Jan 19, 2022
General

रुजली गं माझी तुळस

Read Later
रुजली गं माझी तुळस

रुजली गं माझी तुळस

अरविंद व रेवाच्या प्रेमविवाहाला अरविंदच्याघरुन संमती होती पण रेवा मोठ्या घरातली असल्याकारणाने तिच्या या निर्णयाला तिच्या वडिलांची,भावाची नापसंती होती.

 त्यांनी रेवाला सर्वतोपरी समजावून पाहिलं. अगं रेवा हे प्रेम नव्हे हे निव्वळ आकर्षण आहे असं रेवाची आई तिच्या कानीकपाळी ओरडून झाली पण रेवाला अरविंद खूपच आवडला होता. 

आईवडील नाही म्हणतात म्हंटल्यावर तिने खाणंपिणंही बंद केलं ज्यामुळे तिचा रक्तदाब फार कमी झाला. डॉक्टरांना घरी बोलवावं लागलं . डॉक्टरांनी रेवावर मानसिक ताण आहे व तिच्या मनाला त्रास होईल असं काही बोलू नका असं म्हंटल्यावर रेवाच्या वडिलांना तिची  अधिकच काळजी वाटू लागली. 

त्यानंतर चारेक दिवसांनी रेवा झोपेच्या गोळ्या घेत होती तेवढ्यात तिथे तिचा भाऊ,रौनक आला म्हणून ती वाचली. मग मात्र रेवाची आई रेवाच्या वडिलांना म्हणाली,"अहो,ऐका. आपण काय कमी प्रयत्न केले,रेवाचे मन वळवण्याचे! पण तिने कानाला झापडं लावून घेतली आहेत. द्या करुन तिचं लग्न त्या अरविंदाशी. तिच्या नशिबाची ती."

 रेवाच्या वडिलांना बायकोचं म्हणणं पटलं व अतिशय मोजक्या लोकांच्या साक्षीने त्यांनी अरविंद व रेवाचं लग्न लावून दिलं. लग्नात रेवाचे आईवडील श्रीमंतीचा टेंभा मिरवत होते. अरविंदला त्यांच वागणं मुळीच आवडत नव्हतं पण केवळ रेवासाठी तो गप्प होता.

लग्न झाल्यावर रेवाच्या वडिलांनी त्यांना हनिमुन टूरची तिकीटं दिली पण अरविंदने ती घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि तिथूनच अरविंद व रेवामधली धुसफूस सुरु झाली.  रेवाचे वडील अरविंदला त्यांच्या कंपनीत घ्यायला तयार होते पण अरविंदने त्यांची ऑफर धुडकावली. रेवाला प्रेमविवाह जेवढा सोप्पा वाटत होता तेवढाच तो अवघड होता.

एकत्र कुटुंबाची सवय नसलेल्या रेवाला अरविंदच्या आईवडिलांची अडचण होऊ लागली. रेवा अरविंद घरात नसताना अरविंदच्या आईवडिलांना उलटसुलट बोलू लागली. अरविंद घरात असेल तेंव्हाच काम करायची नाहीतर तिच्या रुममधे मोबाईलवर मैत्रिणींसोबत चाटींग करत,गाणी ऐकत वेळ घालवू लागली.

 दुपारी सासूसासऱ्यांसोबत जेवायला बसावं असंही तिला वाटत नव्हतं. सरळ आपलं ताट आपल्या रुममधे घेऊन जायची.

काही दिवसांनी तर ती अरविंदच्या पुढ्यातही अरविंदच्या आईला उलटसुलट बोलू लागली. बरं यावर अरविंद तिला ओरडला तर रडण्याचा सूर लावू लागली.

 एकदा अरविंदची आई,नलुताई तिला तिच्या उशिरा उठण्याबद्दल बोलली.  रेवाला सासूचा फार राग आला. ती नलुताईंशी अतिशय उद्धटपणे बोलली. अरविंदने रेवाचं ते उद्धट बोलण ऐकताच तो तिच्यावर ओरडला,"रेवा,तू कुणाशी बोलतेस  याचं भान ठेव जरा. माझी आई आहे ती. तुझ्या आईशी मी या भाषेत बोललो तर चालेल का?"

अरविंदचं असं बोलणं रेवाला अपेक्षित नव्हतं. तिला वाटलेलं तो तिची बाजू घेईल. रेवा रडतरडत त्याला म्हणाली,"कळलं तुझं माझ्यावरचं प्रेम. याचसाठी माझ्याशी लग्न केलं होतंस! तुझी आई मला काहीही बोलेल ते मी ऐकून घेऊ? तुझं माझ्यावर प्रेमच नाही. तू प्रेमाच्या आणाभाका घेऊन फसवलंस मला."

 रेवाने तिचे कपडे बेगेत भरले. हे पाहून नलुताई जाम घाबरल्या. त्या रेवाची विनवणी करु लागल्या,"रेवा,माझंच चुकलं. तू केव्हाही उठ,केव्हाही झोप,तुला हवं ते कर पण अशी घर सोडून जाऊ नकोस बाई." नलुताईंच्या विनवणीमुळे रेवाच्या रागाचा पारा उतरला. तरी दोन दिवस रेवा व अरविंदातले संभाषण बंद झालं. मग नलुताईंनीच अरविंदला असं भांडू नका म्हणून समजावलं.

अरविंदचा धंद्यात जम बसू लागला होता. तो रेवाकडे पैसे ठेवायला द्यायचा पण पेसे साठवण्याची रेवाला बिलकुल सवय नव्हती. ती महागड्या ज्वेलरी,साड्या खरेदी करु लागली. 

नलुताई तिला यावरुन ओरडल्या. "रेवा सगळे दिवस सारखे नसतात. भविष्यासाठी पैसे राखून ठेवावे लागतात. " पण रेवाने त्यांच मुळीच ऐकलं नाही. 

एकदा अरविंदला अर्जट पैसे हवे होते म्हणून त्याने रेवाकडे पैसे मागितले तर रेवाने नकारार्थी मान हलवली. अरविंद तिच्यावर भडकला,"रेवा, मी तुझ्याजवळ पैसे ठेवायला द्यायचो. साठेक हजार नक्कीच दिले आहेत त्यातले पन्नास हजार दे आत्ताच्या आत्ता. मला गरज आहे."

रेवा म्हणाली,"मी ज्या ऑनलाईन ज्वेलरी,साड्या,ड्रेस मटेरियल खरेदी केलं ते तर तुला दाखवलं आहे. तेंव्हा तर व्वा छान बोललेलास."

अरविंद म्हणाला,"अगं,मला कुठे माहिती होतं तुझी ती ज्वेलरी नि साड्या एवढ्या महागड्या असतील!"

रेवा उत्तरली,"मग काय यापुढे माझ्या सगळ्या खरेदीचं तुला बील द्यावं लागणार का मला? पप्पांकडे असं नव्हतं. मी मला हवी तशी खरेदी करत होते. कोणी मला इतकं घालूनपाडून बोलत नव्हतं. तरी मम्मीपप्पा  मला सांगत होते की अरविंदचं इनकम कमी आहे. त्याच्या कमाईत तुझ्या गरजा भागणार नाहीत पण वेडी झाले होते मी तुझ्या प्रेमात. भूत बसलेलं माझ्या मानगुटीवर तुझ्या प्रेमाचं." 

अरविंद पुरता गोंधळला. तो हॉलमधे येऊन बसला. अरविंदच्या वडिलांनी त्याला पन्नास हजाराचा चेक दिला. अरविंद वडिलांना बोलला की थोड्याच महिन्यांत तो त्यांचे पैसे परत करेल कारण अरविंदला त्या पन्नास हजारांची किंमत ठाऊक होती. ते साठवण्यासाठी वडिलांना किती वेळ लागला हे ठाऊक होतं.

काही दिवसांनी रेवाच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं. रेवा आधी दोन दिवस मम्मीपप्पांसोबत मावशीकडे गेली. अरविंद लग्नाच्या दिवशी हॉलवर गेला. तिथेही रेवाच्या पप्पांनी अरविंदची आपुलकीने विचारपूस केली नाही. तुमचे जावईबापू दाखवा म्हंटल्यावर रेवाचे पप्पा अगदी जीवावर उदार होऊन अरविंदकडे बोट दाखवायचे. अरविंदला तिथे उबग आला तो दोन तासातच तिथून निसटला. त्याला जेवणाचाही कोणी आग्रह केला नाही.

 दोन दिवसांनी अरविंदने रेवाला फोन करुन घरी कधी येतेयस विचारलं. यावर रेवा म्हणाली,"तुझ्या आईबाबांसोबत मी नाही राहू शकत. तू दुसरं घर घे तरच मी येईन." अरविंद फोनवरच तिच्यावर भडकला,"अगं रेवा, तुझे सारे टँट्रम्स माझी आई सहन करते तरी तुला वेगळं रहाण्याची कसली हुकी आलीय!"

रेवाने फोन कट केला. अरविंदने रेवाचं बोलणं आईबाबांच्या कानावर घातलं व म्हणाला,"कुठून दुर्बुद्धी सुचली नि रेवाच्या लफड्यात अडकलो असं झालंय."

अरविंदच्या आईवडिलांनी विचार केला व ठरवलं,गावच्या घरी रहायला जायचं. 
अरविंदला मात्र त्यांनी गावचं घर दुरुस्त करण्यासाठी गावी जातो असं सांगितलं. गावच्या घरावर त्याचाही फार जीव होता त्यामुळे तो आईवडिलांना नाही म्हणू शकला नाही.

रेवाच्या सासूने रेवाला ती दोघं गावी गेल्याचं कळवलं. रेवा खूप खूष झाली. ती मम्मीपप्पांचा निरोप घेऊन घरी आली. 

येताना तिने सोबत एक कुक आणला. कुक सकाळसंध्याकाळ त्याला दिलेल्या ऑर्डरनुसार स्वैंपाक करु लागला. आता रेवा अरविंदशी पुर्वीसारखी गोडीगुलाबीने वागू लागली. अरविंदला मात्र आईवडिलांना गावी सोडल्यामुळे घरात अपुरेपण जाणवत होतं. त्याने आईची आठवण काढली की रेवा फणकारायची,"माहिती आहे आईचं कुक्कुलं बाळ आहेस ते! एवढंच होतं तर लग्न तरी कशाला केलंस? रहायचं होतं आईच्या कुशीत. अरविंदने घरी आईवडिलांना फोन लावला की रेवाच्या कपाळाला आठ्या पडायच्या.

गावच्या घराच्या दुरुस्तीचं काम संपलं तरी अरविंदचे आईवडील अरविंदकडे येऊ मागेनात. अरविंदने गावी जायचा निश्चय केला. रेवा गावी यायला तयार होईना. ती तिच्या मम्मीपप्पांकडे गेली. 

अरविंदला पाहून नलुताईंना खूप आनंद झाला. रेवा सोबत न आल्याचं दु:ख वाटलं पण त्यांनी ते लेकाला जाणवू दिलं नाही. नलुताईंनी लेकाला सुरळीच्या वड्या,ताकाची कढी,डाळिंबीची भाजी,मसालेभात असे सगळे त्याच्या आवडीचे पदार्थ करुन खाऊ घातले. त्याच्या डोक्याला मालिश करुन दिलं. 

अरविंदला हे सुख अनुभवताना अगदी माहेरी आल्यासारखं वाटलं. त्याने आईवडिलांना त्याच्यासोबत येण्याची विनंती केली पण त्या दोघांनीही इथली हवा मानवतेय या सबबीखाली त्याचं म्हणणं नाकारलं. अरविंद परत घरी आला.

इकडे रेवाला दिवस गेले. कधीमधी घरातच चक्कर येऊन पडू लागली तेव्हा अरविंदने आईला फोन करुन ही गोड बातमी सांगितली व तिला सांभाळण्यासाठी या म्हणून सांगितलं. अरविंदला आशा होती की रेवाची तब्येत बरी नाही म्हंटल्यावर ती दोघं नक्की येतील पण रेवाने अरविंदचं बोलणं ऐकलं व धिंगाणा घातला,"कोणाला विचारुन तू बोलवलंस त्यांना. त्यांना बोलवण्याआधी मला विचारावसं नाही वाटलं तुला?"

अरविंद म्हणाला,"त्यात काय विचारायचं? माझ्या आईवडिलांना बोलवण्यासाठी मला तुझी परवानगी घ्यावी लागेल असं मुळीच वाटत नाही आणि हे घर त्यांचच आहे. तू कागदपत्रांवर त्यांच नाव बघू शकतेस. दारावरची नेमप्लेटही बघ जरा."

रेवा म्हणाली,"म्हणजे माझ्या मतांना तुझ्या लेखी काहीच किंमत नाही तर. तुला फक्त तुझ्या आईवडिलांचा पुळका."

अरविंद यावर काहीच बोलला नाही पण दुसऱ्या दिवशी अरविंदच्या आईनेच फोन करुन सांगितलं की अरविंदच्या वडिलांचा रक्तदाब वाढल्यामुळे सध्यातरी ते प्रवास करु शकत नाहीत. बरं वाटलं की येतील. रेवाने हे ऐकताच सुस्कारा सोडला. 

रेवाच्या भावाचं लग्न ठरलं. रेवा महिनाभर आधीच मम्मीपप्पांना मदत करण्यासाठी माहेरी गेली. रेवाच्या मम्मीने रेवासाठी तिच्या आवडीचा लेहंगा व आकर्षक ज्वेलरी घेतली. रेवाशिवाय तिथे पान हलत नव्हतं. भाऊ रौनकही तिला विचारुनच सगळे निर्णय घ्यायचा.

 अरविंदने स्वतःला धंद्यात झोकून दिले. आता तो बाबा होणार म्हणजे त्याची जबाबदारी वाढणार होती. येणाऱ्या अपत्याच्या भविष्यासाठी तो पैसे कमवत होता. अरविंदच्या मनात यायचं,"बाळ रेवाच्या पोटात वाढतय तसंच ते माझ्या मनात वाढतय. मीही ते येण्याची तेवढ्याच आतुरतेने वाट बघत आहे.''

रौनकच्या लग्नात रेवा मरुन रंगाच्या लेहंग्यामधे खूप गोड दिसत होती. ती प्रेग्नंट असल्याने सगळे तिची काळजीही घेत होते. अरविंद मात्र तिथे पाहुण्यासारखा गेला व आला. रेवाच्या मावस बहिणीच्या लग्नातला कटू अनुभव त्याच्या गाठीशी होताच. 

रौनकच्या लग्नानंतर आठेक दिवसांनी रेवा घरी आली. घरी आली तरी तिला तिकडचीच आठवण जास्त येत होती. 

रौनक व केयराचा संसार सुरु झाला. केयरालाही विभक्त कुटुंब पद्धतीची आवड होती. ती रौनकच्या मागे लागली की आपण आपल्या दोघांच दुसरं घर घेऊया. रौनकनेही तिच्या मताला दुजोरा दिला व नवीन घर शोधण्यास सुरुवात केली. 

रेवाच्या मम्मीने रेवाला रौनक व केयराच्या वेगळं होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. रेवाला भावाचा खूप राग आला. ती अरविंदशी रौनकच्या या निर्णयाबाबत बोलली,"रौनककडून मला ही अपेक्षा नव्हती. आता कुठं लग्न झालंय नि वेगळं घर हवं झालं त्याच्या बायकोला. दिसते साधीभोळी पण पक्की 420 आहे ही केयरा."

अरविंद हसला तशी रेवा अजुनच चिडली.

अरविंद म्हणाला," कसं नं माणसाला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही."

"काय म्हणायचंय काय तुला."

"आठव नं तूपण माझ्या मागे लागलेलीस वेगळं राहुया म्हणून. मी तुझं ऐकलं नाही म्हणून चिडली होतीस. पेरतं तेच उगवतं रेवा. तुला माझे आईवडील नको झाले होते. ते बिचारे आपल्यात भांडणं होऊ नयेत म्हणून गुपचूप गावी रहायला गेले. आता हीच परिस्थिती तुझ्या आईवडिलांच्या बाबतीत होऊ पहातेय म्हंटल्यावर तुला तुझ्या दादावहिनीचा राग येतोय."

"अरविंद,तुझ्या आईवडिलांपेक्षा माझे आईवडील कितीतरी चांगले आहेत."

"आईवडील मग ते तुझे असो वा माझे ते वाईट नसतात रेवा. तू माझ्या आईला आई म्हणतेस पण आईवर करतात तशी माया तिच्यावर करत नाहीस. ती कधी तुझ्या भल्यासाठीच तुझ्यावर रागावली तर लगेच अबोला धरतेस किंवा तिला उलट उत्तर देतेस."

सातव्या महिन्यात रेवा माहेरी रहायला गेली. एखाद दिवसासाठी ती जेव्हा माहेरी रहायला जायची तेव्हा तिला तिथे खूप प्रसन्न वाटायचं पण चार दिवसांत तिला कळून चुकलं की तिथे फारच बदल झाला आहे. घरात आता केयराच्या म्हणण्याप्रमाणेच सगळं चालत होतं. 

रौनकने पप्पांना काही सुधरत नाही या नावाखाली घरी बसवलं होतं. सगळी सूत्रं ती दोघंच हलवित होती. मम्मीपप्पांची ही अवस्था पाहून रेवाला फार वाईट वाटलं.  तिनेही निलुताईंसोबत तसंच वर्तन केलं होतं. आता रेवाला तिच्या वर्तनाचा पश्चाताप होऊ लागला. 

तिने अरविंदला फोन करुन बोलावून घेतलं व आपण मम्मीपप्पांना आपल्या घरी नेऊया का विचारलं.  अरविंद म्हणाला,"चालेल पण एका अटीवर. माझे आईवडीलही रहायला येतील आपल्याकडे." रेवा अरविंदला बिलगली. पोटातलं बाळही जोरात ढुशी मारु लागलं. आपल्या मम्मापप्पांची एकी पाहून ते खूष झालं असावं. 

रेवाचे मम्मीपप्पा तिच्याकडे रहायला आले. आपण जावयाला कमी लेखले याचं रेवाच्या वडिलांना फार वाईट वाटत होतं. त्यांनी त्यांच्या मनातला सल अरविंदला बोलून दाखवला व अरविंदची माफी मागू लागले. अरविंदने त्यांचे दोन्ही हात आपल्या हातात धरले व म्हणाला,"मला तुमचा मुलगा माना. माफी मागून परकं मात्र करु नका. तुम्ही मोठे आहात. तुम्हाला रागावण्याचा पुर्ण अधिकार आहे." रेवाला अरविंदचा खूप अभिमान वाटला. 

काही मोठ्या माणसांना हाताशी घेऊन अरविंदने रौनकला कडक शब्दात समज दिली. कंपनीची गुडविलही कमी होत चालली होती. रेवाच्या वडिलांनी परत सर्व कारभार आपल्या हातात घेतला व रौनकला कंपनीत कामावर येऊ शकतोस अशी कडक शब्दात समज दिली. 

रेवाला नववा महिना लागला नि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही खबर कळताच अरविंदचे आईवडीलही गावच्या घराला टाळं मारुन आले. बारसं अगदी झोकात झालं. बाळीचं नाव रोशनी ठेवलं. नलुताई व तिचे यजमानही आपलं चंबुगबाळं गुंडाळू लागले तसं रेवाने रोशनीला नलुताईंच्या मांडीवर ठेवलं व म्हणाली,"पिल्लु,आजीआजोबांना सांग तुझ्या की तुला सोडून कुठे जायचं नाही आणि जमल्यास तुझ्या मम्माला माफ करायलाही सांग." 

नलुताईने सुनेला कुशीत घेतलं व म्हणाली,"रुजली गं माझी तुळस."

------सौ.गीता गजानन गरुड. LP​​​​

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now