
फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 8
गाडीत बसल्यावर सुध्दा चंचल उदास वाटत होती.
अमेय-चंचल रडून रडून तुझा चेहरा पूर्ण सुजलाय
चंचल-खरचं का गं दिप्ती?
दिप्ती(चंचलची बहीण) - अगं रडलीये ना तू म्हणून असं वाटतय
चंचल -आरसा दे ना तुझ्या पर्स मधून
अमेय -दे गं,नाहीतर आमच्या कडे सगळे म्हणतील रडकी बायको करून आणली
चंचल- मी काय रडूबाई वाटते की काय तुला , सगळ्यांना रडताना बघून मलाही रडायला आलं ,आता मी ठीक आहे.
अमेय-आता जी बोलत आहे ना ती माझी बायको आहे असं तो हसत म्हणाला.
दिप्तीच्या लक्षात आलं की,जिजू हे दीदीचा मूड बदलण्यासाठी सगळं करत आहे ,तिचा त्यांच्या बद्दलचा आदर वाढला.
अमेयचे घर आले आणि गाडी थांबली ,तसे सगळे गाडीतून उतरले, बाहेर लोखंडाची कॉट टाकली होती आणि त्यावर गादी टाकून छान चादर अंथरली होती ,त्यावर अमेय आणि चंचलला बसवले ,वरातीची सगळी तयारी केली होती. अमेयच्या घरात सगळे व्हेज खाणारे होते ,त्यामुळे सगळ्यांसाठी व्हेज पुलाव मागवला होता आणि अमेयच्या मित्रांसाठी नॉनव्हेज बिर्याणीची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केली होती.चंचल आणि अमेयला तिथेच कॉटवर जेवायला दिलं. थोड्या वेळाने डीजे आला तोपर्यंत सगळ्यांची जेवण झाली होती ,वरातीला सुरुवात झाली,सगळेच बेधुंद होऊन नाचत होते. मोठे,लहान, अमेयचे मित्र सगळेच नाचत होते ,अमेयचे मित्र त्याला डान्स करायला घेऊन गेले ,तसे चंचललाही तिच्या नंदांनी ,जावांनी डान्स करायला नेले.
नंतर सगळ्यांनी मिळून दोघांना डान्स करायला लावला आणि त्यांच्या भोवती सगळे डान्स करत होते ,अमेयचे आईवडीलही नाचले,हे सगळं पाहून चंचलला मजा वाटत होती,कारण तिचे आईवडील असे कधी एकमेकांसोबत नाचले नव्हते.
चंचलची मावशी बोलली ,तुझ्या घरचे खरंच खूप हौशी आहेत.
नाचून नाचून सगळे 2.00 वाजता थांबले आणि त्यानंतर ढेढवा
नाचायचा कार्यक्रम सुरु झाला. सगळे पुरुष मंडळी एक एक करून देव ताम्हाणात ठेवून भंडारा उडवत वाजंत्र्यांच्या तालावर नाचत होते ,यातच पहाटेचे 4.00 वाजले होते.
--------------------------------------------
आता गृहप्रवेशाची सगळी तयारी केली होती घराच्या दरवाजात अमेय आणि चंचलला उभे केले,सगळ्या बहिणींनी मिळून दार धरले, त्यावर तिथे असलेल्या बायकांनी दार धरण्याचे गाणं म्हटलं, नंदांनी तिला विचारल,मुलगी झाली तर सून म्हणून देशील काय, चंचल लाजतच ,हो म्हणाली. तसं त्या दारातून बाजुला झाल्या ,आता दारात तांदळाच मापट ओलंडायला सांगितल ,मापट ओलांडायला लावतात कारण असं म्हणतात
हळूच लवंडल तर म्हणतात ,सुनबाई प्रेमळ आणि सगळ्यांना एका धाग्यात बांधून ठेवणारी आणि तिच्या येण्याने धन धान्याने घर भरून जाऊ दे अशी एक प्रचलित प्रथा आहे. तसं चंचलने हलकच्ं पायाच्या अंगठ्याने त्याला लवंडल,तसं सगळे तांदुळ खाली सांडले ,ते गोळा करायच काम दिराच्ं असते ,अमेय एकटा असल्याने त्याचे दोन चुलत भाऊ तांदुळ गोळा करायला लागले ,जसे ते गोळा करायला लागले ,सगळ्यांनी त्यांना मारायला सुरवात केली,बिचा-यांनी कसे बसे गोळा केले ,ते झाल्यावर परातीत कुंकवाच पाणी केलेल होत ती समोर ठेवण्यात आली ,चंचलने साडी हलकेच वर घेतली,परातीत पाय ठेवले आणि नंतर खाली पाय ठेवत देवघरात देवाच्या दर्शनासाठी गेले ,तिच्या पायाचे ठसे सगळीकडे उमटले होते,फोटोग्राफर त्याचंही शूटिंग घेतले .देवाच्या पाया पडून झाल्यावर घरातील सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडले.
तिथे बाजुलाच काही भांडी एकावर एक रचली होती , मग तिला सांगण्यात आले की,तिला काय बोलायचे आहे.
अमेयची आई- या राशी कसल्या सूनबाई
चंचल- गव्हाच्या
अमेयची आई- या राशी कसल्या सूनबाई
चंचल-तांदळाच्या
अमेयची आई- या राशी कसल्या सूनबाई
चंचल- डाळींच्या
अमेयची आई- या राशी कसल्या सूनबाई
चंचल- कडधान्याच्या
अमेयची आई- या राशी कसल्या सूनबाई
चंचल- साखरेच्या
हे सगळं झाल्यावर तिला एका साईडला आणि अमेय दुस-या साईडला अमेयच्या आईच्या मांडीवर बसले.
अमेयची आई- झालं का बाबा
अमेय- हो आई
अमेयची आई- झालं का बाई
चंचल- हो आई
अमेयची आई- कशाच्या पावलांनी आली
चंचल- लक्ष्मीच्या पावलानी
अमेयची आई- कशाच्या पावलांनी आली
चंचल- सोन्या चांदीच्या पावलानी
मग अमेयची आई तिला एक बॉक्स देते ,आशिर्वाद म्हणून,त्यात छोटं मंगळ सूत्र असतं,ते ती अमेयच्या हातात देते,तसं तो तिच्या गळ्यात घालतो.
असच ते दोघं अमेयच्या चूलत्यांच्या व मावशांच्या मांडीवर बसतात ,प्रत्येक जण चंचलला काही ना काहीतरी गिफ्ट देतात,तसं अमेय म्हणतो-सगळे तिचेच लाड करतात ,मला कुणी काही देत नाही.
तसं सगळे हसतात
अमेयची आई- ती तिच सगळं सोडून तुझ्याकडे आपल्या घरी आली आहे,तू तर इथेच आहे
अमेय- तेही खरं म्हणा
तसं तोंड वेडावून चंचल त्याला चिडवते,ते पाहून सगळे हसतात.
--------------------------------------------
दोघांना समोरासमोर बसवतात . त्यात एक सोन्याची आणि एक चांदीचे जोडव लपवतात ,एक दोन तीन म्ह्टले की ,त्यांनी हात घालून अंगठी काढायची ,ते शोधत असताना एकमेकांच्या हाताचे स्पर्श होत होते ,लाजत होते ,अमेयचं सगळं लक्ष चंचल वर होतं,पण चंचलच मात्र अंगठी शोधण्यात,असं तीन वेळेला केलं ,दोन वेळा चंचलला अंगठी आणि जोडव दोन्ही मिळाल होत ,तसं सगळे अमेयला बोलू लागले अरे काही तरी मिळव नाहीतर आयुष्यभर तिच्या ताटाखालच मांजर बनाव लागेल ,आता कुठे अमेय अंगठीसाठी लक्ष देतो , चंचल त्याच्याकडे पाहून डोळा मारते तसा तो तिच्याकडे पाहत राहतो ,तो पर्यंत ती तांदळात हात घालून अंगठी आणि जोडवी दोन्ही घेते,त्याच्या डोळ्यासमोर पकडते ,तेव्हा तो बोलतो,चिटिंग. तिच्या बाजूने सगळे बोलतात ,काय चिटिंग केली ते तर सांग.
बिचारा अमेय शांत बसला काय करणार आणि सगळ्यां समोर काय सांगणार ,तसं चंचलला हासू आलं. अमेयची आई म्हणते ,पाच वाजले चला झोपा आता सगळे,परत नऊ वाजता यांची हळद उतरवायची आहे.
चंचलची ,दिप्ती आणि मावशी यांची झोपण्याची व्यवस्था शेजारच्या घरात केलेली असते. त्यांच्या घरात खूप पाहुणे मंडळी मध्ये त्यांना ऑकवर्ड वाटायला नको म्हणून तसं केलेलं.
------------------------------------------------------
दुस-या दिवशी हळद उतरवण्यासाठी चंचलला साधी साडी नेसायला सांगितली.घराच्या अंगणात सगळ्यांसमोर अशी आंघोळ करायची म्हणजे तिला थोडं विचित्र वाटत होतं.पण तिच्या मावशीने समजावलं, तेव्हा ती तयार झाली. दोघांना समोरासमोर पाटावर बसवलं, कुंकवाच पाणी केलं होतं ,सुपारी होती .चंचलला दोन हातांच्या मध्ये सुपारी पकडायला सांगितली आणि अमेयला सोडवायला सांगितली ,तसं अमेयने दोन्ही हातांच्या मध्ये बोट घुसवायचा प्रयत्न केला तसं तिला गुदगुल्या होत होत्या ,तरीही ती सोडत नव्हती ,आता अमेयने डोळा मारला,तशी तिची पकड ढिली झाली आणि त्याने सुपारी काढली. असं अजून दोन वेळा केलं ,एकदा तो काढू शकला पण शेवटी चंचलने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आता अमेयला दोन बोटांच्या मध्ये सुपारी पकडायला सांगितली आणि चंचलला सोडवायला सांगितली ,चंचलने एकदा सोडवली पण दोन वेळा नाही सोडू शकली . आता दोघांच्या हातातील हळकुंड सोडायला सांगितले ,पण त्यातही ट्वीस्ट होतं की चंचल दोन हाताने सोडणार पण अमेय मात्र एका हाताने,ते सोडवत असताना आजूबाजूचे सगळे त्यांना प्रोत्साहन देत होते.तिथल वातावरण मस्तीमय झालं होतं.तिला वाटल्ं संपल वाटत,पण अजून बाकी होतं,त्यांच्या दोघांच्या हातात पाण्याचा तांब्या देण्यात आला , तोंडात पाण्याची चूळ भरायची आणि एकमेकांवर टाकायची ,पहिल चंचल नाही बोलली तसं सगळे बोलतात असं केल्याने प्रेम वाढते. अमेयने मात्र चूळ भरून तिच्या अंगावर टाकली तशी तिनेही त्याच्या तोंडावरच दोन तीन वेळा निशाना साधला,पण अमेयला काही चान्स भेटत नव्ह्ता . आता मात्र अमेयने तिच्याकडे असं काही पाहीलं की दोन मिनीटं ती स्तब्ध उभी राहिली आणि त्याने ही तोंडावर निशाना साधला,तस त्याच्या चेह-यावर हसू उमटलं,आता त्यांचे पाट जवळ घेण्यात आले ,एकमेकांना एकमेकांच्या अंगावर पाणी ओतायला सांगितले . सगळे आजुबाजूला उभे राहून त्यांना एकमेकांविरुद्ध प्रोत्साहन देत होते. आता दोघांनाही आत जाऊन आंघोळी करायला सांगितल्या.
तयार झाल्यावर सगळ्यांनी नाश्ता केला. अमेय,चंचल,दिप्ती आणि अमेयची मोठी बहीण असे गावात जाऊन देव दर्शन घेऊन आले,तो पर्यंत जेवण तयार होते ,जेवण झाल्यावर दुपारी ते खंडोबाला ,जेजुरीला निघाले. अमेयच्या बहीणी ,मामा असं दोन गाड्या घेऊन सगळा ताफा जेजुरीला निघाला.
-----------------------------------------------------
जेजुरीला ते पाच वाजता पोहोचले ,ऊन कमी झाले होते तर चढायला त्रास होणार नव्हता .आता जेजुरीला जाताना नवीन नवरीला नवरदेव पाच पाय-या उचलून चढतो ,अमेयने आनंदाने उचलून घेतले,ती पण लाडाने त्याच्या दोन हातात छान बसून आनंद लुटत होती. त्याला साथ देण्यासाठी अमेयच्या भाऊजींनीही त्याच्या बहीणीला उचलून घेतलं,तशी ती म्हणाली त्यांच नवीनच लग्न झालय्ं ,असू दे अजून मी जवान आहे ,त्यांच्या या वाक्यावर सगळेच हसले आणि त्याची बहीण लाजेने चूर चूर झाली. सगळे वर चढून गेले ,देव दर्शन छान झाले ,सगळ्या पुरुष मंडळींनी तळी भरली ,सदानंदाचा येळ्कोट,भैरवनाथाची चांगभले चा जयघोष झाला . सगळे भंडा-यानी माखले होते ,गडावरून खाली येईपर्यंत आठ वाजले होते. आता परतीचा प्रवास सुरू झाला, आता सगळ्यां च्या पोटात कावळे ओरडायला लागले होते म्हणून एक छानस्ं हॉटेल बघून जेवण्यासाठी गाडी थांबवली. जेवण मागवले ,सगळयांना भूक लागली होती,त्यामुळे कुणीही एकमेकांशी न बोलता जेवत होते,आता सगळ्यांच्या पोटात भर पडल्यामुळे सगळ्यांना एनर्जी आली होती ,मग काय सगळे अमेय आणि चंचलला पूर्ण रस्ताभर काहीही कारणाने चिडवत होते.
अमेय बोलला,उगाच तुम्हांला सगळ्यांना जेवायला घातले .
तसं चंचलची मावशी खुदकन हसली , चंचल तिच्याकडे पाहून,काय झालं तशी मावशी म्हणाली ,पाहुणे भारीच जोक मारतात.
चंचल-आता हे पाहुणे कोण
मावशी -आमचे जावई बापू दुसरं कोण
चंचल-मला तर कधी कधी तू काय बोलते ते कळतच नाही
मावशी-जाऊ दे मग ,शांत बस
मग सगळीकडे शांतता पसरते ,सगळ्यांना उशीर झाल्यामुळे डुलक्या येत होत्या ,चंचलही अमेयच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपली होती ,तिची झोप मोडू नये म्हणून तो शांत बसला होता आणि कुणाच लक्ष नाही हे पाहून तिला न्याहाळत होता.
रात्री एक वाजता ते घरी पोहोचतात,अमेय आणि चंचलला बाहेरच थांबायला सांगितले,तिला वाटते आता अजून काय करायचं आहे माहित नाही. तितक्यात अमेयची आई काळ्ं लावलेला भाकरीचा तुकडा आणि पाणी घेऊन आल्या ,काहीतरी बडबडत तो दोघांवरून ओवाळून लांब फेकून दिला.
त्या चंचलला म्हणाल्या,उशीर झाला आहे ,जा मावशी आणि तुम्ही जाऊन झोपा ,उद्या सकाळी लवकर उठायची गरज नाही, उद्या परत पूजा ,सगळे पाहुणे मंडळी त्यामुळे परत झोपायला मिळायचे नाही आणि व्यवस्थित झोप घेतली तर फ्रेशही वाटेल तुला.
त्या तिघी झोपायला गेल्या.
सगळेच दमलेले असल्याने सगळे पटकन आपआपली जागा पकडून झोपी गेले.
क्रमश:
रुपाली थोरात