फुलले रे क्षण माझे फुलले रे -भाग 1

How bonding forms between husband and wife

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 1

चंचल आज खूपच खुश होती त्यामुळे तिच्या नकळत तिच्या मनात गाण्याने ताल धरला होता,फुलले रे क्षण माझे फुलले रे.

चंचलला तीन महिने झाले पाळी आली नव्हती,तिची नेहमी दोन अडीच महिन्यानी यायची ,पण यावेळी जरा जास्तच उशीरा आली होती.मनात नाही नाही ते संमिश्र विचार येत होते,शेवटी तिने एकदाचं त्याला पूर्ण विराम दयायचं ठरवलं होतं,ऑफिस मधून घरी जाताना तिने कीट घेतली आणि घरी गेली ,मनात खूप सा-या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

ती मात्र सकाळ होण्याची वाट पाहत होती,सकाळी तिने कीट घेतले आणि चेक केलं तर त्यावर दोन रेषा दाखवत होत्या ,तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता म्हणून तिने दुस-या  आणलेल्या कीटवर चेक केलं तर त्यावरही पुन्हा दोन रेषा दिसत होत्या ,मग तिने स्वत:ला चिमटा काढून परत बघितलं तर परत तेच, त्याला कारणही तसचं होतं,तिच्या लग्नाला तीन वर्षे होवून गेली होती आणि प्रत्येक वेळी असं झालं की खूप अपेक्षेने चेक करायची,पण प्रत्येक वेळी निराशा हाती यायची म्हणून ती इतकी साशंक होती.

आता तिची खात्री पटली होती,तिला ही गोष्ट कधी एकदा अमेयला सांगते असं झालं होतं आणि तिचं मन तर गाण्यावर थिरकायला लागलं होतं.

चंचल- अमेय ,ऊठ ना मला तुला काहीतरी सांगायचय ,खूप महत्त्वाचं ,ऊठ ना रे

अमेय- अगं झोपू दे ना,तू पण झोप ये इकडे

चंचल- अरे इथं माझी झोप उडाली आहे आणि तुला काय सुचतय्ं

अमेय डोळे चोळत चोळतच उठला - बोल काय झालं एवढं,आभाळ कोसळलं की फाटलंय 

चंचल- आपण दोनचे तीन होणार आहोत 

अमेय- एकतर झोपेतून उठवलं आणि असं कोड्यात का बोलतेस काय ते स्पष्ट बोल ना

चंचल लाजतच - तू बाबा आणि मी आई होणार आहे 

काय सांगतेस असं म्हणून त्याने तिला अक्षरश: उचलून घेतले, तसं ती म्हणाली -आता असा वेंधळेपणा नाही करायचा 

त्याने हळूच तिला खाली ठेवलं आणि म्हणाला - मी खूप आनंदी आहे ,थांब मी आताच आईबाबांना सांगतो ,त्यांना हे ऐकून खूप आनंद होईल 

चंचल-अरे थांब ,मला काय वाटतं की आपण पहिलं डॉक्टर कडे जावून खात्री करून घेऊ आणि मग सांगू त्यांना

अमेय-अगं पण तूच म्हणालीस ना,टेस्ट पॉजिटिव आली आहे

चंचल- पण मला असं वाटतं की ,आपण खात्री करून नंतर सांगाव उगाच नंतर त्यांच्या आशेवर पाणी नको पडायला.

अमेय-तू म्हणतेस तसचं करू,आज संध्याकाळीच ऑफिसमधून डायरेक्ट डॉक्टरकडे जाऊ

चंचल - चालेल

अमेय-मी आईला सांगतो,की संध्याकाळी आम्हाला यायला उशीर होईल.

चंचल- या गडबडीत मला उशीर होतोय,आई एकट्याच जेवण बनवत असतील ,मी जाते

अमेय तिला मागून मिठी मारतो ,तिच्या पोटावर हात ठेवतो आणि बोलतो- welcome my Baby in our life

चंचल- चल ,चावट कुठला 

असं म्हणून चंचल निघून जाते.

संध्याकाळी दोघेही हॉस्पिटलमध्ये जातात , डॉक्टर जेव्हा सांगतात की ,तुम्ही दोघे आईवडील होणार आहात .

दोघेही खूप आनंदीत होतात,अमेयला तर घरी जावून कधी एकदा आईबाबांना सांगतोय असं झालं होतं.

घरी पोहोचताच अमेय आईबाबांना हाक मारतो .

आई-अरे काय झालं ,तुम्ही तर उशीरा येणार होतात ना

अमेय-काम झालं ,मग आलो ,ते जाऊ दे,मला तुम्हांला एक आनंदाची बातमी द्यायची आहे 

बाबा -अरे सांग ना मग लवकर ,उगाच आमचा अंत पाहू नको

अमेय- हो,हो सांगतो,त्या साठी तुम्हाला डोळे बंद करावे लागतील

आई- बरं बाबा असं म्हणत त्या चंचलला डोळ्यानेच विचारतात 

तीही डोळ्यानेच नाही माहित असं सांगते.

त्यांच्या खाणाखुणा पाहून अमेय आईला सांगतो -तिच्या साठीही सरप्राईज आहे ,तूही डोळे बंद कर गं 

सगळेच डोळे बंद करतात ,तो प्रत्येकाच्या हातात एक एक कार्ड ठेवतो आणि सांगतो ,आता उघडा डोळे आणि पहा काय आहे ते.

प्रत्येकजण आपलं कार्ड पाहतो .

आईच्या कार्डवर लिहिलेलं असतं,अभिनंदन आजीबाई 

बाबांच्या कार्डवर लिहिलेलं असतं,अभिनंदन आजोबा

चंचलच्या कार्डवर लिहिलेलं असतं,अभिनंदन माझ्या बाळाच्या आईसाहेब आणि आम्हाला सगळ्यांना हा आनंद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद .

अमेय मात्र प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत असतो.

आई आणि बाबा -खरचं,सुखी राहा पोरांनो

आई-चंचल इकडे ये,मला तसा थोडा संशय आला होता,जा देवाला नमस्कार करा पहिला.

दोघांनी देवाला नमस्कार केला आणि आईबाबांच्या पाया पडायला लागले तसं आई-चंचल तू नको पाया पडू ,जोपर्यंत बाळ येत नाही ,तोवर हा तुझ्या वाटचं पाया पडेल ,हो किनाई रे

अमेय- आता काय करणार,मी आपला बिचारा बापडा ,आता इथे मला कोण विचारणार 

तसे सगळेच खळखळून हसले,तितक्यात अमेय म्हणाला -अजून एक गोड बातमी आहे

तसं बाबा - अश्या एका मागून एक बातम्या दिल्या तर आम्हाला डायबिटीस व्हायचा,आता काय अजून 

अमेय-मला प्रमोशन मिळालं आहे,तसं मला ऑफिस मध्ये गेल्यागेल्याच कळाल्ं होतं पण दोन्ही गुड न्यूज एकत्र देऊ म्हणून नाही सांगितलं

आई-आम्ही खूप खुश आहोत , दोघेही या आणि इथे बसा, मी आलेच

अमेय-आता हे काय आणखी 

आई - काही नाही तुमच्या दोघांची दृष्ट काढते मीठाने ,असचं आमचं घर समाधानाने आणि आनंदाने भरून राहू दे , असं म्हणत तिने दोघां वरूनही मीठ ओवाळून टाकलं.

बाबा -चला आता जेवायला ,मला तर खूप भूक लागली आहे 

अमेय-उद्या आपण सगळे बाहेर जेवायला जाऊ

आई- अरे नको ,तुम्ही दोघं जा ,हा क्षण तुम्ही भरभरुन जगा ,मनात साठवून ठेवा ,तू माझ्या पोटात असताना मलाही असं करावस वाटत होतं,पण एकत्र कुटुंब असल्यामुळे नाही करता आलं ,माझ्या वाटचही चंचल तू जग,त्यातच मला आनंद आणि तसही आम्हाला बाहेरच जेवण जमत नाही.

अमेय-बरं ठीक आहे

चंचल-नाही आई तूम्हीही चला आणि तुम्हीही आजी होण्याचे क्षण जगा ,प्लीज चला ना

आई -बरं बाई,पण तुम्ही तुम्हांला जे हवं ते खा ,आम्ही आमच्या पथ्यानुसार 

चंचल- हो ,चालेल की,चालेल काय पळेल 

अमेय- माझं नाही ऐकलं तिचं बरं ऐकलं 

आई- अरे आता तिला आनंदी ठेवायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि हो चंचल इथून पुढे तू वेळेत जेवत जा . सगळ्यांसाठी थांबण्याची काही गरज नाही.

चंचल- हो ,आई

सगळे आनंदात जेवले आणि झोपायला गेले. झोपताना चंचलला लग्न ठरल्यापासून आतापर्यंतचे सगळे दिवस आठवत होते,कशी ती या कुटुंबात  सामावून गेली ,साखर जशी दुधात मिसळल्यावर दूध गोड लागते ,अगदी तसचं ती सगळ्यां बरोबर इतकी छान मिसळली होती आणि आता तर संसारात एका नव्या पाहुण्याच्या आगमनाने त्यांच्या आयुष्यात एक गोडवा निर्माण झाला होता . चंचलच्या मनात परत गाण्याने ताल पकडला होता,फुलले रे क्षण माझे फुलले रे . या क्षणापर्यंतचा चंचलचा प्रवास आपण पुढील काही भागातून अनुभवूया...

काय मग आहात ना तयार अनुभवायला, मग वाचत राहा , हसत राहा

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all