Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

माझी माणसं

Read Later
माझी माणसं

लेखाचे नाव - ‘माझी माणसं’
विषय - स्री ला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो?
फेरी - राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा 


“सासरच्या माणसांना आपली माणसं मानायचं, घरातील सर्वांना माया लावायची, सर्वांना आपलसं करायचं.”
लग्न झालं होतं तेव्हा आईने पुन्हा पुन्हा गिरवलेलं वाक्य अनघाला आठवलं आणि जुन्या स्मृती जाग्या झाल्या. शिंदेंच्या घरात ती मोठी सुन बनुन आली आणि पहिल्या दिवसापासून तिने सर्वांना आपलंसं केलं. त्यांना जीव लावला. सासर, माहेरच्या माणसांत कधी भेदभाव केला नाही. सगळ्यांचा व्यवस्थित पाहुणचार केला. मोठ्या, एकत्र कुटुंबातून आली होती ना!... सगळे तिच्या गुणांचे भरभरून कौतुक करायचे. लग्नानंतरच्या पंधरा वर्षांत तिनं काय कमावलं होतं? तर तिने फक्त माणसं कमावली होती. पण तिच्या चांगुलपणाचा फायदा मात्र सर्वांनी उठवला. ‘माझी माणसं’ म्हणून तिने आपल्या माणसांसाठी सगळं केलं होतं पण  तिच्यासाठी?
      
आज तिला सगळं आठवत होतं. ग्रॅजुएट असलेली पवारांची अनघा शिंदेंच्या घरात सुन म्हणुन आली आणि आईने सांगितल्याप्रमाणे सगळ्यांशी प्रेमाने वागुन अनघाने सगळ्यांची मने जिंकली होती. त्या दिवसापासून ती पदर खोचून कामाला लागली ती आजपर्यंत. सासुसासरे, दिर, नणंद आणि हे दोघे पती पत्नी असा त्यांचा परिवार होता. सासुबाईंनी तिच्याकडे स्वयंपाकघराचा चार्ज देऊन टाकला आणि निवांत झाल्या. तिचा दिनक्रम सुरू झाला की, पहाटे लवकर उठून सर्वांचे डबे करायचे. सर्वांना चहा, नाष्टा द्यायचा. सगळे आपापल्या कामावर गेले की उरलेले घरकाम करायचे. तिचा सगळा दिवस घरकाम करण्यात जात असे. दुपारी थोडं लवंडलं तर थोड्यावेळातच सासुबाईंची हाक कानावर यायची.

 “सुनबाई, चहाची वेळ झाली तेवढा चहा बनव, चहा घेऊन जरा देवळात जाऊन येते..”

मग काय! नाईलाजाने तिला उठावंच लागे. संध्याकाळ झाली की सगळे बाहेरून घरी येणार म्हणून मग रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं‌. असं तिचं नेहमीचं रूटीन ठरलेलं होतं. रविवारी तिला थोडीसुध्दा विश्रांती नसायची. ती उत्तम सुगरण होती. प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ बनवायला लागायचे. सगळे तिच्या सुगरणपणाचे भरभरून कौतुक करायचे आणि समाधानाचे हासु तिच्या चेहऱ्यावर यायचं.

“माझी माणसं खुष आहेत ना मग बस्स झालं अजुन काय हवं?”

आपल्या माणसांसाठी करताना आपले छंद ही ती विसरून गेली होती. रविवारी प्रत्येकजण आपला सुट्टीचा दिवस आनंदात घालवी. नणंदबाई नटुनथटून फिरायला जात. अनघाचा नवरा मनोज तिलाही फिरायला जावूया म्हणायचा, सुरवातीला थोडे फिरलेही पण सासुबाई कुरकुर करु लागल्या घरातली कामं पडून रहातात म्हणून तिने फिरायला जाणं बंद केलं पण मनोज मात्र मित्रांबरोबर विकेंडला फिरायला जावू लागला.
 
 तीन वर्षांत दोन मुलं तिच्या पदरात पडली आणि अजुनच ती व्यस्त झाली. मुलांचं पाहताना तिची दमछाक होऊ लागली. भांडी,फरशीसाठी बाई लावूया म्हटलं तर सासुबाई बोलल्या, 

“मला कामवाल्या बायकांचं काम आवडतं नाही, आणि तु काय करणार दिवसभर?”

मग ‘कामवाली बाई’ या गोष्टीला तिथेच पुर्णविराम मिळाला. सणवार असो की अजुन कुठला कार्यक्रम असो ती अतिशय उत्साहाने सगळं करायची. परंपरांचे पालन करायची. गणपतीचे दिवस  जवळ आले होते. रोज रात्री घरात सगळे गणपतीची सजावट करण्यात मग्न असायचे आणि अनघा रोज रात्री आज लाडू उद्या चिवडा, तळणीचे भरपुर मोदक असे विविध पदार्थ बनवण्यात मग्न असायची, कोणी इकडची काडी तिकडं करत नसे. लाडू तयार झाले की खाण्यासाठी मात्र सगळे पुढे असायचे.

दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन होते म्हणून अनघाने पुजेची सगळी तयारी करुन ठेवली होती. पहाटे चार वाजता उठून सोवळ्यात सोळा प्रकारच्या भाज्या, पुरणावरणाचा स्वयंपाक, कोशिंबीरी, चटण्या सगळं सकाळच्या दहाच्या ठोक्याला तयार होतं. बारा वाजेपर्यंत महाआरती झाली. सवाष्णी भोजन झाले. दोन गौराईच्या दोन सवाष्णी होत्या. त्यात अनघाची मैत्रीण मीना आली होती.  तिला माहित होतं एवढं सगळं राबून अनघानेच सगळं केलं असणार. ती जाता जाता बोललीच अनघा खुप छान झालं सगळं. मस्तच, अनघाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. 
    
दरम्यान नणंदेच लग्न झालं होतं. तिला ही मुले झाली होती.  ती दिवाळी, मे महिन्याच्या सुट्टीत येऊन रहात असे. चांगला पाहुणचार झोडून जात असे पण अनघा हसतमुखाने सगळं करत असे पण ती कधी माहेरी गेली की लगेच लवकर ये म्हणून मागून फोन येत असे.

अनघाची मुलं आता आठ,दहा वर्षांची झाली होती. धाकट्या दिराचं ही लग्न झालं आणि जाऊबाई घरी आली. आता थोडीतरी मदत होईल असं तिला वाटलं. नवी नवरी म्हणून तिने तिला सुरुवातीला जास्त काम करु दिले नाही. रविवारी बाहेर फिरायला जाणे, बाहेरुन खाऊन येणे असं त्यांचं सुरु होतं. 

“आता पुरे झालं फिरणं.. घरात कामाला मदत करत जा असं सांगा तिला..”

अनघा सासुबाईंना म्हणाली. तिच्या बोलण्याशी सासरे सहमत झाले पण अनघाच्या सासुबाई  म्हणाल्या, 

“हेच त्यांचे फिरायचे दिवस, नवीन आहेत तोपर्यंत फिरतील.”

अनघाला एकदम आठवलं.

“ह्या त्याच  सासुबाई आहेत ना.. ज्या आम्ही नवीन लग्न झाल्यावर कोल्हापूरला प्रथम कुलस्वामीच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा आमच्याबरोबर आल्या होत्या. मनोजने देवदर्शनानंतर तिथून तसेच पन्हाळगडावर हनीमुनला जाण्याचा केलेला प्लॅन त्यामुळे फिसकटला होता.”
      
तिच्या डोळ्यात पाणी आलं. मुलांना शाळेत सोडायला गेल्यावर तिची मैत्रीण मीना तिला नेहमी म्हणायची,

“अनघा नुसती ‘माझी माणसं, माझी माणसं’ म्हणत बसू नकोस.. जरा स्वतःकडेही लक्ष दे..”

अनघाला हळूहळू ते पटू लागलं होतं. मुलांना चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले होते. सहामाही परीक्षा जवळ आली होती त्यामुळे अनघाने त्यांचा अभ्यास घ्यायचा ठरवले होते. बाहेर हॉलमध्ये मोठ्या आवाजात सासुबाई टीव्ही लावून बसल्या होत्या. अनघाने जावेला सांगितले.

“आजपासून संध्यकाळचा स्वयंपाक तु बनवायचास."

आणि मुलांना घेऊन बेडरुमचा दरवाजा लावून त्यांचा अभ्यास घेत बसली. मुलांची परीक्षा संपल्यावर ती मनोजला म्हणाली, 

“उद्या रविवार आहे.. आपण मुलांना घेऊन बाहेर फिरायला जाऊया.”

“आईला विचारलेस का?”

मनोजने प्रश्न केला. 

“त्या सहजासहजी परवानगी देणार आहेत का? तुम्ही त्यांना आम्ही जाणार आहोत असं सांगा.”

त्याप्रमाणे मनोजने आईला सांगितलं. नाराजीच्या सुरात सासूबाई म्हणाल्या, 

“तुम्ही आधीच ठरवून टाकलंय आणि  परवानगी मागतोस कशाला?  चला मी पण येते.”

“अगं आई उद्या एकादशी आहे तुला भजनी मंडळात जायचे असेल ना?”

मनोजच्या वाक्यसरशी  अनघा गालातल्या गालात हसली.

दुसऱ्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसून आणि हलका मेकअप करुन तयार झालेल्या अनघाला पाहून मनोज तिच्याकडे पाहतच राहिला आणि हळूच तिच्या कानाजवळ कुजबुजत म्हणाला, 

“आता सुट्टीत पन्हाळ्याला जाऊ.. राहून गेलेला हनीमून साजरा करायला..”

त्याचे ते बोलणं ऐकून अनघा मोहरली आणि तिच्या गालावर लाजेची लाली चढली..

© सौ. सुप्रिया जाधव
जिल्हा- रायगड- रत्नागिरी

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//