
फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 9
दुस-या दिवशी सकाळी जेजुरीला गेलेले सगळेच उशीरा उठले. चंचल आठ वाजता उठलीच , आता इकडे जास्त वेळ झोपून राहणं बरं नसतं वाटल,तिने सकाळचे प्रातर्विधी उरकून आंघोळ केली ,मावशीच्या मदतीने साधीच पण छान साडी नेसली ,जरा लाईट मेकअप केला. मावशी आणि ती आता त्यांच्या घरात गेल्या तर सगळे नाष्टा करत होते. अमेयची आई त्यांना म्हणाली,या बसा ,तूम्हीही नाष्टा घ्या . त्यांनी दोघींनी नाष्टा केल्यावर मावशी म्हणाली ,मी पण येते भांडी घासायला.
अमेयची आई-अहो नको ,घासतील सगळ्या मिळून,तुम्ही थोड्या नेहमी येणार आहात आमच्याकडे ,तुम्ही बसा
मावशी- अहो बसून बसून कंटाळा आलाय,घरी कोण एवढं बसून राहतयं,काही ना काही चालूच असतं
अमेयची आई-म्हणून तर म्हणते आराम करा ,माहेरी आल्या असं समजा
मावशी- अहो लेकीच्या सासरी आलेय,असं बसून राहणं चांगल नाही वाटतं,तुमचे नातेवाईक काय म्हणतील
अमेयची आई- नातेवाइकांचा जास्त विचार करु नका ,ते दोन्ही कडून बोलतात
मावशी -तुम्ही म्हणता ते ही खरेच आहे म्हणा,तरी बसल्या बसल्या लसूण तरी सोलते ,तेवढीच तुम्हाला मदत
अमेयची आई- तुम्ही काय ऐकणार नाही ,बरं सोला
चंचल-मावशी मी पण मदत करते
अमेयची आई-चंचल नको,तू जावून तुझी तयारी करायला घे ,गुरुजी साडे अकरा वाजता पुजेसाठी येतील आणि जाताना दिप्तीसाठी नाश्ता पण घेऊन जा.
चंचल- चालेल ,असं म्हणून ती दिप्तीचा नाश्ता घेऊन जाते.
दिप्तीचा नाश्ता करून झाल्यावर दोघी मिळून चंचलच्ं आवरतात ,चंचलने छान लग्नाचा शालू घातलेला असतो , मेकअप आणि हेअरस्टाईल दिप्ती करून देते , तितक्यात तिला मामी ,मामी असा आवाज येतो,ती मागे वळून पाहते तर तिचा भाचा गजरे घेऊन आलेला असतो ,तो गजरे तिच्या हातात देत तिला म्हणतो,आईने दिलेत आणि गुरुजी आलेत तर लवकर बोलवले आहे. दिप्ती सांगते , गजरे लावून येतोच आम्ही.
त्या दोघी आवरून त्यांच्या घरी जात असताना जेवणाचा छान वास येत होता,आचा-याने जेवण बनवायला सुरुवात केली होती,आज सगळ्या गावाला पुजेचे निमंत्रण दिले होते आणि आजुबाजुच्या गावातून जवळची पाहुणे मंडळी येणार होती ,चंचलचे आईवडीलही येणार होते ,म्हणून ती खूष होती.
जेवण संध्याकाळी पाच वाजताच सुरु होणार होते .
-------------------------------------------------
त्या घरात पोहोचल्या तर गुरुजींनी पुजेची सगळी तयारी करून ठेवली होती, अमेय तर चंचलला बघून बघतच राहिला होता,त्यानेही लग्नातलाच ड्रेस घातला होता,तोही राजबिंडा दिसत होता . तसं गुरुजी म्हणाले,आता तुमचं झालं असेल तर सर्व वडीलधा-या माणसांच्या जोडीने पाया पडून या. तसे दोघेही एकमेकांकडे पाहत सगळ्यांच्या जोडीने पाया पडले.
सगळ्यात शेवटी गुरुजींच्या पाया पडून पाटावर बसले.
अमेयच्या आणि चंचलच्या खांद्यावर उपरणे टाकले, त्याच्या मोठ्या बहिणीला उपरण्याची गाठ बांधायला सांगितली,त्यावर गुरुजी म्हणाले,जशी बांधली ,तशी सोडायची पण तुम्हीच आणि सोडताना मात्र नाव घ्यावे लागेल ,तयारीत राहा. तसं ताई गालातचं हसल्या.आता पुजेला सुरुवात झाली,गुरुजी जसं सांगतील ,तसं दोघे करत होते ,सर्वात शेवटी कथा वाचायला सुरुवात केली,सगळ्या घरात प्रसादाच्या शि-याचा सुगंध दरवळत होता. चंचलला प्रसादाचा शिरा खूप आवडायचा पण इथे नवीन असल्यामुळे ती शांत होती.
कथा वाचून झाली तसं आरतीची तयारी झाली ,दोघे मिळून आरतीसाठी उभे राहिले. गुरुजींनी पुरण पोळीचा नैवेद्य आणि प्रसादाचा शिरा दोन्ही मागवून घेतले.सगळ्यांनी मिळून उत्साहात आरती केली,गुरुजींनी नैवेद्य दाखविला ,नंतर चंचल आणि अमेयला दिला आणि बाकी सगळ्यांना वाटायला सांगितला. गुरुजींनी चंचलची खणा नारळाने ओटी भरली आणि दोघांनाही गुरुजींनी नाव घ्यायला सांगितले.
अमेय-भाजीत भाजी मेथीची, चंचल माझ्या प्रीतीची
चंचल- आईवडीलांनी बाळकृष्ण भेट दिला लग्नाच्या दिवशी,
माझ्या सासरची मंडळी आहेत खूप हौशी,
अमेयरावांच नाव घेतं सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी.
सगळ्यांनी मिळून चंचलच खूप कौतुक केलं,अमेय तर तिच्या कडे पाहतच बसला , गुरुजींनी सांगितलं ,आता जोडीने सगळ्यांच्या पाया पडून या.तसे ते सगळयांच्या पाया पडून आले आणि परत पाटावर बसले ,गुरुजींनी त्याच्या बहिणीला गाठ सोडवायला बोलावलं आणि नाव घेतल्यावर तिने गाठ सोडली.दोघंही गुरुजींच्या पाया पडतात ,अमेय त्यांना दक्षिणा देतो आणि जेवायला आत नेतो. गुरुजी जेवून जातात ,पुजा उरकायला अडीच वाजून गेले होते.अमेय आणि चंचलला पुरण पोळीचे जेवण जेवायला दिले. अमेयची बहिण चंचलला म्हणाली ,जा एखादा तास आराम कर ,मग संध्याकाळी परत सारखं पाया पडण्यासाठी खाली वाकाव्ं लागेल.
चंचलला पुजेला बसून नाहीतरी कंबरेला कळ लागली होती,पण बोलणार कसं,ताईंनी स्वतःहून सांगितल तर तिला खूप बरं वाटलं.ती जाऊन थोडा वेळ पडली तर तिला बरं वाटलं.
------------------------------------------------
अर्ध्या तासाने तिलाच असं वाटल्ं ,ताई जरी बोलल्या तरी येवढा वेळ झोपणे चांगले नाही ,ती उठली आणि तयार होऊन घरात गेली,आता पाहुणे यायला सुरुवात झाली होती,चंचल मनातल्या मनात म्हणाली ,बरं झालं मी आले .
अमेय जेवणाची तयारी करण्यात बिझी होता , त्याने चंचल कडे पाहून डोळ्यानेच विचारलं,आराम झाला का .
तिने त्याला डोळ्यानेच सांगितल ,हो झाला ,तसं त्यांच्या लक्षात आलं की,सगळे त्यांच्याकडे पाहत होते ,बिचारे दोघही लाजून पाणी पाणी झाले ,तसं त्याची आई म्हणाली ,तुम्ही आता नवरा बायको आहात ,एकमेकांशी बोललात तरी चालेल.
आता पाहुण्यांची वर्दळ वाढली होती ,अमेय सगळ्यांबरोबर तिची ओळख करून देत होता,जे मोठे होते त्यांच्या दोघे पाया पडत होते ,येणा-या बायका चंचलची ओटी भरत होत्या ,तीही त्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार करत होती.
अमेयचे आईवडील सगळ्याना जेवण करुन जा असं सांगत होते. इतक्यात दिप्ती चंचल जवळ आली आणि सांगितल आई बाबा आलेत ,तिच्या डोळयात लगेच एक वेगळीच चमक येते. आईवडीलांना पाहून तिला बरे वाटते. त्यांच्याबरोबर तिचे काका ,काकू,मामा,मामी सगळेच आले होते . ते आल्यावर सगळ्यांना पाणी देण्यात आले,मग अमेय आणि चंचलला पाटावर बसवले, चंचलच्या आईने तिची ओटी भरली आणि तिच्या वडिलांनी अमेयला गंध लावून ड्रेस दिला , बाकीच्यांनीही चंचलची ओटी भरली आणि अमेयला जावई म्हणून टोपी घातली.अमेयच्या आईने चंचलच्या घरून आलेल्या सगळ्या बायकांना चंचलला हळदी कुंकू लावायला सांगितले आणि प्रत्येकीला साडी दिली.
बाबांनी अमेयला सगळ्या पुरुष माणसांना गंध लावायला सांगितला आणि टॉवेल टोपी दिली. आता अमेयच्या आईवडिलांनी सगळ्या व्याही मंडळींना जेवणाची विनंती केली,तसे सगळे जेवायला गेले. अजूनही पाहुणे मंडळी चालूच होती,त्यामुळे चंचल तिथेच थांबली. जेवल्यानंतर ते लोक परत जायला निघाले ,तसे अमेयच्या घरातले सगळे चंचल सहित गाडी पर्यंत सोडवायला गेले . अमेयचे बाबा म्हणाले आज रात्री जागरण गोंधळ आहे ,उद्या दुपारी चंचलला पहिल्या बोळवणीला पाठवू ,तेव्हाच मावशी आणि दिप्ती तिच्या बरोबर येतील. चालेल असं बोलून ते गाडीत बसले आणि सगळ्यांना हात करत गाडी निघून गेली.तितक्यात अमेयचा चुलत भाऊ सांगत आला ,गोंधळी आलेले आहेत. चला पोरांनो आता जागरणाची तयारी केली पाहिजे. तसे सगळे जातात.
जागरणाच सगळं सामान त्या गोंधळ्यांकडे देण्यात येतं ,ते सगळी पुजा मांडतात ,मग ते जेवायला जातात ,तर घरातली सगळी मंडळी जी जेवायची राहिली होती ती सगळीच जेवून घेतात.
-------------------------------------------
जागरणाला सुरुवात होते ,अमेयच्या डोक्यावर घोंगडीची घोंगटी बनवून घालायला देतात,त्याच्या हातात दिवटी देतात , तिच्या वातीला तुपात भिजवून ठेवले होते,ती वात दिवटी वर तेल घातले जाते आणि ती पेटवली जाते. चंचलच्या हातात हळदीकुंकु आणि नैवेद्याचे ताट असते ,थोडसं शेणंही असतं,पाण्याचा तांब्या दिप्तीच्या हातात असतो ,बाकी पाच बायकांच्या हातात मोठ्या वाती असतात ,सगळ्यांची वरात संबळ आणि डफलीच्या तालावर निघते . काही अंतर गेल्यावर एका छोट्याशा मंदिराच्या बाजुला थांबतात ,तिथे चंचलला शेणाने थोडी जमीन सारवायला सांगतात . ती सारवते,मग त्यावर पाच दगडांची नागिनीच्या पानावर देव म्हणून प्रतिष्ठापना करतात. त्यांची अमेय आणि चंचल पूजा करतात ,बाकी सगळे पुजा करतात . मग सगळ्यांच्या हातातल्या पीळ मारलेल्या लांब वाती तेलात बुडवून त्या पण पेटवतात ,मग आरती होते ,परत वाजत गाजत सगळे घरी आले . घरासमोर मंडपात पुजा मांडली होती ,त्यासमोर जाऊन अमेय आणि चंचलला बसवले ,दोघांनी मिळून मांडलेल्या चौकासमोर पुजा सांगितल्या प्रमाणे केली.मग तिथे असलेल्या सगळ्यांनीच पूजा केली,गोंधळ्यांनी गोंधळ सुरु केला, चार पुरुष गोंधळी होते आणि एक मुरळी होती . मुरळीच्या हातात चिपळी होती . एकाकडे तूणतूण होतं,एकाच्या हातात डफली ,एकाकडे संबळ आणि एक माईक समोर बोलणारा होता. त्याने गणपतीची आराधना केली आणि आवाहन केले तालावर ,गजानना तुम्ही गोंधळा यावे ,असे सगळ्याच देवांची नावे घेतली,बाकी सगळे त्याला साथ देत होते आणि मुरळी त्या तालावर नाचत होती.
जागरणाला रंग चढला होता ,गोंधळी गोष्टी सांगून लोकांचे मनोरंजन करत होते . तिथे उपस्थित असलेले पैसे काढून दोघांवरून ओवाळून त्यांना देत होते, तसा त्यांचा उत्साह अजून वाढत होता,मधून मधून काही हौशी मंडळी ऊठून त्यांच्या बरोबर नाचत होती ,पहाटेचे चार वाजले होते ,काही मंडळी एक एक झोप काढून आली होती ,काही पेंगत होती आणि काही एन्जॉय करत होती ,थंडीमुळे काही चादर पांघरून बसली होती. आता त्यांनी आरती घेतली आणि अमेयला टाक (कडी असते जिला साखळी लावलेली असते,साखळी धरून जोरात खेचायची असते की कडी तुटली पाहिजे )तोडायला सांगितला , एकाच दणक्यात अमेयने कडी तोडली ,तसं सगळ्यांनी जल्लोष केला,सदानंदाचा येळ्कोट,भैरवनाथाची चांगभले ,सगळा परिसर भंडारामय झाला होता. जागरण संपले ,गोंधळी लोकांनी आवरा आवर करेस्तोवर त्यांना चहा बनवून आणला,तोपर्यंत पाच वाजले. गोंधळी निघाले ,तसे जे ते आप आपल्या जागी जाऊन झोपले.
सगळेच अकरा वाजता उठले. माहेरी जायचे म्हणून चंचल खूष होती ,आज सगळे डायरेक्ट जेवले होते कारण आज उशीर झाला होता. जेवल्यानंतर निघायची तयारी झाली, मावशींना अमेयच्या आईने हळदी कुंकू लावून साडी देवून ओटी भरली आणि अमेयला सांगितले ,जाता जाता वाटेत एखाद्या दुकानात,दिप्तीला तिच्या पसंतीचा ड्रेस घेऊन दे आणि मग घरी नेऊन सोड. लवकर संध्याकाळ व्हायच्या आत परत ये ,अजून अंगाला हळद आहे आणि हा चाकू खिशातच राहू दे.
चालेल ,असं म्हणून ते निघाले. चंचलच्या गावी दुकाने मोठी होती ,चंचलने सांगितले त्या दुकानात गेले,तिच्या आवडीचा ड्रेस घेतला. त्याने चंचलला विचारले ,तुझ्याकडे जीन्स आहे का, ती हो म्हणते,मग तो म्हणतो तुला एखादा टॉप किंवा रात्री घालण्यासाठी गाऊन वैगेरे काही हवं असेल तर घे आणि तू आल्यावर आपण महाबळेश्वरला जाणार आहेत दोन तीन दिवसांसाठी ,तर तिकडे जाण्याच्या हिशोबाने काही घे. आहे माझ्याकडे मी आणेल,निघुया का सगळे वाट पाहत असतील.
तसे ते निघतात ,तो त्यांना सोडवून चहा घेऊन निघतो. त्यांना सांगतो, आईने हळदीच अंग असल्यामुळे लवकर बोलवलय्ं.
ते त्याला सांगतात ,पोहोचल्यावर फोन करा आणि व्यवस्थित जा. तो गाडीत जाऊन बसतो ,तसं चंचल जवळ जाते आणि बोलते,व्यवस्थित जा. तसं तो म्हणतो,लवकर ये ,मी तुझी वाट पाहतोय ,डोळा मारुन म्हणतो लक्षात आहे ना ,आपल्याला जायचं आहे . ती लाजून ,हो म्हणते. चल येतो,असं म्हणून निघतो.तिच्यासाठी एक गिफ्ट घेतो ,ते गाडीतच ठेवतो,घरात नेले तर सगळे विचारतील काय आहे म्हणून.
आता खरी त्यांच्या संसाराला सुरुवात होणार असते,काय होईल पुढे ते जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा आणि आनंदी राहा ,आपला अभिप्राय नक्की द्या.
क्रमशः
रुपाली थोरात