माझे स्पेशल गुरू

माझ्या या लेखामध्ये मी माझे गुरू कोण आहेत,त्यांचे व्यक्तित्व,विचार कसे आहेत ,तसेच त्याचा माझ्यावर झालेला परिणाम याविषयी भाष्य केले आहे.



       माझा मुलगा साधारण सव्वा महिन्यांचा असेल तेव्हा त्याचं सेरेब्रल पाल्सीचं निदान झालं होतं. खर तर हा काळ आमच्यासाठी खूप कष्टाचा होता.कारण आम्ही सर्व जण बाळाला योग्य डॉक्टर कुठला निवडावा या टेंशन मध्ये होतो.आधीच तो रडला नाही म्हणून या मेंदूविकाराचं टेंशन होत,मग आता पुढील मार्ग सोपस्करपणे कोण दाखवू शकेल हे दुसरे टेंशन होते .मग याला विचार त्याला विचार असे सुरू झाले. पण सुदैवाने लवकरच देव आमच्या मदतीला धावून आला आणि गाढे सरांचा पत्ता आम्हाला मिळाला.माझे मिस्टर त्यांना भेटले,त्यांनी एक फिजिओथेरपिस्ट आम्हाला सुचवली.आम्ही त्वरित त्यांच्याकडे गेलो,आणि आम्हाला लवकरच बाळाची हालचाल करण्यास योग्य ,पोषक असे वातावरण तिथे मिळाले.आमचे बाळ कायमचे स्टिफ होण्यापासून वाचले.आजतागायत बाळाची फिजिओथेरपी याच थेरपिस्ट कडे चालू आहे. तेव्हा गाढे सर अगदी माझे पहिले वहिले स्पेशल गुरू बनले.

      खर तर सरांचा मुलगाही स्पेशल चाइल्ड आहे.त्यामुळे या क्षेत्रातील प्रत्येक बारकावे सर जाणून आहेत.माझ्या मैत्रिणीच्या मुलाला झटक्यांचा प्रचंड त्रास होता.पण यांच्या सर्व सूचना पाळून  त्या मुलाचा त्रास एकदम नाहीच्या बरोबर झाला.खर सांगायचं झालं तर स्पेशल मूल हॅण्डल करणे सोपी गोष्ट नक्कीच नाही.यासाठी पालक म्हणून तुम्ही नेहमी खंबीर असायला हवे.अगदी गाढे सरांसारखे! ही बाब त्यांनी खरच पदोपदी दाखवून दिली.स्वतःच्या मुलासाठी,त्याच्या योग्य उपचारांसाठी त्यांनी आजवर मिळेल त्या क्षेत्रात पडेल ते काम केलं,अगदी शेती केली,क्लासेस टाकले,एवढेच काय तर आमच्या सारख्या नवोदित स्पेशल आईवडिलांना योग्य मार्गदर्शन ,आधार मिळावा म्हणून त्यांनी स्वतः फिजिओथेरपी सोबत नेचरोपॅथीचे सांगड घालणारे शिक्षण पूर्ण केले.खरच एखाद्या माणसाचे एखाद्या नाजूक गोष्टी प्रती असणारे समर्पण किती व्यापक असू शकते हे त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहिल्यावर समजते.खरच ही जिद्द ,चिकाटी आमच्या सारख्या स्पेशल पालकांमध्ये कायम अशीच तेवत ठेवण्याचे मोलाचे योगदान खर तर गाढे सरांचे आहे असे मी ठामपणे सांगू शकते.

          त्यांच्याशी स्पेशल मुलांसंदर्भात कुठल्याही विषयावर गहन चर्चा केली की त्यांचे या क्षेत्रातील बारकावे,स्वतःच्या मुलासोबतचे अनुभव अगदी सोप्या व त्यांच्या दिलखुलास शैलीत ते मांडतात.खरच आमच्यासारखे भाग्यवंत आम्हीच, कारण गाढे सर आम्हाला या स्पेशल मुलांसोबतच्या प्रवासामध्ये अगदी योग्य ,असे सारथीरुपी स्पेशल गुरू म्हणून लाभले.कितीही उशीर झालेला असो किंवा कितीही लवकर असो ते आमच्यासारख्या पालकांचे समस्यांचे फोन घेवून त्यावर उपाय नक्की सुचवतात,प्रसंगी त्यांच्याकडे येऊन राहण्यास सुद्धा सांगतात.

      आज मी सुद्धा  स्पेशल मुलांचे डाएट चार्ट अनुसरून विविध पदार्थ बनवण्याचे धडे माझ्यासारख्या स्पेशल पालकांना देत आहे. माझे जगणे जे सुरुवातीला खूप निराशा दायी होते,ते गाढे सरांनी घालून दिलेल्या या आदर्शांमुळे दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी बनलेले आहे.माफ करा हे मी नाही तर माझा मित्र परिवार मला सांगतो. सरांसारखेच या क्षेत्रातील बरेच बारकावे मी शिकले आणि अजूनही ही प्रक्रिया चालूच आहे,ज्याचा खूप फायदा मला माझ्या मुलासाठी होत आहे.खरच मी आज अशी जी घडले आहे ते केवळ  गाढे सरांमुळे ,जे माझे स्पेशल गुरू,दादा आणि प्रसंगी वडीलही आहेत..त्यांचे एक वाक्य मी माझ्या मनात कायम स्वरुपी कोरून ठेवलेलं आहे,जे त्यांचे प्रयोगशील व्यक्तिमत्त्व दर्शवते,

"जिंदगी एक जुगाड हैं जनाब, इसे हमें अपने हिसाब से बनाना पडता है,तभी हम यहा अच्छे से जी सकते हैं||" 

          खरच खूप खूप धन्यवाद सर,माझ्यासारख्या वेंधळ्या पालकांना हुशार बनवण्यासाठी,येणाऱ्या काळासाठी खंबीर,परिपक्व बनवन्यासाठी!आपल्याला शतशः प्रणाम!!


©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे 

गोष्ट छोटी डोंगराएवढी _ गुरुपौर्णिमा विशेष लेख 

# फोटो साभार गूगल