
फुलले रे क्षण माझे फुलले रे-भाग 10
अमेय गेला आणि ती घरात जाऊन आली ,तसं ती बाथरूममध्ये जाऊन आली ,तिला आता टेन्शन आले की,आता ही गोष्ट अमेयला कशी सांगायची हा प्रश्न बिचारीला पडला. किती स्वप्न पाहिली असतील त्यानी ,त्याच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरेल आणि हे सांगितल्यावर तो ही गोष्ट कोणत्या पध्दतीने घेईल आणि माझ्या बद्दल काय विचार करेल हा विचार करून तिचं डोकं सुन्न झालं . ती आईला म्हणाली ,मस्त आल्याचा चहा कर ना ,डोकं दुखतंय थोडं
मंगेश-म्हणजे तुला डोकं आहे तर
चंचल- तू गप रे ,काही पण बोलत असतो
दिप्ती-ताई तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे
मंगेश-गप ग ताईची चमची ,तुला त्यांनी मनासारखा ड्रेस घेतला तर लगेच तिची चमचागिरी करते का?
दिप्ती-तसं काही नाही ,पण ते सगळेच खूप चांगले आहे,हवं तर मावशीला विचार
आई-बस करा रे तुमचं ,काय लहान मुलांसारखे भांडताय
मंगेश-नाही ग अशीच मजा घेत होतो ,आता परत थोडी ना ती लवकर भेटणार आहे,मस्करी करायला ,पण जिजू बाकी एकदम रॉयल भेटले आपल्याला ,तो थोडा भावनाविवश होऊन बोलला.
आई- हं ,तेही खरंच म्हणा , किती जीव लावला तरी मुली
दुस-यांच्या घरात जातात हीच समाजाची रीत आहे.
चंचल-आई मला जरा पाण्याची पिशवी गरम करुन दे ना
आई- का ग ,काय झालं
चंचल- काही नाही ग ,महिन्याचं दुखणे दुसरं काय
आई -मी येते घेऊन,तू झोप जरा
चंचल जाऊन झोपते,आई पिशवी घेऊन येते .
आई-अगं पण तारखेला अजून आठ दिवस होते ना,हे अचानक कसं काय?
चंचल- कदाचित लग्नाची धावपळ आणि नीट झोप नाही झाली म्हणून तर झालं नसेल
आई-होऊ शकतं
चंचल-अगं मी इथून गेल्यावर फिरायला जायचे होते ,आता रद्द करावे लागेल,पण अमेयला कसं सांगायच ते कळत नाही
आई-मी सांगते हवं तर,तुझ्या सासुबाईंना,ह्या गोष्टी काही आपल्या हातात नसतात ,पण हे एक बरं झालं की ,देवाच्या कार्यात काही विघ्न नाही आलं ,नाही तर शंकेला कारण.
चंचल- मीच करते आईंना फोन ,त्या सांगतील अमेयला
आई-बरं बाई
चंचल फोन लावते .
चंचल- आई ,चंचल बोलते
अमेयची आई- बोल ,काय करते
चंचल-आई ,महाबळेश्वरला आमचं जायचं रद्द करावं लागेल,मला पाळी आली आहे, ह्यांना कसं सांगाव ते कळतच नाही,तुम्ही सांगाल का?
अमेयची आई- एवढं घाबरु नको ,त्यात तुझी काय चूक,मी सांगते त्याला ,असंही हॉटेल वैगेरे काही बुक केलं नाही ,पण एक बरं झालं देवाचं सगळं व्यवस्थित पार पडलं
चंचल- हो ,आई पण तेच म्हणत होती,तशी माझी तारीख आठ दिवसानंतरची आहे ,कसं काय लवकर आली माहित नाही
अमेयची आई- धावपळीने आणि टेन्शनने होतं असं कधी कधी ,तू नको काळजी करू,मी सांगते त्याला ,तसा तो समझदार आहे.
चंचल-ठेवते मी फोन
अमेयची आई-बरं,बरं
--------------------------------------------------
अमेयची आई- अमेय ,इकडे ये जरा
अमेय- काय झालं
अमेयची आई- तुमचा महाबळेश्वरला जायचा प्लान सध्या रद्द करावा लागेल,चंचलला पाळी आली आहे,तुला कसं सांगाव तिला कळत नव्हतं,म्हणून तिने मला सांगितलं ,अजून नवीन आहात ना तुम्ही दोघे एकमेकांसाठी आणि मला तिच्या बोलण्यातून असं वाटलं की,रद्द होण्यास ती कारणीभूत आहे,मला असं वाटतं,तू तिला फोन करून,तिच्या मनातील ही भावना काढून टाक ,या गोष्टी कुणाच्या हातात नसतं,तसं तिची तारीख आठ दिवसांनी होती ,पण धावपळ आणि कमी विश्रांती घेतल्या मुळे लवकर आली असेल.अजून एक गोष्ट पाळी येणे म्हणजे मातृत्वाला आकार देणे ,त्यामुळे अशा वेळी स्त्रिया चिडचिड करतात ,अशावेळी नव-याने त्यांना समजून घेतलं पाहिजे ,तुला असे वाटेल ,आई मला एवढं का सांगतेय . ती तिच्या आईवडिलांच घर सोडून आपल्या घरी येत आहे ,आपण जर तिला आधार दिला तर तिला आपल्या घरात रुळायला वेळ लागणार नाही. ही तुझी जबाबदारी आहे.
अमेय-हो आई ,तू म्हणशील तसचं होईल आणि आता तर आम्ही नवरा बायको आहोत ,त्यामुळे मी तिच्या बरोबर नेहमीच असेल.
अमेयची आई- मला तुझ्याकडून हिच अपेक्षा होती.
अमेय - मी थोड्या वेळाने करतो तिला फोन आणि असही माझ्या मित्राच्या फार्म हाऊस वर जाणार होतो ,मग पुढची
बुकिंगची तारीख किती सांगू त्याला
अमेयची आई- आता चंचल आल्यावर आपण मुंबईला जाऊ , तिथे घर बरेच दिवस बंद आहे ,साफ सफाई होईल,चंचलला मिळालेली ,जी भांडी नको आहे ,ती बांधून ठेऊ ,तुला सुट्टी कधी पर्यंत आहे .
अमेय-अजून एक आठवडा
अमेयची आई- मग तिकडूनच जा महाबळेश्वरला, अजून दोन दिवस सुट्टी मिळते का बघ म्हणजे तुमचे फिरणे पण होवून जाईल.
अमेय-बघतो ऑफिस मध्ये फोन करून काय म्हणतात सुट्टीच
अमेयची आई- तसं तुला काही वाटल्ं तर बाबांना बोलायला सांग तुझ्या साहेबांशी ,कसं आहे ना हे दिवस परत येत नाही.
अमेय-तुम्ही गेला होतात का कुठे
अमेयची आई- कसलं काय,लग्न झालं,तुझ्या बाबांनी लगेच मुंबईला नेलं,दोन जण बसू शकतील एवढीच खोली ,त्यातच ऐडजस्ट केलं आणि त्या काळी असं काही नव्हतं, पण आता तुम्हाला आहे तर जाऊन या ,आता आमच वय झालं . तुम्हाला सगळ्यांना मोठं करण्यात ,पोरींची लग्न करण्यात आयुष्य निघून गेलं ,आता तरी निदान तुझ्या हट्टासाठी आम्ही दोघे निदान देव दर्शनाला तरी जातो.
अमेय-बाबांना पण फिरायला खूप आवडते
अमेयची आई- हो ,पण इतके दिवस पैशाअभावी शांत बसायचे ,त्यांची एकदा विमानात बसायची हौस तेवढी पूर्ण कर बाबा .
अमेय-हो आई ,माझ्या लक्षात आहे ,आता हे लग्नाचे पैसे थोडे क्लीयर झाले की ,मग तुम्हाला दोघांना कुठंतरी पाठवेन
अमेयची आई- आता पहिलं तुम्ही जा ,एन्जॉय करा, आमचं नंतर बघू ,नाहीतर सुनबाई म्हणायची यांना म्हातारचळ लागलाय.
अमेय-असं काही नाही म्हणणार ती.
अमेयची आई- झालं ,लागला का बायकोची साइड घ्यायला
अमेय-आता तू एवढं समजून सांगितल्यावर घेणारच ना ,असं हसून म्हणाला .
अमेयची आई- असचं खुश राहा.
------------------------------------------------
अमेय रात्री चंचलला फोन लावतो.
अमेय-काय करतेस
चंचल- काही नाही
अमेय-काही सांगायच आहे का तुला
चंचल-तुला आईंनी सांगितलं का ,मला खरचं खूप वाईट वाटतय
अमेय -तसं काही नाही ,आता आपण नवरा बायको आहोत , तर आता प्रत्येक गोष्ट आपण शेअर केली पाहिजे ,मला तीन बहिणी आहे ,त्यामुळे या सगळ्या गोष्टींची मला कल्पना आहे,तू असं काही वाटून घेऊ नकोस
चंचल - तुझ्याशी बोलल्यावर बरं वाटलं
अमेय-बरं आता प्लान मध्ये थोडासा बदल झाला आहे,आपण तू आल्यावर मुंबईला जाणार आहोत ,दोन तीन दिवस घरातलं उरकून मग आपण महाबळेश्वरला तीन चार दिवसांसाठी जाणार आहोत ,मग खूश ना.
चंचल -तू नाहीस का खूश
अमेय -आहे ना,तू तुझी काळजी घे आणि इथून पुढे काहीही प्रोब्लेम असेल तर तू मला बिनधास्त सांगू शकते.
चंचल-हो पती महाराज
अमेय- हे काय असं महाराज वैगेरे मला म्हणू नको ,अमेय म्हण
चंचल- हो पतीदेव
अमेय-आता तर देव करून टाकलं,देवालाच देव राहू दे ,मला देव नको बनवू ,मी माणूस म्हणून अमेय ठिक आहे
चंचल-हो अमेय ,पण घरात सगळ्यांसमोर अहो चालेल ना
अमेय-हो ग माझी राणी
चंचल- आणि तू माझा राजा
अमेय- कधी येणार आहेस
चंचल-आईंनी परवा यायला सांगितल सकाळी
अमेय-तुझं सगळं सामान व्यवस्थित घेऊन ये ,त्याच दिवशी दुपारी मुंबईला जाणार आहोत
चंचल- हो आईंनी सांगितल
अमेय- सासू सुनेच चांगलच गणित जमलय,आम्हाला दोघांना वजा नका करु म्हणजे झालं
चंचल-सगळे मिळून गणित सोडवू
अमेय-हे बरोबर बोलली ,मी एकटाच आहे त्यामुळे आपल्याला आपल्या नात्याला वेळ देऊन त्यांनाही थोडा वेळ द्यावा लागेल.
चल करेल उद्या फोन.
चंचल- बाय,गुड नाईट ऐण्ड लव्ह यू
अमेय-गुड नाईट ऐण्ड 143
ती खुदकन हसून फोन ठेवते.
-----------------------------------------------------
चंचलने तिला न्यायचं सामान रात्रीच भरून ठेवलं होतं,जेवल्यानंतर सगळे बसले होते,तेव्हा आजीने चंचलच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या ,तसं तिच्या डोळ्यांत पाणी आलं,तसं आजी म्हणाली ,छान हौशी सासर मिळालं आहे,छान हौस पुरवून घे आणि सगळ्यांना जीव लाव . इथं नाकाच्या शेंड्यावर जो राग येतो ना,जाताना तो शेंडा इथेच ठेवून जा ,तुझी सासू चांगली आहे ,तुला मुलगी म्हणते ,त्याचा गैरफायदा घेऊ नको ,सुनेची सगळी कर्तव्य पार पाड आणि काही दिवस नको जॉब करु ,म्हणजे घरातल्या सगळ्या गोष्टी तुला समजतील आणि गावी पण सणावाराला यावं लागेल . मग एकदा का जॉब जॉईन केला की त्यातून सुटका नाही.
चंचल- हो ग आजी ,मी करेल सगळं व्यवस्थित,तू नको काळजी करू.
चंचलची आई-अगं आमचं सांगायच काम आहे ,सासरच्या लोकांनी लेकीच्ं कौतुक केलं की,आईबापाचं मन भरून येतं आणि अभिमान वाटतो की ,आपण चांगले संस्कार केले याचा.
चला झोपा आता सगळे,उद्या सकाळी हिला नेऊन सोडायचं आहे,तर उठून शिदोरी द्यावी लागेल बरोबर.
सगळे झोपायला जातात ,दिप्ती चंचलच्या शेजारी झोपते.
दिप्ती-ताई मला तुझी खुप आठवण येईल
चंचल-मग ये आमच्याकडे राहायला आठवण आली की
तसं दोघींचही मन भरून आलेल असतं,दोघी काहिच बोलत नाही आणि झोपून जातात.
दुस-या दिवशी सकाळी मंगेश चंचलला सोडवायला जातो,तिला पाहून अमेयचा चेहरा खुलतो.
त्याचा चुलत भाऊ त्याला म्हणतो,आज कळी खुलली नाहीतर दोन दिवस सुकली होती,यावर सगळेच हसतात.
मंगेश चहा घेऊन घरी जातो आणि अमेयला सांगतो,मुंबईला पोहोचल्यावर फोन करा.अमेय ,हो बोलतो.
सगळ्या सामानाची बांधाबांधी झालेली असते ,जेवण झाल्यावर सगळे मुंबईला निघणार असतात .
जेवण झाल्यावर सगळं सामान टेम्पोत भरून आणि काही सामान गाडीच्या डीक्कीत टाकून मंडळी मुंबईला रवाना होतात.
क्रमशः
रुपाली थोरात