Login

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 7

Mrriages are made in Heaven.

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 7

दोन्ही घरातील मंडळी लग्नाच्या तयारीत व्यस्त होती ,चंचल आणि अमेयचा दिवसातून कमीत कमी एक तरी फोन व्हायचा.

चंचलच्या घरी रुख्वदाची तयारी जोरात चालू होती , अमेय घरच्या सगळ्यांसहित गावी आला होता ,त्याच्या तिनी बहिणींची लग्न स्वतंत्र पण मुंबईला झाली होती. गावच्या सगळ्या नातेवाईकांची इच्छा होती,हे लग्न तरी गावाला व्हावं आणि तसं झाल्यामुळे घरात भावकीच्या लोकांचीही खूप वर्दळ सुरु होती,सांदु-यांच्या पु-यांचा वास दरवळत होता ,आजुबाजुचे सगळेच लग्नाआधी दोन तीन दिवस त्यांच्या घरी जेवायला होते

सगळ्या बायका कामही करत होत्या आणि एकमेकांची मस्करी करत आनंदही लुटत होत्या आणि हे सगळं बघून अमेयच्या आईवडिलांच मन समाधानान भरून पावत होतं.

चुलत भाऊ,बहीणी सगळे आपली हौस पूर्ण करत होते . घर पाहुण्यांमुळे लग्न घर वाटत होते.

दोन्ही घरी मंडप टाकले होते ,मामा लोकांकडून मांडव डहाळ्याच्या गाड्या दोन्ही घरां समोर आल्या होत्या, सगळ्या स्त्रिया,बहिणी,लहान मुले छान नटून लग्नासाठी तयार झाले होते. अमेयच्या घरचे सगळेच खुप हौशी ,त्याच्या माम्या,मावश्या ,चूलत्या,बहीणी,वहिन्या आणि आई सगळ्यांनी ठरवून साखर पुड्यासाठी नववारी साड्या घातल्या होत्या ,चंचलनेही साखरपुडयासाठी नववारी नेसली होती,खूप छान दिसत होती. सगळी व-हाडी मंडळी मंडपाच्या दारात येऊन उभी राहिली,तसं चंचलची आई आणि त्यांच्या घरातील बाकीच्या बायका नवरदेवाला ओवाळायला, इतर लोकांच स्वागत करायला. स्वागत झाल्यावर त्यांना त्यांच्या तीन रूम दाखवण्यात आल्या ,त्यांच सगळं सामान तिथे नेण्यात आलं.

इकडे स्टेजवर साखरपुड्याची तयारीला सुरुवात झाली . व-हाडी मंडळींनी साखरपुड्याच सामान वाजत गाजत स्टेज पर्यंत आणले ,ती मिरवणूक म्हणजे खूप विलोभनीय पारंपारिक वाटत होती ,कारण सगळ्यांनीच नववारी साड्या घातल्या होत्या,त्यामुळे सगळ्यांचे लक्ष मिरवणूकीने वेधून घेतले होते आणि कार्यक्रमाला छान शोभा आली.

चंचलला तिच्या मैत्रिणी सांगत होत्या ,तुझ्या सासरकडचे लोक खूपच हौशी आहे ,बघ सगळयांनी कशा छान नववारी घातल्या आहेत,तसं ती तिच्या रूमच्या खिडकीतून पाहून आनंदी होते.

----------------------------------------

साखरपुडा सुरु होतो,पहिलं  चंचलला बोलावतात ,ती तिच्या मैत्रिणींसोबत स्टेजवर येते ,अमेय तिला पाहतच राहतो ,तिच्या चेह-यावर आज एक वेगळेच तेज आलेले असते. सगळे विधी पूर्ण झाल्यावर अमेयला बोलावतात , तेव्हा चंचल परत आपल्या रूम मध्ये गेलेली असते ,तिला अमेयला पहायचे असते म्हणून तिची मैत्रीण तिला लाइव रिकॉर्डिंग दाखवत होती आणि तो क्षण आला,तिला पण स्टेजवर बोलावण्यात आले. दोघांना एकमेकांसमोर उभे करण्यात आले,रिंग सेरेमनीसाठी तिला त्याला डोळे भरुन पाहण्याची खूप इच्छा होती पण सगळ्यां समोर कसे पाहणार ,त्याने तिच्या बोटात अंगठी घातली, त्याने अंगठी घालण्यासाठी हात पुढे केला,ती घालणार,तर त्याने हात मागे घेतला,तसं तिने मान वर करून त्याच्या कडे पाहिले ,त्याच्या डोळ्यांत हसू होत ,तसं त्याने परत हात पुढे केला आणि तिने अंगठी घातली ,तसे आजुबाजुच्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ,एकमेकांना पेढा भरवा असे सांगण्यात आले.चंचलने अमेयला पेढा भरवला,अमेयने तोच पेढा पटकन हातात घेऊन तिला भरवला ,तसे सगळे हसायला लागले,तिला कळालेच नाही, नंतर लक्षात आले त्याचाच उष्टा पेढा भरवला म्हणून सगळे हसत होते, तितक्यात फोटोग्राफर येऊन दोघांना फोटोसेशन साठी घेऊन गेला . तिथे फोटो काढत असताना एकमेकांच्या स्पर्शाने त्यांच्या मनात फुलपाखरे उडत होती.मंडपात जेवणाच्या पंगती उठत होत्या.

दोघांचेही आईवडील येणा-या जाणा-या पाहूण्यांची काळजी आणि विचारपूस करत होते.

------------------------------------------------

फोटो सेशन झाल्यावर त्यांना हळदीसाठी तयार व्हायला पाठवले ,ते तयार होऊन आल्यावर त्यांना पाटावर बसवण्यात आले,हळदीची ताट गुलाबाच्या फुलांनी छान सजवलं होतं ,अमेयकडच्या ताटावर चंचल लिहिलं होतं आणि चंचलकडच्या ताटावर अमेय लिहिलं होतं,ती नावं बघून दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. पहिलं अमेयला हळद लावून नंतर चंचलला एक एक जण हळद लावायला सांगितली,सुरुवातीला तर दोन्ही पक्षांच्या बायकांची हळद लावण्यासाठी झुंबड उडाली ,तसं फोटोग्राफरने मधला मार्ग काढत,दोन्ही कडची एक एक म्हणजे फोटो काढणं सोपं जाईल. थोड्या वेळाने मागच्या बाजूला खूप गोंधळ ऐकू येत होता,तिने पाहिले तर अमेयच्या घरचे हळदी खेळत होते ,छान एन्जॉय करत होते ,तिला जरा बरं वाटलं की,आपली सासर कडची सगळी माणसे हौशी आहे.

सगळ्यात शेवटी त्यांनी एकमेकांना हळद लावली ,एकमेकांना हातात हळकुंड बांधले ,त्यानंतर दोघांना मोत्याच्या मुंडवळ्या बांधल्या,फोटोग्राफरने हळदीचे फोटो सेशन केले ,आता पाहुण्यांची जेवण उरकत आली होती. आता दोन्ही पक्षाच्या घरच्या मंडळीसाठी जेवणाची तयारी करून ठेवली होती,सगळे आले ,ताटांभोवती छान रांगोळी काढली होती ,सगळेच जोडी जोडीने बसले होते. चंचल आणि अमेय या दोघांनी एकमेकांना घास भरवल्यावर ,सगळे त्यांची थट्टा करत करत जेवत होते.

जेवण झाल्यावर दोघेही लग्नाच्या तयारीसाठी आपआपल्या रूममध्ये रेडी व्हायला गेले. अमेयला तयार होवून मिरवणूकीसाठी जायचे होते ,त्याचे सगळे मित्र नाचण्यासाठी खूप एक्साइटेड होते ,त्यांनी मिरवणूकित खूप धमाल केली,त्याच्या बहिणी,माम्या ,आत्या आणि आईला सुध्दा थोड्या वेळासाठी नाचायला नेले ,त्यांच्याकडचे हे शेवटचे लग्न असल्याने सगळेच खूप एन्जॉय करत होते.

------------------------------------------------

लग्न वेळेत लावण्यासाठी त्यांना थांबवण्यात आले ,नाहीतर त्यांचा उत्साह काही कमी होत नव्हता.लग्न घटिका समीप आली तसं चंचल जास्त भावनाविवश झाली होती,जिथे आपण जन्माला आलो ,वाढलो,त्यांना सोडून, ज्यांना आपण ओळखत नाही ,कायमस्वरुपी त्यांच होऊन राहायचं , त्यांची मन जपायची आणि ज्या आईवडीलांनी जन्म दिला त्यांच्याकडे सणावाराला पाहुणी म्हणून जायचं,किती विचित्र आहे सगळं ,हिच जगाची रीत आहे , माझी आईपण तिच्या आईवडीलांना सोडून आली .

नवरदेव मंडपाच्या गेटवर उभा होता, चंचलच्या आत्यांनी अमेयला ओवाळले ,त्याने प्रत्येकीला एक साडी दिली,ही वर ओवाळणीची लग्नात प्रथा असते,गेटवर अमेयला तिथेच उभे केले,चंचलला तिचे मामा घेऊन येत होते,अमेय तिच्या कडे पाहतच राहिला ,तसं त्याच्या मित्राने त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली, तेव्हा तो भानावर आला नाहीतर आजुबाजूला काय चाललय हे कळतचं नव्हतं,चंचल येऊन त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली ,तसे सनईचे सूर वाजू लागले,फुलं त्यांच्या अंगावर उधळत मागे मामा आणि सगळ्या कलव-या असा ताफा स्टेजकडे गेला.दोघांच्या मधे आंतरपाट धरला गेला , मंगलाष्टके सुरु झाली, शेवटचे मंगलाष्टक संपत आल्यावर मामा लोकांनी दोघांच्याही हातात हार दिले , मंगलाष्टक  संपताच बाहेर वाजंत्री आणि फटाक्यांचा जोरदार आवाज सुरु झाला. स्टेजवर मात्र वेगळीच मजा चालू होती , चंचल हार घालणार इतक्यात अमेयच्या काही मीत्रांनी त्याला उचलले आणि म्हणाले तो वाकणार नाही ,आता घाला तुम्ही हार ,चंचलचे भाऊ लगेच पुढे सरसावले ,त्यांनी तिला उचलून घेतले ,मग मात्र अमेयला राहावलं नाही,त्याने स्वत:ची मान खाली केली ,तसा तिने हार घातला,त्यानेही तिला हार घातला,मग सगळ्यांनी त्यांना खाली उतरविले . दोघांनी एकमेकांच्या हातात फुलांचे  गुच्छ दिले . ज्यांना लग्न लागल्यावर निघायचे होते ,त्यांनी स्टेजवर भेटण्याकरता गर्दी केली . दोघे एकमेकांच्या पाहुण्यां बरोबर ओळख करून देत होते ,फोटो काढत होते. आता गर्दी थोडी ओसरली होती ,तशी अमेयच्या ऑफिसची मित्रांची गँग वर आली ,त्यांच्या हातात कोल्ड्रींक होते .

भटजींची पण पुढच्या विधींची तयारी करून झाली होती,तेही बोलवत होते ,पण ही गँग कुठे ऐकते.

अमेयला त्याचा एक मित्र म्हणाला,आज हार घालताना वाकलास,आता आयुष्यभर समोर वाकावे लागेल,काय वहिनी.

बिचारी चंचल लाजेने चूर चूर झाली ,तिला काय बोलावे ते कळेना. मग त्यांनी दोघांना नावे घ्यायला पपलावली,तसं चंचलने भलं मोठं नाव घेतले की ते शांतच झाले,आता अमेयची पाळी आली होती,त्याने नाव घेतले 

वन बॉटल टू ग्लास ,चंचल इज फस्ट क्लास

तुम्ही खूप दमले असाल ना असं बोलत त्याच्या मित्रांनी कोल्ड्रींकची बाटली समोर धरली आणि बोलले, वन बॉटल टू स्ट्रॉ ,कोल्ड्रींक दोघांनी प्या .

अमेयने बॉटल हातात घेतली,एक स्ट्रॉ अमेयने तोंडात घातला आणि एक चंचलने दोघेही ओढत होते पण कोल्ड्रींक काही येत नव्हते,अमेयला काहीतरी आठवले तसं त्याने स्ट्रॉ बाहेर काढले आणि चंचलला दाखवले की स्ट्रॉच्या आतल्या भागाला गाठ आहे.तसं तिच्यासहीत सगळेच खळखळून हसले.

आता चंचलचा भाऊ त्यांना पुढच्या विधीसाठी न्यायला आला , तसे ते दोघे त्या सगळ्यांचा निरोप घेऊन भटजींकडे आले.

होमहवन ,सप्तपदी झाली ,कन्यादानाची वेळ आली,चंचलचा छोटा मामा कन्यादानासाठी बसला ,तसं चंचलच्या डोळ्यांत पाणी आलं,अमेयने तिचा हात धरत डोळ्यांनीच धीर दिला , तिथं उपस्थित असलेले सगळेच मामांच्या आठवणीने भावुक झाले होते.कन्यादान पार पडले आणि अमेयला बूट घालायचे होते ,पण ते काही सापडत नव्हते ,चंचलच्या बहीण भावंडांनी बूट चोरायचा डाव साधला होता.त्यांच्या बरोबर बोलणी करुन बूट घेतले आणि त्यांना एक हजार एक रूपये दिले ,ते तर पाच हजार मागत होते ,पण मोठ्यांनी गोडीत सांगितल्यावर त्यांनी ऐकलं.

----------------------------------------------

आता वेळ होती चंचलच्या बोळवणीची त्याआधी अमेयने त्यांच्या देव्हा-यातील देव चोरला ,त्यांनी त्याला नारळ आणि पाचशे एक रुपये देऊन आपला देव सोडवून घेतला ,ही एक लग्नातली प्रथा आहे. चंचलचा रुख्वद  छानच सजवला होता, त्या रुख्वदाची पुजा करायला अमेयची आई आणि तिच्या जाऊबाई गेल्या ,त्यांनी त्याची पूजा केली ,विहिणबाईच्या म्हणजेच चंचलच्या आईचा कुंकवानी भांग भरला आणि त्यांच्या डोक्यावर तळलेल्या कुर्ड्या फोडल्या,असं दोघी तिघींनी एकमेकींना केलं, अमेयच्या आईने रुख्वदावर साडी ठेवली ,आता अमेयच्या घरच्या चुलत भावांनी रुख्वद भरायला सुरुवात केली ,त्यात जे गोडाचे पदार्थ होते आणि सांदु-याच्या पु-या होत्या त्याचा व-हाडी मंडळींनी तिथेच फडशा पाडला.

आता चंचलच्या माहेरच्या सगळ्या लोकांनी हातात साखर घेतली आणि सगळ्यांना देत होते ,साखर देण्या मागचा अर्थ असा असतो की नेहमी आपल्या नात्यात गोडवा राहू दे. साखर देत सगळ्यात शेवटी चंचलला साखर भरवत होते आणि ती प्रत्येकाच्या गळ्यात पडून रडत होती,अमेय तिच्या भावना समजू शकत होता ,कारण त्याच्याही तीन बहिणींची लग्न झाली होती,तो फक्त तिच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होता. सगळ्यात शेवटी तिच्या वडिलांनी तिला साखर भरवली आणि दिवसभर तिचे वडील सगळ्यां पासून आपल्या भावना लपवत होते ,पण ती समोर येताच त्यांच्या डोळ्यातून अश्रुंचा पूर वाहू लागला,असं म्हणतात मुली आईपेक्षा बापाच्या जास्त लाड्क्या असतात. तिच्या वडिलांनी स्वत:ला सावरले,अमेयच्या हातात चंचलचा हात देत म्हणाले, माझ्या परीची काळजी घ्या ,जो माझा तुमच्या वर विश्वास आहे तो सार्थ करा ,तितक्यात तिथे अमेयचे आई बाबा आले ,त्यांना म्हणाले ,काळजी करू नका जशा आमच्या तीन मुली तशीच ही चौथी ,आम्ही अमेयच्या आधी तिचे आईवडील आहोत ,असं बोलताच तिच्या आईने अमेयच्या आईला मिठी मारली आणि तिच्या बाबांनी अमेयच्या बाबांना आलिंगन दिले. सगळे आता सजवलेल्या गाडीजवळ आले ,त्यांना गाडीत बसवले,चंचलची मावशी आणि तिची छोटी बहीण तिच्या शेजारी बसल्या ,त्या तिच्याबरोबर पाठराखीण म्हणून चालल्या होत्या,त्यांच व चंचलच सामान डीक्कीत ठेवलं.

अमेयच्या वडिलांनी त्यांना दोन दिवसानंतर असलेल्या पुजेचं निमंत्रण दिले आणि नमस्कार केला,आता गाडी अमेयच्या घरी निघाली.

सगळं वाचून लग्नाला गेल्याची अनुभूती आली का नाही .

पुढच्या भागात तिचे नवीन घरात झालेले स्वागत ,वरातीची आणि पूजेची मजा.

मंडळी वाचत रहा,हसत रहा,खूष रहा आणि तुमचे अभिप्राय देत रहा म्हणजे लिखाणास हुरुप येतो.

क्रमशः 

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all