सिद्धी भुरके ©®
नेहाची सकाळी सकाळी ऑफिसला जायची गडबड चालू होती. भरभर सगळी कामं करत होती. उभ्या उभ्याच नाश्ता करून तिने पटकन जेवणाचा डबा भरला आणि बॅग घेऊन निघाली ती. तितक्यात नेहमीप्रमाणे सासूबाईंनी बडबड सुरु केली..
"हे काय माझ्या एकटीचं आहे का??? हे देव काय मी माझ्या माहेरून आणलेत का?? कोणी आपलं समजून कधी काय करत नाही या घरात... संध्याकाळी एवढं चैत्र गौरीचं हळदी कुंकू आहे पण त्याचं कोणाला काय पडलं नाहीये.. जरा म्हणून मला कोणाची मदत नाहीये.. " जोशी काकू बडबडत होत्या.
नेहाने ते सगळं ऐकून न ऐकल्यासारखं केलं.. स्वतःची बॅग उचलली आणि काही न बोलता ऑफिसला निघून गेली.
जोशी काकू तिच्याकडे थक्क होऊन बघत बसल्या.
नेहा अशी का वागत आहे त्यांना काही समजत नव्हतं. तिला या घराशी काही घेणं देणं नाहीये असं का वागतीये नेहा?? बास दोन वेळेचा स्वयंपाक करायचा आणि बाजूला व्हायचं.. घरात काय चालू आहे काय नाही याच्याशी संबंध नसल्यासारखं वागायला काय झालंय नेहाला? हे काकूंना काही केल्या समजत नव्हतं.
जोशी काकूंनी घराकडे एक नजर फिरवली. कितीतरी कामं बाकी होती. दारावर तोरण लावणे, दारात रांगोळी काढणे, स्वच्छता करून चैत्र गौरीची सजावट करणे एक ना अनेक कामं बाकी होती.. हे सगळं आता वाढत्या वयामुळे काकूंना एकटीने करणं शक्य नव्हतं.
हॉलमध्येचं खुर्चीवर बसलेल्या मीनाआजी म्हणजे जोशी काकूंची सासू हे सगळं शांतपणे बघत होत्या. त्यांना काकूंच्या मनाची घालमेल लक्षात आली होती.
इथे ऑफिसमध्ये पोहोचल्यावर नेहाने पहिल्यांदा आपल्या आजेसासूला म्हणजे मीना आजींना फोन लावला.
"हॅलो.. आजी.. मला फार वाईट वाटतंय हो.. हे असं मी किती दिवस वागू?? आज तर असं न ऐकता निघून येणं ऑफिसला यावरून काय विचार करतील आई माझ्याबद्दल..?? " नेहा म्हणाली.
"झालं.. आज नाटकाचा शेवटचा अंक आहे.. मग सगळं ठीक होणार आहे .. काळजी नको करू.. ठरलंय तसं कर.. "
म्हणून मीना आजींनी फोन ठेवला.
नेहा अस्वस्थ होऊन गेल्या काही दिवसात घडलेल्या गोष्टींचा विचार करू लागली.
नेहाच्या लग्नाला आता दोन वर्ष झाली होती. तरी सुद्धा तिला घरात सून म्हणून स्थान मिळालं नव्हतं. अर्थात जोशी काकू काही तिचा छळ करत नव्हत्या.. आणि नेहा अमितचं लग्नं काही प्रेम विवाह पण नव्हता. काकूंनी पसंद करून खूप हौशेने नेहाला घरी आणलं होतं. पण जेंव्हा नेहा घरात काही नवीन गोष्ट करायची तेव्हा मात्र जोशी काकूंचा त्यावर आक्षेप असायचा. चहा साखरेचे डबे बदलायचे नाहीत.. चमचे असेच ठेवायचे..त्यांना स्वयंपाघरात कोणताच बदल मान्य नव्हता..' माझं किचन माझा ओटा.. 'असं त्यांचं चालू असायचं. आपल्याकडे अशा भाज्या केल्या जातात.. नेहमी नेहाला सांगत.. आणि नेहाने वेगळ्या पद्धतीने केलेला पदार्थ त्यांना आवडत नसे. नेहाने एकदा छान हॉल आवरून थोडे बदल करून त्यात गोष्टी ठेवल्या.. तर अगं हे इथं चांगलं दिसत नाही वगैरे म्हणून पुन्हा त्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळं आवरलं.. नेहाला काही फार छान रांगोळी काढता यायची नाही, पण एक दिवस प्रयत्न करून तिने हळदीकुंकवाच्या दिवशी रांगोळी काढली आणि सगळी सजावट पण केली.. मात्र सगळा कार्यक्रम झाल्यावर काकू तिला म्हंटल्या "अगं आज सगळ्या मैत्रिणी मला म्हणत होत्या कि तुझी रांगोळी इतकी खराब कशी आली ?? आणि सजावट पाहून बोलल्या आज तुझा टच नाहीये यात हे जाणवतंय.. " नेहाला फार वाईट वाटलं..
आपण स्वतःहून काही केलं तर आईंना आवडतचं नाही.. त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध केलेलं पटत नाही.. कधी त्या माझ्या नव्या गोष्टींचा स्वीकार करणार..?? म्हणून एकदा नेहाने मीना आजींकडे आपलं मन मोकळं केलं.. "आजी मला काय या घराचा कायापालट करायचा नाहीये पण थोडा फार बदल केला किंवा माझ्या आवडीची वस्तू ठेवली तर आईंना ते पटत नाही.. मला आता हे घर माझं वाटत नाहीये.. सासूच्या घरात राहतीये मी.. "म्हणत नेहा रडू लागली.
आजींच्या सगळा विषय लक्षात आला, त्या धीर देत नेहाला म्हणाल्या, "तुझी बाजू समजतीये मला.. अशाने घर तुटतं आणि मग तुम्ही सूना वेगळ्या राहता.. हे घर तुटू नये म्हणून माझ्याकडे एक उपाय आहे.. पण तुला अगदी मन खंबीर ठेवून वागावं लागेल... "
"काय वागायचं आहे मला??? "नेहाने विचारलं.
"हळू हळू घरातलं लक्ष कमी कर.. दोन वेळचा स्वयंपाक आणि ऑफिस एवढच तुझं जग ठेव.. कोणतीही आवरा आवर...कोणताही बदल करू नको, सणावाराला जेवढ्यास तेवढं करून बाजूला हो.. "आजी म्हणाल्या.
त्यानंतर नेहा मीना आजींनी सांगितल्याप्रमाणे वागू लागली. सुरवातीला जोशी काकूंना बरं वाटलं. नेहा काही गोष्टी बदलायला जात नाहीये बरं झालं.. पण काही दिवसांनी त्यांच्या अंगावर कामाची जास्त जबाबदारी पडायला लागली.
जोशी काकू 'माझं किचन माझा ओटा 'म्हणायच्या म्हणून नेहाने तिकडची आवराआवर, साफसफाई बंद केली, हॉल मधील शो केस मध्ये छान पद्धतीने वस्तू मांडणे सोडून दिले, दारात जमेल तशी रांगोळी काढणे सोडले आणि आज चैत्र गौरीच्या हळदीकुंकू समारंभाची तिने काही तयारी केली नाही.
अचानक ऑफिसमधला फोन वाजल्याने नेहा भानावर आली.. आणि पुन्हा ऑफिसचं काम करू लागली.. आज ती ऑफिसमधून लवकरच घरी जाणार होती पण ती जोशी काकूंना काही बोलली नव्हती.
इथे घरात मीनाआजींनी जोशी काकूंची अवस्था बघून त्यांना जवळ बोलवलं..
"सुनबाई.. जरा इकडे ये.. काय झालंय?? चेहरा का पडलाय तुझा?? " आजींनी विचारलं.
"काही नाही सासूबाई... कामं भरपूर आहेत ना.. म्हणून जरा थकवा आलाय.. "जोशीकाकू म्हणाल्या.
"कामाचा विचार चालूये कि नेहाच्या वागण्याचा??? " आजींनी विचारलं.
आजींचा प्रश्न ऐकून काकू गोंधळल्या...आणि त्यांचा बांध सुटला आणि त्या पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या, "हो बघा ना सासूबाई.. ही नेहा का असं वागतीये समजत नाहीये.. तिला हे घर आपलं वाटतचं नाहीये.. मी कशात कमी पडले?? तिला किती हौशेने घरात आणलं होतं...तिचे सगळे पहिले सण पण किती हौशेने केले मी.. पण त्या बदल्यात ही मुलगी असं का वागतीये??? "
" कमी तू नाही मीचं पडले.. तू नवीन सून म्हणून या घरात आलीस तेव्हा तुझ्यावर या घरातील सगळे नीतिनियम लादले.. तुला काय हवय काय नकोय हा विचार न करताच आमच्या घरात असंच असतं हे तुला नेहमी सुनावलं. तुझ्या मनाचा जरा विचार केला नाही.. अर्थात सुनांचे मन जाणून घायचा तो काळ नव्हता.. मग मी थकले आणि तुझ्या हाती हे घर सोपवले.. पण कितीतरी वर्ष माझ्या धाकाखाली संसार केल्याने तुला आता या घरातली प्रत्येक वस्तू तुझ्या मनाप्रमाणे ठेवायची सवय झाली.. आणि आता त्यात तुला नेहाची लुडबुड नको वाटते... म्हणून तू तिला प्रत्येक गोष्टीत टोकतेस.. तुला वाटतं नेहा आल्यावर तुझा या घरावरचा अधिकार संपेल.. तू जसं माझ्या आज्ञेत राहिलीस, मी सांगेल तसं सगळं केलंस तसं तिने पण करावं.. या सगळ्या परिस्थितीच्या मुळाशी मी आहे.. माझं चुकीचं वागणं आहे.. म्हणून मी आज तुझी माफी मागते, मला माझ्या नातसुनेच दुःख दिसलं पण तुझं नाही.. माफ कर मला सुनबाई.. "आजी जोशी काकूंची माफी मागत होत्या.
"अहो सासूबाई माफी नका मागू.. माझ्या मनात तुमच्या बद्दल काही नाहीये.. खूप आदर करते मी तुमचा.. पण तुम्ही म्हटला तसं मला या घरात नेहाने केलेले बदल पचत नव्हते कदाचित म्हणून मी नकळत तिचं मन दुखावत होते.. आणि ती या घरापासून दुरावली गेली.. आता तिला दोष देण्यात काय अर्थ आहे?? "जोशी काकू म्हणाल्या.
"अगं असं म्हणतात मी या घरची राणी आहे.. पण आपण राणी नसून आई असतो.. पोटच्या पोराप्रमाणे आपण या घराला, इथल्या प्रत्येक वस्तुंना जपतो.. पण कधीतरी आपलं मुलं आईचा हात सोडून चालायला शिकत ना ग.. तसंच आता या घराला नेहाच्या मायेची आणि जिव्हाळ्याची गरज आहे.. चार गोष्टी तिच्या ऐकायच्या.. चार आपल्या सांगायच्या.. तिच्या अंगावर जबाबदारी टाकून तर बघ.. काही चुकलं तर हक्काने सांगायचं आपण.. शेवटी तिचा पण संसार आहे.. तिची पण स्वप्न आहेत.. "आजी म्हणाल्या.
"बरोबर आहे तुमचं सासूबाई.. मला पटतय तुमचं म्हणणं " असं म्हणून काकूंनी आजीला मिठी मारली.
आजींनाही बरं वाटलं.. इतक्या वर्षात त्यांच्या मनात जी सल होती ती नेहाच्या निमित्ताने भरून निघाली होती आणि सासू सुनेच्या नात्याचा वेगळा पैलू त्यांच्या समोर आला होता.
तितक्यात ऑफिसमधून नेहा धावतपळत घरी आली.ज्या पद्धतीने सकाळी ती घराबाहेर पडली होती सकाळी त्यावरून तिला वाटत होते कि आई आता जाम चिडल्या असतील.. ओरडतील मला. तिला दडपण आले होते पण तितक्यात आजींनी नजरेने खुणावून सगळं ठीक आहे असं सांगितले तिचा चेहरा खुलला आणि ती म्हणाली, "आई सांगा.. काय करायचं आहे ते.. मी मदत करायला आलीये.. "
"हो तुला नाही तर कोणाला सांगणार .. हे सगळं तुझंच तर आहे.. तुला हवी तशी तुझ्या मनाप्रमाणे आरास कर.. आणि मी तुला आज मदत करते.. अन ती रांगोळी पण तुझ्या त्या यू ट्यूब वर बघून काढ.. मी रंग भरेन त्यात.. " काकू डोळे पुसत म्हणाल्या.
आता नेहाला पण अश्रू अनावर झाले.. किती दिवस झाले चार आपलेपणाचे शब्द ऐकायला तिचे कान आसुसले होते.. काकूंच्या बोलण्याने तिला खूप छान वाटलं.. तिने पण काकूंना मिठी मारली आणि म्हणाली, "थँक यू आई... "
वाचकहो कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा. आवडली तर like आणि कंमेंट नक्की करा. नावासकट share करायला माझी हरकत नाही. धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा