माझे गुरु - एक आठवण

“हे समोर चार टरबाइन ईम्पेलर ठेवलेले आहेत, फ्रांसिस टरबाइनचं ईम्पेलर दाखवा.” - आमचे सर.

माझे गुरु – एक आठवण.

साधारण १९७१ -७२ साल असेल. मी तेंव्हा थर्ड इयर इंजीनीरिंगला  होतो. परीक्षेचे दिवस होते, हॉस्टेल मधे पूर्ण परीक्षेचे वातावरण होतं. परीक्षेच्या तयारी साठी सुट्ट्या लागल्या होत्या. रात्र रात्र मुलं जागून अभ्यास करायची. साहजिकच सकाळी उठायला उशीर व्हायचा. त्या दिवशी असाच सकाळी १० वाजता उठून मी चहा प्यायला नेहमीच्या, कॉलेजच्या समोर असलेल्या चहाच्या हॉटेल मधे जाऊन चहा घेत होतो. आमच्या वर्गातली बरीच मुलं प्रॅक्टिकल जर्नल हातात घेऊन लगबगीने कॉलेज कडे जातांना दिसली. एकाला विचारलं तर तो म्हणाला “ तू इथे काय करतो आहेस ? आता hydraulics चा फायनल व्हायव्हा आहे. सुरू पण झाला आहे. चल लवकर.”

मी नोटिस वाचलीच नव्हती त्यामुळे हा घोटाळा  झाला होता. धावत धावत हॉस्टेलवर गेलो, भरकन  आंघोळ आटोपली आणि जर्नल घेऊन धावतच कॉलेज मधे गेलो. विषयाची काहीच तयारी नव्हती, त्यामुळे सगळाच आनंद होता. मुलांच्या दोन रांगा होत्या, एक छोटी आणि एक मोठी. मी एकाला विचारलं की “असं का?” तर तो म्हणाला की “एक्सटर्नल खूपच रॉयल आहेत, एक दोन प्रश्नातच सोडून देतात. छोट्या रांगेतल्या मुलांचा व्हायव्हा कॉलेजचे सर घेतायत, आणि ते खूप डीप मधे  विचारतात. मी थोडा विचार केला, नाही तरी अभ्यास झालाच नाहीये, तेंव्हा एक प्रश्न काय आणि अनेक काय? लवकर तरी सुटू, मी छोटी रांग निवडली.

“हे समोर चार टरबाइन ईम्पेलर ठेवलेले आहेत, फ्रांसिस टरबाइनचं ईम्पेलर दाखवा.” - आमचे सर.

आवघड काम होतं. काय करायचं ? मी हाताची चार बोटं चार ईम्पेलर कडे दाखवली. “हे बघा सर.”

सरांनी काय करावं? ते उठले, माझ्या मागे उभे राहिले, म्हणाले “कोणत्या बोटांच्या दिशेने पाहू?”

आता काय करायचं? काळ तर मोठा कठीण आला होता. उत्तर अवघड होतं. पण तरी, सगळं बळ एकवटून उत्तर दिलं. “जे बोट फ्रांसिस दाखवते आहे, त्या दिशेने.”

“फाइन, उत्तम, Mr. भिडे, छान. तुम्ही जाऊ शकता.”

संपलं,  मी नापास होणार यावर सगळ्यांचच एकमत होतं. पण जेंव्हा रिजल्ट लागला, तेंव्हा मी पास झालो होतो, आणि या विषयात प्रॅक्टिकल मधे ५० पैकी ४५ मार्क पडलेले दिसले. नक्की काही तरी गफलत झाली होती. पण रिजल्ट लागला होता आणि विचारणार तरी कोणाला? पण तेवढ्यात समोरून सर येतांना दिसले. मी थांबलो, सरही थांबले. म्हणाले “तुला पडलेले मार्क्स बघितले ?”

“हो सर. पण कारण कळलं नाही.”

“हे मार्क तुझ्या ज्ञानाला नव्हे, तर प्रसंगावधानाला आहेत. हा गुण जोपास, आयुष्यात  कुठल्याही संकटावर  या गुणांनी मात करशील. गॉड ब्लेस यू”

आज मी सत्तरी ओलांडलेली आहे आणि या वाक्यांनी माझी आयुष्य भर साथ केली आहे.

शत शत नमन.

दिलीप भिडे.