Login

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 24

Sometimes don't think about your age ,just enjoy the moments

फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 24

लग्न झाले,आता परत रोजचं रूटीन सुरू झालं,पुढच्या महिन्यात आईचा आणि चंचलचा वाढदिवस होता , दोघींच्या वाढदिवसात एक आठवड्याच अंतर होतं ,चंचलने अमेयला आईच्या वाढदिवसाबद्दल विचारलं,तर त्याने सांगितल,तिला केक कापायला आवडत नाही,जेव्हा पासून आम्हाला कळायला लागलं,तेव्हा पासून ती आमच्या सर्वांच्या समाधानासाठी काहितरी घरीच गोड बनवते. 

अमेय-मग तुझ्या डोक्यात काही प्लान आहे का 

चंचल- आहे ,पण तो शक्य आहे का ,ते पाहते ,तुला उद्या सांगते 

अमेय-जशी तुमची इच्छा,तुझ्या वाढदिवसाला कुठं तरी बाहेर जाऊ हवं तर,चालेल ना 

चंचल-असंही दोन महिन्यांनी आपला लग्नाचा पहिला वाढदिवस आहे,तेव्हा आपण जाऊ ना कोठे तरी दोन तीन दिवसांसाठी,आता नको ,तू नको टेन्शन घेऊ ,मी सांगते ना उद्या सांगते.

अमेय-बरं राणी सरकार ,सांगा मग उद्या या पामराला 

चंचल-जास्तच नौटंकी सुचते ,कधी कधी तुला 

अमेय-तुला नाही छळणार ,तर कुणाला छळणार,हक्काची बायको आहेस माझी

चंचल-अगदी बरोबर,झोपा आता 

असं म्हणत दोघेही झोपच्या अधीन होतात.

-------------------------------------------------------

चंचल-रेखा तुम्ही मागे एकदा सगळी फैमिली मिळून कुठल्या तरी रिसॉर्टला गेल्या होतात ना 

रेखा - का ग्ं असं अचानक 

चंचल-काही नाही गं,मी पण विचार करत आहे ,फैमिली पिकनिकचा ,बघू कसं जमतय्ं 

रेखा-पनवेलच्या पुढे आहे ,आम्ही पस्तीस जण होतो ,तर 25%

डीस्काउंट दिला होता त्याने ,तुम्ही किती जण आहात 

चंचल- आधी रिसॉर्ट मध्ये फोन करून विचारते ,त्यानुसार सगळ्यांना फोन करुन विचारते ,मग कळेल किती जण होत आहेत

चंचलने रिसॉर्ट वाल्याशी बोलणं केलं ,त्यानी सांगितल तीस पेक्षा जास्त लोकं असतील तर सहाशे पन्नास रुपये एका माणसा साठी त्यात सकाळचा नाश्ता,दुपारचे जेवण,संध्याकाळी निघताना परत चहा ,नाश्ता ,पाण्यातील सगळ्या राइडस फ्री आणि बुक करायचं ठरवलं तर कसं करायचं

रिसॉर्ट मैनजर-एक दिवस आधी कळ्वाव लागेल आणि बुकिंग साठी  कमीत कमी पाच हजार ऑनलाईन द्यावे लागतील.

ती ठिक आहे,म्हणून फोन ठेवते . मग सगळे मामा ,मावशी , नंदा सगळ्यांना फोन करून माहिती देते आणि सांगते की , दोन दिवसात तुमचा विचार कळवा. एकच दिवसाचा प्लान असल्यामुळे सगळे हो म्हणतात , मोठ्या मामांनी तर पुढाकार घेतला,म्हणून कौतुकही केलं ,पिकनिक साठी रविवार ठरवण्यात आला , प्रत्येकाकडे गाडी होती ,त्यामुळे गाडी करण्याची गरज नव्हती,ज्यांच्या कडे गाडी नव्हती त्यांची कुठे ना कुठे बसायची व्यवस्था झाली. एक दिवस आधी चंचलने अमेयला सांगून पाच हजार ऑनलाईन रिसॉर्टवाल्याला दिले.

  आता पिकनिकला जाताना तुम्हाला दिलेली कपडे घाला ,असं फर्मान चंचलनी काढलं,तसे ते दोघे हो म्हणाले ,चंचल आणि अमेयला एक दिवस ऑफिस मधून यायला उशीर झाला होता,आल्यावर त्यांनी आईं साठी अजून एक साधा ड्रेस ,बाबांसाठी हाफ पँट,टी शर्ट आणि दोघांसाठी गॉगल आणले होते,ते पाहून दोघे म्हणाले ,तुम्ही दोघं काही आमचं ऐकणार नाही,होऊ द्या तुमच्या मनासारखं.

--------------------------------------------------------

चंचलच्या वाढदिवसाच्या दिवशी ती नाही म्हणाली ,तरी आई बाबांनी केक आणला आणि रात्री बाबांनी तिच्या वाढदिवसा निमित्त सगळ्यांना पार्टी दिली ,अमेयने तिला छानसं घड्याळ दिलं,तिने लगेच आवडीने हातात घातलं,तिला पाणी पुरी आवडायची,त्या भैयाकडे जाऊन ऑफिस मधून येता येताच खाऊ घातली आणि आई बाबांसाठी पण पार्सल घेतले.

आता सगळ्यांनाच पिकनिकचे वेध लागले होते.पिकनिकचा दिवस उजाडला,बाबांनी पँट शर्ट आणि आईंनी ड्रेस घातला ,दोघांनी एकमेकांकडे पाहत छान असं म्हटलं,नेमकं ते चंचलने पाहीलं आणि म्हणाली ,काय मग तयार आहात एन्जॉय करण्यासाठी.

आई-ह्यांच ठिक आहे गं,पण सगळे मला बघून जास्त हैराण होतील आणि जावयांसमोर पहिल्यांदाच घालतेय ,तर कसं तरी वाटतय

चंचल-अहो आई ,कार्यक्रम नाही काही ,आपण पिकनिकला चाललोय,कोणी काही म्हणणार नाही ,घ्या तुम्ही दोघे गॉगल घाला ,मी सेल्फी काढते सगळ्यांचा 

चौघे गॉगल घालून उभे राहतात ,चंचल सेल्फी काढते आणि लगेच फैमिली ग्रुप वर टाकते ,रेडी फॉर पिकनिक ,दोन तीन मिनिटांत बरेच लाइक्स येतात .

सगळ्यांनी निघताना एकमेकांना कॉन्टैक्ट केले होते ,सगळे बेलापूरला  येऊन उभे राहिले ,सहा गाड्या होत्या,अमेयची गाडी पुढे ,सगळे त्याच्या मागे होते,चंचलनी जीपीएस लावलं,त्या प्रमाणे सगळे त्यांच्या मागून येत होते.एकदाचे शिवगंगा रिसॉर्ट आले ,सगळे खाली उतरले ,चंचल आणि अमेय ऑफिस मध्ये जाऊन बुकिंगची कल्पना देऊन आले .

सगळ्यांनी आपापल्या माणसांप्रमाणे पैसे अमेय कडे दिले ,तो उरलेले पैसे देऊन आला ,त्या सगळ्यांसाठी दुसरे गेट उघडले,आत जाताना प्रत्येकाच्या हातात बँड लावले,मग सगळे इकडं तिकडं बघत कँटीन मध्ये नाश्ता करायला पोहोचले ,आतल्या साइडला मोठ मोठे शेड उभारले होते ,त्यात बाजा टाकल्या होत्या , त्यातल्या एका शेडवर चंचल आणि ग्रुप ची पाटी लावली होती.

सगळे तिथे आत जाऊन बैग ठेवल्या ,काहींना पाण्यात जाण्यासाठी कपडे बदलायचे होते ,काही घालून आले होते , तिथेच जवळ  चेंजिंग रूम होती ,सगळ्यांनी आप आपले सामान ठेवायला लॉकर घेतले आणि आता सगळे पाण्यात उतरले ,काही लहान मुलांना खेळवत होते ,येताना बॉल आणला होता,सगळ्यांनी पाण्यात ऊभं राहून गोल केला आणि बॉल पासिंगचा गेम खेळत होते,काही वेळाने सगळे स्लाइड कडे गेले ,प्रत्येक जण स्लाइड करत होते ,कुणी ना कुणी तरी फोटो काढत होते.

आता रेन डान्सची अनाऊन्समेंट झाली ,तसे सगळे तिकडे पळाले,आई बाबा एकत्र डान्स करत होते ,गाणं लागलं होतं,लैला मैं लैला ,आई चांगल्याच रंगात येऊन डान्स करत होत्या आणि बाबा साथ देत होते , सगळ्यात छोटे मामांनी त्यांच नामकरणही करून टाकलं,लव्ह बर्डस,आई आणि बाबा दोघेही खूप एन्जॉय करत होते ,आता सगळी तरुण मंडळी मोठ्या स्लाइड कडे गेले ,तिथेही दोघं दोघं स्लाइड करत होते , सगळे खूप एन्जॉय करत होते ,या सगळ्यात अडीच कधी वाजले समजलेच नाही ,आता सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते,काहींनी चेंज केले ,पण काही तसेच ओल्या कपड्यांवर तसेच जेवायला बसले , जेवणानंतर आइस्क्रीम पण होती ,सगळे गप्पा मारत एकमेकांची खेचत सगळ्या गोष्टींचा आनंद लुटत होते. आता मोठ्या लोकांनी सगळ्यांनी चेंज केले आणि आपल्या शेड मध्ये येऊन गप्पा मारत बसले ,त्या शेडच्या जवळ फ्री मध्ये बर्फाचा गोळा आणि पॉपकॉर्न होते ,जस जसे माहित पडत होते,सगळ्यांनी त्या दोन्ही गोष्टींचा आनंद लुटला,अजुनही तरुण मंडळी पाण्यातून बाहेर आली नव्हती , त्यांचा जोश कायम होता . चंचलला पुढे खेळ सुरु करायचे होते म्हणून ती पाण्याबाहेर आली आणि सगळ्यांना चेंज करून शेड मध्ये गोळा व्हायला सांगितले .

सगळे चेंज करून आले ,तसे बसायची व्यवस्था चेंज करण्यात आली,सगळ्या बाजा साइडनी लावल्या आणि मधली जागा मोकळी करण्यात आली.

आधी सगळ्या मोठ्या माणसांच्या जोड्यांचे खेळ घेतले ,त्यांना एकमेकांबद्दल प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरे द्यायला सांगितली ,त्यात आई बाबा पहिले आले आणि मोठे मामा मामी दुसरे आले ,आता तरुण जोड्यांना पेपर देण्यात आला ,त्यावर ऊभं राहून डान्स करत राहायचं,जो पेपरच्या बाहेर जाईल किंवा डान्स करायचा थांबेल तो आऊट. घडी अजून बारीक  बारीक होत होती आता एक पाय बसेल ,एवढीच घडी होती ,अमेय एक पाय वर धरून,एक पाय कागदावर आणि मागे पाठीवर चंचल असं करून नाचत होते ,दुसरी जोडी छोटे मामा आणि मामींची होती ,मामाच्या पायावर पाय ठेऊन मामी उभ्या होत्या आणि दोघांनी आपला एक एक पाय उडवत डान्स करत होते ,इकडे चंचलनी दोन्ही हातांनी अमेयला धरल्यामुळे तिला नाचता येत नव्हते , मग काय छोटे मामा ,मामी जिंकले . लहान मुलांसाठी सगळ्या खायच्या वस्तू ठेवल्या होत्या,त्यांच्याकडे रिंग दिली ,ज्या वस्तूवर रिंग पडेल,ती वस्तू त्यांची , या सगळ्यात सहा कसे वाजले ,ते कळालंच नाही ,सगळ्यांनी आपापल्या बैग घेतल्या आणि नाश्ता आणि चहा प्यायला कँटीन मध्ये गेले ,कारण रिसॉर्ट मधला माणूस त्यांना सांगायला आला होता की ,आता बंद व्हायची वेळ झाली आहे,शेवटी जड अंत:करणानी सगळे निघाले ,चहा नाश्ता झाल्यावर सगळे येताना ज्या गाडीत होते ,त्या गाडीत जाऊन बसले ,सगळ्यांनी आपापल्या मोबाईल मधील फोटो गाडीत बसल्यावर ग्रुपमध्ये टाकले ,काही बोलले घरी गेल्यावर टाकतो ,पाण्यात खेळल्यामुळे सगळेच थकले होते ,आता सगळ्यांच्या स्टेटसला दोन तीन दिवस पिकनिकचे फोटो झळकत राहणार यात कोणतीही शंका नव्हती.

घरी पोहोचल्यावर प्रत्येकाच्या घरी किती मजा केली हाच विषय होता.

आई-चंचल आज तुझ्यामुळे पहिल्यांदा आम्ही रिसॉर्टला गेलो आणि खूप मजा आली ,नाहीतर इथून मागे आमचं फिरणं म्हणजे देवधर्म करणे हेच होते. आज तुझ्या हट्टासाठी आम्ही हे जगही अनुभवले .

बाबा-हो पोरी ,याआधी आम्ही इतकं स्वछंदी कधीच जगलो नाही आणि आज सगळ्यांच्या तोंडी आमचा झालेला कायापालट हाच सगळ्यांच्या तोंडातला विषय होता,सगळी व्यवस्था पण तू छान केली होती.

अमेय-सुनेच्ं एवढं कौतुक आणि लेकाचं काय

चंचल-काहीतरी जळाल्यासारखा वास आला का,एक माणूस जळतय 

अमेय-असं काही नाही,याआधी मी ह्या दोघांना ,चला म्हटलेलो,विचार हवं तर, पण ते माझं कशाला ऐकतील,लाडक्या सुनेचे ऐकणार ना

बाबा-असं काही नाही,तू आम्हाला म्हणायचा ,आम्ही नाही म्हटलो की ,तू तुझा मित्रां बरोबर निघून जायचा ,इथे डायरेक्ट बुकिंग केलेलच दाखवलं,त्यामुळे नाही म्हणता नाही आलं,की ज्यामुळे नेहमी पेक्षा काहीतरी वेगळं केल्याचा आनंद मिळाला

चंचल-थोडं फ्रेश होण्यासाठी नेहमी पेक्षा थोडसं काहीतरी वेगळं करावं आणि मला माहित होतंं की ,तुम्ही नाही म्हणाल,तिकिट हातात दिलं तर निदान भरलेले पैसे वाया जाऊ नये म्हणून याल,मनात ही खात्री कुठे तरी होती आणि त्या प्रमाणेच झालं.

अमेय-हे मात्र अगदी खरं आहे तुझं म्हणणं,जास्त पैसे खर्च होतील म्हणूनच हे दोघे नाही यायचे आणि आज आले त्याचे कारण तू बरोबर सांगितले.

बाबा -अरे आपण मध्यम वर्गीय माणसं प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो,जर आम्ही असचं वागलो असतो तर तुमची सगळ्यांची शिक्षण आणि लग्न राहून गेली असती .

अमेय-सगळं खरं आहे तुमचं,पण आता आम्ही दोघे कमावतो,एवढी मजा तर करू शकतो.

चंचल- आम्हांलाही माहित आहे की ,तुम्ही किती चिकाटीने संसार केला आहे ,पण थोडासा असा चेंज मिळाला की,पुढे काम करायला अजून हुरुप येतो.

बाबा - हे मात्र अगदी खरं बोलली

आई-मी आता थोडीशी डाळ भाताची खिचडी करते ,सगळे जेवा आणि लवकर झोपा ,कारण उद्या ऑफिस आहे ,लक्षात आहे ना 

चंचल- हो ,मी तो पर्यंत ओली कपडे धुऊन वाळत घालते.

पुढे काय काय होते हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,हसत रहा ,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.

क्रमशः 

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all