मैत्रिणीची आठवण

About a friend's rememberance

जीवन जगण्यासाठी जशी श्वासांची गरज असते तशी मैत्रीचीही असते. मैत्री कोणाशीही, कोणत्याही वयाच्या व्यक्तीबरोबर होऊ शकते. तिथे वय, जात, धर्म, पंथ आड येत नाहीत.

आपल्याला भेटणारे सगळेच आपले मित्र होत नाहीत तर ज्यांच्याशी आपले विचार आणि स्वभाव जुळतो तेच आपले मित्र बनतात, आणि मग परस्परात आपुलकी आणि विश्वास वाटू लागला ही मैत्री होते आणि ही मैत्रीची ओढ दोन्हीकडून ही असेल तर मैत्री जीवाभावाची होऊन जाते.

मी अशाच जिवाभावाच्या मैत्रीणी बद्दल सांगणार आहे. ती माझी मैत्रीण म्हणजे माझ्या चुलत सासुबाई इंदुबाई जाधव ( ईंदुमामी) माझ्या सासुबाईंच्या वयाच्या पण त्यांनी मला खुप जीव लावला होता. शेतात जाताना सासुबाईना विचारायच्या वंदना आली आहे का? आणि आली आहे असं समजलं की शेतात जाता जाता म्हैशीला आमच्या अंगणातील नारळाच्या झाडाला बांधून माझी भेट घ्यायला घरात यायच्या. त्यांच्या बोलण्यात माझ्याबद्दल खुप आपलेपणा, माया होती.

अशीच एकदा गावाला गेले होते, दुपारचं जेवण झाल्यावर वामकुक्षी घेत होते, दुपारी फक्त थोडावेळ विश्रांती घेते, झोप लागत नाही पण कशी काय त्यादिवशी झोप लागली होती आणि नेमक्या त्याच वेळी त्या मला भेटायला आल्या, हाका मारल्या पण मला जाग आली नाही, थोडावेळ थांबून निघून गेल्या. या गोष्टीला साधारण दहा वर्षे झाली असतील त्यानंतर त्यांची भेट झाली नाही. मी पनवेलला निघून आले. नंतर माझ्या सासुबाईंनी फोनवरून त्या आजारी आहेत असं सांगितलं, गावाला गेल्यावर त्यांना भेटायला जायचं ठरवलं पण तत्पूर्वीच त्यांच निधन झालं, मला समजले तेंव्हा खूप वाईट वाटले, खुप रडले. ही जिवाभावाची सखी मला आता परत भेटणार नव्हती. ना त्या मला काही देत होत्या ना मी काही त्यांना देत होते , आमच्यात होतं फक्त मैत्र.

अजुनही गावाला गेले की या मैत्रीणीची खुप आठवण येते आणि डोळे पाण्याने भरुन येतात.

© सौ. सुप्रिया जाधव