Login

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 17

Different festivals brings happiness in our life

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 17

दिवस छान चालले होते,लग्न झाल्यावर वटपौर्णिमा पहिला सण होता ,तेव्हा हौसेने तीघींनी नववारी साडी घातली होती ,छान फोटो सेशन केले ,श्रावण महिन्यात नागपंचमीला जावून आली ,रक्षाबंधनला तिचा भाऊ राखी बांधून घ्यायला आला ,त्याचा घरच्यांनी छान आदर सत्कार केला,हे पाहून ती खुश होती,त्याला एक दोन दिवस राहायला ठेवून घेतले आणि मुंबई दर्शनही करवून आणले ,त्याच्या निमीत्ताने चंचलचे पण सगळं पाहून झालं ,सगळे तिला खूप जीव लावतात हे पाहून भावालाही बरं वाटलं होतं ,तो समाधानाने घरी गेला आणि गेल्यावर सगळयांच खूप कौतुक केले,आईवडीलांना तरी काय हवं असतं,आपली मुलगी आनंदात आहे यापेक्षा अजून आनंदाची गोष्ट कोणती असू शकते.

गणपती बाप्पा आले,त्यांच्या चाळीत,तसं नवीन जोडपं म्हणून पुजेला बसायचा मानही मिळाला,गणपतीच्या निमित्ताने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि तिला रांगोळीत पहिलं पारितोषिक मिळाले,फैन्सी ड्रेस मध्ये दुसरं पारितोषिक आणि कपल्सचा गेम होता त्यात पहिलं पारितोषिक,अमेयच्या आईला या सा-या गोष्टींच खूप कौतुक होतं ,स्वत:च्या सुनेवर गर्व होता , या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ताई आणि आई नेहमी तिच्याबरोबर असायच्या. कुकिंग स्पर्धाही होती ,पण त्यात दुसरं पारितोषिक मिळाले,अमेयलाही छान वाटत होतं की,माझी बायको सर्वगुणसंपन्न आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणूकीत सगळ्यां बरोबर खूप नाचली होती.

तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळे चाळीतल्या सगळ्यांची मने तिने जिंकली होती पण प्रत्येक ठिकाणी असं कुणीतरी असतं की ज्याला चांगल्या गोष्टी आवडत नाही ,असं त्यांच्या चाळीतही एक काकी होत्या ,त्यांचा चंचलचं कौतुक ऐकून चेहरा पडायचा आणि त्या त्यांच्या सुनेला बोलायच्या ,तिच्याकडे बघ ,नेहमीच कशी फ्रेश आणि खुश राहते ,नाहीतर तुझ्या तोंडावर नेहमी बारा वाजलेले असतात,तिच्या लग्नाला दोनच वर्षे झाली होती,त्यामुळे ती शांत ऐकून घ्यायची ,पण मनातल्या मनात म्हणायची ,तिची सासू जशी तिला साथ देते ,तशी तुम्ही मला कधी देणार नाही.

अमेयच्या आईला जसं तिचं कौतुक होतं ,तसं त्या तिला घरातल्या कामात सगळी मदत करायच्या ,हे सगळ्यांना माहित होतं,दोघी मिळून पटापट काम उरकून घ्यायच्या ,मग दोघींनाही आप आपला वेळ मिळायचा.

-------------------------------------------------

असं करत करत नवरात्र आलं ,मग काय रोज नवरात्रीतल्या कलरच्या साड्या घालायच्या आणि सगळ्यांबरोबर गरबा आणि दांड़िया खेळायच्या ,आता सगळ्या चाळीतल्या पोरींची आवडती वहिनी झाली होती,काही करायच झालं की तिला पहिलं विचारायला जायच्या आणि सगळ्या सुनांबरोबर पण तिची छान गट्टी जमायची ,पण ती काकू मात्र तिच्या सुनेला तिच्या बरोबर बोलू देत नव्हती,तिला वाटायचं ती तिच्या सुनेला तिच्या बद्दल भडकवेल,चंचलच्या असं काही मनात नव्हतं,पण म्हणतात ना,चोराच्या उलट्या बोंबा तसा काही त्यांचा प्रकार होता,सगळ्यांना त्यांचा स्वभाव माहित होता ,त्यामुळे सगळे तिच्या कडे दुर्लक्ष करायचे ,एकदा दोनदा चंचलला त्यांचे वागणे पटले नव्हते ,तेव्हा आईंनी सांगितल की,त्यांचा स्वभावच तसा आहे ,तू स्वत:ला त्रास करून घेऊ नकोस.

तेव्हा पासून चंचलही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असे.

दिवाळी जवळ आली होती,एक दिवस अमेय तिला घेऊन दिवाळीसाठी साडी घ्यायला घेऊन गेला ,म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवून ती दिवाळीत घालेल.ते दोघे दुकानात गेले ,तो म्हटला ,तुला जी घ्यायची ती घे ,चांगली घे ,असं आईने सांगितल आहे, ती ठिक आहे असं बोलली ,दुकानदाराला साड्या दाखवायला सांगितल्या,त्यातल्या तिने पाच साड्या सिलेक्ट केल्या .

अमेय-अगं हे काय ,तू एक सारख्या पाच साड्या कशाला पसंत केल्या फक्त कलर वेगवेगळे,एकच घे पण चांगली घे ना 

चंचल-अहो,ही पण तर छान आहे,एक आईंना ,एक मला आणि तीन ताईंना तीन,तुम्हांला त्यांना तर घ्याव्या लागतीलच  ना

अमेय-त्यांच नंतर बघू ,आईने फक्त तुला एकटीला घ्यायला सांगितली आहे.

चंचल-मग आईंना आणि मला तरी घेऊ,मला एकटीला घेणं बरं नाही वाटत 

अमेय-अग आई बजेट मुळे बोलली असेल 

चंचल-कीतीची घ्यायला सांगितली त्यांनी माझ्यासाठी 

अमेय -दोन अडीच हजारापर्यंत 

चंचलने दोन साड्या अकराशे रुपयांची एक ,अशा सिलेक्ट केल्या .

अमेय-अगं दोन कशाला आता 

चंचल-मी आणि आई ,तुमचं कर्तव्य आहे त्यांनाही साडी घेण्याचं 

अमेय-तू माझं काही ऐकणार नाही,घे 

असं म्हणून दोन साड्या घेऊन घरी आले,ती घरात आल्या आल्या आईंना साडी दाखवत होती, तितक्यात ताईला पाहून तिला कसं तरी वाटलं.

ताई-छान आहेत ग साड्या ,कुठून घेतल्या

चंचल-नाक्यावरून नेहमी आई घेतात ना तिथून 

ताई-दोन साड्या घेतल्या का तुला

चंचल-नाही अहो,एक आई आणि एक माझ्यासाठी 

तसं ताईच्या डोळ्यातून पाणी आलं,चंचलला वाटल्ं त्यांना नाही आणली म्हणून त्यांना वाईट वाटल की काय.

चंचल-ताई अहो मी पाच साड्या काढल्या होत्या,पण हे म्हणाले की,तुम्हांला नंतर घेऊ,हवं तर ह्यातली तुम्हाला जी आवडेल ती ठेवा.

तिला असं बोलताना पाहून ताई-दोन्ही ठेवते ,मला आवडल्यात

चंचल-चालेल,तसं माझ्याकडे लग्नासाठी घेतलेली साडी आहे की जी मी घातली नाही ,मी तिची घडी मोडेल दिवाळीत

ताई आणि आई दोघी हसतात ,तसं ती दोघीं कडे पाहते

ताई- अगं मला काही नको,ह्यांनी मला घेतली आहे,तुझ्या जागी दुसरी कुणी असती तर स्वत:साठीच साडी घेऊन आली असती, पण तू आईला पण आणली म्हणून मन भरून आलं,आईने आतापर्यंत कधीही दिवाळीत साडी घेतली नाही,ती म्हणायची माझे तिन्ही भाऊ मला घेतात ,मग अजून खर्च कशाला ,आम्हालाच चांगल्या साड्या घ्यायची , सगळ्यांसाठी  ती असचं करायची ,पण आज तू तिचा विचार केला तर मला खूप छान वाटलं,तुझा अभिमान वाटला आणि नेहमी दोघी मिळून अशाच रहा,आता दोघींचे ब्लाऊज चांगले डिझाईनचे शिवायला टाकू ,म्हणजे लक्ष्मीपूजन पर्यंत मिळतील, दोघी सासू सुना कशा छान दिसल्या पाहिजे.

--------------------------------------------------------

चंचलच्या माहेराहून पण सगळ्यांना पहिल्या दिवाळ सणाचे आमंत्रण मिळाले होते,दोघी सासू सुनेने मिळून घराची साफ सफाई केली ,डी मार्ट मध्ये जाऊन दिवाळीच्या फराळासाठी लागणारे सामान भरले ,दिवाळी जशी जशी  जवळ येऊ लागली तसं तसं एक एक पदार्थ तयार करायला सुरुवात केली, बघता बघता लक्ष्मी पूजनाचा दिवस उजाडतो,सकाळी उठून उटण्याने सगळे आंघोळ करतात ,दाराला तोरण लागते , पुरणपोळीचा नैवेद्य तयार होतो,संध्याकाळी चंचल दारापुढे छान रांगोळी काढते,मग दोघी मिळून पूजेची तयारी करून ठेवतात आणि तयार होतात ,दोघींच्या साड्या सारख्याच असतात ,कलर मात्र वेगळा असतो ,चंचल आईंना छान आंबाडा घालून गजरा पण माळते ,ती स्वत:चीही हेअरस्टाईल करते आणि गजरा घालते ,स्वत: थोडासा लाइट मेकअप करते आणि आई नाही म्हणत असतानाही थोडा मेकअप करतेच.

अमेय आणि बाबा प्रसाद घेऊन येतात ,तसं दोघेही दोघींकडे पाहतच राहतात.

बाबा-अमेय ,ही नक्की तुझीच आई ना 

चंचल-हो आईच आहे ,मग कशा दिसतायेत आज 

बाबा-छानच आहे हो ,सून आल्या नंतरचा काया पालट 

तशा आई-तरी मी तुला बोलत होते ,नको हे सगळं ,ह्यांना नाही आवडणार ,आता पर्यंत नाही केलं कधी ,आता केलं तर म्हणतील म्हातारचळ लागलाय म्हातारीला 

बाबा-अगं खरच खूप छान दिसत आहेस,उलट नेहमी तू अशी राहिलीस तर मला आवडेल

चंचल- बाबांना आवडलं ना ,मग झालं तर बाकीच्यांचा कशाला विचार करताय ,काय हो तुम्हाला पण आवडलं ना

अमेयचं लक्षच नव्हते,तो तर चंचल कडे बघतच राहिलेला,त्याच्या लक्षात नाही येत ,की ती काही बोलली 

चंचल-अहो मी तुम्हाला विचारत आहे

बाबा-अग त्याची विकेट पडली आहे,हो ना अमेय

अमेय-काय हो बाबा ,तुम्ही पण,माझं लक्ष नव्हतं तिच्या बोलण्याकडे

बाबा-मग मी त्या बद्दलच तर बोलत आहे 

तसं चंचल समजून लाजली 

आई-तुम्ही दोघे पटकन तयार व्हा ,पुजा करायची आहे

बाबा-ओके मैडम

अमेय-बाबा ,आज काय मूड मध्ये आहात 

बाबा-गप रे ,बापाला चिडवतोस का,जा आवर पटकन

दोघेही आवरून येतात ,मग सगळे मिळून पुजा करतात,अमेय आणि चंचल आई बाबांचा आशिर्वाद घेतात,फोटो सेशन होते ,ताई आणि तिचे मिस्टर मुलांसहित येतात ,सगळे मिळून फटाके वाजवतात , चाळीतल्या बायका दोघींच्या साडीची खूप तारिफ़ करतात ,तसं आई सगळ्यांना कौतुकाने सांगत असतात,चंचलनी आणल्यात,हे सगळं पाहून अमेय आणि बाबा एकमेकांकडे पाहून हसतात,त्यांच्या बरोबर फोटो सेशन झाल्यावर ते जेवायला जातात ,इकडे हे पण जेवण उरकून घेतात .

आई-चंचल बैग भरून ठेवली का 

चंचल-हो आई,तुम्ही दोघेही आले असतात ,तर बरं वाटलं असतं 

आई -अमेय येतोय ना तुझ्या बरोबर सगळ्यांच काय काम आहे

चंचल-पण आईबाबांनी तुम्हाला पण आमंत्रण दिले आहे ,हवं तर तुम्ही अमेय बरोबर लगेच परत या 

अमेय-जाऊ सगळे,हिला सोडून आपण परत येऊ

आई-बघू

अमेय-बघू नाही ,ठरलं,उद्या सगळेच जाणार आहोत ,तयार व्हा सकाळी सहा पर्यंत,म्हणजे रात्री वेळेत परत येऊ.

अमेय आणि चंचल वर झोपायला जातात

अमेय-तू तर आज आईचा मेकओव्हर करून टाकला

चंचल-तुला आवडला का

अमेय-मला तर आवडला ,पण बाबा आज आईवर नव्याने फिदा झाले ,थैंक्स 

चंचल-अरे थैंक्स कशाबद्दल,माझेही आई बाबा आहेत ना ते

अमेय-हो राणी सरकार ,उद्या माहेरी गेल्यावर आम्हाला विसरू नका म्हणजे झालं

चंचल- असं कसं विसरणार,चार दिवसांचा तर प्रश्न आहे,कधी निघून जातील ,कळणार नाही ,चला झोपा आता,सकाळी लवकर उठायचे आहे ना 

-------------------------------------------------

दुस-या दिवशी सकाळी लवकर निघून ते चंचलच्या माहेरी 10.00 वाजता पोहोचतात , त्यांना सगळ्यांना बघून चंचलचे वडील त्यांचे स्वागत करतात आणि म्हणतात-तुम्ही आमचा मान ठेवला आणि सगळे आले ,बरं वाटलं.

बाबा-आम्ही नाहीच म्हणत होतो कारण उद्या पोरी पण येतील , पण या दोघांपुढे आमचं कुठे काय चालतं .

असं म्हणत सगळे आत जातात ,अमेय त्यांना कल्पना देतो की ,आम्ही दुपारचे निघू.

सगळ्यांची जेवणे खावणे होतात . पहिला दिवाळसण म्हणून अमेयला ते सोन्याची अंगठी देतात ,त्याच्या बाबांना ड्रेस द्यायला लागतात तसे ते म्हणतात ,म्हणून आम्ही येत नव्हतो,याची काही गरज नाही.

चंचलचे वडील-अहो पहिली दिवाळी आहे म्हणून मग नंतर नाही देणार

असं म्हणत ते जबरदस्ती त्यांना पोशाख देतात आणि चंचलची आई अमेयच्या आईची साडीचोळीने ओटी भरते.

आता सगळ्यांचा निरोप घेऊन ते मुंबईला निघतात,चंचल चार पाच दिवसांनी जाणार असते.

पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा,आनंदात रहा आणि अभिप्राय देत रहा.