मनोगत ईराची वाचक आणि लेखक म्हणून

Ira is a platform for new writers

मनोगत ईराची वाचक म्हणून 

फेसबुकवर ईराच्या कथा शेअर केल्या जातात, त्यातलीच एक कथा वाचनात आली ,नंतर ईरा नाव दिसले, की उत्सुकतेने बघायची ,असेही लहानपणापासून पुस्तक वाचनाची आवड होतीच. एकदा पुस्तक हातात घेतलं, की जोपर्यंत ते संपत नाही, तोपर्यंत चैन पडायची नाही. घरातली कामे ,पटापट हातावेगळी करून, पुस्तकाचा फडशा कधी एकदा पडेल, असं वाटायचं .जादूच्या गोष्टी, रहस्यकथा, ऐतिहासिक कथा वाचायला खूप आवडायच्या. भुतांच्या कथा वाचल्या, की रात्री मात्र भीती वाटायची. शाळेची लायब्ररी, म्हणजे तर वास्तव्य करण्याचे ठिकाण झाले होते, एकदा मी वाचनात इतके गुंग होते की, ग्रंथपाल सर लायब्ररी बंद करून कधी गेले, ते कळालंच नव्हतं, नशीब ते जेवण करून एक तासाने परत आले. जर संध्याकाळची वेळ असती, तर माझं काही खरं नव्हतं. जोपर्यंत पुस्तक पूर्ण होत नाही, तोपर्यंत आता पुढे काय होणार ,याचा विचार मात्र सतत मनात घोळत असायचा ,अशी मी पुस्तकवेडी, पण नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले, त्यामुळे मराठी वाचन बऱ्याच प्रमाणात कमी झालं .फेसबुकवरचे ईराचे लेख पाहून खूप आनंद झाला, हळूहळू हे लक्षात आलं, की त्यांचे फेसबुक पेज आहे ,त्याला फॉलो करायला सुरुवात केली. छान छान कथा वाचायला मिळत होत्या, पण त्याच्या लिंक असायच्या, एखादया कथेचा आधीचा भाग लिंक द्वारे दिलेला असायचा, जेव्हा वेळ मिळेल,तेव्हा मोबाईल फेसबुक ओपन करून ,आता वाचनाचा आनंद मिळू लागला. खूप वर्षानंतर वाचायला लागल्यामुळे, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. काही काही लेख तर ,आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे लिहिले आहेत ,असं वाटू लागलं .ईरावरील प्रत्येक लेखकाची , कथा लिहिण्याची  एक वेगळीच पद्धत आहे , काही काही लेखकांच्या व्याकरणात चुका होत असतील ,तरीही त्यांना जे बोलायचे आहे, ते मात्र वाचकांपर्यंत पोहोचते. त्यांनी वाईट वाटून घेऊ  नये, उलटं या गोष्टीतून आपण हेच शिकावे, की आपण कमीत कमी चुका किती प्रमाणात करू. 

मनोगत ईराची लेखक म्हणून 

करोनामुळे लॉकडाऊन झालं आणि मग वारंवार ईरा फेसबुक पेजला भेट देऊ लागले, त्यातूनच कळालं ,की आपण स्वतःही लिहू शकतो. मग काय लगेच रजिस्ट्रेशन केलं ,लहानपणापासूनच कविता करण्याचा छंद होता, मग काही कविता पोस्ट करून पाहिल्या, त्यानंतर पहिल्यांदाच कथा लिहायला घेतली. कथेला चांगला रिस्पॉन्स मिळाला, तर बरं वाटलं आणि त्यातूनच मग लिखाणाची सुरुवात झाली . असं म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट  होण्यामागे, काही ना काही तरी  चांगला हेतू असतो,  तसंच आता मलाही वाटू लागलं होतं, अजूनही समाज म्हणावा तितका पुढारलेला नाही, मला जे वाटतं, जे सुचत, ते कथांमधून लिहिण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून समाजात थोडासा बदल व्हावा, ही अपेक्षा आहे.

ईरा व्यासपीठाच्या निर्मात्या, संजना ताई इंगळे ,यांचे खरच मनापासून आभार, की त्यांनी सगळ्या नवोदित लेखकांसाठी, एक चांगले व्यासपीठ निर्माण केले .मी तर त्यांच्या कथांची फॅन आहे, स्वतः एक लेखिका असताना , दुसऱ्या लेखकांना संधी देणे ,यातून त्यांची उदात्त भावना दिसून येते.

कधी अपलोड करताना, जर काही प्रॉब्लेम झाला, तर योगिता मॅडम, नेहमीच मदतीसाठी तयार असतात, त्या स्वतःही एक उत्तम लेखिका आहे. हे आयुष्य म्हणजे, एक रंगमंच आहे आणि आपण त्यामधील पाञे आहोत. प्रत्येकाचा जन्म, हा काही ना काही उद्देशाने झालेला असतो, तसंच ह्या दोघींच्या हातून, नवोदित लेखक उदयाला यावे ,अशी देवाची इच्छा असेल. त्या दोघींनीही,या कामात स्वतःला इतके वाहून घेतले आहे, की देवाने केलेली त्यांची नियुक्ती, चुकीची नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे.

पण लेखक म्हणून लिहिताना, मला एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली, काही लेखक खूप छान लिहितात आणि त्यांचे लिखाण सुद्धा सगळ्यांना आवडते ,पण तरीही त्यांच्या मनात असते, की आम्हाला वाचकांचा प्रतिसाद मिळत नाही, बाकीच्यांना मिळतो, असं मनात आणण्या ऐवजी ,आपल्याला जे सुचतं, ते आपण लिहीत जावे ,आपल्या लिखाणाची तुलना इतरांशी करू नये. प्रत्येकाची लिखाणाची एक शैली असते, तिचा सन्मान करावा. ईरा टीमला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा आणि अशीच तुम्हा सर्वांची साथ, नेहमी राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

रूपाली थोरात.