दिसलीच नाही . 

तिने पुन्हा त्या चित्रावरून मायेने हात फिरवला आणि हलकेच गालात हसली , मग हसता हसताच रडली . कारण आज पहिल्यांदाच तिची राणी चित्राद्वारे व्यक्त झालेली .  तिने तिच्या आईबद्दल प्रेम व्यक्त केलेलं .

शारदा त्या चित्रावरून मायेने हात फिरवत वेड्या आशेने अडखळत बोलली ,

"बाईसाहेब..... माझी राणी....."

" हा बोल ना थांबलीस का ?"
नीलिमाताई प्रेमाने बोलल्या.

शारदा त्या चित्रावरून हात फिरवत वेड्या आशेने तोंडात पुटपुटली ,

"माझी राणी मोठ्ठी चित्रकार हुईल का ?"

नीलिमाताई हसत बोलल्या,
" का नाही होणार ? मी आहे ना? बघशील तू..
ती खूप मोठी चित्रकार होईल.. तिची पेंटिंग्स बघायला परदेशातून लोक येतील .
तिचं नाव सगळीकडे झळकेल. तिचं व्यंग तिच्या कलेने झाकोळल जाईल."

नीलिमा ताईंच बोलणं ऐकून शारदाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले . तिने त्या चित्रावर ओठ टेकवत आपल्या आनंदाश्रूंनी ते चित्र भिजवून आपल्या लेकीला आशिर्वाद दिला .
समाप्त

©® प्रियांका (सुभा) "कस्तुरी"


जिल्हा - सातारा, सांगली.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

प्रियांका सुभा "कस्तुरी"

लेखिका

लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दात तुमचं अस्तित्व असतं.

//