Aug 18, 2022
प्रेम

माझं शेजार

Read Later
माझं शेजार

माझं शेजार

विसावा बंगला,शहरापासून चार किलोमीटरवर.. आजुबाजूला जुनीजाणती झाडं..फणस,आंबा,पपई, नारळ,पेरू,चिकू..
पक्ष्यांचा तर पहाटे चार वाजल्यापासून किलबिलाट सुरु व्हायचा. पोपटी अंगाचे लाल चोचीचे राघू मान वाकडी करुन पिकलेले पेरु खायचे. खारुताई या फांदीवरून त्या फांदीवर पकडापकडी खेळायच्या. बुलबुल व साळुंकी जोडीने येऊन बसायचे.

मला त्यांच्यातला संवाद अगदी नवराबायको घरातले इश्यू डिसकस करत आहेत असा वाटायचा.

आम्ही दोघंच श्री व सौ. परांजपे. मुलबाळ म्हणताय..नाही झालं हो. बरेच डॉक्टर..हकीम केले. चार वेळा गर्भपात झाला.  गर्भ गर्भाशयात टिकतच नव्हता. मीही मग नाराजच असायचे. दोष माझ्यातच होता पण यांनी फार सावरुन घेतलं मला.

सासूबाई म्हणायच्या,"कशाला ही पांढरी पाल पाळतोस!" मला वाईट वाटायचं ते ऐकून पण मग विचार करायचे,"काय चुकलं त्यांच? त्यांनाही नातवंडांची आस होतीच ना. मीही मग यांना म्हंटलं,"आपण मुल दत्तक घेऊ." यांनीही हो ना करत करत होकार दिला शेवटी पण सासूबाई नाही ऐकल्या. त्यांना आमचंच मुल हवं होतं.

खूप सहन केलं त्यावेळी..लोकं पहिली चारेक वर्ष विचारायची,"काय मग पेढे कधी?" पहिलं पहिलं ओके वाटायचं..तशी रीतच असावी असं वाटायचं पण गर्भ रहात नाही म्हंटल्यावर त्यांच्या या चांभारचौकशीचा राग येई. तोंडात शब्द येत,"जा मिठाईच्या दुकानात न् खा की किलोभर पेढे..सारखं काय पेढे पेढे..मेले हावरे कुठचे!"

चारेक वर्षांनी मात्र लोकांची वाक्य बदलली,"काय प्लेनिंग वगैरे करता वाटतं..होत नसेल तर फलाना डॉक्टर यावर सुविख्यात आहेत..अगदी हमखास रिझल्ट..जाच तुम्ही."

हळूहळू आमचा कोरडा रिस्पॉन्स पाहून लोकंही सल्ले द्यायचे कंटाळले. मी मला बागेत रमवलं. कितीतरी प्रकारची फुलझाडं आहेत माझ्या बागेत.सोनचाफ्याचं झाड आहे. मोगऱ्याचा वेल आहे,क्रुष्णकमळीचा वेल तर गेटभोवती वेढला गेलाय. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या गर्द निळसरजांभळ्या फुलांच रुप पहावं. दवाचे थेंब पडलेली कोवळी नाजूक सोनटक्क्याची फुलं,फार सुंदर वास असतो बरं यांना. लालगावठी गुलाब तर झुबक्यांनी फुलतो. अहाहा! याहुन सुंदर सुगंध तो कोणता!

वर्षभरापुर्वी एका संध्याकाळी मी झाडांना पाणी घालत होते आणि एक जोडपं आल़ं. आम्हाला जागा मिळेल का भाड्याने विचारत होतं. अजुनपर्यंत सासुबाईंना भाडोत्री ठेवणं मान्य नसल्याने कुणी आलं तरी मी नाही सांगायचे पण गेल्याच वर्षी गेल्या त्या. मी विचार केला,"काय हरकत आहे. एखादा निर्णय स्वतः घ्यायला. पैशाचं राहूदे..थोडी सोबत तर होईल."

मी यांना न विचारताच त्या जोडीला हो म्हणाले. कसले खूष झाले दोघं! रविवारी शीफ्ट होतो म्हणाले. मीही हे आल्यावर त्यांना माझा निर्णय सांगितला. हे म्हणाले,"बरं केलंस. थोडी जाग राहील. मी दुकानात गेल्यावर तू एकटी इथे. मला हल्ली काळजी वाटते तुझी."

मीही म्हंटलं,"नका करु काळजी. आता सोबत येतेय ना."

दुसऱ्यादिवशी एका छोट्या टेम्पोतनं त्यांच सामान आलं.
मी लहान मुलासारखं खिडकीतून त्यांची सामानाची नेआण निरखत होते.

एक टिव्ही,कपाट,बेड,थोडी भांडीकुंडी असं मोजकं सामान. नव्यानेच तर संसार थाटत होते ते.

मी मग स्वैंपाकाला लागले. म्हंटल, आज चौघांसाठी स्वैंपाक बनवुया. दाण्याचं कुट,तीळ घालून वांग्याचं भरीत केलं,मोड आलेल्या मसुरीची आमटी,पोळ्या,भात..कधी आवरलं माझं मलाच कळलं नाही. एक आगळीच उर्जा आली देहात.

मी त्या दोघांना जेवणाची ताटं नेऊन दिली. दोघंही अगदी सावधान स्थितीत उभे होते. मधुच्या केसांचा अवतार झालेला. दोन उशा इकडेतिकडे पडलेल्या. मी हसू दाबत मधुकडे ताटं दिली.

म्हंटलं,"हात धुवून आधी ऊनऊन जेवून घ्या. मग करा सावकाश कामं." तशी दोघं हसली. शहाण्या बाळासारखी हातपाय धुवून जेवायला बसली. मी पाण्याचा तांब्या आणून दिला. तिला म्हंटलं नाव काय गं तुझं?  ती म्हणाली,"मधुरा." मी म्हंटल,"मी तुला मधु म्हणेन."

"मावशी हा मंथनही मला मधुच म्हणतो." मधु असं म्हणताच मंथनने हसत मान डोलावली.

मी मनात म्हंटलं,"आमच्यावेळी फक्त अगं ए,ऐकलस का असायचं. कधीतरी निजायच्या खोलीत नाव घेतलं तर. सासूबाई शिस्तीच्या होत्या.

हे जाम घाबरायचे त्यांना. त्यांच्याप्रमाणे मग मीही. रिंगमास्टरच्या ताब्यातच होतो आम्ही दोघं. सासूबाईंनी एकहाती यांना सांभाळलं. यांच्या वडिलांची साथ काय ती दोनेक वर्षच लाभली त्यांना म्हणून हे एकच अपत्य आणि यांच्यावरच सगळा जीव,सगळा धाक. मीही कधी त्यांच मन मोडेल असं वागले नाही. काय हे मन तरी न् कुठच्याकुठे पोहोचलं.

मी घरी आले. जरा लवंडले. विजया वाड यांच एक पुस्तक आणलेलं ते वाचत बसले.

दुसऱ्या दिवशी मी मधुकडे जाऊ लागले तसं यांनी मला हटकलं. "अगं नवीन जोडपं आहे ते. काय तुझी म्हातारीची सारखी लुडबुड त्यांच्यात!"

"म्हणजे मी म्हातारी!"

"मी म्हातारा न् तू माझी लाडकी म्हातारी."

"चहा हवाय वाटतं."

"दिलास तर बरं होईल."

मी यांना चहा देऊन बागेत आले. रोपांना शेणखत घालू लागले तोच मागून 'मावशी' असा गोड आवाज आला. मधु उभी होती मागे. गुलाबी टॉप त्यावर पोपटी स्कर्ट..शोभून दिसत होता तिला.

आमच्यावेळी जास्तीत जास्त तर पंजाबी ड्रेस. तोही घालताना किती ऑकवर्ड व्हायचं.  मी परत माझ्या विचारांत रमले.

"मावशी मला न् अळुवडी करायची आहे. प्लीज शिकवशील"मधु तिच्या कुरळ्या केसांच्या बटा कानामागे घेत म्हणाली." मी नळाला हात धुतले.

"हो अगं चल दाखवते तुला. आधी दोन वाट्या चणाडाळ,थोडे तांदूळ भिजत घाल. एका वाटीत चिंचही भिजत घाल. थोडे धणे,जिरे,आलं,लसूण,मिरच्या,हळद,तिखट,किंचीत साखर व हे भिजवलेलं सामान वाटून घे."

मधु मी सांगितल्याप्रमाणे करत होती. इतक्यात मंथन जरा दचकतच आला. मधु म्हणाली,"आलास हात हलवत. एक काम धड येत नाही. ठोंब्या कुठचा. आता हे वाटण कोणाला लावू. जा केळीचं  पान आण जा काढून. केळपानाच्या वड्या घालते तुला"

मधुच्या नाकाचा शेंडा लाल झाला. मला बाई हसूच आलं.  आम्ही नाही हो एवढं कधी नवऱ्याला तासलं. मी मंथनला म्हंटलं,"मागीलदारी भरपूर अळू फोफावलय वडीचच आहे. अजिबात खाज नाही. हातभर लांब पानं आहेत. जा घेऊन ये."

मंथन पानं घेऊन आला. त्यानेच ती स्वच्छ धुतली. देठ काढले व पुसून घेतली मग मी सांगितल्याप्रमाणे पानं पालथी करुन मधुने त्यांना वाटण लावलं.

मधुच्या अळुवड्या बांधुन झाल्या तसं मंथनने त्या उकडायला ठेवल्या व मला म्हणाला,"मावशी,तुझ्यामुळे आज ओरिजनल अळुवडी खायला मिळेल नाहीतर ही मधुना.." इतक्यात मधुने त्याच्या पार्शवभागावर सणसणीत धपाटा घातला.

मी मग निघालेच तिथून. हसू तरी किती कोंडून ठेवणार नं. इतक्या वर्षांनी हसल्यामुळे डोळ्यात पाणी येत होतं. बागेतल्या रोपांप्रमाणे आमचं शेजार रुजू लागलं. रोपांना कसं पाणी लागतं तसंच नात्याला थोडा आपलेपणा, थोडा मायेचा स्पर्श लागतो.

एकदा मी मधुला तिच्या आईवडिलांबद्दल विचारलं. ती म्हणाली,"बाबांसोबत गुजरातला असते ती सध्या. बदलीची नोकरी. दर चारेक वर्षाने बिर्हाड हलवावं लागतं." सासूसासरे देशावरचे म्हणाली. त्यांची बागायती शेती त्यामुळे त्यांनाही मुक्कामाहून हलता येत नसे.

मधुला मंथनने संध्याकाळच्या फावल्या वेळात स्कुटी शिकवली. कशी एकमेकांना खेटून बसायची दोघं. तिचे कुरळे केस मंथनच्या गालांवर उडायचे.

कधी दोघं अंगणात बेटमिंटन खेळायचे. कधीकधीतर मला ती बहीणभावंडच वाटायची..अगदी तशीच मारामारी..हमरीतुमरी. मी त्यांना हवी तेवढी फळं खायला सांगितलेलं.  आंबा पडला की दोघंही धावायची. तुला मिळतो की मला. नुसती गंमत.

आणि एक दिवस मधुला कोरड्या उलट्या होऊ लागल्या. तिचा तो दीनवाणा चेहरा पाहून मंथनपण रडवेला झाला. मधुच्या पोटात काहीच थारत नव्हतं. मी तिला लिंबू गरम करुन त्यावर साखरमीठ लावून दिलं.

थोड्यावेळाने तांदूळ मिक्सरला लावून भाजले व त्याची पेज थोडं मेतकूट पेरुन दिली. बिचारी पोर अगदी अळवाच्या पानासारखी मलूल झाली.

मंथन तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. आला तो नाचतच. "मावशी तू आजी होणार,मी बाबा,मधु आई.."असं म्हणून नाचू लागला. मधु लाजली. मी पोरीच्या पाठीवरुन हात फिरवला. तिन्हीसांजेला तिची दुष्ट काढली.

डॉक्टरांनी मधुला फॉलिक एसिडच्या,केल्शिकमच्या वगैरे गोळ्या दिल्या होत्या. मंथन सकाळी स्वतः उठून पोळीभाजी करुन डब्यात न्यायचा. मधुला शांत निजू द्यायचा. मला सांगायचा, तिच्यावर लक्ष ठेवा म्हणून.

मधुच्या पोटात पाणीही रहात नव्हतं.मी कसंबसं तिला खाऊ घालायची. मग तिचे आईवडील आले. आईही तिच्यासारखीच बोलकी. आम्ही खूप गप्पा मारल्या. जाताना मात्र म्हणाली,"काळजी घ्या हं माझ्या मनुची." आणि रडायलाच लागली. मी कसंबसं सावरलं तिला. म्हंटलं,"मुळीच काळजी करु नका तिची. आम्ही आहोत तिला बघायला."

चारेक महिने झाल्यावर मधु नीट जेऊखाऊ लागली. थोडं पोटही दिसू लागलं. बाळानं पोटात पहिली लाथ मारली तेव्हा मी व मधु व्हरांड्यात बसलो होतो. मी मधुच्या ओटीपोटाला हात लावला. स्रुजनाची ती चाहूल पाहून माझे डोळे भरुन आले.  मी तिच्या गालावरून कडाकडा बोटं मोडली.

आता माझं अर्ध लक्ष मधुकडेच असायचं. सकाळी तिला सोबत घेऊन फिरणं,संध्याकाळी स्तोत्र वाचून दाखवणं असं आमचं दोघींच छान जमलं होतं. रक्ताचे संबंध नव्हते हो, पण हे मायेचे ऋणानुबंध अधिकाधिक द्रुढ होत होते.

एकदा रात्री यांना बरं वाटेना. मी गरम लिंबुपाणी दिलं प्यायला. थोडं बरं वाटलं परत छातीत दुखू लागलं. मी मंथनला बोलावून घेतलं. त्याने रिक्षा आणली व ह्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला. माझ्या मनात हजार शंका. मी देव पाण्यात ठेवून बसले. मधु माझे डोळे पुसत होती.

अखेर अकरा वाजता मंथनचा फोन आला,"मावशी,काका बरे आहेत. एसिडिटी झाली होती त्यांना. उद्या सकाळी येऊ आम्ही दोघे. तुम्ही झोपा दोघी." तेव्हा कुठे मी देवांना काढलं पाण्यातून.

मधु म्हणाली,"अगं मावशी,कुडकुडले तुझे देव." किती वेळाने मी हसले! खरंच, म्हाताऱ्या खोडांना नव्या फांद्यांची साथ लागतेच हो. सगळ्या गोष्टी विकत नाही घेता येत. सकाळी हे व मंथन आले. त्यानंतर मी यांच तेलकट,तुपकट बरंचसं बंद केलं. यांनाही सकाळी फिरायला नेऊ लागलो.

मधुची सोनोग्राफी केली त्यात कळलं की बाळाभोवतीचं पाणी कमी झालंय. ठराविक दिवशी तिला डॉक्टरांकडे इंजेक्शन घ्यायला जावं लागे.

तिच्या आईचा,सासूचाही फोन असायचा. पोट बरंच आलं होतं. मधुची आई तिला न्यायला आली खरी पण डॉक्टर म्हणाले येण्याजाण्याची रिस्क घेऊ नका. मग ती इथेच थांबली. आम्ही दोघींच्या तिघी झालो. मधुची आई त्यांच्या जेवणाखावणाचं बघत होती. मीही कधीकधी त्यांना शेजारपाळं देत असे पण यांच्या डायटमुळे माझं गोडधोड करणं तसं कमीच झालं होतं.

मधुची आई व मी दोघींनी मिळून पुठ्ठा,जर,टिकल्या वगैरे साहित्य आणलं व बागेतल्या तगरीच्या कळ्या,गुलाब,निळी कोराटीण,क्रुष्णकमळ..वापरुन फुलांची वाडी बनवली. व्हरांड्यातल्या झोक्याच्या दांड्यांना जुईचे गजरे बांधले. मंथनने फुलांचा धनुष्यबाण तयार केला आणि मग टिपुर चांदण्यात आम्ही मधुचं डोहाळजेवण केलं. आजुबाजूच्या ओळखीच्या पाचसहा बायांना बोलावलं.

कपाळाला फुलांचा मुकुट,गळ्यात पुष्पमाला,हातात पुष्पबंध,कंबरेवर फुलांचा पट्टा.. हिरवीकंच पैठणी तिला लाल काठ,गोऱ्यापान दंडात रुतलेला लाल ब्लाऊज,डोळ्यात काजळ,ओठांवर लाल लिप्स्टीक,मागे केस मोकळे सोडलेले,त्यावर मोगऱ्याच्या फुलांचे गजरे सोडलेले. मी माझ्या डोळ्यातलं काजळ करंगळीने काढलं व ते बोट तिच्या कानाच्या पाळीमागे लावलं.

मधुला आता फार जपायला सांगितलं होतं. नववा लागला नि दुसऱ्या दिवशी मधुच्या पोटात दुखतय म्हणू लागली. मंथन तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. मधुची आई व जोडीला मीही गेलो त्यांच्या मागाहून.

मधु कळा देत होती. जवळजवळ चार तास झाले. बिचारी पोर घामेजून गेली,रडू लागली.

डॉक्टर सिझेरियनचा निर्णय घेऊ म्हणाले व मंथनची सही घेण्यासाठी त्याला केबिनमध्ये घेऊन गेले.

इकडे मधु सारा जोर लावून पायाने खालचा बेड रेटू लागली आणि नर्सची एकच धावपळ उडाली. बाळ बाहेर आलं होतं. आम्ही देवाचे आभार मानले. बाळाला स्वच्छ धुवून,पुसून आईच्या स्तनाग्रांना लावलं तसं बाळ दुधू चोखू लागला. गुलाबी अंग,इवलेसे डोळे, इवलीइवली बोटं..ते शैशव पाहून खरंच सांगते मी हरखून गेले.

कधी कोणाच्या मुलाकडे पाहिलं की बाया डोळे वटारुन पहायच्या माझ्याकडे पण इथे मात्र उलट होतं. मधु,मधुची आई,मंथन मला हक्काचं माणूस मानत होते. चारेक दिवसांत बाळाला घरी आणलं. पाचवी केली. माझं बरचसं लक्ष आता बाळाच्या आवाजाकडेच असायचं.

बारसं अगदी झोकात केलं. लाकडी पाळणा यांच्यावेळचा माळ्यावर होता. तो काढला. त्याला वॉर्निश वगैरे लावून आणलं. फुलं,पेढे भरपूर आणले. जाई,जुईच्या फुलांचे गजरे पाळण्यावर सोडले. लाल,पिवळे फुगे लावले. फिरतं खेळणं मधोमध लावलं. मधुच्या सासरची बरीच जणं आली होती.

मधुच्या सासूने मधुसाठी चिंतामणी कलरची साडी आणली होती. त्यांनी मधुच्या आईची मस्टर्ड कलरची साडी,श्रीफळ घालून ओटी भरली. मी बाळासाठी चांदीचे वाळे केले होते. मधुचीही साडीचोळी,श्रीफळ  घालून ओटी भरली.

जेवण बाहेरुन मागवलं होतं. छानच होतं. बाळाला आत्याने पाळण्यात घातलं.  त्याच्या कानात कुर्र करुन नाव ठेवलं. मधु व मंथनचा मानस.  खूप छान नाव ठेवलं. मानस त्याच्या इवल्याइवल्या मुठी चोखत होता.

मधु मंथनच्या आग्रहास्तव मीही एक जुनं पाळणागीत गायले

सोनियाचा पिळणा,रेशमाचा दोर ग
मधोमध विसावला माझा चितचोर ग

नीज नाही डोळा,कसा टकमक बघतो
बाळमुठी वरखाली नाचवीत राहतो
याच्या चांण्यात माझे लोचन चकोर ग

याच्या दर्शनाने येई सुखाला फुलोरा
याच्या स्पर्शनाने लाभे आशेला निवारा
याच्या प्रेमसूत्रे नाचे माझा मनमोर ग

कुणी गुणगुणा गाणे,कुणी हालवा हिंदोळा
झोपू द्या ग राजसाला,हीच विसाव्याची वेळ
शिरी क्रुपाद्रुष्टी याच्या धरा सानथोर ग

बारश्यादिवशी मधुची आई गुजरातला निघून गेली. जाताना मात्र एक शब्दही न बोलता तिने मला गच्च मिठी मारली. एका आईच्या ह्रदयातल्या भावना माझ्या ह्रदयाशी हितगुज करत होत्या.

मंथनची आई बाळाला शंभो घालू लागली. त्याला बेसन,आंबेहळदीचं पीठ लावून मांडीवर घेऊन ऊनऊन पाणी घालू लागली. धुपाची धुरी देऊ लागली. मीही कौतुकाने बघायला जाई पण मी गेलेलं मंथनच्या आईला तेवढं रुचत नसे. नजरेतून जाणवे मला ते पण तरीही माझं मन कोडग्यासारखं झालेलं. मी जाईच बाळाला पहायला. बाळाचं हसरं बोळकं पाहिल्याशिवाय मला चैन पडत नसे.

बाळ कलेकलेने वाढत होता.  आम्ही एक सोहळाच अनुभवत होतो. एकदा मंथनच्या गाडीचा अपघात झाला.  यांना कळवलं,हे दुकानातून थेट इस्पितळात गेले. पायाला फ्रेक्चर झालं होतं,डोक्याला जखम होऊन रक्तस्त्राव झाला होता.  यांनी रक्ताची,पैशाची सगळी व्यवस्था केली. मी मंथनच्या आईला व मधुला धीर देत होते. सात दिवस हे मंथनसोबत इस्पितळात होते. त्याला घेऊन घरी आले.

त्या प्रसंगानंतर मंथनची आईही माझ्याशी मायेने वागू लागली. मानस आता ढोपराने चालू लागला होता. इकडेतिकडे फिरायचा. काय मिळेल ते तोंडात घालायचा.

एकदा मधु सासूला घेऊन बाजारात गेली. मानसला माझ्याजवळ ठेवलं होतं. मानस खेळताखेळता झोपला. मी त्याला उचलून बेडवर ठेवलं. बाजुला उशा लावल्या व कपडे धुवायला गेले.

दहाएक मिनटं झाली असतील मला जोरात आवाज आला म्हणून बाहेर येऊन बघते तर मानस उशा ओलांडून खाली पडला होता. त्याने डोळे फिरवले होते. मी कसंबसं रडतरडत त्याचं डोकं चोळलं.

इतक्यात मधु आली. मधुने त्याला छातीशी धरलं. मी रडतच होते,"नकाे ठेवू माझ्याकडे बाळ. मी वाईट आहे", म्हणत मलाच कोसत होते.

मधुच्या सासूने बाळाला उचललं व माझ्या मांडीवर ठेवलं.    तसा गुलाम माझ्या मांडीवर चढला व इवल्याशा दातांच्या कण्यांनी माझे गाल चावू लागला.

कोणत्यातरी जन्माचं नातं असावं माझं या शेजाराशी.

(समाप्त)

-------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now